जगण्याचा नेमका मार्ग!

प्रभाकर नानावटी

मजकूर

जगण्याचा नेमका मार्ग!

जरा शहाणे होऊ! हे पुस्तकाचे शीर्षक थोडेसे पॉप्युलर टाइप असले तरी पुस्तकातील आशय मात्र गंभीरपणाने विचार करणार्‍यासाठी आहे. माणूस प्राणी लाखो वर्षे या पृथ्वीवर आहे. परंतु नेमके कसे जगावे, कसे विचार केल्यास माणूस सुखी - समाधानी होईल हे अजूनही त्यास कळले नाही. प्रत्येक कालखंडात काहीना काही नवीन टूम निघते व लोक त्याच्यामागे (काहीही साधक बाधक विचार न करता!) धावत असतात व शेवटी निराश होऊन आहे तेथे परत येतात. परंतु गेली 200 - 300 वर्षात माणसाच्या हाती विचार करण्याची नवीन वैज्ञानिक पद्धत, सुख सोईने जीवन जगण्यासाठी नवीन तंत्रज्ञान मिळालेले आहे. त्यामुळे आता तो पूर्ण विचारांती स्वत:चा मार्ग शोधू शकतो. त्यासाठी कुठल्याही प्रेषितांच्या आदेशाच्या वा धर्मग्रंथांच्या कुबड्यांची जरूरी भासणार नाही. याचाच प्रत्यंतर शरद अभ्यंकर यानी या पुस्तकाद्वारे आणून दिला आहे.

डॉक्टरांनी समाजातील अपप्रथा, गैरसमजुती, अंधश्रद्धा, रूढी - परंपरांचा ध्यास, हेकेखोरपणा, इत्यादीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. आपण याविषयी कुठे चुकतो, काय करायला हवे हे स्पष्ट केले आहे. आपल्या समाजातील अजूनही पाळली जात असलेली व्रत वैकल्ये, रूढी परंपरा, देव-धर्माचा अतिरेक, संस्काराच्या चुकीच्या कल्पना याविषयी सडेतोड भाष्य त्यांनी केले आहे. अनेक वेळा आपला अशा गोष्टींवर विश्वास नाही, अशा अंधश्रद्धांशी आपला संबंध नाही, केवळ मानसिक समाधानासाठी त्यातील काही तुटपुंज्या गोष्टी आम्ही पाळतो, असे वाटत असले तरी रूढी परंपरांचे हे ओझे व बालपणापासून आपल्या मनावर बिंबवलेल्या अशा गोष्टी समाजमानसाला एक वेगळा संदेश देत असतात व त्यामुळे हितसंबंधीयांचे आयतेच फावते. आपली ही मूकसंमती व सामाजिक अपप्रवृत्तीकडे होत असलेली डोळेझाक प्रदूषणांना आमंत्रण देवू शकते, दंगली घडवू शकते व समाजजीवनावर विपरीत परिणाम करू शकते. आताच्या समाजाचा हा वाढत असलेला देवभोळेपणा समाजास हितावह नाही असे लेखकाला वाटते. चांगल्या गोष्टी घडल्या तर त्या देवामुळे, आणि वाईट घडल्या तर आपली भक्ती कमी पडल्यामुळे असे देवावर विश्वास ठेवणारे सर्व मानतात. देव सर्व काही करतो, आणि जे करतो ते भल्याकरताच करतो या अत्यंत भ्रामक आणि भोळसट समजुतीपायी, मोठ्या नैसर्गिक आपत्ती, परकीय आक्रमणे, अन्याय यांचा मुकाबला करण्याऐवजी, लोक देवाची प्रार्थना करणे किंवा देवाला बोल लावणे एवढेच करत राहत. जेवढा समाज अशिक्षित आणि मागास, तेवढा त्या समाजाचा देवाचे उत्सव, यात्रा, बळी, मिरवणुका, यज्ञ, पूजा, जेवणावळी, यावर खर्च होणारा वेळ व पैसा जात असे. लेखकाच्या मते देव, धर्म याबरोबरच टोकाची राष्ट्रीय व भाषिक अस्मितासुद्धा समाजाच्या र्‍हासास कारणीभूत ठरत आहे.

आपल्या बालपणात झालेल्या संस्कारांचा आपल्या श्रद्धाविषयक समजुतीवर फार मोठा पगडा असतो. काळे मांजर आडवे गेल्यावर (शक्य असल्यास!) एक क्षणभर तरी थांबावेसे वाटते. रूढी, प्रथा, परंपरेने आखून दिलेल्या गोष्टी न केल्यास आपले काही तरी नुकसान होणार या भयगंडापायी व ही शक्यता गृहित धरून चटावरच्या श्राद्धासारखे आपण या गोष्टी उरकत असतो. असे केल्यामुळे कुणाचे नुकसान तर होत नाही ना, मग करायला काय हरकत आहे अशा मानसिकतेमुळे आपण कुठे थांबावे व कुठे थांबू नये याचे भान रहात नाही. म्हणूनच मुंबईतीतील लालबाग गणपतीच्या दानपेटीत लाखोंनी दाग दागिने व पैसा टाकला जातो, पुण्याचा दगडूशेट गणपती आणखी श्रीमंत होतो. अभ्यंकरानी अशा अनेक प्रकारच्या कालबाह्य व कालविसंगत रूढी परंपरावर ताशेरे ओढले आहेत. या गोष्टी केवळ ग्रामीण भागातील अशिक्षितच करतात, व शहरातील सुशिक्षित विवेकी जीवन जगत आहेत, हा आपला गोड गैरसमज आहे, हे डॉक्टर पुराव्यानिशी सिद्ध करतात. सगोत्र विवाह, गुरुपुष्य योग, दैववादाला पाठिंबा, स्वप्न व दृष्टांताच्या सत्यतेवर विश्वास, वास्तुशास्त्र-फलजोतिष यांचा भंपकपणा, पुनर्जन्माच्या ऐकीव गोष्टीवरील जाहीर चर्चा, भोंदू बाबा-बुवांच्या चमत्कारांची भलावण, नवस हा एका प्रकारे देवाला दिलेली लाच, गर्भसंस्काराचा खोटेपणा, हिंदू मनाला प्रिय असलेली 'ग' ची बाराखडी (गायत्री मंत्र, गणपती, गीता, गीर्वाण भाषा, गुरु, गूढ विद्या,गोमूत्र, गंगा..) योग म्हणजे जादूची कांडी हा समज इ.इ. अनेक विषयावरील लेखकाच्या मुद्देसूद मांडणीवर आपल्याला प्रतिवाद करता येत नाही.

बर्ट्रंड रसेलच्या An Outline of Intellectual Rubbish या अप्रतिम लेखाचा स्वैर अनुवाद व हिंदू मनाची जडण घडण एक चिकित्सा हे लेख या पुस्तकाचे परमोच्च बिंदू आहेत असे म्हणता येईल. समाजालील अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हायला हवे (किमान पक्षी त्या कमी कमी होत गेल्या पहिजेत) अशी तळमळ असलेल्यांनी जवळ बाळगले पाहिजे असा हा एक संदर्भ ग्रंथच आहे.

जरा शहाणे होऊ!
लेखक: डॉ. शरद अभ्यंकर,
अक्षर मानव प्रकाशन, पुणे;
पृ.सं - 184; किं - 150 रु

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 4 Oct 2010 - 07:54

परिचयाबद्दल आभार.
परिचयावरून तरी लेखन भारतीय समाजाला डोळ्यासमोरच लिहून केल्यासारखे वाटले. कारण जरी विविध प्रेषितांमागे जग धावत असले तरी "देव सर्व काही करतो, आणि जे करतो ते भल्याकरताच करतो" काय किंवा "त्सव, यात्रा, बळी, मिरवणुका, यज्ञ, पूजा, जेवणावळी" काय ह्या पूर्ण भारतीय पद्धती आहेत.

पुस्तकात हाच श्रद्धावाद विविध प्रांतातील उदाहरणे घेऊन अभ्यासला आहे की केवळ भारतातील? हे विचारायचे कारण परदेशांतही विविध अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसतात.

यशोधरा

यशोधरा · Mon, 4 Oct 2010 - 08:48

तुम्ही अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख करुन देत आहात. मनापासून आभार.
जरासे अवांतर - निळू दामल्यांचे लवासा आपण वाचले आहे का? असल्यास तुमची त्यावरील मते वाचायला आवडेल.

चर्चा प्रकार