- Log in to post comments
मलपृष्ठावर उल्लेख केल्याप्रमाणे समुद्र ही मिलिंद बोकील यांची तिसरी कादंबरी. कादंबरी लेखनावर एकेकाळी प्रतिभावंतांची मक्तेदारी असे. अलिकडे मात्र या लेखन प्रकाराला अवकळा प्राप्त झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे, काही अपवाद वगळता, कुणाचीही कादंबरी हातात घेणे व (पूर्णपणे!) वाचून काढणे फार कष्टदायक ठरत आहे. तरीसुद्धा मिलिंद बोकील या नव्या दमाच्या लेखकाच्या नावामुळे ही कादंबरी पूर्ण वाचाविशी वाटली.
ही एक साधी, सरळ कादंबरी. फार घटना नाहीत, माफक संघर्ष व शेवट गोड अशी एकंदर कादंबरीची धाटणी आहे. भास्कर हा एक यशस्वी उद्योजक. एक छोट्या कंपनीचा मालक. सेल्फमेड मॅन. नंदिनी त्याची पत्नी. घर संभाळणारी. फावल्या वेळात स्थानिक देवळांच्या इतिहासात रस घेणारी. राजू हा त्यांचा एकमेव मुलगा. मुलगा कुठेतरी मर्चंट नेव्हीत काम करत असल्यामुळे जगभरची भटकंती. वडिलांच्या कंपनीत त्याला रस नाही. भास्कर अनेक वर्षानंतर चार - पाच दिवस मजेत घालवण्यासाठी समुद्राकाठच्या रिसॉर्टवर नंदिनीसकट येतो. शहरातून रिसॉर्टच्या ठिकाणी गाडीतून येतानासुद्धा नंदिनी झोपूनच असते. भास्कर स्वत:च्या तंद्रीत जुन्या आठवणी काढत (उकरत!) गाडी हाकत असतो. आठवणींच्या अडगळीत नंदिनीची राजोपाध्ये बरोबर असलेली 'मैत्री' कुठेतरी हरवलेली असते. परंतु अशा क्षुल्लक गोष्टीबद्दल विचार करण्याची गरज नाही व वेळही नाही अशी मनाची समजूत घालून पुढील 3-4 दिवसाचे बेत तो आखतो.
परंतु नंदिनी येवढी सुखासुखी त्याला रिसॉर्टचे प्रसन्न वातावरण भोगू देणार नव्हती. तिलाही या राजोपाध्येच्या 'मित्रत्वा'विषयी नवर्याला जे काही असेल ते सांगून मन मोकळे करायचे असते व नेमके हेच टिकाण व हीच वेळ ती यासाठी निवडते. तिचे ऐकून घेतल्यानंतर भास्करमधील टिपिकल मध्यमवर्गीय पुरुषी अहंकार उफाळून येतो. नंदिनीला आताच्या आता नेसत्या वस्त्रानिशी हाकलून द्यावे, मारावे, झोडावे, चार चौघात तिची धिंड काढावी असे विचार मनात यायच्या आतच त्या विरघळून जातात. परिस्थितीशी जुळवून घेण्यातच शहाणपण आहे, हे लक्षात येते. नंदिनी त्या मैत्रीची साद्यंत हकीकत सागंते. एक अनुभव म्हणून ती राजोपाध्ये बरोबर झोपते, अशी ती कबूली देते. परंतु मनापासून भास्करच तिचा ’देव ’ असतो. त्यामुळे या किल्मिषातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे मन स्वच्छ करणे असे तिला वाटत असते. व शेवटी तिला बरोबर घेऊन भास्कर रिसॉर्ट सोडतो व घरी परततो.
कादंबरी वाचताना नेहमीप्रमाणे शेवट काय होणार याची उत्सुकता असतेच. परंतु या कादंबरीचा शेवट वाचताना काही तरी चुकल्यासारखे वाटू लागते. लेखकाला नेमके काय म्हणायचे होते, जे काही सांगायचे होते त्यासाठी समुद्राची पार्श्वभूमी का निवडली हे लक्षात आले नाही. रिसॉर्टसमोरचा समुद्र पूर्ण कादंबरीभर व्यापलेला आहे. भास्करच्या अस्वस्थपणाचा व नंदिनीच्या आत्मकथनाचा साक्षीदार म्हणून समुद्र असल्यास समुद्राऐवजी एखाद्या थंड हवेचे ठिकाण वा एखादे ऐतिहासिक पर्यटन स्थऴसुद्धा चालले असते, व कथानकात फार फरक पडला नसता असे वाटू लागते. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातील अशा प्रकारच्या नाट्य प्रसंगांना खरोखरच काही सामाजिक संदर्भ असू शकतात का? नंदिनी जेव्हा ग्रामोपाध्येबरोबर शय्यासोबत करते तेव्हा त्याचे परिणाम काय होणार याचे भान तिला नव्हते का? गैरसमज, अनुभव, मजा, आपोआप होत गेले, नैसर्गिकरित्या घडले, अपवादात्मक परिस्थिती अशी कारणं देत आपण स्वत:ला फसवत तर नाही ना? जर भास्करचाच असा एखादा विवाहबाह्य अनुभव असता व नंदिनीला तशी कबूली त्याने दिली असती तर तिची काय प्रतिक्रिया झाली असती? असे अनेक प्रश्न कादंबरी वाचून झाल्यानंतर विचारावेसे वाटतात.
समुद्र ही जेमतेम 90 पानांची कादंबरी. लेखकाने मनोविश्लेषणात्मकरित्या भास्कर, नंदिनी वा ग्रामोपाध्ये या पात्रांच्या मनांचा वेध घ्यायला हवे होते असे राहून राहून वाटू लागते. नवरा बायकोत तेवढं 'अंडरस्टँडिंग' असलं म्हणजे झालं हेच लेखकाला सांगायचे होते का? कदाचित नंदिनीने उल्लेख केल्याप्रमाणे आपण पती, पत्नी, उद्योजक, मालक, मित्र, मैत्रिण, आई, वडील असे एकाच रोलमध्ये कधीच नसतो; आपण एकाच वेळी अनेक रोल्समध्ये वावरत असतो. त्यामुळे नंदिनीच्या मते तर ती अजूनही भास्करबरोबर प्रामाणिकच होती, कारण तिने सर्व काही सांगून टाकले आहे. पती-पत्नी म्हणून राहणे हा काही करार होऊ शकत नाही, प्रत्येकाचे एक व्यक्तिमत्व असते व त्या व्यक्तिमत्वानुसार आपण अड्जस्ट होत गेलं पाहिजे असे तर लेखक सुचवत नसेल ना? कदाचित हे सर्व माझ्या आकलनाच्या बाहेर असावे.
समुद्र
मिलिंद बोकील
मौज प्रकाशन (2009)
मू: 80 रु. पृ.सं: 90
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 16 Nov 2010 - 05:10
मागे हे पुस्तक एका सहप्रवाशाकडे होतं. तो झोपला होता तेव्हा ह्या पुस्तकाचं "फास्ट रिडींग" केलं आहे. तितकसं आवडलं नव्हतं. मात्र अश्यावेळी स्वतःसाठी (स्वतःला त्रास होऊ नये म्हणून) नवरा बायकोला स्वीकारतो असे वाटल्याचे आठवते. बाकी कादंबरी ठिक ठिक!
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 16 Nov 2010 - 06:19
शाळा हे मला माहित असलेलं बोकिलांचं एकमेव पुस्तक. त्यामुळे त्यांची इतरही पुस्तकं अशीच चांगली असतील असे वाटलं होतं. पण एकंदरीत परिचय वाचल्यावर व ऋ चे मत वाचून हे पुस्तक काही आवर्जून वाचावं अशा छापाचं नाही वाटत आहे. कधी कधी समोर आहे किंवा हातात काहीतरी नवीन आहे म्हणून काही पुस्तकं वाचली जातात, हे पुस्तक असंच कधी स्वत:हून येऊन भेटलं तरच वाचेन!!! :-)
डिगम्बर षशिकन्त बन्ने
डिगम्बर षशिकन्… · Tue, 1 Mar 2011 - 10:33
मिलिन्द बोकिल यान्चे दुसरे पुस्तक कोनते आहे हे कलेल काय?