- Log in to post comments
पुस्तकांच्या व खेळण्यांच्या जगातला 'वेडा'!
काही जण One Man Institute म्हणून ओळखले जात असतात. त्यापैकीच पुण्यातील आयुका येथील मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे संचालक अरविंद गुप्ता असावेत. या जगावेगळ्या व्यक्तीचा परिचय करून देणारे खेळण्यांचा जादूगार - अरविंद गुप्ता या पुस्तिकेची लेखिका शोभा भागवत यांना हे व्यक्तिमत्व अत्यंत भावल्यामुळे त्यानी त्यांचे एक मनस्वी चित्रण या पुस्तिकेत रेखाटले आहे. पुस्तक वाचताना आजकालच्या rat race च्या जमान्यात अशी माणसं असू शकतात याचे आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाही!
लेखिकेने उल्लेख केल्याप्रमाणे हे व्यक्तिमत्व अनेक सुंदर गोष्टींचे अजब मिश्रण आहे. झपाटलेपणा, बुद्धीमत्ता, (बुद्धीमानांपाशी सहसा न आढळणारा!) स्वभावातील गोडवा, सर्वांच्यात सर्व वाटून घेण्याचा उत्साह, चांगली पुस्तकं मिळवण्याची धडपड, खेळणीवरचे प्रेम, खेड्यातील मुला-मुलींनाही परवडल्या पाहिजेत अशी खेळणी बनवण्याचा अट्टाहास, माणसं जोडण्याचा निर्व्याजपणा... अशा कित्येक गुणविशेषांचे एक जगावेगळे मिश्रण यांच्यात समावले आहे.
शोभा भागवत यांनी गुप्तांच्या बालपणीच्या, शाळा कॉलेजच्या काही आठवणी रंगून सांगतात. आय आय टी कानपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी संपादन करून अरविंद गुप्ता पुण्यातील टेल्कोत दाखल झाले. मुळातच चळवळीचा पिंड असल्यामुळे व तो सत्तरचा काळही क्रांतीची चाहूल देणारा असल्यामुळे इतर तरुणांप्रमाणे गुप्ता यांना खेड्यात काम करण्याचे आकर्षण होते. टेल्कोतील दोन वर्षाच्या सुटीनंतर काही दिवस हुशंगाबाद येथे घालविले. विज्ञान शिक्षण म्हणजे नेमके काय असते या विचाराने ते भारावले. Materials fascinates me म्हणत विविध साहित्यांच्या, माध्यमाच्या बरोबर त्यांची खटपट सुरू झाली. त्यातूनच सायकलीचे व्हाल्व ट्यूब वापरून भूमितीचे विविध आकार जन्माला आले. केरळमध्ये शारीरिक श्रमांचे घरबांधणीसारखी कामं करत असलेल्या 60 वर्षाच्या लॉरी बेकर या जगावेगळ्या स्थापत्यविशारदाला भेटण्यासाठी ते मुद्दाम तेथे गेले. त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. जवळ पैसे नव्हते. रहायला जागा नव्हती. मित्राच्या ओळखीने 'मित्रनिकेतन' या संस्थेत असताना केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे कृष्णकुमार यांची भेट झाली. त्यांना गुप्ता यांचा काड्यांचा मेकॅनो फारच आवडला. गुप्तानीं काही भाषणंही तेथे दिली. पुण्याला परतल्यानंतर त्यांचे नोकरीत मन रमेना. पगार चांगला असूनही बहुतेक पगार पुस्तक खरेदीतच संपायचा. नोकरी सोडली. छत्तीसगड येथील खाण कामगारांच्या मुलासाठींच्या शाळेसाठी ते काम करू लागले. मधल्या काळात सुनीता पंदे यांच्याशी आर्यसमाज पद्धतीने विवाह झाला. त्याही शाळेत शिकवू लागल्या. दुलारी या मुलीच्या जन्मानंतर परत ते पुण्याला आले.
पुस्तकांचे जग
त्याकाळचे विज्ञान - तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रो यशपाल यांची हुशंगाबाद येथे गुप्तांशी भेट झाली होती. त्यांनी अरविंदच्या काडीपेटीच्या मेकॅ्नोवर पुस्तक काढण्याचा प्रस्ताव मांडला. केंद्र सरकारतर्फे 2000 प्रती काढण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु अविनाश देशपांडे यानी काढलेली चित्रं व इतर मजकूर पाहिल्यानंतर खेल खेल में या पुस्तकाची 25000 कॉपी काढल्या. हे पुस्तक भारतातील 13 भाषेत अनुवाद झालेले आहे. महाराष्ट्रात ग्रंथालीने 25000 प्रती छापल्या. अजूनही त्यांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघत असतात. अशा प्रकारे अरविंद गुप्ता कळत न कळत वाचकापंर्यंत पुस्तकं " पोचवण्याच्या " व्यवसायात ओढले गेले. खेल खेल में नंतर तोतोचान ही जपानी कादंबरी भारतीय भाषेत येण्यात गुप्तांचाच मोठा हातभार होता. डेंजर स्कूल, दिवास्वप्न, टीचर अशी किती तरी पुस्तकं सर्व शिक्षकांनी वाचावीत यासाठी गुप्ता धडपडत असत. पुस्तक प्रकाशनासाठी नॅशनल बुक ट्रस्ट, व केरळ शास्त्र साहित्य परिषद बरोबर दीर्घकालीन नातं प्रस्थापित होऊ लागले. स्वत: गुप्तांनी अनेक पुस्तकं लिहिली. शांतता, विज्ञान, पर्यावरण, शिक्षण, इत्यादी विषयावरील अनेक चांगल्या चांगल्या इतर भाषेतील पुस्तकांची मित्र मैत्रिणीकडून अनुवादित करून घेतली. व प्रकाशकांना हाताशी धरून अशी पुस्तकं शाळाशाळापर्यंत, मुला-मुलीपर्यंत पोचवली. खेल खेल में , कबाड से जुगाड, खिलौनांका बक्सा, दानी पेड (Giving Tree) , जिसने उम्मीद के बीज बोये (The Man who planted trees) , बिल्लीयोंकी बरात, पृथ्वी के रहस्य (Secrets of the earth), प्रिय बाई, नीलची शाळा, बहुरूप गांधी, अशा शेकडो सदाबहार पुस्तकांचा ठेवा गुप्तांनी आपल्याला दिला आहे. Red Ballon हे फ्रेंच पुस्तक नेटवरून वाचून हिंदी - इंग्रजीत छापण्याची व्यवस्था त्यांनी केली. एक एक पुस्तक छापत आठ लाख पुस्तकं त्यानी विकली आहेत. पुस्तकच इतकी चांगली आहेत की ती इतर ठिकाणी कुठेही मिळणार नाहीत. जगातलं उत्तम दुर्लभ साहित्य कमी किमतीत आपल्या मुला-मुलीपर्यंत पोचवणे हे आपल ऐतिहासिक कार्य आहे असे त्यांना मनापासून वाटत आले आहे. त्यांची मित्र मंडळी जगभर पसरलेले आहेत. मैत्रीचा दुवा पुस्तक व विज्ञानावरील नि:सीम प्रेम! एखादं पुस्तक गुप्तांना आवडलं की त्याचा परिचय इतरांना पोस्ट कार्डद्वारे करून देत असे. रोज 30-40 कार्ड लिहिले जात होते. (आता पोस्ट कार्ड ऐवजी ईमेल वापरतात!)
फोटोकॉपीअर्स मशीन्स आल्यानंतर गुप्ता यांना आकाश ठेंगणे झाले. शांतता, विज्ञान, पर्यावरण, शिक्षण, स्त्रीवाद अशा विषयांवरील चांगली चांगली पुस्तकं निवडून त्यांची कॉपी काढून मास्टर कॉपी तयार करून ते घेत असत. अशा निवडक 150 पुस्तकांची यादी त्यानी मित्रांना पाठवली. मित्र हवे असलेल्या पुस्तकांची यादी व पैसे पाठवत असत. व मास्टरवरून केलेली कॉपी मित्रांकडे रवाना होत असे. पुस्तक प्रकाशित करण्याइतके किंवा छापून घेण्याइतके पैसे माझ्याकडे नसल्यामुळे माझी स्वप्न इतरांपर्यंत पोचवण्याचा हाच मार्ग होता. इती अरविंद! शिक्षणाच्या सर्व पारंपरिक कल्पना उलथून टाकणार्या कार्टून स्वरूपातील डेंजर स्कूल छापण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पाऊलो फ्रेअरीच्या ग्रुपला छपाईच्या परवानगीसाठी एअरमेल (त्याकाळी ईमेल सुविधा नव्हती!) पाठवून सतावले. शेवटी परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी 8-10 मित्रांना गळ घालून पैसे उभे केले. त्याचे 1000 प्रती छापल्या. पैसे दिलेल्या मित्रांना प्रत्येकी 100 प्रती पाठवून त्या वेगवेगळ्या राज्यात पोचवल्या. अशा प्रकारे मित्रांच्या सहकाराने प्रकाशन करण्याचे हे एक धाडसी पाऊल होते. आता मात्र याच्या संग्रहातील शेकडो पुस्तकं त्यांच्या वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध आहेत व रोज त्यात भर पडत आहे.
खेळण्यांचे जग
आपल्या शिक्षण व्यवस्थेत कुठल्याही गोष्टीचा बाऊ करण्याच्या घातक सवयीमुळे विज्ञान शिक्षणाची ससेहोलपट होत आहे. विज्ञान शिक्षण म्हणचे प्रयोगशाळा, त्यातील काचेची सामानं, रसायनं इत्यादीमुळे शिक्षक, विद्यार्थी सर्व बिचकून असतात. विज्ञानाला सामाजिक संदर्भापासून तोडल्यामुळे विज्ञान संबंधितापर्यंत पोचतच नाही. सरकारी खर्चाने चालवलेल्या नॅशनल सायन्स सेंटर्स, म्यूजियम्स, वा लॅब्समधील निम्म्या गोष्टी नादुरुस्त असतात, मुलांना हात लावू देत नाहीत वा योग्य माहिती द्यायला तेथे कुणीही नसतात. खरे पाहता सायन्स म्यूजियम/सेंटरमधून बाहेर पडताना मुला-मुलींनी उत्साह, स्फूर्ती, ऊर्जा घेऊन बाहेर पडायला हवे. येथे मात्र उलटा कारभार! मुलं खचलेल्या मनाने बाहेर पडतात, नाराज असतात. मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तूंपासून विज्ञान पटकन शिकता येते. म्हणूनच अरविंद गुप्ता यांनी अगदी टाकाऊ वस्तूंपासूनसुद्धा विज्ञान शिक्षण देता येतं, हे खेळण्यांच्या माध्यमातून सिद्ध करून दाखविले आहे. गुप्तांच्या खेळण्याच्या गुहेत शिरल्यानंतर एक अद्भुत अनुभव येतो असे त्यांना भेट देणार्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांचे बहुतेक खेळणी आसपासच्या सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून तयार होतात. मोडली तर दुरुस्त करता येतात. त्यांच्या मागे हजारो वर्षांचे संशोधन, अनुभव व लहानापर्यंत पोचण्याची सर्जनशीलता असते. या खेळणीवर कुणाचा शिक्का नाही, लेबल नाही, पेटंटचा, धोक्याचा इशारा नाही, MRP नाही; जे आहे ते समाजाचे आहे. मुलं ती स्वत: करत असल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. ज्ञान वाढतं. Joy of Learningचे ते प्रात्यक्षिक असतं. याप्रकारच्या वैज्ञानिक खेळणी व विज्ञानाच्या प्रचारासाठी गुप्ता जिवाचे रान करत असतात. आता तर त्यांच्या हाती इंटरनेटवरील यूट्यूबची जादू सापडल्यामुळे त्यांचे सर्व प्रयोग घरबसल्या बघता येते, करता येते. या व्हिडीओंना विविध भाषेतला आवाज मिळालेला असल्यामुळे लहान मुलं ऐकत ऐकत खेळणी बनवू शकतात.
लेखिका शोभा भागवत या जादूगाराचे सुरेख चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. पुस्तक वाचत असताना त्यांची एकदा तरी भेट व्हावी असे वाटू लागते. नैरा्श्य झटकून पुढे जावेसे वाटू लागते. शिक्षणक्षेत्रातील दुरवस्थेच्या नावाने खडे फोडत न बसता पोकळ्या भरून काढण्यासाठी गुप्ता यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत असे वाटू लागते.
खेळण्यांचा जादूगार - अरविंद गुप्ता
लेखिका: शोभा भागवत,
कजा कजा मरू प्रकाशन, मूल्य रु 30, पा:40
अभिप्राय
सागर
सागर · Mon, 20 Sep 2010 - 09:04
प्रभाकर एका प्रतिभावंत व्यक्तीच्या पुस्तकाचा परिचय करुन दिलात तुम्ही.
शीर्षकावरुनच ओळखले होते की अरविंद गुप्ता यांच्याबद्दलच असणार :)
माझ्या सुदैवाने त्यांच्याशी मला ई-मेल व चाट द्वारे संपर्क करण्याची संधी मिळाली होती.
त्यांनी अनेक इंग्रजीतील उत्तमोत्तम पुस्तके मुलांसाठी मराठीत उपलब्ध करुन दिली आहेत.
त्यांच्या http://arvindguptatoys.com/ या संकेतस्थळावर ही पुस्तके इंग्रजी, हिंदी व मराठी अशा भाषांमध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 21 Sep 2010 - 08:04
सुंदर परिचय. मी बहुतेक यांच्याबद्दल आधी उपक्रमावर वाचले होते. पण त्याहून जास्त चांगले ते तुमच्या लेखातून कळाले.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 21 Sep 2010 - 15:33 · उत्तर
+१
उपक्रमावरही तुम्हीच लिहिले होते का?
प्रभाकर नानावटी
प्रभाकर नानावटी · Tue, 21 Sep 2010 - 16:52 · उत्तर
उपक्रमवरील टाकावू वस्तूंपासून बनवलेल्या खेळण्यांच्या जगात.. श्री अरविंद गुप्ता यांच्या यूट्यूबवरील खेळण्यांच्याबद्दलची माहिती आहे. येथील लेख शोभा भागवत यांच्या पुस्तकाबद्दल आहे. कदाचित कंटेंटमध्ये फार फरक नसल्यामुळे गोंधळ झाला असेल.
यशोधरा
यशोधरा · Tue, 21 Sep 2010 - 17:14
पुस्तकपरिचय आवडला.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Wed, 6 Oct 2010 - 21:03
उत्तम परिचय. हे पुस्तक वाचायला उत्सुक आहे.