- Log in to post comments
ऐसा ज्ञानसागरू: बखर मुंबई विद्यापीठाची या पुस्तकाबद्दल मी काहीबाही वैयक्तिक टीका-टिप्पणी करण्यापेक्षा पुस्तकाच्या ब्लर्बवरील मजकूरच पुस्तकावर योग्य प्रकारे भाष्य करू शकेल म्हणून ते परिच्छेद आहे तसे देत आहे.
"दीडशे वर्षापूर्वी कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथील विद्यापीठे स्थापन झाली. त्यापूर्वीच मुंबई ही देशाची अनभिषिक्त आर्थिक राजधानी झाली होती. मुंबई हे शहर जगाची पूर्वेकडील व्यापारपेठ होती. उद्यमामुळे झालेली आर्थिक प्रगती आणि नामवंत गुरू-शिष्यांनी केलेली वैचारिक प्रगती यांच्या सहयोगातून मुंबईत विद्यापीठाची स्थापना होणे आणि सर बार्टल फ्रिअरसारख्या धाडसी गव्हर्नरने किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा 1860 साली निर्णय घेणे हे मुंबई शहराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरलेले दोन महत्वाचे निर्णय. यापुढील विद्यापीठाची आणि शहराची समांतर वाढ होणार होती. ती कशी झाली, त्यामुळे समाज प्रबोधन होऊन मुंबईने देशस्तरावर सर्वच क्षेत्रांचे नेतृत्व कसे मिळविले... हा सारा रोमहर्षक इतिहास या पानांवर ग्रंथित झाला आहे.
मुंबईसंबंधी प्रकरण, नंतर विद्यापीठाच्या विकासाच्या आलेखाची प्रकरणे, असा आकृतीबंध लेखकाने स्वीकारल्याने 19व्या शतकातील शैक्षणिक आणि अन्य घडामोडी आपल्यासमोर घडत आहेत, असा आभास होतो. इतका वाचक गुंतून जातो. वाचनीयता हा या इतिहास लेखनाचा विशेष मानावा लागेल. किंबहुना पक्के संशोधन वाचनीय असू शकत नाही या गैरसमजाला या ग्रंथाने पुन्हा एकदा छेद दिला आहे.
मुंबई विद्यापीठाची क्षेत्र मर्यादा अगदी थेट कराचीपासून कारवारपर्यंत होती, तेव्हापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात कराचीचा भाग पाकिस्तानात गेला, नंतर एका पाठोपाठ एक पुणे, कर्नाटक, गुजरात अशी प्रादेशिक विद्यापीठे, नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, एम् एस् युनिव्हर्सिटी बरोडा, स्थापन होऊन मुंबई विद्यापीठाचे क्षेत्र आकुंचित होत गेले. आणि ती सिटी युनिव्हर्सिटी बनली. हा सारा प्रवास होताना शैक्षणिक उलथापालथ होणे अपरिहार्य होते, कधी शिलकी अंदाजपत्रक, पण समस्या अधिक तर कधी तुटीचे अंदाजपत्रक पण समस्या कमी. विद्यापीठ आणि ब्रिटिश सरकार यांचा संघर्ष तर पाचवीलाच पुजलेला. परंतु टोलेजंग व्यक्तीमत्वाच्या आदरणीय व्यक्ती सरकारला पुरून उरल्या. मग ते महादेव गोविंद रानडे असोत वा सर फिरोजशहा मेहता, सर चिमणलाल सेटलवाड असोत वा डॉ जॉन मथाई. रजिस्ट्रार प्राध्यापक फर्टुनजी दस्तुर, एस् आर् डोंगरकेरी, ग्रंथपाल डी एन् मार्शल, डॉ पी एम् जोशी अशा कित्येकांची शब्दचित्रे वाचणार्यांच्या मनात कायमची कोरली जातील. एतद्देशीय विद्यार्थ्यांबद्दल आणि त्यांच्या बौद्धिकवाढीविषयी विशेष आस्था बाळगणारे सर एड्विन अरनॉल्ड, सर अलेक्झांडर ग्रांट, डॉ विलियम्स वर्डस्वर्थ, प्रोफेसर एफ एच सेल्बी, -1826 सालीच मराठीत गणित शिल्प विद्यालय काढून विद्यार्थ्यांना मराठीतून स्थापत्य शिकवणारा व मराठीतून प्रशस्ती पत्रक देणारा - कॅप्टन जॉर्ज रिस्टो, जर्विस अशा कितितरी प्रोफेसरांचे श्रम एतद्देशियावर पाश्चात्य विद्येचे संस्कार घडविण्यात कामी आले. त्यांचे परिणाम या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवनावर झाले. व्यक्तिगत आचरण आणि सार्वजनिक पैसा यांच्या नव्या मोजपट्या या प्रोफेसरांनी तत्कालीन विद्यार्थ्यांना दिल्या. मुंबई विद्यापीठ केवळ संलग्नता देणारे, परीक्षा घेणारे न राहता ते पदव्युत्तर शिकवण्याचे केंद्र बनले. विविध विभाग उघडले गेले. समाजशास्त्र व अर्थशास्त्र विभागांची तर बॉंबे स्कूल म्हणण्याइतपत प्रगती केली.
उदारमतवादी ब्रिटिश अधिकार्यांनी तसेच प्रोफेसरांनी स्त्रियांच्या उच्चशिक्षणाविषयी बाळगलेले मौन आज आश्चर्यजनक वाटेल. पण त्यावेळच्या ब्रिटिश युनिव्हर्सट्यातही वेगळी परिस्थिती नव्हती. आपल्या येथील महिलांना आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष कसा करावा लागला, अखेरीस विद्यापीठ कसे नमले, हे महिलांच्या उच्चशिक्षणावरील प्रकरणात सविस्तर दिले आहे. ब्रिटिशांनी मराठी व इतर प्रादेशिक भाषांना डावलून इंग्लिशचे घोडे पुढे दमटले या समजाला धक्का देणारे काही दस्तऐवज या ग्रंथामुळे प्रकाशात आले आहेत. ते वाचून उद्बोधन होईल. चान्सलर, व्हाइस चान्सलर, प्रोफेसर, युनिव्हर्सिटी, कॉलेज या शब्दांना मराठीचे पर्याय कधी आले याचा तडा लावण्याचा प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे. मराठीच्या पुरस्कर्त्यानी आवश्य वाचावे असे हे प्रकरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात उच्चशिक्षणाचा विस्तार की विकास अशा पेचात विद्यापीठ सापडले. विस्ताराला कौल मिळाला तो सामाजिक न्यायाच्या उदात्तभावनेतून. विद्यार्थी प्रतीवर्षी वाढत आहेत. महाविद्यालये वाढत आहेत. उच्चशिक्षणाचा हा डोलारा तोलणे ही मोठीच जवाबदारी आहे. विद्यापीठातील घटनांचा समाजातील घटनांशी मेळ लावल्यामुळे आत्मचरित्रे - चरित्रे, आठवणी, किस्से यांचे माफक उपयोग केल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाला नवे परिणाम लाभले आहे. "
फक्त एवढ्यावरून पुस्तकाचे मोठेपण कदाचित लक्षात येणार नाही. लेखकाने परिश्रमपूर्वक केलेले लिखाण व इतिहास कसा लिहावा याबद्दलच्या त्यांच्या कल्पना यामुळे पुस्तक वाचनीय झालेले आहे व शेवटपर्यंत वाचल्याशिवाय पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही. विद्यापीठांना असाही इतिहास असू शकतो हे प्रथमच कळले. मुंबई विद्यापीठाची अशा प्रकारची परंपरा व उज्वल इतिहास इतर विद्यापीठात क्वचितच सापडेल. अलिकडच्या काळात या विद्यापीठाची होत असलेली ससेहोलपट बघितल्यावर ज्ञानाची किती अवहेलना होत आहे हे पुस्तक वाचत असताना पदोपदी लक्षात राहील.
एक वाचनीय व संग्राह्य पुस्तक!
पुस्तकातील काही वाचनीय उतारे
उदारमतवादी शिक्षणाचे ध्येय 'माणूस घडविणे' हे असते ; तांत्रिक उद्योगासाठी अतिकुशल मानवी साधने म्हणूनच उपयुक्त ठरतील, बाकी ज्यांचा उपयोग शून्य असेल, अशी माणसे तयार करण्याच्या प्रक्रियेत त्याचे 'रूपांतर ' होऊ देता कामा नये. विज्ञान आणि वाङ्मय या दोन्ही क्षितिजावर ज्ञानाच्या बळावर मनाचा विकास साधला पाहिजे. सर्वक्षेत्रीय समन्वय साधण्याची शक्ती मनाला प्राप्त करून दिली पाहिजे आणि तत्वचिंतनाची सवय मनाला लावली पाहिजे. तरच प्रगतीच्या प्रत्येक पावलाचा व्यापक विचार होऊन ते यंत्रणेत अंतर्भूत केले जाईल. ज्ञानासाठी ज्ञानासक्त व्हावयास शिकविले पाहिजे आणि ज्ञानाच्या सामर्थ्यावर उदात्त प्रगल्भ व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र प्रज्ञा विकसित केली पाहिजे.
सर रेमंड वेस्ट, व्हाईस चान्सलर (1882)
तरुण मंडळीनी सुयोग्य नागरिक होण्याच्या दृष्टीने युनिव्हर्सिटीने त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. म्हणजे भोवतालच्या परिस्थितीशी त्यांचा सुसंवाद राहील. मानव आणि संस्कृती यांना निसर्गापासून भय नाही, ते आहे मानवाच्या अमर्याद हव्यासापासून. रशिया आणि आयर्लंडमध्ये घडणार्या घटना राजकीय आणि आर्थिक संघर्ष, मानवी ज्ञान व सामर्थ्य निसर्गाला वैराण कसे करू शकतात याचे उदाहरणच आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, राजनीती, सामाजिक अर्थज्ञान यांच्या अभ्यासाला युनिव्हर्सिटीत भरपूर प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. कारण त्यामुळे सामाजिक जीवनाच्या, राजकीय जीवनाच्या तसेच आर्थिक जीवनाच्या प्रशिक्षणाचा लाभ होत राहील.
सर चिमणलाल एच सेटलवाड, व्हाईस चान्सलर (1922)
ऐसा ज्ञानसागरू: बखर मुंबई विद्यापीठाची
डॉ. अरुण टिकेकर
पॉप्युलर प्रकाशन (2006)
किं - 550 रु, पृ.सं 320+
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Mon, 8 Nov 2010 - 11:38
नेहमीप्रमाणे एक उत्तम पुस्तक परिचय. धन्यवाद.
सागर
सागर · Mon, 8 Nov 2010 - 12:14
यावेळी नानावटींनी दिलेल्या पुस्तकाच्या परिचयाबद्दल त्यांनी म्हटलेले अगदी खरे आहे
काहीबाही वैयक्तिक टीका-टिप्पणी करण्यापेक्षा पुस्तकाच्या ब्लर्बवरील मजकूरच पुस्तकावर योग्य प्रकारे भाष्य करू शकेल म्हणून ते परिच्छेद आहे तसे देत आहे
अगदी अगदी खरे. यावेळी तुमच्या शब्दात जास्त न लिहिताही निवडलेले उतारेच सगळे स्पष्ट करतात.
नेहमीप्रमाणेच हे ही पुस्तक वाचायचे आहे या माझ्या यादीत नोंदवले आहे :)
अजून एका सुरेख पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद