- Log in to post comments
महाराष्ट्राच्या आधुनिक वैचारिक परंपरेच्या दृष्टिकोनातून बघितल्यास 19व्या शतकाचा उत्तरार्ध हा सुवर्ण काळ होता, असे म्हणावयास हरकत नसावी. त्यातही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार इतक्या वर्षानंतरसुद्धा प्रेरणादायी ठरत आहेत हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आगरकरांनी ज्या पाऊलखुणा उमटवल्या आहेत त्यांचा मागोवा घेतल्यास सामाजिक बांधिलकी मानणार्या आपल्यासारख्या सामान्यांना व/वा सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या आजच्या पिढीतील शेकडो कार्यकर्त्यांना नवचैतन्य लाभेल असे वाटू लागते. आगरकराच्या विचारांचा व विचारसुसंगत कार्याचा मागोवा घेणार्या डॉ. भा.ल. भोळे, तानाजी ठोंबरे आणि डॉ. अशोक चौसाळकर या विचारवंताचे लेख आगरकर विचार या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत. मुळातच हे पुस्तक आगरकरांच्या वर लिहिलेल्या तीन पुस्तिकेंची एकत्रित केलेली आवृत्ती आहे. डॉ. भा.ल. भोळे यांनी लिहिलेले आगरकरांचे धर्मचिंतन, डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेले आगरकरांचे राजकीय विचार व प्रा. तानाजी ठोंबरे यांचे आगरकरांचे सांस्कृतिक व साहित्यविषयक विचार या तीन पुस्तिकेतील लेखामधून आगरकरांची समाज, साहित्य, राजकारण, संस्कृती, धर्मविषयक अशी एक वेगळी प्रतिमा या पुस्तकातून साकार होते. याचबरोबर या पुस्तकाला सामाजिक विषयाचे अभ्यासक असलेले ग. प्र. प्रधान यांची सुदीर्घ प्रस्तावना लाभलेली आहे.
आगरकरानी 1881 ते 1895 या काळात केसरी व सुधारक या पत्रिकांचे संपादक म्हणून मांडलेल्या बहुतेक विचारांची त्याकाळी अवहेलनाच झाली होती. सनातनी वृत्तीच्या, प्रतिगामी विचारांच्या लोकांना आगरकरांचे टीकास्त्र इतके झोंबले की सनातनी समाजाने त्यांचा शक्य तितका छळ केला. परंतु आगरकरांची सत्यनिष्ठा आणि तत्वनिष्ठा अत्यंत प्रखर असल्यामुळे ते यत्किंचितही विचलित झाले नाहीत. सनातन्यावर टीका करतानासुद्धा जनसामान्याबद्दल ते कधीच कठोर नव्हते. म्हणूनच आगरकरांचे राजकीय, सामाजिक व धर्मचिंतनपर विचारांचा मागोवा घेणे आजही इष्ट ठरेल.
आगरकरांच्या धर्माबद्दलचे विचार मांडताना डॉ. भा.ल. भोळे यांनी आगरकरांच्या अज्ञेयवादी भूमिकेचा आढावा घेतला आहे. आगरकरांच्या मते बुद्धीवाद आणि अज्ञेयवाद या एकाच नाण्याचे दोन बाजू असतात. जे बुद्धीने जाणून घेता येत नाही ते अज्ञेय आहे. " जी गोष्ट आम्हाला कळते ती कळते. जी कळत नाही तीही कळते असे आम्ही म्हणणार नाही" बुद्धीवादाचा आग्रह धरताना आगरकरानी कर्मकांड, प्रेतसंस्कार वगैरे रूढी, समजुती हास्यास्पद आहेत, हे दाखवून दिले. धर्मक्षेत्रातील ढोंगीपणावर प्रखर हल्ला चढविला. त्यामुळे त्याकाळातील शास्त्री-पंडितांच्या वर्चस्वाला धक्के बसू लागले. मुळात धर्माचरणाचा उद्देश लोककल्याण हवा, इहवादी हवा. आपल्या धर्माचरणाची व्याप्ती स्वत:च्या घरापुरती मर्यादित ठेवावी,यावर आगरकरांचा रोख होता, असे डॉ. भोळेना वाटते.
आगरकरांची आपल्या समोरील प्रतिमा ही केवळ समाजसुधारक आगरकर अशीच असते. परंतु तानाजी ठोंबरे यानी आपल्याला अपरिचित असलेल्या आगरकरांच्या सांस्कृतिक व साहित्यविषयक विचारांचा परिचय त्यांच्या लेखामधून करून दिला आहे. आगरकर काही काळ फर्गसन कॉलेजमध्ये तत्वज्ञान, इतिहास व इंग्रजी साहित्य हे विषय शिकवित होते. या शिकवणीतूनही विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यविषयक विचारांचा परिचय नक्कीच झाला असेल. सुधारकच्या संपादकीयामधून अज्ञान, अंधश्रद्धा, गुलामीवृत्ती, स्त्रियावरील अन्याय इत्यादीवर आगरकरांनी तीव्र प्रहार केला आहे. भारतीय कला व तिचा विकास याविषयी त्याने चार निबंध लिहिले होते. आपली हस्तकला टाकाऊ नाही तर टिकाऊ आहे व अशा कलाकारांच्या कलांना अर्वाचीन यंत्रकलेची जोड मिळाल्यास आपली कला ऊर्जितावस्थेत पोचू शकेल असे आगरकरांना वाटत होते. आगरकर हे ललित साहित्याचे रसिक जाणकार वाचक होते, असे प्रतिपादन ठोंबरे यानी केले आहे. परंतु आगरकरांचे सर्व लेखन सहेतुक होते. कलात्मक रीतीने मन रिझवणारी लेखन शैली त्यांना मान्य नव्हती. स्वतंत्र व सुस्पष्ट विचार त्यांच्या लेखनाची खासीयत होती. त्यांच्या शैलीत डौल नसे. आवेशयुक्त व उपरोधक असे काहिसे संमिश्र स्वरूप अशी ती शैली होती.
डॉ. अशोक चौसाळकर यांनी आगरकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या राजकीय संदर्भातील लेखांचा एकत्रित अभ्यास करून आगरकरांच्या राजकीय विचारासंबंधी टिप्पणी केली आहे. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या स्वराज्याच्या संदर्भातील वैचारिक भूमिका सारखी होती. इंग्रजांचे राज्य हे वरदान नसून शाप आहे म्हणून स्वातंत्र्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत व यात त्याग व समर्पणाची भावना हवी यावर त्या दोघांचे एकमत होते. भारताच्या निकृष्टावस्थेची कारणे सागताना समाजातील दोषांचे स्वरूप त्यांनी स्पष्टपणे मांडले आहेत. त्याच वेळी ब्रिटिश राजवटीच्या दुष्परिणामावरही ताशेरे ओढले आहेत.
अशाप्रकारे या तिन्ही अभ्यासकांनी आगरकरांच्या विचारांचा आढावा घेतला आहे. आपल्या आजच्या समाजाचा विचार करून यात काही बदल घडवून समाज परिवर्तन करू इच्छिणार्यांनी आगरकरांनी घेतलेले कष्ट, दाखवलेली दिशा, त्याच्यां विचारातील सुस्पष्टता, तळमळ यांचा पुनर्विचार करू लागल्यास सामाजिक कार्यात सहभागी होण्याची गरज आहे, हे पुस्तक वाचताना वाटू लागते. आगरकरांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत हे मान्य करताना हे विचार लोकापर्यंत, विचारवंतापर्यंत, सुशिक्षितापर्यंत का पोचले नाहील, का पोचत नाहीत याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. या दृष्टिकोनातून बघितल्यास हे पुस्तक खरोखरच अत्यंत उपयुक्त ठरेल.
अभिप्राय
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 19 Oct 2010 - 06:00
डॉ. अशोक चौसाळकर कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख असताना त्यांच्या आणि कॉ.गोविंद पानसरे यांच्यासमवेत 'राजघराण्याचा इतिहास आणि पुण्याची वृत्तपत्रे' विषयासंदर्भात एका व्याख्यानानंतर चर्चा करीत असताना साहजिकच ते गाजलेले 'कोल्हापूर प्रकरण' आणि संस्थानाचे कारभारी बर्वे यांनी केलेला अब्रुनुकसानीचा दावा व त्यासाठी आगरकर व टिळकांनी झालेली शिक्षा, त्यांचे डोंगरी किल्ल्यातील ती कैद आदी विषयही निघाले....त्यातूनच (जरी टिळकांच्याविषयी भरपूर माहिती होती, तरी...) आगरकर आणि 'सुधारक' यांच्या कारकिर्दीचा आलेख डॉ.चौसाळकरांनी आम्हा विद्यार्थ्यांसमोर नेटका उभा केला होता. पुढे त्यांच्यावर साहित्यही (विश्राम बेडेकरांच्या 'टिळक आणि आगरकर' नाटकाच्या यशामुळे) बर्यापैकी उपलब्ध झाले आणि त्यातील काही वाचल्यानंतर अवघे ३९ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या (आणि जिवंतपणीच पुणेकरांनी काढलेल्या आपली 'प्रेतयात्रा' पाहण्याचे 'भाग्य' लाभलेल्या...) या खर्याखुर्या समाजसेवकाची समाजाप्रतीची तळमळ समजून आली.
त्या काळात सार्या महाराष्ट्राने टिळकांवर जीव लावला असल्याने 'बाळ' बोले आणि 'गाडा' हले अशी स्थिती त्या काळात असल्याने जरी टिळक आणि आगरकर स्वातंत्र्य आणि समाजसुधारणा या भावनेने एकत्र आले होते तरी, टिळकांच्या 'स्वराज्य' प्रथम या भूमिकेने समाजात त्यांना हीरोचे स्थान होते आणि समाजसुधारणेच्या खाली व्यक्तिस्वातंत्र्य आणि विज्ञाननिष्ठा कायम अंगी बाणवून परिवर्तनाचे वारे खेळविण्याची भूमिका मांडणारे आगरकर सनातन्यांच्या डोळ्यात सलू लागले होते यात आश्चर्य नव्हतेच.
महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ गणेश आगरकरांकडे जाते. त्यातच समाजशूचितेचे पाईक मानल्या गेलेल्या परंपरावाद्यांना आगरकरांच्या बालविवाह, जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, विधवेचे केशवपन, यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत या घोषणा तर तांदळातील खड्यासारख्या बोचत....पुढे त्यात त्यांनी "समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य" या वादातून 'केसरी' सोडल्यावर मग काय टिळक भक्तांना आनंदच झाला असणार.
धागाकर्ते श्री.प्रभाकरपंत लिहितात, "आगरकरांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत हे मान्य करताना हे विचार लोकापर्यंत, विचारवंतापर्यंत, सुशिक्षितापर्यंत का पोचले नाहील, का पोचत नाहीत याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे...".....आणि यातना 'का पोचत नाहीत...' हे शल्य तितकेच महत्वाचे. आता त्यांनी लिहिले आहे आक्टोबर २०१० मध्ये...मग खुद्द गोपाळ गणेश आगरकर यांनी हेच विचार १८८२-८५ या काळात केसरीमधून व १८८८ नंतर 'सुधारक' मधून मांडण्यास सुरूवात केली त्यावेळी त्या काळातील (१२५ वर्षापूर्वीच्या...) परंपरावाद्यांनी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छ्ळ कशाप्रकारे केला असेल याची कल्पना येथील सदस्यांना येऊ शकेल.
'आगरकर विचार...' या पुस्तकात हे मांडले गेले असेल असे वाटते. एका चांगल्या विषयावरील पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल श्री.नानावटी यांना धन्यवाद.
इन्द्रा
टंकनदोषाचे निवारण केले आहे, साहित्य संपादनासाठी मदतनीसाला जरुर संपर्क करावा.
मदतनीस
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 18 Oct 2010 - 11:22
आगरकर यांची स्वातंत्र्य आणि समाजोन्नती यांमधे, आधी समाजोन्नती व्हावी आणि मग उन्नत समाजाला स्वातंत्र्य मिळवायला वेळ लागणार नाहि किंबहूना उन्नत समाजाकडे स्वातंत्र्य हे आपोआप येईल ही विचारसरणी आणि त्याभोवतीचा उहापोह बर्याचदा वाचनात येतो. आगरकर म्हटले की चर्चा ह्याच टिळक आणि आगरकरांच्या वादाभोवती फिरू लागते. अश्या वेळी
वगैरे वाक्यांमुळे ह्या पुस्तकात त्यांच्या राजकीय मतांबरोबरच इतर बरेच पैलु वाचायला मिळतीलसे वाटते.
प्रभाकरराव,
प्रस्तुत पुस्तकाचे लेखन कितपत सोपे आहे? म्हणजे सामान्य वाचकाला तत्कालिन घडमोडी ढोबळपणे/ऐकून माहित असतात पण तपशील अज्ञात असतात. मागे मी आगरकरांवरचा एक लेख वाचला होता त्यात वाचकाला सगळे संदर्भ आधीच माहित आहे हे गृहितक असावे असे वाटते. त्यामुळे लेख दुर्बोध झाला होता. त्या दृष्टीने हे पुस्तक कसे आहे हे सांगाल काय?
प्रभाकर नानावटी
प्रभाकर नानावटी · Tue, 19 Oct 2010 - 07:07 · उत्तर
आगरकर विचार हे पुस्तक शब्दबंबाळ वा संदर्भबंबाळ नसल्यामुळे वाचणे सोपे होते. हे सर्व लेखक प्राध्यापक मंडळी असल्यामुळे कदाचित या पुस्तिका विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले असावेत. क्लिष्ट वाक्यरचना टाळलेले असावेत. याचा अर्थ पुस्तक रंजक वा लाइट्ली घेण्यासारखीसुद्धा नाही. प्रत्येक लेखकाने आपापल्या विषयाचे काही विभाग पाडून विषय समजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विचार समजून घेण्यास मदत होते. उदा: आगरकरांचे साहित्यविषयक विचार माडताना भारतीय कला व तिचा विकास, व्याकरणविषयक विचार व साहित्यविषयक विचार अशी मांडणी आहे. माझ्या मते या गोष्टी दुर्बोध नाहीत.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 19 Oct 2010 - 07:30 · उत्तर
अरे वा! मग मिळवले पाहिजे हे पुस्तक. माहितीबद्द्ल आभार
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Tue, 19 Oct 2010 - 07:35 · उत्तर
शाळेच्या अभ्यासक्रमात मिळालेली माहिती वगळता आगरकरांबद्दल फारशी माहिती नाहीच आहे, पण कुतूहल मात्र जरूर आहे. पुस्तक नक्कीच वाचेन.
सागर
सागर · Tue, 19 Oct 2010 - 08:55 · उत्तर
शाळेच्या अभ्यासक्रमात मिळालेली माहिती वगळता आगरकरांबद्दल फारशी माहिती नाहीच आहे, पण कुतूहल मात्र जरूर आहे. पुस्तक नक्कीच वाचेन
खलनायक
खलनायक · Tue, 19 Oct 2010 - 10:12
पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद. पुस्तक वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
यशोधरा
यशोधरा · Tue, 19 Oct 2010 - 13:58
नेहमीप्रमाणे करुन दिलेला नेटका पुस्तकपरिचय.