- Log in to post comments
कष्टकर्यांची जिद्द!
मध्यमवर्गातील बहुतेकांना संप, बंद, धरणं, मोर्चा, साखळी उपोषण, आमरणांत उपोषण इत्यादी शब्दांची नेहमीच अलर्जी असते. श्रीमंत तर या गोष्टींशी आपला सुतराम संबंध नाही असेच वागत असतात. परंतु कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा प्रकारच्या गोष्टींचा अवलंबन का करतात याचा थोडासा विचार केल्यास त्यांच्यावर लादलेल्या या नामुष्कीला आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, कळत वा न कळत जवाबदार असतो. मोर्चा बघत असताना किती man-hours वाया गेले याचा हिशोब मांडत बसण्यापेक्षा ही परिस्थिती त्यांच्यावर का आली याचाही विचार करू लागल्यास व संबंधितावर दबाव आणू शकल्यास अशा गोष्टी हळू हळू कमी होत जातील. कुठलाही कष्टकरी गंमत म्हणून या मार्गाचा अवलंब करत नाही. काही अपवाद वगळता (वा भाड्याने आणलेल्या मोर्चेकर्यांच्याबद्दलचा विचार बाजूला सारून) अन्यायकारक परिस्थितीच त्यांना गोचीत पकडत असते. आपण मात्र या गोष्टींना नेत्याला, पक्षाला, पुढार्याला जवाबदार ठरवून त्यांना लाखोली वाहत आपल्या दैनंदिन व्यवहारात मश्गूल होतो. मोर्च्यात सामील झालेल्या सामान्य कष्टकरी बाईचे जीवन काय असते, तिची मुलं बाळ काय करतात, कुठे राहतात, दोन वेळच्या रोजी रोटीसाठी काय काय क्लृप्त्या वापरतात याचा विचार करणेसुद्धा आपल्या जिवावर येत असते. परंतु एका रणरागिणीची हकीकत हे पुस्तक वाचताना आपले मध्यम वर्गीय विचार (थोडा काळ तरी!) नजरेआड होऊ लागतात व आपण अस्वस्थ होऊ लागतो.
अशा प्रकारच्या सामान्यातील सामान्यांची ओळख करून देणारी काही पुस्तकं कॉ. गोविंद पानसरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध झालेली आहेत. एखाद्या पुढार्याचा अमृत महोत्सव म्हटले की काही गोष्टी पारंपरिकपणे पाळल्या जात असतात. त्यापैकी गौरवग्रंथ या प्रकारामध्ये उत्सवमूर्तीबद्दल इतर लेखकमित्रांनी लिहिलेले गुणवर्णनपर गौरवगान नेहमीच आढळते. परंतु कॉ. गोविंद पानसरे यानी अशा प्रकाराला फाटा दिला आहे. अमृतमहोत्सवानिमित्त उभ्या केलेल्या आर्थिक पाठबळातून सन्मान-समारंभ, हार-तुर्याऐवजी गेल्या नव्वदहून अधिक वर्षे डाव्या चळवळीत, साम्यवादी पक्षात निरलसपणे आयुष्य वेचलेल्यांच्या त्यागी जीवनाचा परिचय करून देणारी काही पुस्तकं या निमित्ताने छापली आहेत. त्यापैकी एका रणरागिणीची हकीकत हे पुस्तक माझ्या वाचनात आले. सर्वार्थाने भ्रष्ट झालेल्या आताच्या राजकारणात, समाजकारणात आणि सांस्कृतिक चळवळीत आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी व्यक्तिमत्वे काही दशकापूर्वी होत्या हे सांगूनही विश्वास बसणार नाही. रणरागिणी पार्वतीबाई भोर यांचे चरित्रवजा माहितीपर आत्मवृत्त वाचताना आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.
पार्वतीबाईंची ही जन्मकथा आपल्या डोळ्यासमोर 1920 ते 1960 पर्यंतचा जनसामान्यांचा इतिहास उभी करते. कृष्णा किंबहुने यानी केलेल्या शब्दांकनातून त्यांची ही हकीकत आपल्यापर्यंत छानपैकी पोचली आहे. 1914च्या सुमारास जन्माला आलेल्या पार्वतीबाईंचे मूळ गाव मंचरजवळचे उम्रज. तिचा आजा व बाप पोट भरण्यानिमित्त मुंबई गाठत असले तरी लग्न, कार्य, दुखवटा, जत्रा इत्यादीच्या निमित्ताने गावाकडे येणे जाणे चालूच होते. पार्वतीचा आजा व्यवसायाने न्हावी. परंतु बंड करणे, अन्यायाविरुद्ध झगडणे हा त्याचा स्वभाव. तेच गुण नातीतही उतरले होते. मनाविरुद्ध झालं की झगडायचं, भांडण करायचं हा तिचा खाक्या. वयाच्या नवव्या वर्षी तिच लग्न झालं. मुंबईतल्या चाळीत राहू लागली. लग्नापूर्वी तिच्या वडिलांनी - अप्पानी - तिला शाळेत घालण्याचा आग्रह धरला. न्हाव्याच्या दुकानातील एक मुलगा तिला रोज शाळेत पोचवायचा. नंतर त्याच्याशीच तिच लग्न झालं. चाळीमध्ये शिवाशिवी असायची. भांडणं व्हायची. या लहान मुलीला मात्र याचे आश्चर्य वाटायचे. तिच्या प्रश्नाला ठराविक उत्तरं असायची. आम्ही न्हावी. आपली जात हलकी. नऊ वर्षाच्या मुलीला खाली मान घालून चाल. डोक्यावर पदर घे. कुंकू कपाळभर लाव. मंगळसूत्र ढिलं करू नको. अशा उपदेशामुळे ती बंड करून उठायची. बामणाची सोंगं इथ आणू नकोस हे नेहमीच ऐकविलं जाई. चौथ्या इयत्तेपर्यत शिकलेली ही मुलगी इतर चार चौघीप्रमाणे गृहिणीची भूमिका बजावणे अपेक्षित होते. परंतु अनुभवाने तिला भरपूर शिकविले. नवरा भलताच संशयखोर. आयुष्यभर त्यानी तिला संशयग्रस्त नजरेने पाहिले. शेवटी शेवटी मात्र आपल्या बायकोच्या कर्तृत्वाची, तिच्यातील लढावू वृत्तीची त्याला कल्पना आली. तिच्या दत्तक भावाने तिच्यातील या चळवळी वृत्तीचे, बेडरपणाचे कौतुक केले. उत्तेजन दिले. व ती घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता स्वदेशी चळवळीत भाग घेवू लागली. खादीच्या टोप्या , रुमाल घरोघरी जाऊन विकू लागली. त्याच काळी तिला गिरणाकामगारांची व्यथा कळू लागली. भांडवलदारांच्या नफेखोरीची कल्पना येऊ लागली. व लाल बावट्यांच्या चळवळीत ती सामील झाली.
स्वत:च्या पायावर उभारून कुटुंबाला मदत होईल या उद्देशाने हट्ट करून तिने शिवण क्लासमध्ये नाव नोंदविले. या क्लासच्या बाईनी तिला भरपूर मदत केली. कॉ. देशपांडे व कॉ. बी टी रणदिवे यांच्या अभ्यास वर्गाला ती जावू लागली. गॉर्की, लेनिनची पुस्तकं वाचू लागली. घरच्या भाडणांना वैतागून ती एकदा आत्महत्या करायला निघाली होती. पुन्हा एकदा असले भेकड कृत्य करणार नाही असे लेनिनच्या पुस्तकावर हात ठेवून तिने शपथ घेतली.
तो काळ म्हणजे गिरणी कामगारांचा संपांचा काळ. कुठल्याही प्रकारचे अन्याय सहन करणार नाही ही त्या काळाची शिकवण. टेक्स्टाइल मिल्संना रणांगणाच स्वरूप यायचं. 100 - 200 दिवस संप चालायचे. गेटजवळ, मॅनेजरच्या दारातच स्त्रिया धरणं धरत होते. संपकर्यांना इतर कामगार आर्थिक मदत करायचे. कामगारांच्या पगाराच्या दिवशी थाळी फिरवली जात होती. बूर्झ्वा संस्कृतीचा मध्यमवर्ग मात्र कामगारांची थट्टा करायचा. पार्वतीबाई संपात सहभागी होत असत. सकाळच्या चारपासून त्यांचा खडापहारा असे. घरकाम, शिवणकाम व पक्षाच काम त्या संभाळू लागल्या. निधी जमवणं, पिकेटिंग करणं, सभा घेणं, प्रचार करणं, कामगारांच्या भावना काबूत ठेवणं हा तोल संभाळत अत्यंत धीटपणे पक्षकार्य करू लागल्या. कामगारांच्यासाठीच्या साक्षरता वर्गात त्या शिकवू लागल्या. प्रसंगी कामगारांसमोर भाषणं देऊ लागल्या. एखाद्याची शाबासकी त्यांना उत्तेजन देई. कॉ. ना म जोशींच्या बरोबर त्या सहकार्यवाह झाल्या. पाटकर, देशपांडे, तांबिटकर या कार्यकर्त्यानी तिला घडवलं. नागपूर, कानपूर, दिल्ली अशा ठिकाणी त्या फिरल्या. स्वातंत्र्यानंतरच्या डाव्यांच्या संपकाळातील धरपकडीत त्यांना भूमिगत व्हावे लागले. पुढे पकडल्यानंतर दीड वर्ष तुरुंगात काढली. स्वत:च्या हक्कासाठी त्या भांडत असत. तेथेही अठरा दिवस त्यांनी अन्नसत्याग्रह केला. गोदावरी परुळेकराबरोबर काम करू लागल्या. सौम्य हार्ट अटॅकमुळे दवाखान्यात जावे लागले. इतर कामगारांनी त्यांना मदत केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पार्वतीबाई राजकारणातून निवृत्त झाल्या.
या सामान्य महिलेने ज्या जिद्दीने, ज्या प्रेरणेने आपल्या आयुष्यातील अडचणीवर मात करून सामान्यासाठी लढल्या त्याला तोड नाही. म्हणूनच आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणाच्या वातावरणात एखादा लहान गट संप, मोर्चा सारखे हत्यारं वापरून अन्यायाच्या विरोधातला आपला क्षीण आवाज ऐकवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्या निष्फळ प्रयत्नाबद्दल कुत्सितपणे हसण्यापेक्षा संपकर्यांच्या भावनेशी संवेदनशील असणे सुसंस्कृततेचे लक्षण ठरेल.
एका रणरागिणीची हकीकत: कॉ. पार्वतीबाई भोर,
शब्दांकन व संपादन - कृष्णा किंबहुने
कॉ. गोविंद पानसरे अमृत महोत्सव समिती,
पा - 71, किंमत- 40 रु
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 27 Sep 2010 - 10:28
छोटेखानी पुस्तकाचा सुंदर परिचय! वाचलं पाहिजे..
कम्युनिझम हा हल्लीच्या जगात जितका निरूपयोगी वाटतो तितकाच रोचकही हेच खरं
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 27 Sep 2010 - 14:45
नानावटींचे आभार
दर सोमवारी एका वेगळ्या विषयावरील पुस्तकाबद्दल वाचायले मिळते.
आता एखादा सुद्धा सोमवार चुकु नये असेच वाटते.
आता नेहमीच यांचा परिचयांना छान परिचय म्हणावे लागते. पुस्तक वाचलेली नसतात त्या मुळे जास्त काही लिहिता येत नाहीच. संधी मिळाल्यास वाचुन इथे भर घालेल.
आनंदयात्री
आनंदयात्री · Wed, 29 Sep 2010 - 06:52 · उत्तर
नानावटींमुळे दरवेळी ननविन पुस्तकांचा परिचय वाचायला मिळतो.
मी तर पुविवर लॉगिन केले की पहिल्यांदा नानावटींचा लेख शोधतो !
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 27 Sep 2010 - 15:20
सुंदर परिचय. आणि निखिलशी सहमतही.