- Log in to post comments
आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे, परिस्थितीप्रमाणे स्वत:लाच आकार देणे, आहे ते असे आहे, यात बदल करण्याची गरज नाही असं समजून आयुष्य कंठणे, हे स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचे सहजसुलभ मार्ग आहेत. भोवतालच्या गरजेप्रमाणे आपण बदलत राहणे, समाजवास्तवाशी मिळतजुळतं घेऊन सर्वमान्य मूल्ये, रूढी, अंधविश्वास, कर्मकांडे, व्यावहारिक संकेत इत्यादी मान्य करणे व त्यांचे तंतोतंत पालन करणे हे केव्हाही बिनधोक असते. परंतु काही धडाडीची माणसं ही प्रस्थापित पाऊलवाट सोडून वेगळ्या दिशेने जातात. मळलेल्या वाटेने न जाता नवीन वाट शोधत असतात. नवीन वाट तयार करतात. त्यात धन्यता मानतात. नवीन वाट तयार करणे व त्या वाटेच्या शेवटी काय असेल याचा शोध घेणे यातून त्यांना आनंद मिळतो. यशापयशाची चिंता त्यांना सतावत नाही. अशाप्रकारे प्रस्थापित जीवनापासून फारकत घेऊन नवीन वाटांच्या शोधात असलेल्या व आदिवासी क्षेत्रात काम केलेल्या काही कार्यकर्त्यांचा परिचय डॉ. गोविंद गारे यांनी आदिवासी विकासातील दीपस्तंभ या पुस्तकाद्वारे करून दिलेला आहे.
या पुस्तकात वर्णन केलेल्या कार्यकर्त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी स्थूलमानाने गांधीवादी-सर्वोदय विचार, राष्ट्र सेवादलाचे संस्कार, साम्यवादी विचार, व हिंदू वा ख्रिश्चन धार्मिक विचार, यापैकी एखाद्यातून मिळालेली प्रेरणा आहे. एकीकडे सेवा, त्याग, मदत, यावर भिस्त असलेले कार्यकर्ते आहेत. तर दुसरीकडे जनसंघटन, आंदोलन, संघर्ष यावर भर देणारे कार्यकर्ते आहेत.
बाळूभाई मेहता, ताराबाई मोडक, खेजीभाई चौधरी, भूमीसेनेचा काळूराम धोदडे, लोकबिरादरीचे डॉ. प्रकाश व मंदा आमटे, मेधा पाटकर, विवेक व विद्युल्लता पंडित, इत्यादींच्या कार्याची ओळख करून देणारे लेख मुळातूनच वाचावयास हवेत. बाळूभाई मेहता यांना खानदेशचे गांधी असेच संबोधले जात असे. गांधीजींच्या सर्वोदय विचारांना कृतीरूप देणे हेच त्यांचे ध्येय होते. शिक्षकांना प्रशिक्षणाची व्यवस्था, आदिवासी ग्रामोद्योग अशा योजना त्यांनी राबविल्या. त्यातून आदिवासी निर्भर होतील हे पाहिले. ताराबाई मोडक यांनी बालशिक्षण हेच जीवनकार्य मानून आदिवासींच्यात राहून या क्षेत्रात अनेक प्रयोग केले. बालवाडी, आंगणवाडी या संकल्पनांना मूर्तरूप देऊन महाराष्ट्रभर त्याची अंमलबजावणी करण्यास उद्युक्त केले.
मनोरचे काळूराम धोदडे यांनी आदिवासी समाजासाठी दिलेला लढा, स्वातंत्र्य पूर्व काळातील कुठल्याही स्वातंत्र्ययोद्ध्याच्या लढ्यापेक्षा तसूभरही कमी नाही. गोदावरी परुळेकरांचा, साम्यवादी विचारांचा पगडा धोदडे यांच्या खांद्यावर होता. प्रस्थापिताविरुद्ध लढण्यासाठी आदिवासींची भूमीसेना नावाची संघटना त्यानी उभी केली. या भूमीसेनेने सामूहिक गुंडगिरी मोडून काढली. शेतमजूरांच्या किमान वेतनासाठी लढा दिला. कूळकायद्याची नीटपणे अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडले. गावोगावी तरूण मंडळांची, मजूर संघटनांची स्थापना केली. लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी आदिवासींच्यामध्ये सामूहिक लग्नाची प्रथा रुजविली.
माडिया गोंड या आदिवासी जमातीमध्ये राहून हेमलकसा या छोट्या गावाच्या परिसरात बाबा आमटे यांचा लोकबिरादरीचे प्रकल्प राबविणारे डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांचे नाव परिचित आहे. डॉ. गारे यांचा या दांपत्यावरील लेख आपल्याला परत एकदा त्या माडियांच्या रम्य परिसरात फिरवून आणतो. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर जिवाचे रान केले होते हे आपण कधीच विसरू शकणार नाही. मार्केट संस्कृतीशी संबंध नसलेल्या तडवी, वसावा, पावरा या प्रकल्पग्रस्त आदिवासी जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज जरी इतिहासजमा झाल्यासारखे वाटत असले तरी त्याकाळी ते ज्वलंत प्रश्न होते. केवळ जमिनीच्या तुकड्याऐवजी जमिनीचा तुकडा वा घराला घर देवून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नाहीत हे जगाला त्यानी ठणकावून सांगितले. या अटीतटीच्या समस्यावर वर्ल्ड बँकसुद्धा विकास प्रक्रियेपेक्षा सावकारांचीच भूमिका बजावत होती हे वाचताना आपल्यालाही चीड येते. धरणग्रस्तांच्या जैविक संस्कृतीचे अस्तित्व नाकारणार्या, सरकारी दृष्टीकोनातून केल्या जाणार्या विनाशकारी विकासाविरुद्ध नर्मदा बचाव आंदोलनाचा हा लढा होता.
वसई, पालघरच्या परिसरात काम करणारे विवेक व विद्युल्लता पंडित या दांपत्याबद्दलचा लेख वाचताना आपण एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट तर वाचत नाही ना, असे वाटते. सत्य हे कल्पनेपेक्षा जास्त धक्कादायक व दाहक असू शकते याची प्रचीती येते. कुठल्याही मागासलेल्या प्रदेशात शिक्षण, आरोग्य इत्यादी छोट्या मोठ्या कल्याणकारी योजना राबविणार्या कार्यकर्त्यांचे त्या गावातील तथाकथित प्रतिष्ठित वर्ग उत्साहाने स्वागत करतो. कौतुक करतो. शक्य तेवढी मदतही त्या कार्यकर्त्याला केली जाते. परंतु या प्रतिष्ठितांच्या शोषणव्यवस्थेवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कुटिल कारस्थानांना सीमा राहत नाही. त्यात कोण कोण किती बळी पडतील याचा अंदाज करता येत नाही. विधायक संसदेद्वारे अशा विषमव्यवस्थेचे वाभाडे काढणारे प्रश्न घेऊन लढा देणार्या या दांपत्याला अनेक कष्ट भोगावे लागले. वेळी प्रसंगी उपाशी राहिले. त्यांना मारहाण झाली. रातोरात बेघर होण्याची पाळी आली. जेलमध्ये गेले. तरीही त्यानी हार मानली नाही. एस एम जोशी, सदानंद व सुधा वर्दे यांनी त्यांचे मनोबल वाढविले. वेठबिगारातून आदिवासी मुक्त होतात, परंतु त्यांचे नीटसे पुनर्वसन होत नाही ही त्यांची व्यथा आहे.
या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त आदिवासींच्याबद्दल सहानुभूतीने काम केलेले बाळासाहेब खेर, मधुकरराव पिचड, विठ्ठलराव गेडाम यांच्याबद्दलचे लेख या संग्रहात आहेत. प्रसिद्धीवलयाच्या बाहेर असलेले परंतु तळमळीने व जिद्दीने काम केलेले कॉ. बी.के. देशमुख, बळवंत अग्निहोत्री, दामोदरदास मुंदडा, शेमुअल चव्हाण, महाजन गुरुजी, दादासाहेब लिमये इत्यादींच्या कार्याचा व जीवनाचा आढावा लेखकाने घेतला आहे.
डॉ. गारे यांचे हे पुस्तक वाचताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागतात. फक्त 10 -12 वर्षापूर्वी असा एखादा समाज, अशी एखादी जमात पुढारलेले म्हणवून घेणार्या महाराष्ट्रात होती याची कल्पनाच करवत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे या समाजाला आपल्यावर अन्याय होत आहे, आपले शोषण होत आहे, आपल्या गरीबीचे कारण दुसरे तिसरे काही नसून शोषणावर जगणारा जंगल ठेकेदारांचा, वनखात्यातील नोकरांचा प्रतिष्ठित समाज आहे, याची जाणीवच नव्हती. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी म्हणजे नेमके काय असते, भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे काय झाले हे समजावून सांगावे लागत होते. हा आदिवासी समाज व्यसनाधीन व निरक्षर रहावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न अजूनही केले जातात. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या जिद्दी कार्यकर्त्यांना हे सहन होणे शक्य नाही. त्यांच्याबरोबर राहून, मिळून मिसळून त्यांच्याच बोलीभाषेत बोलत हे कार्यकर्ते त्याच्यांत आत्मविश्वास निर्माण करत असतात. जीवाला जीव देणारा हा समाज त्यामानाने अजून निरागस आहे. शहरी छक्के पंजे कळत नाहीत. परंतु त्यांना खर्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रगल्भ कार्यकर्त्यांची भली मोठी फळी उभी करावा लागेल.
पायात चप्पल वा स्लीपर, काखेत शबनम पिशवी व अंगावर जाडे भरडे कपडे घालून काम करणारे कार्यकर्ते नवीन पिढीच्या उपहासाचे विषय झालेले आहेत. इतरांविषयी बेपर्वा असणे व आपला स्वार्थ साधत राहणे यालाच शहाणपणा म्हणत असतील तर या पुस्तकात वर्णन केलेल्या सर्व व्यक्ती वेडे आहेत असेच म्हणावे लागेल. परंतु या वेड्यांनी जागोजाग उभे केलेले नंदनवन पाहिल्यावर आपले जीवन कस्पटासमान आहे असेच वाचकाला वाटेल. इतरांच्या कार्याविषयी - त्यातही विधायक कार्याविषयी - तुच्छता बाळगणे व येताजाता कशाही शब्दात ती व्यक्त करणे हा अनेकांचा स्वभाव बनलेला आहे. सार्वजनिक जीवनातून आदर्शवादी विचारांची झालेली पीछेहाट व सत्ता हेच एकमेव साध्य मानून तिचा उघडपणे पुरवलेला पिच्छा, या गोष्टी समाजहितकारक नाहीत हे ठणकावून सांगणारे कार्यकर्ते व अभिजन आपल्याला हवे आहेत. डॉ. गारेसारख्या लेखकांची अशा प्रकारची पुस्तकं वाचून समाजकार्याची धुरा संभाळणारी नवीन पिढी तयार होईल अशी आशा करू या!
आदिवासी विकासातील दीपस्तंभ
डॉ. गोविंद गारे
श्री विद्या प्रकाशन, पुणे (1999)
किंमत: 225 रु
अभिप्राय
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 9 May 2011 - 18:27
होते? नाही. आहेत! तो भूतकाळ ठरवला गेला आहे. बाकी लढाई तशीच चालू आहे. ती आता बातम्यात तशी झळकत नाही आणि म्हणून इतिहास ठरते.
पुस्तकांच्या परिचयाची ही मालिकी चांगलीच होते आहे.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 9 May 2011 - 18:44 · उत्तर
श्रावण मोडक,
पुस्तकांच्या परिचयाची ही मालिकी चांगलीच होते आहे.
हे अगदी खरे आहे....