मानवी स्वभावाचे कंगोरे

प्रभाकर नानावटी

मजकूर

मानवी स्वभाव, मन, मनाचे आजार, मनोव्यापार या गोष्टी आजच्या जमान्यात कळीचे विषय झालेले आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे याची जाण सर्वसामान्यांना येत आहे व पटतही आहे. वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवणीत अशा विषयावर जाणीवपूर्वक लेख छापले जात आहेत. काही तज्ञ नित्यनियमाने अशा विषयावर आवर्जून लेख लिहित असतात. कदाचित याचा वाचकवर्गही मोठा असावा. असाच एक प्रयत्न डॉ. राजेंद्र बर्वे या मानसतज्ञानी मुंबई टाइम्ससाठी लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजेच मनातलं......मनापासून. या पुस्तकातील बहुतेक लेख मनोव्यापाराशी संबंधित असून लेखकाने वाचकांना विश्वासात घेत विषय जास्तीत जास्त हलके फुलके करत मानवी स्वभाव वैशिष्ट्याबद्दल सुंदरपणे टीका-टिप्पणी केली आहे. अनेक वेळा वृत्तपत्रांसाठी लिहिलेल्या लेखांचा बाज वेगळा असतो. त्या त्या काळाचे संदर्भ लेखात असल्यामुळे असे लेख नंतरच्या काही वर्षानी (दिवसानी!) शिळे वाटू लागतात. परंतु डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या या पुस्तकातील लेख आजही तेवढेच ताजे व relevant वाटतात.

डॉ. बर्वे आपल्या पुस्तकाची सुरुवातच मानसिक आरोग्याची व्याख्या व त्याच्या विश्लेषणापासून करतात. स्किझोफ्रेनिया, मानसिक चिंता व नैराश्य यांच्या भोवतीच मनाचे अस्वास्थ्य घुटमळत असते, असे त्यांचे मत आहे. मानसिक अस्वास्थ्य तपासण्यासाठी त्याची तीव्रता, अस्वास्थ्य किती काळ टिकते व त्याची वारंवारता असे निकष डॉक्टर सुचवतात. रुग्णाचा स्वभावच तसा आहे म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही. डॉक्टरांच्या मते स्वभावाला औषध नसले तरी स्वयंप्रयत्नाने निश्चितपणे स्वभावात बदल करणे सहज शक्य आहे. मुळातच स्वभाव म्हणजे विशिष्ट प्रसंगांना विशिष्ट प्रकारे भावनात्मक, विचारात्मक वा वर्तनात्मक प्रतिसाद देण्याचा पॅटर्न असतो व त्याचे वर्णन ’विशिष्ट सवयींचा समुच्चय ’ असेही करता येते. मूळ स्वभावाला औषध नाही हे मान्य. परंतु एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वभावात बदल हवा असल्यास तसे जिद्दीचे प्रयत्न केल्यास हेही अशक्य नाही.

तिळगुळ घ्या गोड बोला या लेखात सरधोपटपणे आपण साजरा करत असलेल्या सणांबद्दल लेखक ताशेरे ओढतात. खरे पाहता सणातील आनंद, उत्साह, आणि भेटीगाठींच्या चवी जिभेवर रेंगाळायला हवे. तिळगुळ घेण्या-देण्यामधील परस्परांशी संवाद करतानाचे भान, शब्दांचा जपून वापर, दोन मनांच नातं घट्ट करणारा अनुभव या सगळ्यांना आपण आपल्यातील सरधोपटपणामुळे मुकतो. उगीचच दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय घेत असतो. मनात कायमचीच शंकेची पाल चुकचुकत असते. थोडा प्रयत्न केल्यास हे सर्व बदलता येईल. रोखठोक व तिरकस बोलण्याची सवय बदलणे सुरुवातीला अवघड वाटत असले तरी दिवसातून एकदा तरी (माझ्यासाठी .... प्लीज...) गोड बोलून बघा असे लेखक सुचवतात.

फ्लूऑक्सेटिन (प्रोझाक) या औषधामुळे जगातील करोडो मनोरुग्णांना दिलासा मिळाला हे मान्य करावे लागेल. मनात वारंवार नकोसे विचार, शंका यानी हैराण झालेल्या ऑब्सेशनवाल्यांसाठी हे औषध नक्कीच वरदान ठरत आहे, असे मत डॉ. बर्वे व्यक्त करतात. खरे पाहता अशा प्रकारच्या औषधांपेक्षा एक अत्यंत प्रभावी मार्ग यासाठी आहे; म्हटलं तर सोपा, म्हटलं तर कठिण! जे मुळातच नसतं ते घालवून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऑब्सेशनवाल्यांच्या शंका, विचार या गोष्टींना कुठलाही आधार नसतो. त्यामुळे जे नाही ते घालविणे म्हणजे समुद्रकाठावर उभे राहून लाथेने लाट फिरवण्यासारखे ठरेल. मनातल्या मनात कुढत राहण्यापेक्षा, हळवी सेन्सिटिव्ह राहून दु:ख कुरवाळत बसण्यापेक्षा भावनांच प्रकटीकरण केव्हाही चांगले असे डॉक्टरांना वाटते. दुसर्‍या एका लेखात मनाने स्व:तला साखळदंडाने जोखडून ठेवल्यासारखे बांधून ठेऊन त्याची गुलामी स्वीकारण्यापेक्षा या न्यूनगंडातून बाहेर पडून प्रजासत्ताक दिनाप्रमाणे मनसत्ताक दिन साजरा करावा असे सुचवतात. मनाची गुलामगिरी भिरकावलेला दिवसच खरा मनसत्ताक दिन!

ह्रृदयाची तब्येत उत्तम! मनाची? या लेखात विशेषज्ञांच्या focussed उपचारामुळे रुग्णांच्यावर होत असलेल्या मानसिक परिणामावर लेखक आपले लक्ष वेधू इच्छितात. रुग्ण अगोदरच ह्रृदयविकारासारख्या गंभीर आजारामुळे धास्तावलेला असतो. गलितगात्र झालेला असतो. आत्मविश्वास हरवून बसतो. नको ती बाह्य लक्षणं रुग्णावर दिसू लागतात. अशा वेळी रुग्णाचे आत्मसंतुलन राखणे गरजेचे असते व नेमकी तीच गोष्ट विशेषज्ञ लक्षात ठेवत नाहीत. डॉक्टर काही लेखामधून श्वासोच्छ्वासांच्या (ध्यान, प्राणायाम इ.इ) व्यायामामुळे झालेल्या फायद्याचे वर्णन करतात. हेवा, हाव, हव्यास, नैराश्य, औदासीन्य, डिप्रेशन, उदासीनता, पझेसिव्हनेस, चिडचिडपणा, न्यूनगंड, असुरक्षितता, भयग्रस्तता, भयगंड, वैफल्यग्रस्तता, पॅनिक, फाजिल आत्मविश्वास अशा मानवीमनाशी संबंधित असलेल्या अनेक आजारावर मीनाताई, डॉ. कुमुद, श्रीकांत, विश्वास, इंदिराबाई, राजेश, स्वप्ना-राहुल, रोहन रानडे, अंजली, मुकुल, चित्रा इत्यादी रुग्णांची case history देत व त्यांना वेळोवेळी दिलेल्या सल्ल्याबद्दलचे लेख वाचताना अशांच्या भयानकतेची, दूरगामी परिणामांची वाचकांना कल्पना येते.

लेखकाची रसिकता त्यानी उल्लेख केलेल्या व चर्चिलेल्या कविता, ओव्यामधून आपल्या लक्षात येते. इंदिरा संत, आरतीप्रभू, झेन, इत्यादींच्या कविता व ज्ञानेश्वरांच्या ओव्या यांच्या रसग्रहणातून लेखक आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात. खरे पाहता मानसतज्ञाचा व कवितांचा काय संबंध असे आपल्याला (उगीचच!) वाटत असते. पुस्तकातील काही लेख वाचत असताना लेखक मानसतज्ञाबरोबरच एक चांगला वाचक, रसिक, मनापासून जीवन जगण्यावर, जीवनावर प्रेम करणारा अशा अनेक स्वरूपात आपल्याला भेटतात. डॉक्टरांनी एका लेखात जाहिरातदार आपल्या ग्राहकांवर कशा प्रकारे मोहिनी घालतात, कुठल्या क्लृप्त्या वापरतात याचे मजेशीर वर्णन केले आहे. व्यक्तिमत्वाच्या संदर्भात व्यक्तीचे विचार, भावना व वर्तन हे मानसिक घटक गुंफून तयार झालेला ढाचाच व्यक्तिमत्व असतो, असे लिहितात. व्यक्तिमत्वात विविध कौशल्यांचा समुच्चय असतो. दुसर्‍या एका लेखात माणसाच्या वर्तनाचा शोध घेताना वर्तनातील बदल घडवण्यासाठी मानसशास्त्रीयदृष्ट्या असलेल्या मॉडेलची गरज आहे असे सुचवतात. अपघातप्रवण व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करताना घाईघाई करणे, उतावीळ होणे, एकापेक्षा जास्त कामांचा विचार करणे, थोड्याशा गोष्टीवरून चिडचिड करणे, एकाग्र नसणे, फाजिल आत्मविश्वास असणे या गोष्टी कारणीभूत आहेत, असे त्याना वाटते. मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार करू लागल्यास आपल्या मनाचा धांडोळा घेऊन चित्तवृत्ती शांत ठेऊन स्वावलंबी, स्वतंत्र व परिपूर्ण होणे गरजेचे आहे.

अनेक विषयावर त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणीवरून लेखकांची बहुश्रृतता आपल्या मनात घर करून बसते. त्यांच्या दृष्टीने कोणताही विषय वर्ज्य नाही. आपल्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने लठ्ठपणा हा केवळ शारीरिक असमतोलाचा फलितांश असतो. परंतु लेखक त्याचे विश्लेषण मानसशास्त्रीयदृष्ट्या करू शकतात. लठ्ठपणाला अंत:प्रेरणा व बाह्यप्रेरणा दोन्ही कारणीभूत असून अन्नपदार्थांची विपुलता हेही एक कारण असू शकते, हे वाचून आपल्याला गंमत वाटते. कळत पण वळत नाही या लेखात त्यांनी आपल्या मनोव्यापाराचे अचूक निदान केले आहे. कळलं की आपोआप कळेल हे गृहित धरणं, कळलं की लगेच त्या क्षणापासून कळले पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं, कळलं की का वळत नाही याचा छडा न लावणं व शेवटी कळतं पण वळत नाही म्हणून स्वत:ला माफ करणं या चुका आपण नेहमीच करत असतो. लेखकाच्या दृष्टीने सुखाचा मंत्र म्हणजे ये भी दिन बीत जायेंगे - It will pass. खरोखरच दुखद प्रसंगी हा विचार मनात आणल्यास आपण नक्कीच त्यातून बाहेर पडू शकतो व सुखात हा विचार लक्षात ठेवल्यास आपण स्थितप्रज्ञ होऊ शकतो.

मनोविकारात घाबरण्यासारखे काही नाही हेच ठसवण्याचे प्रयत्न डॉक्टर करत आहेत. मुळात मनोविकार जडण्यात काही अपमानास्पद नाही, कमीपणाची बाब नाही आणि मानसिक कमकुवतपणा मुळीच नाही लेखकाचे हे शब्द नक्कीच उभारी देऊ शकतील. जसे शरीराला रोग होऊ शकतात तसे मनाला. यात काही विशेष नाही. याचाच अर्थ मानसिक आजारांचा उपचार होऊ शकतो, यासाठी आधुनिक वैद्यकशात्र सक्षम आहे, व अशा आजारातून नीटपणे बरे होऊन बाहेर पडता येते, चांगले जीवन जगता येते, हे समजल्यावर आपण नक्कीच सुखावतो. यासाठी असली पुस्तकं मार्गदर्शक ठरू शकतात.

मनातलं......मनापासून
डॉ. राजेंद्र बर्वे
मैत्रेय प्रकाशन, मुंबई (2009)
कि: 200 रु, पृ. सं: 220

अभिप्राय

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 07:09

~~ पुस्तक परिचय उत्तमरितीने आणि प्रभावीपणे, विस्तृतरित्या करून दिला असल्याने मूळ पुस्तक जेव्हा वाचायला मिळेल तेव्हा मिळो, पण आताच त्याच्या कोषात गेल्याची जाणीव झाली आहे. मनोविकार झालेल्या व्यक्तीला या वाचनाचा काही फायदा होणार नाही (त्याची कारणे स्वयंस्पष्ट आहेतच...) पण त्याच्या जवळीच्या नातेवाईकाला (मुद्दाम एकवचनी संबोधन वापरीत आहे....मनोविकार केसीसमध्ये नातेवाईकांचे अनेकवचन वापरणे वृथा आहे....पण तो दुसरा विषय आहे.) उभारी देणारा आहे, हे मी नक्कीच म्हणतो.

असे असले तरी "मुळात मनोविकार जडण्यात काही अपमानास्पद नाही, कमीपणाची बाब नाही आणि मानसिक कमकुवतपणा मुळीच नाही लेखकाचे हे शब्द नक्कीच उभारी देऊ शकतील. जसे शरीराला रोग होऊ शकतात तसे मनाला. यात काही विशेष नाही." ---- या विधानाशी सहमत होणे प्रॅक्टीकली फार म्हणजे फार अवघड आहे, प्रभाकरराव !

मनोविकारामध्ये अपमानास्पद नाही....कुणाला? त्या पिडीताला की त्याच्या जन्मदात्रीला? कमीपणा नाही? आहेच.... सामाजिक हेटाळणी किती होते ते पाहायचे झाल्यास ज्या घरात एक मनोविकारी मूल असेल त्याच घरातील एक मुलगी (त्या मुलाची बहिण....) लग्नाची असेल आणि ती सक्षम असली तरी तिचे लग्न ठरविण्यात येत असलेल्या अडचणीचे डोंगर जर डॉ.राजेन्द्र बर्वे यांनी पाहिले तर, ते वरील वाक्य लिहिण्यास धजले नसते. ~ मी जाणतो की लेखकाचे ते वाक्य Individually घेतले पाहिजे....केवळ संबंधित पेशंटच्या संदर्भात...!

पण समाज तसे मानत नाही....हे कटु असले तरी सत्य आहे.....[मी साक्षीदार आहे अशा एका मुलीच्या बाबतीत....तिशीला येऊनही 'तसल्या' एका भावामुळे बिनलग्नाची राहिलेली...]

इन्द्रा

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Mon, 1 Nov 2010 - 10:02 · उत्तर

>> मनोविकारामध्ये अपमानास्पद नाही....कुणाला? <<
हे वाक्य आहे ते एका मनोविकारतज्ञाने लिहीलेलं आहे. प्रॅक्टीकली शक्य नाही हे कोणाला शक्य नाही? मनोविकारतज्ञाला, टनांच्या हिशोबात पुस्तकं फस्त करून आंतरजालावर अभ्यासपूर्ण (आणि अनेकदा भावनेच्या भरात वाहवणार्‍या) लेखकाला का शिक्षण, विचार, सुसंगती यांच्याशी फारकत घेतलेल्या समाजातल्या मोठ्या घटकाला?

मनोविकार अपमानास्पद समजणार्‍या किंवा एकाच्या मनोविकाराचा दुसर्‍याशी बादरायण संबंध जोडणार्‍या लोकांना उद्देशून हे वाक्य एका मानसोपचारतज्ञाने वापरलेलं आहे. असल्या अजागळ समजूतींपायी स्वत: आणि समाजाचं नुकसान करणार्‍यांचं मतपरीवर्तन डॉ. बर्वेंसारख्यांनी करूच नये का? डॉ. बर्व्यांनी हे काम करायचं नाही तर कोणी करायचं? कोणीतरी हेटाळणी करतो म्हणून डॉ. बर्वेंनी मनोविकारामधली तथ्य काय हे सांगायचंच नाही का? इन्द्रा, तुम्ही अशी घटना प्रत्यक्षात पाहिली असेलही, तर डॉ. बर्व्यांनी अशी पेशन्ट्स, त्यांचे नातेवाईक यांची कितीतरी लग्नं मोडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली असतील. आणि अशा अनुभवांमधूनच हे वाक्य आलेलं असणार.

डॉ. बर्वेंचं सदर मी बरीच वर्ष वाचत आले आहे. पुस्तकरूपाने त्यांचे अनुभव आता प्रकाशित झाले आहेत हे उत्तमच. पुढच्या यादीत किंवा भेटवस्तूंच्या यादीत या पुस्तकाचं नाव टाकलेलं आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 2 Nov 2010 - 09:06 · उत्तर

".....डॉ. बर्व्यांनी हे काम करायचं नाही तर कोणी करायचं? कोणीतरी हेटाळणी करतो म्हणून डॉ. बर्वेंनी मनोविकारामधली तथ्य काय हे सांगायचंच नाही का?......"

~ अदिती....प्रतिसादात मी जाणिवपूर्वक 'प्रॅक्टिकली' हा शब्द वापरला आहे. त्याला कारण असे की, ज्या घरात वा परिवारात एखादी मनोविकारग्रस्त व्यक्ती (विशेषतः मुलगी - स्त्री) असते, त्या घरातील वा त्यांच्या नातेवाईकातील किती लोकांपर्यंत डॉ.राजेन्द्र बर्वे यांचे विचार (Counseling म्हणू या हवंतर..) पोचतात? उत्तर आहे - बिग झीरो ! हे मी रुढार्थाने सुशिक्षित समजल्या जाणार्‍या घरांविषयी बोलत आहे (विदा आहे); मग निमशिक्षित आणि अशिक्षित घरे तर सोडूनच दे.

डॉ.बर्वे यांचे स्वतंत्र लेख मीही वेळोवेळी वाचले आहेत, पटतातही त्यांचे विचार....पण त्याचा अर्थाअर्थी पिडीत कुटुंबाला काहीच उपयोग होत नाही, हे मी स्वानुभवाने सांगतो आहे, यावर प्लीज विश्वास ठेव. मनोविकारामुळे "त्या" ओळखीच्या तरूणीची उद्ध्वस्त स्थिती पाहून तिचे घर हादरले आहे....लज्जास्पद पातळीवर आता ती दिवसरात्र पाहते. (हिची धाकटी बहिण आणि माझा एक मित्र यांच्यात सध्या 'भविष्यातील स्वप्न' या दृष्टीने चाचपणी सुरू आहे....मी मिडिएटर असल्याने माझे सध्या दोन्ही कुटुंबाशी अगदी अरे-तुरे पातळीवरील संबंध आहेत. (आम्ही सर्व कुटुंब एकाच कॉलनीत राहतो, त्यामुळे लपवून काही ठेवणे हे संभवतच नाही). मित्राचे आईवडिल दोघेही राष्ट्रीकृत बॅन्केत नोकरी करतात....मित्रही सी.ए. आहे....सर्व काही उत्तम....पण सुमेधा (ती धाकटी...) शी लग्न करायला ते कदापिही परवानगी देणार नाहीत ही काळ्या दगडावरील रेघ, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही......कारण उघडच आहे ! आणि आईबापामुळे उद्या रविने पाय मागे घेतले तर सुमेधा (कदाचित आक्रस्ताळेपणा करणार नाही...पण) आपल्या कमनशिबीपणाबद्दल दोष आपल्या थोरल्या बहिणीलाच देणार ना?

आता या मित्राच्या, सर्वार्थाने सुशिक्षित समजल्या जाणार्‍या , मातापित्याना डॉ.राजेन्द्र बर्वे यांची मते टाहो फोडून सांगितली तरी ते आपल्या एकुलत्या एका मुलाच्या भवितव्याबाबत चिंतामुक्त होतील काय? हा खरा ऐरणीवरचा प्रश्न आहे.

असो...तुझ्या मतासंदर्भात मला इतकेच म्हणायचे होते....बाकी टनावारी पुस्तके, वाचन वगैरे ते राहू दे... दॅट्स इम्मटेरियल इन धिस एक्झाम्पल !

इन्द्रा

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Tue, 2 Nov 2010 - 12:14 · उत्तर

माझा प्रश्न एवढाच आहे की सामान्य लोकांना समजत नाही म्हणून डॉ. बर्वे या मानसोपचारतज्ञानेही "मुळात मनोविकार जडणे अपमानास्पद आहे, कमीपणाची बाब आहे" असं लिहायचं का सकारात्मक आणि शास्त्रीय लिखाण करून लोकांना जागरूक करायचं?

यशोधरा

यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 07:54

परिचय चांगला आहे. धन्यवाद.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Mon, 1 Nov 2010 - 08:13

आजचा सोमवारही सार्थकी लागला.. आताशा उत्सुकता लागून राहिलेली असते की आज कोणत्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळणार म्हणून!!!
पुस्तक नक्की मिळवून वाचेन हेवेसांनल.

रोचीन

रोचीन · Mon, 1 Nov 2010 - 08:17

परिचय चांगला आहेच.
फक्त एकच...
डॉ.राजेन्द्र बर्वे ऐवजी राजीव बर्वे झालंय.

मदतनीस

मदतनीस · Mon, 1 Nov 2010 - 08:52 · उत्तर

धन्यवाद रोचीन. नानावटींच्या लेखाला पुस्तक जोडतांना मदतनीसाकडून ही चुक झाली. आता योग्य लेखक जोडला आहे.

-
मदतनीस

आरागॉर्न

आरागॉर्न · Sat, 27 Nov 2010 - 04:07

उत्तम परिचय.
मी राजेंद्र बर्वेंचे अजूनपर्यंत एकही पुस्तक वाचलेले नाही. परिचय वाचून पुस्तक वाचनयादीत टाकले आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 27 Nov 2010 - 10:41

कुठल्यातरी वृत्तपत्रात (बहुदा मटा?) लिहितात ते हेच ना?
पुस्तक वाचायच्या यादीत अ‍ॅडवले आहेच

चर्चा प्रकार