जग बदलू शकलेली पुस्तकं!

प्रभाकर नानावटी

मजकूर

जग बदलू शकलेली पुस्तकं!

पुस्तकामुळे जग बदलू शकते, हे कदाचित अनेकांना खुळचटपणाचे वाटू शकेल. लाखो वर्षापूर्वी लघुग्रहांच्या मार्यापुढे डायनासॉरसारखे प्रचंडकाय प्राणी निर्वंश झाले व जगाचा चेहरामोहरा बदलला, हे आपण समजू शकतो. कारण त्यामुळे मनुष्यप्राण्यासकट इतर सस्तनी प्राण्यांना जिवंत राहाण्यासाठी अवकाश मिळाला. प्रचंड प्रमाणात हिमवर्षाव झाल्यामुळे जग बदलले असेल याची आपण कल्पना करू शकतो. जागतिक तापमानवाढीमुळे जगाचे व्यवहार बदलू शकतील याची आपल्याला समज आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया, क्यूबा, चीन इत्यादी देशातील रक्तक्रांतीमुळे जगरहाटीत बदल झाला याची आपल्याला जाणीव आहे. पहिल्य व दुसऱ्या जागतिक युध्दानंतर विश्वशांतीसाठी प्रयत्न होत आहेत व युध्द नको ही मानसिकता मूळ धरू पाहत आहे, याची पण आपल्याला जाण आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसांचे आयुष्य वाढले आहे, उपभोगवाद उच्चांक गाठत आहे, खेडी ओस पडत आहेत, शहरं बकाल होत आहेत, इत्यादी अनेक गोष्टींचे आकलन सोपे आहे. परंतु पुस्तकामुळे जगाचा चेहरामोहरा पालटला, किंवा पालटू शकतो, पुस्तकं जग बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, पुस्तक उत्प्रेरकाची (कॅटलिस्टची) भूमिका बजावू शकतात, लिखित/मुद्रित शब्दांमध्ये एवढी ताकद असू शकते, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असू शकतील.
आपल्यासारख्या चोखंदळ ग्रंथप्रेमींना मात्र पुस्तकं हे प्रेरणास्रोत आहेत, याबद्दल तिळमात्र संशय नाही. जगाविषयीच्या जाणीवा रुंदावण्यासाठी पुस्तकं वाचकासमोर नेमक्या माहितीचा डोंगरच उभे करू शकतात, पुस्तकं आपल्या अभिरुचीची गुणवत्ता वाढवतात, आपल्यात सुधारणा घडवून आणू शकतात, आपल्याला संवेदनशील बनवू शकतात, विवेकी बनवू शकतात, प्रसंगी हसवतात, रडवतात, भावनावश करतात, मनोरंजन करतात, जगण्यासाठी बळ देतात, उत्कंठा वाढवतात, विचार करायला लावतात, वर्तणुकीत बदल घडवतात, एकटेपणात मित्राची भूमिका वठवतात, मार्गदर्शी होतात, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करू शकतात व (काही वेळा!) नीतीचे, उपदेशाचे डोस पण पाजतात. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर पुस्तकांचे ॠण फेडणे अशक्यातली गोष्ट ठरेल. त्याच वेळी अजून थोडयाशा खोलात जावून विचार करू लागल्यास मानवतेला आकार देणारे, मानवी वंशाची पुनर्रचना करणारे, मानवी प्राण्याचे उन्नयन करणारे व मानवतेच्या श्रध्दा-सिध्दांतांचे कर्ते करवते पण पुस्तकच आहेत.

परंतु जग बदलू शकलेल्या निवडक पुस्तकांची सर्वसंमत यादी करणे फार जिकिरीचे ठरू शकेल. परिस्थितीचा रेटा व कालमान स्थिती-गतीमुळे प्रत्येक समाजगटाचे प्रश्न व अग्रक्रम बदलत जातात. एका समाजगटाला अत्यंत निकडीच्या वाटणाऱ्या समस्या व त्या समस्यांचे साधक बाधक विश्लेषण करणारी पुस्तकं दुसऱ्या गटाला तितके महत्वाचे वाटणार नाहीत. भाषा, भौगोलिक परिस्थिती, जोपासलेली संस्कृती, रूढी-परंपरा इत्यादीमुळे जग वैविध्यपूर्ण आहे व याच विविधतेमुळे अस्मितेचा प्रश्न मूळ धरू पाहत आहे. माणसा-माणसात भेद करणाऱ्या अनेक संकल्पना जगभर पसरलेल्या आहेत व अशा संकल्पनांशी टक्कर देणे तितके सोपे नाही. तरीसुध्दा जगभरातील अनेक दूरदर्शी तत्ववेत्त्यांनी वेळोवेळी समाजाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केले आहेत व त्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत.

एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावरून मागे वळून पाहताना अखंड जगाला समावून घेतलेल्या व जग बदलू पाहणाऱ्या अशा काही तत्त्वज्ञांनी लिहिलेली पुस्तकं नक्कीच उद्बोधक ठरतील:
1. प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (1687) आयझॅक न्यूटन (1642-1727)
2. ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज (1859) चार्ल्स डार्विन (1809-1882)
3. एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी (3 खंडात: 1839,1844,1855) मायकेल फॅरडे (1791-1867)
4. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड (1789) विलियम विल्बरफोर्स (1759-1833)
5. ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन (1792) मेरी वोलस्टोनक्रॅफ्ट (1759-1797)
6. मॅग्नाकार्टा -1215
7. वेल्थ ऑफ नेशन्स (1776) ऍडम स्मिथ (1723-1790)
8. पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग (1769) रिचर्ड आर्कराइट (1733-1792)
9. दास कॅपिटल (3 खंडात: 1867,1885, 1894) कार्ल मार्क्स (1818-1883)
10. वाट इज लाइफ?(1943) एर्विन स्क्रोडिंजर (1887-1961)

आपले जीवन समृध्द करण्यासाठी वर उल्लेख केलेल्या पुस्तकांचा फार मोठा सहभाग आहे. आपण वापरत असलेले तंत्रज्ञान (फॅरडे, न्यूटन) उत्पादन, समाज व अर्थ व्यवस्था (आर्कराइट, ऍडम स्मिथ व कार्ल मार्क्स) आपण भोगत असलेले स्वातंत्र्य व लोकशाही (मॅग्नाकार्टा, मेरी वोलस्टोनक्रॅफ्ट) आपल्याला मिळालेले दीर्घायुष्य (स्क्रोडिंजर) बराक ओबामासारख्यांना मिळालेले उच्चपद (विल्बरफोर्स) मानवीवंशाबद्दलच्या कल्पना आणि ईश्वर व धर्माच्या जंजाळातून सुटका (डार्विन) यासाठी आपण या तज्ञांच्या पुस्तकांना चिरॠणी आहोत.

अभिप्राय

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Mon, 21 Jun 2010 - 12:17

छान यादी..
यातलं अजून कुठलंच पुस्तक वाचले नाही, तेव्हा जेव्हा करावीशी वाटेल तेव्हा सुरूवात इथूनच करेन.
अवांतरः आइनस्टाईनचं "द वर्ल्ड अ‍ॅज आउ सी इट" हे कुणी वाचले आहे का?? पुस्तक माझ्याकडे आहे पण अजून त्याला हात लागला नाहीए.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · गुरुवार, 24 Jun 2010 - 13:36

या पुस्तकांवर काही लिहावं इतकी माझी पात्रताच नाही.
जग बदलणार्‍या 'संकल्पनां'चा आढावा याच धर्तीवर घेणारं एक पुस्तक आहे त्याची आठवण झाली -
राजू परुळेकर - आयडियाज आर डेंजरस (अर्थात प्री-राज पिरियडमधले परुळेकर बरे का!)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · गुरुवार, 24 Jun 2010 - 18:45

२, ७, ९ - ही तीन पुस्तकं अशी आहेत की ती वाचण्याची संधी होती. त्यापैकी २ माझ्याकडं आहेच. ते वाचून काढलं एकदा. पण त्या वाचण्याला अर्थ नाही. समजून घेण्यासाठी पुन्हा वाचलं पाहिजे. ७ क्रमांकाचं पुस्तक हाती घेतलं आणि बाजूला ठेवलं. आत्ता अलीकडं मार्केट इकॉनॉमीवर तावातावानं भांडताना या पुस्तकाचा पुन्हा संदर्भ आला तेव्हा वाटलं वाचलं पाहिजे. पण पाहू. मार्क्सच्या पुस्तकाला त्याविषयीच इतके वाचले असल्याने लांबूनच सलाम करावा की काय या मनस्थितीत आलोय. बाकीपैकी पहिलं पुस्तक वाचावं असा मोह होतोय. पण ते गणीत कळेल का?
प्रभाकरराव, तुम्ही या पुस्तकांचा एका लेखातून परिचय का करून देत नाहीये? पुस्तकांचा नुसताच परिचय नाही, खरं तर याच लेखाचा थोडा विस्तार करून त्याविषयी ती जग बदलणारी कशी हे का लिहित नाही? माझ्याशी इथं अनेक जण सहमत असतील हे नक्की.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · गुरुवार, 24 Jun 2010 - 18:50 · उत्तर

प्रभाकरराव, तुम्ही या पुस्तकांचा एका लेखातून परिचय का करून देत नाहीये? पुस्तकांचा नुसताच परिचय नाही, खरं तर याच लेखाचा थोडा विस्तार करून त्याविषयी ती जग बदलणारी कशी हे का लिहित नाही? माझ्याशी इथं अनेक जण सहमत असतील हे नक्की.

खरंच. मोडकांना अनुमोदन!!!

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 24 Jun 2010 - 19:02 · उत्तर

एकच कशाला.. मस्त दहा पुस्तकांवर दहा भागांची लेखमालिका आली तरी चालतेय की! पहिले पुस्तक बहुतेक लहानपणी बघितल्यासारखे वाटतेय. तेव्हा टाळक्यात काही घुसणे शक्यच नव्हते.. पण आता मिळवून वाचायला आवडेल. इतर पुस्तकांचीही थोडी अधिक माहिती कळली तर निर्णय घेणे सोपे जाईल असे वाटते. आन् देओ गाडी... :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Fri, 25 Jun 2010 - 16:14

वर इतरांनी उल्लेखल्या प्रमाणे आपणास विनंती करतो की या पुस्तकांबद्दल आपण वेळ काढुन लिहावे.
हा अल्प परिचयही मौलिक आहे.
धन्यवाद.

चर्चा प्रकार