रारंगमय

आनंदयात्री

मजकूर

कैकवेळा माझ्या स्वप्नात तो पहाड आलाय, ती ढांग आलीये. लेफ्टनंट विश्वनाथांचे कल्पनाचित्र माझे मन कित्येकदा साकारत असते. खरेतर या पुस्तकात दोन ढांग आहे एक रारंग आणि एक लेफ्टनंट विश्वनाथ.

रारंग ढांग वाचले मी लहानपणी. म्हणजे कदाचित दहावीच्या सुट्ट्यात किंवा त्याहीआधी कधीतरी शालेय दिवसात. त्या दिवसात भा.रा.भागवतांच्या भाषांतरित गोष्टी वाचून मी वेडावलो होतो. रॉबिन हुडच्या शौर्यकथा, ज्युल वर्नच्या अलौकिक खिळवून ठेवणार्‍या साहसी विज्ञानकथांच्या प्रेमातच होतो मी. खरेतर मी रारंग ढांग वाचलेय हेच विसरून गेलो होतो, पण मध्यंतरी औरंगाबादचे आमचे घर आवरतांना शाळेच्या काही जपून ठेवलेल्या जुन्या वह्या सापडल्या, अन त्यात सापडले मी लिहिलेले काही निबंध आणि एका निबंधात (मला आवडलेले पुस्तक) लिहिलेला रारंग ढांगचा मोडकातोडका परिचय. सर्रकन तो आठवांचा चित्रपट डोळ्यासमोरून सरकला, सगळे निखळलेले दुवे सांधले गेले आणि मी रारंगमय झालो.
दाट धुक्याच्या पार्श्वभूमीवर ढांगेच्या उंच भागावर मला लेफ्टनंट विश्वनाथ पाठमोरे उभे दिसतात, खाली अनेक मजूर दगड फोडतायेत, लांब कुठेतरी खोल दरीमध्ये एखाद्या रहस्यमय गुहेमध्ये बौद्ध भिख्खु संकटे टाळण्यासाठी प्रार्थना करतायेत, अशी कल्पनाचित्रे रारंग ढांग म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर येत असतात.

काल कळले पेंढारकर गेले, त्यांच्याबद्दल वाचतांना आपसूकच रारंगमय झालो. मागे कधीतरी ऐकले होते, काल लोकसत्तेतही वाचले, रारंगढांगवर चित्रपट काही पेंढारकरांच्या हयातीत बनला नाही. रारंग ढांग स्वतःच इतके ताकतवान आहे की पुस्तक वाचतांनाच वाचक त्याला कल्पनाचित्रे बनवून पाहतो. हो मी तर रारंगमय होतो आणि पाहतो .. आणि तुम्ही ?

*** प्रभाकर पेंढारकरांना भावपुर्ण श्रद्धांजली ***

अभिप्राय

सागर

सागर · Sun, 10 Oct 2010 - 08:32

आनंदयात्री ,

एका सुंदर पुस्तकाची ओळख करुन दिलीत. हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९९७-९८ साली वाचले होते.

पुन्हा आठवणी ताज्या झाल्या :)

माझीही प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 11 Oct 2010 - 06:54 · उत्तर

:)

>>एका सुंदर पुस्तकाची ओळख करुन दिलीत.

खरेतर हा पुस्तक परिचय नाही, पुस्तक ओळख पण नाही.

पेंढारकर गेले ही बातमी वाचुन वाईट वाटले. पेंढारकर आपल्या बालपणाशी वेगवेगळ्या अंगानी जोडलेले आहेत, बाल शिवाजी तर प्रत्येकाने लहानपणी पाहिलाच असेल !
या आठवणींपैकी "रारंग ढांग" ची आठवण मला सगळ्यात सुंदर वाटते, त्याच आठवणीचे हे प्रकटन.

"रारंग ढांग" पुन्हा एकदा वाचायचा मानस आहे, तेव्हा परिचय नक्की लिहिन.

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 11 Oct 2010 - 08:15

रारंगढांग मी ही नेमक्या आनंदयात्री म्हणतोय त्याच वयात वाचले होते आणि तेव्हाही एका दमात, अगदी जागून वाचल्याचे आठवते आहे. तेव्हापासून माझे ते पुस्तक कोणीतरी ढापेपर्यंत अनेकदा वाचले आहे. आता अनेक पुस्तके अशी आहेत ज्यांनी माझ्यावर "गारूड" केले आहे मात्र त्यावेळी भारा भागवत, देनिसच्या गोष्टी, साखरेचं बाळ, चंपक, ठकठक, चांदोबा वगैरे 'बालवाचनातून' पहिल्यांना मला नव्या दुनियेत जर कोणी खेचलं असेल तर "रारंगढांग" आणि (गुर्जरांनी भाषांतरीत केलेल्या) "सत्तर दिवस" ह्या पुस्तकांनी..

परवा बायकोने सांगितलं की पेंढारकर गेले तेव्हाही पेंढारकरांचा चेहरा पटकन आठवेना... मात्र समोर रारंगढांग आणि ले. विश्वनाथ येत होते.. भोवतालच्या जगाचा विसर पाडायला लावणारे चित्रदर्शी लेखन करणार्‍या ह्या जादुई लेखकाने लेखनातून तो परिसर प्रत्यक्षाहूनही वास्तव बनवून ठेवला आहे.

ह्या अमर लेखकाला श्रद्धांजली!!

३_१४ अदिती

३_१४ अदिती · गुरुवार, 14 Oct 2010 - 07:44

काही पुस्तकं उगाचच वाचायची राहून जातात त्यातलं हे ही एक. गेल्याच विकेण्डला हे पुस्तक विकत घ्यायचंच म्हणून दुकानात गेले, तर त्यांच्याकडच्या प्रती संपल्या होत्या!
जरूर वाचेन हे पुस्तक.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 14 Oct 2010 - 08:13 · उत्तर

जरूर वाचेन हे पुस्तक.

~~ अगोदर ते ७x४३ पूर्ण कर....नंतर जी.ए. आहेतच.....नेमाड्यांना अजून हात लावलेला नाहीस....मग मर्ढेकर तर शेकडो मैल दूर....कधी करणार हे सगळं? त्यानंतर पेंढारकर (हेही कोल्हापुरचेच, बरं का, बाई !)

इन्द्रा

चर्चा प्रकार