आत्मचरित्रः आत्मपरिक्षण करायला लावणारं चरित्र

ऋषिकेश

मजकूर

कराचीला एक जहाज निघते.. त्यात अनेक प्रवाशांपैकी एक असतात "श्रीमती" लक्ष्मीबाई टिळक.. लक्ष्मीबाई लिहितात की त्यांच्यापुढे मुंबई छोटी होऊ लागते आणि बोट कराचीकडे निघते.. टिळकांची स्वतंत्रता कविता त्यांना आठवते आणि लक्ष्मीबाईंनी लिहिलेले आत्मचरित्र संपते! पण खरं तर इथे फक्त पुस्तक केवळ लौकिकार्थाने संपते.. वाचकाच्या मनात अनेक तास, दिवस, आठवडे ते वेगवेगळ्या प्रसंगांत रूंझी घालत असते. काहींची आत्मचरित्रे स्फूर्ती देतात, काहि आत्मचरित्रे हुरूप देतात, काही आशा देतात तर काहि आत्मचरित्रांतून जिद्दीला सलाम करावासा वाटतो. मात्र स्मृतिचित्रे वाचले आणि ह्या आत्मचरित्राने मला आत्मपरिक्षण करायला भाग पाडले!

केवळ स्वतःचे आयुष्य (आता आयुष्य शब्द लिहिताना देखील बालकवी, लक्ष्मीबाई आठवल्या. हे गेले काहि दिवस असंच होतंय.. तर ते जाऊ दे.. ) तर केवळ स्वतःचे आयुष्यच नव्हे तर एक अख्खा काळ लक्ष्मीबाई आपल्यापूढे उभ्या करतात. त्या काळातील समाज, राहणीमान, पुरूषप्रधानता, स्त्रीदाक्षिण्य, खोलवर रूजलेला जातीभेद, भंगिणींपासून ते ब्राह्मणांपर्यंतच्या रिती, आचार, विचार ह्या अश्या सगळ्या गोष्टी सहज म्हणून टिपल्या आहेत. आणि ह्या सहज झालेल्या टिप्पणीतून चित्रपट बघावा तसा काळाचा तुकडा आपण बघतो. केवळ बघत नाहि तर स्तिमीत होतो.

सभोवतालच्या वर्णनाइतकेच लक्षणीय आहे त्यांची भाषा. जुन्या वळणाची असली तरी इतकी गोड व चित्रदर्शी भाषा क्वचितच वाचायला मिळते. छोटी परंतू नेमक्या शब्दांतली ती वाक्ये म्हणजे निव्वळ आनंद! नानांना, म्हणजे माझ्या वडिलांना "सोवळे" झाले होते. ह्या पहिल्या पानावरील वाक्याने जे लक्ष वेधून घेतले ते शेवटपर्यंत अनेक वाक्यांनी-शब्दांनी मनात घर केले.

ह्या पुस्तकात काय आहे, काय नाहि हे ज्याने त्याने ठरवावे, तेवढी माझी कुवत नाही. मात्र हा प्रपंच करतो आहे ते पुस्तक वाचून माझ्या मनात उठलेल्या तरंगांना शमवण्यासाठी. सध्या आपण कित्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून केवढे काळजीत पडतो. कित्येक खरंतर फाल्तू गोष्टींवरून वाद घालतो. साधी सर्दी झाली तरी केवढा उपचाराचा मारा करतो, किंवा अभ्यास म्हणजे जगात आपल्याच आहे असे वागतो. लक्ष्मीबाईंचे हे आत्मचरित्र वाचून मला माझ्याच काहि वागण्याची गंमत, लाज, आश्चर्य वगैरे वगैरे सारे काही वाटते आहे. जगात एका व्यक्तीरोबर जे जे काही पिडादायक होऊ शकते ते ते लक्ष्मीबाईंनी सोसूनही त्या कधीही नियतीच्या नावाने, झालेल्या कष्टाच्या नावाने बोटे मोडताना दिसत नाहीत ही केवढी मोठी शिकवण आहे. सारे काही आलबेल असूनही त्यांच्या लेखनातून जाणवणारी अर्धी शांतताही माझ्या मनाला का मिळू नये ही टोचणी म्हणा हा प्रश्न म्हणा, मनाला सतत भेडसावतो आहे.

हल्लीच्या 'इस्टंट लाईफ' मुळे, त्या वेगामुळे असे झाले आहे का? की त्या काळी स्त्रिया इतका विचार करत नसत त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी सोसताना त्या काही सोसताहेत हे त्यांना कधी जाणवलंच नाही? लक्ष्मीबाईंनी सामना केलेल्या तमाम प्रसंगांतील एक जरी माझ्यावर गुदरला तरी तितक्या शांतपणे मी त्याचा मुकाबला करू शकेन का हा प्रश्न मलातरी अस्वस्थ करतो. विचित्र वडील, विक्षिप्त सासरे आणि सर्वांवर कडी म्हणजे लहरी व अव्यवहारी नवरा असूनही त्या कधीच इतरांनी काय करावे असा उपदेश करताना दिसत नाहीत. स्वतः करता येईल तितके करावे ही वृत्ती अनुकरणीय का पारतंत्र्याचे लक्षण म्हणून दुर्लक्षणिय? डोक्यात असंख्य विचार आहेत त्याची उलट सुलट उत्तरेही आहेत.. थोडक्यात काय तर हे नितांतसुंदर पुस्तक पचायला बरेच जड आहे.. बराच विचार-रवंथ करावा लागेलसे दिसते!

अभिप्राय

नंदन

नंदन · Tue, 10 Aug 2010 - 11:13

असं विचारात पाडणं हेच पुस्तकाचं यश म्हणावं लागेल. रूढ अर्थाने हे परीक्षण नसलं, तरी हे पुस्तक ही अनुभवण्याचीच गोष्ट असल्यामुळे त्याची ही ओळखही आवडली (हे थोडंफार, नायगाराच्या तू न काढलेल्या फोटोसारखंच झालं :)). ज्ञानेश्वरांनी म्हटलंय तसं, 'तो नादु जो अबोलपणा । तया तेणेंचि जाणा । हो‍आवे लागे' तसंच काहीसं...

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 10 Aug 2010 - 13:56

जगात एका व्यक्तीरोबर जे जे काही पिडादायक होऊ शकते ते ते लक्ष्मीबाईंनी सोसूनही त्या कधीही नियतीच्या नावाने, झालेल्या कष्टाच्या नावाने बोटे मोडताना दिसत नाहीत ही केवढी मोठी शिकवण आहे. सारे काही आलबेल असूनही त्यांच्या लेखनातून जाणवणारी अर्धी शांतताही माझ्या मनाला का मिळू नये ही टोचणी म्हणा हा प्रश्न म्हणा, मनाला सतत भेडसावतो आहे.

हीच या पुस्तकाची जमेची बाजु आहे. या पुस्तकात असलेल्या पॉसिटिव्हनेस मु़ळेच मला नेहमी हे मराठीतल्या सर्वोत्तम पुस्तकापैकी एक वाटते.

पुस्तक परत एकदा वाचावे लागेल असे वाटतयं..

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 10 Aug 2010 - 18:15

शोधून वाचलेले हे आणखी एक पुस्तक... मलाही त्यांच्या नवर्‍याच्या लहरी आणि सासर्‍याच्या विक्षिप्त वागण्याने चिडून न जाता प्रत्येक गोष्ट हसून नेण्याचे आश्चर्य वाटत होते. मी स्वतः अशी राहू शकेन का हा त्यावेळी मनातल्या मनात स्वतःला प्रश्न विचारण्या आधीच जोरात "नाही" आले होते!!! :)

अजून मला रमाबाई रानडेंचं आत्मचरित्रही वाचायचे आहे. दोन्ही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ असतील. पण नवर्‍यानंतरही स्वतःचे अस्तित्व मानणार्‍या लक्षुंबाईचं नवर्‍याच्या मृत्यूसोबत आपलेही आत्मचरित्र संपवणार्‍या रमाबाईंपेक्षा माझ्या मनातले स्थान वरचे असेल.
जाता जाता, काही दिवसांपूर्वी लोकसत्तात एक लेख वाचला होता. नक्की आठवत नाही कुणाचा होता ते. लक्ष्मीबाईंची सूनबाई रूथ टिळक त्यांना शाळेत शिकवायला होत्या. त्यावेळी त्यांनी पाहिलेल्या लक्ष्मीबाईंचे वर्णन केलेय." बोंगा झालेले लुगडे, अंगातून फिरणारी अघळपघळ चोळी, पण डोळे मात्र प्रेमाने ओथंबलेले." वेशभूषेकडे वयोमानाप्रमाणे लक्ष जरी देता आले नाही तरी येणार्‍या जाणार्‍यांच्या पोटी चार घास गेले आहेत की नाहीत हे पाहायला त्या जागरूक असायच्या!

बाकी, दोन दोन लेख लिहिले गेलेले पुविवरचे हे पहिलेच पुस्तक दिसतेय!!

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 10 Aug 2010 - 20:18 · उत्तर

मी आधी तुझ्याच लेखावर प्रतिक्रीया देणार होतो.. पण प्रतिक्रीया इतकी मोठी झाली की विचार केला की वेगळा लेखच टाकावा :)

चर्चा प्रकार