- Log in to post comments
.....शैलेंद्र, नूरजहान, साहिर व गीता दत्त
लेखकाचे शैलेंद्रशी मैत्रीचे संबंध होते. गाणी, गझल व कविता यांच्या आवडीमुळे दोघेही समानधर्मी. गाण्याचे दर्दी. खरे पाहता लेखकाला चित्रपट गीतावर लेख लिहिण्यास शैलेंद्रनीच प्रोत्साहित केले. शैलेंद्रच्या मृत्युनंतर 'मौज'च्या राम पटवर्धनांशी गप्पा मारताना शैलेंद्रविषयीच्या लेखाची कल्पना लेखकाला सुचली. व नंतर तो लेख सत्यकथेच्या अंकात छापून आला. अशाच प्रकारच्या लेखांचा संग्रह म्हणजेच गीतयात्री हे पुस्तकं
शैलेंद्रनी लिहिलेल्या व मुकेशनी गायिलेल्या पतली कमर है, तिरछी नज़र है... या धुंद आणि बेहोशी आणणार्या स्वरांचा परिचय शाळा शिकतानाच लेखकाला झाला होता. व शैलेंद्रच्या शब्दांची मोहिनी मोठेपणीसुद्धा ओसरली नव्हती. 'टाळ्यां'साठी लिहिणारा कवी शैलेंद्र नव्हता. शैलेंद्रमध्ये कवी व गीतकार यांचा सुरेख संगम होता. त्याच्या बोलण्यात कमालीचा गोडवा होता. नम्रता होती व त्याचबरोबर दांडगा आत्मविश्वास होता. त्याने कधी उडवाउडवी केली नाही. लपवाछपवी केली नाही. अहंकार नाही. परळच्या रेल्वेच्या क्वार्टर्समध्ये असताना, कारखान्यात काम करत असताना शैलेंद्रनी गरीबी, दारिद्र्य काय असतं याचे नीरिक्षण केले होते. शैलेंद्र ट्रेड युनियनची कामं करायचा. घरदार नसलेले, फुटपाथवर झोपणारे, तेथेच संसार करणारे, दिवसरात्र भटकणारे, मिळेल ते काम करणारे, नाही मिळाल्यास उपाशी राहणारे, चोरीमारी करणारे अशा शेकडो लोकांना त्यानी त्या काळात पाहिले असेल. आपण कवी आहोत यापेक्षा आपण सामान्य मनुष्य आहोत यावर त्याचा कटाक्ष होता. मुळात तो सामान्य जनतेचा कवी होता. म्हणूनच पैशासाठी लिहिणार्या कवीप्रमाणे सुरुवातीला चित्रपटक्षेत्रात जावेसे वाटले नाही. परंतु परिस्थितीने त्याला गीतकार बनविले. राजकपूरनं त्याला चित्रपटसृष्टीत आणलं व 'बरसात'पासून 'मेरा नाम जोकर'पर्यंतच्या राजकपूरच्या चित्रपटासाठी प्रत्येक वेळी त्याच्याकडून थीम साँग्स, शीर्षक गीत व इतर गाणी लिहून घेतलं.
एके काळी चित्रपटगीत म्हणजे प्यार, मोहब्बत, बालम, सनम, दिल के टुकडे इत्यादी पाच पंचवीस ठराविक शब्दांचा खेळ अशीच समजूत होती. (व आताही तशीच आहे!) परंतु शैलेंद्रने चित्रपटांसाठी आशयगर्भित गीत लिहून हा गैरसमज दूर केला. चित्रपटगीतांना कलेच्या उंचीवर नेऊन बसविले. अशा प्रकारच्या कित्येक गाण्यांचा उल्लेख मोहोळकरांनी लेखात केला आहे. व त्या मुळातच वाचायला हवीत. परंतु लेखकाचा हा मित्र मध्येच जग सोडून जातो. म्हणूनच हमसफर, एक दिन बिछ़डना ही था... असे लेखकाला म्हणावेसे वाटले.
संगीतकार सज्जाद हुसेन यानी संगीत दिलेल्या 'दोस्त' या चित्रपटातील बदनाम मोहब्बत कौन करे... और इष्क को रुसवा कौन करे.. हे गाणं गाणार्या नूरजहाननं एक काळ गाजवला होता. ती अभिनेत्री होती. परंतु ती गायिका म्हणूनच चित्रपटशौकीनांच्या लक्षात जास्त राहिली. अजूनही 'अनमोल घडी' वा 'रतन' मधील तिने गायिलेली गाणी आवडत असलेले शौकीन हयात आहेत.नूरजहान स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेली व तिच्या गायनाला अवकळा आली. आयुष्यात भरपूर चढ उतार आले. मध्ये एकदा ती कुठल्यातरी कार्यक्रमासाठी मुंबईला आली. लताने तिचा सत्कार केला. नंतर ती काळाच्या पडद्याआड कायमची गेली.
माधव मोहोळकरांनी तलत, शैलेंद्रवरील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे साहिर लुधियानवी या गीतकाराचीसुद्धा अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है.. या लेखात भरभरून कौतुक केले आहे. साहिरसुद्धा कवी व गीतकार म्हणूनच चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. तो काळही हिंदी, उर्दूच्या आकर्षणाचा काळ होता. उर्दूतील अनेक श्रेष्ठ कवी चित्रपटात यशस्वी ठरले नाहीत. अपवाद फक्त साहिर व शकील बदायुनींचा असावा. साहिर एक निश्चित दृष्टिकोन आणि विचारप्रणाली बरोबर घेऊन आला होता. तरीसुद्धा तो लोकप्रिय गीतकार झाला.
आगर्भ श्रीमंत, खानदानी, वतनदाराचा मुलगा असूनसुद्धा घराण्याची ऐषारामी जीवन सोडून गरीबी त्यानं आपल्यावर ओढून घेतली होती. जहागीरदार बापाला सामान्य लोकांसारखा आपला मुलगा शाळा कॉलेजात जाण्याचा हट्ट करतो, हे सहन झाले नाही. साहिर घरातून बाहेर पडला. जीवनसंघर्षाला सामोरे गेला. त्यामुळे तो अकाली प्रौढ झाला. केव्हातरी याच काळात प्रेमभंग झाला. उत्कट भावनापूर्ण शायरीतून तो प्रेम व्यक्त करत राहिला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे सरकारी कॉलेजातून त्याला काढून टाकण्यात आलं. लाहोरच्या रस्त्यावर भणंगावस्थेत तो फिरायचा. स्वत: लिहिलेल्या कवितांच बाड घेऊन प्रकाशकांच्या उंबर्या झिजवायचा. शेवटी त्याच्या काही कविता दिल्लीच्या मासिकात छापल्या गेल्या. कवितासंग्रह छापला. रातोरात तरुणांचा तो आवडता कवी झाला. स्वातंत्र्यानंतर सचिन देव बर्मननी 'बाजी' चित्रपटासाठी गीतकार म्हणून त्याची शिफारस केली. त्यानंतर त्याच भाग्य खुललं.
हा कवी चित्रपटातील गीतामधून पुरोगामी आशय द्यायचा. प्रेमगीतातूनही ही भावना डोकावत होती. पुरोगामी विचार प्रकट करणारी साहिरची चित्रपटतील गीतं कविता वाटायच्या. अनेक वेळा ती निवेदनपर वाटायच्या. सचिन देव बर्मन व साहिर ही जोडी त्याकाळी भरपूर गाजली. बी. आर. चोप्रांच्या चित्रपटात साहिरला मानाचा स्थान होता. "चोप्राजी आपले संगीतकार बदलतात पण साहिरच्याऐवजी दुसरा गीतकार घेत नाहीत" इती शैलेंद्र. अनेक कवी व साहित्यिक चित्रपट क्षेत्रात आले व गेले. त्यांच्या काही कवितांना चाली लावल्या व त्या लोकप्रियही ठरल्या. परंतु साहिरच्या बर्याच कविता सिनेमात गायल्या गेल्या. असे भाग्य फारच कमी कवींना मिळाले असेल. 'प्यासा' चित्रपटातील हीरो, कवी विजय, याच्या जीवनातील घटना साहीरच्या जीवनातील घटना असेच लेखकाला वाटते. 'प्यासा' ही कवीच्या मनाची व जीवनाची कथा होती. माधव मोहोळकरांनी या संवेदनशील गीतकाराबद्दल लिहून त्याला अजरामर केले आहे.
मेरा सुंदर सपना बीत गया... असे गाणारी गीता दत्तसुद्धा - शैलेंद्र, तलत व साहिर यांच्याप्रमाणे - लेखकाचा वीक पॉइंट होता की काय असे तिच्यावरचा लेख वाचताना वाटू लागते. लताला मिळालेले मान सन्मान तिच्या वाटेला आले नाहीत. तरी तीसुद्धा एक प्रथितयश गायिका होती. भक्ती गीत, विरह गीत, लाडिक प्रेम गीत वा कुठल्याही गीताचा प्रकार असो, गीता दत्त अत्यंत तन्मयतेने गायची. गीताच्या आवाजात नशा होती, मादकता होती पण उथळपणा नव्हता. आशा भोसलेचं आगमन होईपर्यंत ओ. पी. नैयरची उद्दीपक गीतं गीता दत्तच्या नशील्या आवाजात ऐकायला यायची. लेखकाने गीता दत्तच्या आवाजाच्या अजून एका वैशिष्ट्याचा उल्लेख केला आहे. पुरुष गायकांनी गायिलेल्या गाणी पुन्हा एकदा गीता दत्तने म्हटली तरी ती गायकांपुढे फिकी पडली नाही. सी. एच. आत्मानं गायलेलं प्रीतम आन मिलो... पुढे गीतानं गायिलेलं हेच गीत कुणाला विसरता आले नाही. न ये चाँद होगा न तारे रहेंगे... हे हेमंतकुमारनं गायिलेले अप्रतिम गीत असूनही गीता दत्तचे स्वरसुद्धा झपाटून टाकतात. त्या तुलनेने लता - आशा हरल्या, असे म्हणावे लागेल. लताच्या जीवन के सफर मे राही मिलते है बिछड़ जाने को.. पेक्षा किशोरच तेच गीत अधिक लोकप्रिय झालं. लताच्या जायें तो जायें कहाँ.. पेक्षा तलतच जायें तो जायें कहाँ.. लोकानी अधिक पसंत केलं. आशाच्या ए ग़मे दिल क्या करूँ... पेक्षा तलतच हेच गाणं अधिक लोकप्रिय ठरलं.
परंतु या गायिकेचीसुद्धा जीवनकहाणी शोकांतिका ठरली. गुरु दत्तबरोबर लग्न झालं. तिच्या गाण्यावर बंदी आली. एका निसटत्या क्षणी गुरू दत्तने आत्महत्या केली व गीता दत्तच संपूर्ण जीवन उध्वस्त झालं. वयाच्या 41व्या वर्षी तिला मृत्युने गाठलं.
हे पुस्तक वाचताना, या जुन्या जमान्यातील गीत-संगीताच्या आठवणींनी भावनावश झालेल्या लेखकाप्रमाणे, त्याने जागे केलेल्या स्मृतींनी, आपणही न कळत हळवे होतो. मोहोळकरांच गीतयात्री वाचल्यानंतर त्यात त्यानी उल्लेख केलेली (शेकडो) गाणी नेटवर ऐकताना आपला आनंद गहिरा होतो. यातच या पुस्तकाचं व लेखकाचं यश दडले आहे. एखादा सर्जनशील चित्रपटसंगीत रसिकानी या पुस्तकातील आशय, यात उल्लेख केलेली गाणी, गीतकार, संगीतकार इत्यादींचे दृक्-श्राव्य विश्व मल्टिमिडीयाद्वारे उभे केल्यास आमच्यासारखे रसिक नक्कीच चिरऋणी राहतील.
समाप्त
गीतयात्री
माधव मोहोळकर,
मौज प्रकाशन गृह (1987)
किं - 53 रु, पृ.सं - 176
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Mon, 10 Jan 2011 - 07:34
मस्त पुस्तक परिचय. नक्की घेणार हे पुस्तक. धन्यवाद.
५३ रुपये फक्त? नक्कीच :)
सागर
सागर · Mon, 10 Jan 2011 - 07:49
या वर्षी मी खरेदी अगदी हातची राखूनच करणार आहे पण हे पुस्तक त्या यादीत अॅडवले आहे
एकदम सुंदर परिचय नानावटीजी :)
धन्यवाद
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 10 Jan 2011 - 12:13
चित्रपट व त्यातील माणसांशी संबंधीत पुस्तके फारशी वाचलेली नाहीत कारण (का कोणास ठाऊक पण) त्यांच्या (खरंतर कोणाच्याही) वैयक्तीक आयुष्याबद्दल फार उत्सूकता कधी वाटत नाही, कार्याबद्द्ल वाटते पण मग कार्याबद्द्ल इतरत्र बरेच लिहिलेले असते.
असो. नव्या पुस्तकपरिचयाबद्दल आभार...सहज हातात पडले तर नक्की वाचेन