झोपी गेलेल्याला जागे करा

आरागॉर्न

मजकूर

तिच्या जन्मापासूनच गरीबी सोबतीला होती. आई नोकराणी, बापाचा पत्ता नाही. पहिली सहा वर्षे आजीकडे काढली. गरीबी इतकी की आजी बटाट्याच्या पोत्याचे कपडे शिवून तिला घालायला लावायची. त्यामुळे ती चेष्टेचा विषय बनली होती. ती नऊ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला, नंतर नातेवाईक आणि परिचित यांच्याकडून विनयभंगाचे बरेच प्रकार घडले. १४ वर्षांची होती तेव्हा घरातून पळून गेली. गरोदर राहीली, मुलगा जन्मल्यानंतर काही काळातच मेला. इथपर्यंत ऐकल्यावर सहानूभूती वाटते, नाही? आणि आत्ता ती कुठे असेल असे विचारले तर डोळ्यासमोर कितीतरी वाईट पर्याय येतात. खरी परिस्थिती अशी आहे की तिला कुणाच्याच सहानूभूतीची गरज तेव्हाही नव्हती आणि आत्ता तर नाहीच नाही. ती सध्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला आहे. फोर्ब्ज मासिकाच्या अनुमानाप्रमाणे २०१० मध्ये तिची मालमत्ता $२७० कोटी आहे. याखेरीज तिने लोकांसाठी केलेले काम इतके मोठे आहे की तिचे नावच तिची ओळख आहे - ऑप्रा विनफ्रे.

चित्र दुसरे : तो विसाव्या शतकातील सर्वात लोकप्रिय अमेरिकन गायकांपैकी एक होता. पैसा, लोकप्रियता, गुणवत्ता कशाचीही कमी नव्हती. तरीही प्रत्येक दिवशी कॉन्सर्टनंतर साधी झोप येण्यासाठी त्याला सहा वेगवेगळ्या झोपेच्या गोळ्या, आणि नंतर डेमेरॉलची तीन इंजेक्शन घ्यावी लागत. हे घेतल्यानंतर अर्धवट झोपेत तो तीन चीझबर्गर आणि सहा-सात बनाना स्प्लिट खात असे. कधीकधी तोंडात घास असताना झोपी गेला तर त्याचे नोकर अन्न श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून तोंड उघडून स्वच्छ करीत आणि मग त्याला बेडरूममध्ये उचलून नेत असत. औषधांचा परिणाम तीन-चार तास रहात असे. मग परत एक डोस. कधीकधी तिसरा डोसही लागायचा. मग दुपारी कधीतरी जाग आली की कोकेनच्या सहाय्याने संध्याकाळच्या कॉन्सर्टसाठी तो तयार होत असे. त्याच्या शेवटच्या दिवशी त्याने तीनही डोस एकदम घेतले आणि त्यानंतर त्याला त्यांची कधीच गरज पडली नाही. त्याचे नाव - एल्व्हिस प्रेसली.

ही दोन टोकाची उदाहरणे झाली. मुद्दा हा की काही लोक कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यावर मात करून यशस्वी होतात. आणि काही लोक नशिबाने सगळे मिळालेले असतानाही स्वतःच्या हाताने सगळ्याचा नाश करतात. असे का होत असावे? यामागे अर्थातच बरीच कारणे आहेत. या कारणांचा शोध घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे ऍंथनी रॉबिन्सचे पुस्तक - अवेकन द जायंट विदिन. ऍंथनी किंवा टोनी - याची ओळख बर्‍याच प्रकारे करून देता येईल. लेखक, स्फूर्तिदायी वक्ता (मोटिव्हेशनल स्पीकर), सीइओ, त्याच्या म्हणण्यानुसार पीक पर्फॉरमन्स कोच ही त्याची सर्वात योग्य ओळख आहे. त्याच्या क्लायंटची यादी डोळे दिपवणारी आहे. नेल्सन मंडेला, मिखाइल गॉर्बाचेव्ह, मार्गारेट थॅचर, फ्रान्झ्वा मितेराँ, बिल क्लिंटन, आंद्रे अगासी. याखेरीज पुस्तके, सेमिनार, वर्कशॉप यांच्या द्वारे त्याने जगभरातील हजारो लोकांना मदत केली आहे.

टोनीचे शिक्षण शाळा संपल्यानंतर थांबले. पुढे काय करावे याचा मार्ग स्पष्ट नव्हता. पैसे नाहीत, नैराश्य, एकटेपणा, कुणाचेही मार्गदर्शन नाही. त्याच्याच शब्दात सांगायचे तर, "एक दिवस माझ्या जेमतेम एका खोलीच्या घरात एकटा बसलो होतो. नील डायमंडचे गाणे चालू होते, अचानक भावनांचा कडेलोट झाला आणि मी ओक्साबोक्शी रडू लागलो. सगळे निरर्थक आहे असे वाटू लागले. मग अचानक आत काहीतरी हलल्यासारखे वाटले. त्या क्षणी मी निर्णय घेतला की आता बास. ह्या क्षणापासून मी माझे आयुष्य घडवणार. तो माझ्या आयुष्यातील कलाटणीचा क्षण होता." नंतर प्रसिद्ध उद्योगपती जिम रॉन यांच्या संपर्कात आल्यावर टोनीने पर्सनल ग्रोथ या विषयाला वाहून घ्यायचे ठरवले. या काळात त्याने ७००हून अधिक पुस्तके वाचली, व्याख्याने ऐकली. हजारो लोकांना भेटला. सर्वांमागे कारण एकच. यशस्वी लोक यशस्वी का होतात याचा शोध घ्यायचा. या सर्व अनुभवातून आलेले पुस्तक म्हणजे अवेकन द जायंट विदइन.

सेल्फ हेल्प किंवा पर्सनल ग्रोथ हा विषय आपल्याकडे फारसा लोकप्रिय नसावा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार सारखे वाक्प्रचार किंवा गुरूवारी-रविवारी वर्तमानपत्रात येणारे 'सुखी संसाराचा मंत्र : समजूतदार व्हा' सारखे चतकोर पानांचे लेख हे सगळीकडे बघायला मिळतात.
पण याला पर्सनल ग्रोथ म्हणणे म्हणजे मुळशी ड्यामला नायगारा म्हणण्यासारखे आहे. अपवाद म्हणजे आनंद नाडकर्णी किंवा राजेंद्र बर्वेंसारखे लोक मानसोपचाराच्या दृष्टीकोनातून यावर उत्तम लिहीत असतात. तुलनेत इंग्रजीत यावर अक्षरशः हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. टाइम मॅनेजमेंटपासून ते पॅराडाइम शिफ्टपर्यंत प्रत्येक बाजूने कीस काढणारी पुस्तके आहेत. अवेकन.. त्यातील एक. आपण जे निर्णय घेतो, ज्या तर्‍हेने लोकांशी वागतो, त्याचा आपले समज, आपली मूल्ये यांच्याशी कसा संबंध असतो या सर्वांचा उहापोह विस्तृतपणे केला आहे. पुस्तक नुसते वाचून उपयोग नाही. यात बर्‍याच प्रश्नमंजुषा आहेत, अवघड चॅलेंजेसही आहेत. उदा. सतत दहा दिवस मनात एकही नकारात्मक विचार न येऊ देणे. वाटते तितकी ही परीक्षा सोपी नाही. बरेच उपयोगी सल्ले आहेत. उदा. प्रत्येक दिवशी ३० मिनिटे वाचन केलेत वर्षभरात कितीतरी पुस्तके वाचून होतील. समजा तुम्हाला शिल्पकलेत रूची असेल तर दोन वर्षात रोज ३० मिनिटे वाचन केल्यावर तुम्हाला तज्ञ नाही तरी माध्यमिक पात्रतेची ओळख नक्कीच होऊ शकेल.

पुस्तक मोठे आहे. (~५३० पाने.) आणि सर्वांना भावेल असे अजिबात नाही. काही लोकांना टोनी खूप आवडतो तर काहींना अजिबात आवडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा सळसळता उत्साह बरेचदा अति वाटू शकतो. मला स्वतःला तो स्फूर्तिदायक वाटतो. यूट्युबवर त्याच्या बर्‍याच चित्रफिती उपलब्ध आहेत. दुकानात जाऊन पुस्तक दहा मिनिटे चाळून बघावे आणि नंतर निर्णय घ्यावा असे सुचवावेसे वाटते. पुस्तक वाचाल किंवा न वाचाल, पण या निमित्ताने थोडे आत्मपरीक्षण झाले तरी छान. माझ्या मित्रमंडळामध्ये कितीतरी लोक या ना त्या कारणाने नाखूष आहेत. एखादा इंजिनिअरचे कामात मन लागत नाही कारण त्याचा खरा ओढा चित्रकलेकडे आहे. आणखी कुणी दोन वर्षांपूर्वी तिने नकार दिला म्हणून अजून दु:खी आहे. स्वतःचे पोटेन्शिअल खर्‍या अर्थाने ओळखून त्याला मनमुराद वाव दिला तर किती अशक्यप्राय गोष्टी साध्य होऊ शकतात हे या लोकांना उमजण्याची गरज आहे असे वाटते. इथे प्रीचिंग करण्याचा हेतू नाही. मात्र तुमच्यामधला सुप्त जिनियस जर झोपी गेला असेल त्याला कुठल्यातरी मार्गाने जागे करण्याची गरज आहे. पुस्तकाचे नाव हेच सांगते - अवेकन द जायंट विदइन.

अभिप्राय

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Sat, 27 Nov 2010 - 08:45

सेल्फ हेल्प पुस्तकांबद्दल माझ्या मनात एक तुच्छतादर्शक पूर्वग्रह आहे खरा. पण नुकताच माझ्या एका मित्राचा अनुभव ऐकला - त्याने ठरवून ही असली सेल्फहेल्प पुस्तके सलग काही आठवडे वाचली. त्याला नेहमी भासणारी अर्थशून्यता, उदासीनता, निष्क्रियता बरीच कमी झाली. त्याच्याच म्हणण्यानुसार हा कदाचित तात्पुरता परिणाम असेल. पण बरेचदा निष्क्रिय मनःस्थितीतून बाहेर येण्याकरता एखाद्या नैमित्तिक / तात्कालिक टेकूचीच आवश्यकता असते.
या पुस्तकाने त्या फीडब्याकची आठवण झाली. परिचयाबद्दल आभार. आता मी हे पुस्तक बहुधा वाचीन. :)

सेमी अवांतरः तसे मला आनंद नाडकर्णींचे 'मुक्तिपत्रे' हे पुस्तक आवडते. बुद्धिमान आणि व्यसनी माणसाला व्यसनापासून दूर राहण्यासाठी मदत करणारी त्याच्या उपचारकाने त्याला लिहिलेली पत्रे, असे त्याचे स्वरूप आहे. हे पुस्तक खरे तर निव्वळ दारू आणि व्यसन याबद्दल बोलते आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. पण लेखकाला बहुधा अभिप्रेत असावा तो दृष्टिकोनातला मूलभूत बदल. ते पुस्तक माहितीपर, सकारात्मक, रंजक आहे आणि तरीही ते बेतीव वाटत नाही.

आरागॉर्न

आरागॉर्न · Sat, 27 Nov 2010 - 09:28 · उत्तर

हरकत नाही. सर्वांची मते सारखी हवीत असे नाही. :)
मी मात्र इटर्नल ऑप्टिमिस्ट आहे आणि याचा आजपर्यंत फायदाच झाला आहे. नाडकर्णी वगैरेंची पुस्तके फक्त मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून या विषयाकडे बघतात. प्रत्यक्षात याचा आवाका बराच मोठा आहे. ज्याची जशी आवड असेल तसे त्याने घ्यावे. पुस्तक बरेच मोठे आहे. आधी चाळून बघ, कसे वाटते ते.

यशोधरा

यशोधरा · Sat, 27 Nov 2010 - 09:29

स्वतःचे पोटेन्शिअल खर्‍या अर्थाने ओळखून त्याला मनमुराद वाव दिला तर किती अशक्यप्राय गोष्टी साध्य होऊ शकतात

हे सगळ्यात ब्येष्ट. आणि प्रीचींग करत नाहीयेस हे त्याहून. नाहीतर मी सांगतोय आणि तुम्हाला पटत नाही म्हंजे काय, असे व्हावयाचे :) आणि हो, सद्ध्या तरी पुस्तक विकत घेणार नाही असे म्हणत असले, तरी चाळून नक्कीच पाहीन, न जाणो घ्यावेसे वाटले तर? :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 27 Nov 2010 - 10:26

बापरे! सेल्फ हेल्प पुस्तके बघितली की अशीच प्रतिक्रीया उमटते.. अगदी नियमानी ठरल्याप्रमाणे कोणीतरी दरवर्षी "अरे नाही, हे तसं नाहि आहे, हे पुस्तक तु वाचच!" म्हणून मागे लागतं आणि मग मी ते वाचतो आणि मग सालाबादप्रमाणे सेल्फ हेल्प वाचायचे नाही असे मी ठरवतो (नियम सिद्ध व्हायला लागणारा अपवाद म्हणून मागे एक "फिश" नावाचं म्यानेजमेंटसाठीचं पुस्तक आवडलं होतं म्हणा)

यंदा गेल्या वर्षी केलेला निश्चय वर्ष संपतय तरी मोडलेला नाहि. बहुदा ह्या इतक्या भारावलेल्या परिक्षणानंतर तो मोडेल की काय शंका येतेय.

पुस्तक चाळून बघावेच लागेल असे परिक्षण.. लगे रहो!!

आरागॉर्न

आरागॉर्न · Sat, 27 Nov 2010 - 12:11 · उत्तर

सेल्फ-हेल्पमध्ये भिती वाटण्यासारखे काही नसावे. :)
एक आहे, पुस्तक काळजीपूर्वक निवडायला हवे. या विषयातील ५०-६०% पुस्तके पुड्या बांधण्याच्या उपयोगाची असतात. उदा. टाइम म्यानेजमेंटवरची बहुतेक पुस्तके तुम्हाला वेळ कसा वाचवावा ते सांगतात. पण मुळात तुम्ही जी कामे करत आहात त्यांची व्हॅल्यु नसेल तर त्या म्यानेजमेंटचा फारसा फायदा नाही. थोड्या सरावाने चांगली पुस्तके कोणती हे ओळखता येते.
बहुतेक करून या विषयातील इंग्रजीमधील, भारतीय लेखकांची पुस्तके फारशी चांगली नसतात असा अनुभव आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 29 Nov 2010 - 09:53 · उत्तर

दर वेळी भरपूर शिफारसीमुळे (फुगलेल्या)(आणि/किंवा नव्या) आशेने पुस्तक उघडावे --> वाचायला सुरवात केली आहे म्हणून संपवले इतपतच ते निघावे असे किमान ५-६ वेळा झाले आहे :(. आता कोणी सेल्फ हेल्प रेकमेंड केलं की आपोआप "बापरे!" येतं :P.

असो. (जित्याची खोड.. या धर्माप्रमाणे) हे पुस्तक दिसल्यास चाळून नक्की बघेन! :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 27 Nov 2010 - 13:43

सेल्फ हेल्प कधी वाचेल असे वाटत नाही. पण ऑप्राची स्टोरी सांगितल्याबद्दल बद्दल धन्यवाद, नवीन माहिती मिळाली.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 27 Nov 2010 - 17:35

या आणि अशा प्रकारच्या पुस्तकांची ओळख मला डेल कार्नेजी माध्यमातून यापूर्वीच झाली होती. पण मला वाटते सेल्फ हेल्प ही संकल्पना अमेरिका आणि युरोपमध्ये (प्राधान्याने) रूजण्याची जी काही कारणे आहेत ती तेथील भौतिकवादामुळे. मी हे अशासाठी म्हणत आहे की अतिसौख्यामुळे (विशेषतः युद्धोत्तर अमेरिकेत....डॉलर मजबूत झाल्यानंतर) अमेरिकन नागरिक भरल्या पोटी "मला आता यापेक्षा जास्त काय हवे?" हे गाणे गुणगुणू लागला आणि त्याचे उत्तर त्याला हवे त्या रागदारीत न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडत गेला.....अतिपणाचे ते एक उदाहरणच होय. मग मानसशास्त्रीय नजरेतून या समस्येकडे पाहण्याचे "फॅड"च निघाले आणि त्यातून सुरू झाली (असावी) ही सेल्फ-हेल्प मालिका.

भारतीय संस्कृतीत हा विचार इतक्या तीव्रतेने रूजलेला नाही...त्याला कारण वैदिक संस्कृती आणि रामायण-महाभारतासारखे भरभक्कम साथीदार आपल्या जीवनात अभेद्य स्थान मिळवून आहेत. ज्या ज्यावेळी आपल्याला (भारतीय मनाला) 'हेल्प' ओरड करावी असे वाटते त्या त्या वेळी आपण या ग्रंथांना गुरू मानून त्यांचे मार्गदर्शन शिरोधार्थ मानतो.. मग भले ते कितीही किचकट असो वा नसो. अमेरिकन नागरिकासमोर भूतकाळाची अशी उज्ज्वल परंपरा सांगणारे ग्रंथराज नाहीत, त्यामुळे 'सेल्फ-हेल्प' चे जे काही हायब्रीड पीक तिथे जोमाने वाढते त्याचे कारण तिकडील साहित्यातील ऐतिहासिक परंपरेची गंगोत्री शुष्क आहे म्हणूनच.

आरागॉर्न यानी पुस्तक परिचय सुरेखच करून दिला आहे यात दुमत नाही....पण ऑप्राचे ते उदाहरण असो वा प्रिस्लेचे... यामुळे ते पुस्तक डोक्यावर घ्यावे असे मानू नये....शेवटी तसली उदाहरणे हा देखील एक शेअर बाझार झूममध्ये आणण्याची टिपिकल ट्रीक असतेच.

शेवटी आपल्या रंगात रंगूनच इथे राहायचे असेल तर ब्रश आणि कॅनव्हास या मातीतीलच हवा.

इन्द्रा

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 29 Nov 2010 - 10:08 · उत्तर

वाह, काय सुरेख प्रतिसाद आहे !! उत्तम.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 29 Nov 2010 - 16:18 · उत्तर

थँक्स प्रसाद....तुझ्यासारख्या छिद्रान्वेषी वाचकाला प्रतिसाद आवडला....यातच सर्व काही आले.

इन्द्रा

शमिश

शमिश · Mon, 29 Nov 2010 - 14:32 · उत्तर

इन्द्रा,

सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे इतकेच म्हणतो. अगदी कसं मनातलं लिहीलंत !

जिये इन्द्रा, जियो!!

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 29 Nov 2010 - 16:24 · उत्तर

काय बोलू (वा लिहू) या देखण्या कौतुकावर? तुमच्या बोटातून टंकले गेलेले 'सरस्वती' हे नावच इतके पवित्र आहे की ते वाचता क्षणीच वैराणातून हिरवा पोपट नाचत गेल्याचा भास व्हावा. थॅन्क्स.

~ नावावरून आठवले....तुमचे "शमिश" हे नाव मला शांतिनिकेतनच्या प्रांगणात घेऊन गेले. तिथल्या हवेतीलच वाटते... जसे "पारूल" !!...पारूलचा अर्थ 'चाफा'...तसा 'शमिश' चा काही सुगंधी अर्थ आहे का? सहज औत्सुक्याने विचारीत आहे, खाजगी असेल तर उत्तर देण्याची आवश्यकता नाही.

इन्द्रा

आरागॉर्न

आरागॉर्न · Sun, 28 Nov 2010 - 10:57

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. :)

नंदन

नंदन · Sun, 28 Nov 2010 - 20:55

चांगला परिचय. एल्विस आणि ऑप्राची उदाहरणं 'तरीही' पेक्षा 'त्यामुळेच' मध्ये (डिस्पाईट पेक्षा बिकॉज ऑफ) मोडत असावीत का, असंही वाटून गेलं.

सेल्फ-हेल्प पुस्तकांबद्दल माझंही मत फारसं चांगलं नाही. अगदी सुरुवातीला अशी पुस्तकं वाचून स्फूर्ती वगैरे यायची, पण ती अगदीच अल्पजीवी असे. त्यामुळे अशा पुस्तकांची किंवा ती वाचणार्‍यांची कधी थट्टा केली नाही, तरी त्या वाटेला पुन्हा फिरकलोही नाही. आता ते मत जरा पुन्हा तपासून पहावंसं वाटतं आहे. संधी मिळाली तर हे पुस्तक वाचून पाहतो.

आरागॉर्न

आरागॉर्न · Mon, 29 Nov 2010 - 06:28 · उत्तर

सेल्फ-हेल्प पुस्तकांची निवड ही थोडी ट्रिकी गोष्ट आहे असे वाटते. ऋषिकेशला म्हटल्याप्रमाणे बरीचशी पुस्तके वाचण्याच्या योग्यतेची नसतात. दुसरा मुद्दा म्हणजे कुठलेही पुस्तक जादूची कांडी ठरत नाही. त्यातून नवे विचार, दृष्टीकोन मिळू शकतात पण नंतरचे सगळे काम तुम्हाला करायचे असते. :)
पुस्तकात एल्विस, ओप्रा यांच्याबरोबरच इतर अनेक उदाहरणे आहेत. होंडा कंपनीचे मालक यांनी सुरूवातील किती अडचणी आल्या हे वाचून छाती दडपते. असो.

पुस्तक चाळून बघावे, रूचले तर पुढे जावे. :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 29 Nov 2010 - 06:31

".....त्यामुळे अशा पुस्तकांची किंवा ती वाचणार्‍यांची कधी थट्टा केली नाही, तरी त्या वाटेला पुन्हा फिरकलोही नाही...."

~ हे मत जसेच्यातसे माझेही आहे. किंबहुना मी असे म्हणेन की, मला त्या (किंवा तशा मुशीतील विद्यापीठीय गाईड्सचीही) धर्तीच्या पुस्तकांची कधी आवश्यकता भासलेली नाही... पण मी वाचत नाही म्हणून त्यांचे महत्व कमी आहे असेही मी कधी मानलेले नाही.

हा खुलासा मला करायचाच होतो....जो नंदनने सोपा केला.

इन्द्रा

मृदुला

मृदुला · Tue, 30 Nov 2010 - 01:27

वर्णनावरून रोचक वाटते आहे.

ऑप्राच्या उदाहरणामुळे मला लहानपणीची माझी व एका मैत्रिणीची चर्चा आठवली. थोरामोठ्यांची चरित्रे टाईप पुस्तक शाळेच्या वाचनालयात वाचून आम्ही निष्कर्ष काढला होता की आमच्या निवांत आयुष्यामुळे आम्ही त्या गोष्टीतल्या लोकांसारखे होऊ शकणार नाही. ओप्रासारखे सगळ्यांचे हाल व्हावे असे म्हणत नाही पण असे हाल झालेल्या किती मुली तिच्या सारख्या झाल्या आणि किती नाही आणि निवांत बालपण गेलेल्या किती मुली वाईट मार्गाला लागल्या आणि किती मिशेल ओबामाच्या वाटेने गेल्या याचे काही आकडे आहेत का? मला वाटते परिस्थिती, स्वभाव आणि थोडा फुलपाखराचा प्रभाव यातून कोण कोणत्या वाटेने जाईल ते ठरते. ते फुलपाखरू कदाचित एखादे स्वमदत पुस्तक किंवा भाषण असू शकते हे खरेच, पण नसूही शकते हेही खरेच.

मला काही स्वमदत पुस्तके आवडली. ऋने उल्लेख केलेले फिश हे त्यातलेच.

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 30 Nov 2010 - 04:49 · उत्तर

रोचक मुद्दा आहे. सर्वांना पुस्तकांची गरज भासेलच असे अजिबात नाही. पुस्तके नेसेसरी अँड सफिशंट कंडीशन नाहीत. कित्येक लोक स्वयंपूर्ण असतात. आकडेवारी माझ्या तरी पाहण्यात आलेली नाही. पण निवांत आयुष्याचा विचार करायचा झाला तर असा निवांतपणा फायदेशीरही असू शकतो. आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन प्रत्येक क्षेत्रात स्वतःमध्ये सुधारणा करणे हे एक मूल्य आहे. एकदा ते मूल्य तुम्ही अंगिकारले की निवांत आयुष्यामधूनही तुम्ही त्याच दिशेने वाटचाल करू शकाल असे वाटते.

मासा पुस्तके वाचलेली नाहीत. आता बघेन. :)

शुचि

शुचि · Sun, 5 Dec 2010 - 03:31

मला सेल्फ्-हेल्प पुस्तके भयंकर आवडतात. एक तर दे कीप यु फोकस्ड आणि दुसरं म्हणजे मनोरंजन देखील होते. मी कविता आणि सेल्फ्-हेल्प पुस्तकांची शौकीन आहे. आता ऑपराह विनफ्रेयचेच उदाहरण घ्या मला कौतुक वाटलं. हा धागा वाचल्याचं सार्थक झालं.उत्तम परिचय.त्याची चित्रफीत पाहीली. खूप ओघवत्या शैलीमध्ये बोलतो आहे. उत्तम वक्तृत्व, नेमकेपणा, विषयाची पकड हे गुण आहेतच आहेत. मला झिग झिगलर ची पुस्तके आवडली होती.

आरागॉर्न

आरागॉर्न · Sun, 5 Dec 2010 - 05:58 · उत्तर

अनेक आभार, शुचि. :)

मलाही टोनीची वक्तृत्वशैली आवडते. याचाही त्याने पुस्तकात उल्लेख केला आहे. अमेरिकेत बरेच लोकप्रिय आणि उत्कृष्ट सेल्फ-हेल्प कोचेस आहेत. टोनी बहुधा टॉप १० मध्ये असावा. त्याच्या व्यतिक्रिक्त मला जॅक केनफिल्ड, स्टीव्ह पावलीना ही लोकही आवडतात. यामुळे फोकस्ड रहाण्यास मदत होते हे पटले.

टोनीच्या बर्‍याच चित्रफिती बघण्यासारख्या आहेत. माझी आवडती म्हणजे त्याने त्याचा मित्र, सिल्व्हेस्टर स्टॅलोनची गोष्ट त्याच्या शब्दात सांगितली आहे. रॉकी मिळण्यासाठी त्याला किती तीव्र संघर्ष करावा लागला, पैसे नव्हते म्हणून कुत्रा विकण्यापर्यंत वेळ आली. (रॉकी मध्ये आहे तोच कुत्रा!) हे सर्व टोनीच्या ओघवत्या शैलीत ऐकण्यासारखे आहे.

चर्चा प्रकार