श्रावण मोडकांचा तिढा

निखिल देशपांडे

मजकूर

साधारण आठ दहा महिन्यांपुर्वीचा एक विकांत... नेहमीप्रमाणे औरंगाबादला गेलो होतो. काही कामा निमित्त गावात गेलो होतो, तेव्हा बळवंत वाचनालयात एक प्रदर्शन चालू होते. सहज पावले तिकडे वळली आणि त्याच प्रदर्शनात पुस्तक पाहत फिरताना अचानक एका पुस्तकाकडे नजर गेली. लेखकाचे नाव होते "श्रावण मोडक" आणि कादंबरीचे नाव होते "तिढा". अरे हे मराठी जालावर लिहिणारे मोडक का???" हा प्रश्न मनात आलाच. पण काही कारणास्तव त्यादिवशी तिढा घ्यायची राहूनचे गेले. सोमवार पासून पुढे परत मिसळपाव वर आल्यावर सगळ्यात आधी मिसळपाव वरच्या एक-दोन सदस्यांकडे मोडकांनी कादंबरी लिहिली आहे का अशी चौकशी केली, पण फारसे कुणाला माहीतच नव्हते. शेवटी मोडकांनाच विचारले त्यावरुन ही कादंबरी वाचायची उत्सुकता अधिकच वाढली आणि त्याच शनिवारी जाउन तिढा घेऊनच आलो.

मोडकांच्या जालावरती वाचलेल्या नियमित लिखाणावरुन त्यांचा धरणामुळे झालेल्या विस्थापतांशी आणि त्यांच्यासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांशी जवळुन संबध आला असेल हे लक्षातच येते. त्याचप्रमाणे तिढा मधेही प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न व त्याच सोबत त्यांच्यासाठी काम करणर्‍या स्वयंसेवी अंतर्गत कामकाज व त्यातुन निर्माण होणारा वैचारिक आणि भावनिक गुंतागुंत या कादंबरीत मांडलेली आहे.

मांडणगाव जिल्ह्यातील आदीवासी भागात सरकारने एक फुडपार्क उभा करायचे ठरवलेले आहे. या भागात असलेल्या नैसर्गिक वनसंपत्तीवर आधारित हा फुडपार्क आहे. पण ह्याच साधानसंपत्तीवर अदिवासींचे जीवन अवलंबून आहे. यात अदिवासींच्या प्रश्नांवर काम करणारे राजीव व विदिशा हे एक जोडपे आणि त्यांची संघटना. ह्या संघटनेच्या उर्मिला सारख्या इतर कार्यकर्त्यांना हाताशी घेउन विदिशा व राजीव ह्यांनी फुडपार्क विरुद्ध संघर्ष उभा केला आहेच. पण या सगळ्यांचा आधार असलेली आणि कादंबरीतील सगळ्यात महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे धर्मा. धर्मा म्हणजे एक क्लिअर विचार असलेला, कुठल्याही गोष्टी कडे त्रयस्थ नजरेने बघु शकणारा असा युवक. ह्या सगळ्या राजकारणात, संघर्षात परिघावर राहुन काम करणारा असा हा धर्मा. धर्माचे कॅरेक्टर हे तिढा मधले मला आवडलेले कॅरेक्टर..

पण शेवटी सगळी माणसे हाडामांसाचीच... सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देताना,कामाची आखणी, अंमलबजावणी करताना कार्यकर्त्यांमधे वैचारीक गोंधळ अपरिहार्यपणे असणारच. इच्छा, महत्त्वाकांक्षा तर आल्याच. मग कुणाला उपेक्षित वाटणं, त्याची दुसर्‍याला जाणीव न होणं, एकमेकांत भावबंध गुंतणं हे सगळं त्रांगडं तिथंही होऊन बसतंच. कोणतंही काम करताना कितीही प्रयत्न केला तरी खाजगी आयुष्य सगळीकडे मधून मधून डोकावत राहतंच. या सगळया तिढ्याचे मस्त चित्रण मोड्कांनी रंगवलेले आहे.

ही कांदबरीच्या वाचताना मोडकांचे इतर लिखाणही आठवत जातेच. या पुस्तकवाचना नंतर एक आयुष्यातला पहिलाच नि आगळावेगळा अनुभव मला मिळाला, आणि तो म्हणजे लेखकासोबत पुस्तकाबद्दल चर्चा. हा एक वेगळाच अनुभव होता. मोडकांना जाउन मी सरळ कादंबरी संबधातले माझे विचार कळवू शकलो,त्यांच्या सोबत पुस्तकाबद्द्ल चर्चा करु शकलो.

आणखी काय सांगू तिढाबद्दल? माझ्या कडच्या पुस्तकाच्या प्रतीची दुबईवारीही पुर्ण झाली. आणि सध्या ते काहीही उणे नसलेल्या पुण्यात न उघडलेल्या लगेज बॅगमध्ये अजूनही सुखाने नांदतेय!!! :)

अभिप्राय

आनंदयात्री

आनंदयात्री · Sun, 9 May 2010 - 11:42

प्रकटन सुरेख झाले आहे निखिल.

>>ही कांदबरीच्या वाचताना मोडकांचे इतर लिखाणही आठवत जातेच. या पुस्तकवाचना नंतर एक आयुष्यातला पहिलाच नि आगळावेगळा अनुभव मला मिळाला, आणि तो म्हणजे लेखकासोबत पुस्तकाबद्दल चर्चा. हा एक वेगळाच अनुभव होता.

क्या बात है ! आम्ही कपाळकरंटे, अजुन कादंबरीही हातात नाही. नक्की वाचेन असे सांगण्यापेक्षा वाचल्यावर नक्की लिहिन असे म्हणतो. धन्यवाद.

नंदन

नंदन · Sun, 9 May 2010 - 22:00

पुस्तकपरिचय. आपल्या मध्यमवर्गीय आयुष्याबाहेरच्या समस्या जवळून पाहूनही त्रयस्थपणाने त्यांच्याकडे पाहून - निव्वळ समस्यांकडेच नव्हे, तर त्यात गुंतलेल्या व्यक्तींकडेही - केलेलं लेखन मराठीत तसं विरळाच असावं. ही कादंबरी 'मिळवून वाचलीच पाहिजे'च्या यादीत टाकली आहे. (ह्या सुविधेबद्दल पुनश्च धन्यवाद :))

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 10 May 2010 - 11:01

अरेच्या!.. श्रामोंचे पुस्तक आहे हे माहित नव्हते.. आता मिळवून वाचतोच :)

-ऋ

कैवल्य

कैवल्य · Wed, 26 May 2010 - 13:10

उत्तम परिचय निखील.
धन्यवाद.

आपण शहरी/निमशहरी भागातल्या लोकांची एक विविक्षित अशी धारणा असते, वर्तमानपत्रांना/इलेक्ट्रॉनिक माध्यमांना पुरवलेल्या बातम्यांच्या आधारे आपण एक चित्र मनात उभे करत असतो. पण स्वतः अनुभव घेऊन, त्या ठिकाणची वस्तुस्थिती जाणुन घेऊन मग त्यावर लिहिणं ह्यातुन दिसणार्‍या चित्राची वेगळीच बाजु समोर दिसु लागते.
बरं, आदिवासीं/वनवासींचे प्रश्न असो, प्रकल्पग्रस्तांची जगण्याची धडपड असो, किंवा नक्षलग्रस्त आदिवासींची विचारधारणा असो, विषय अवघडच! त्यात पुन्हा वस्तुस्थिती जळजळीत! अशा बाबी डोळ्याने पाहुनही शक्यतो सर्वसामान्य वाचकाला कमीतकमी धक्का बसण्यासाठी केलेलं संयत लेखन हीदेखील माझ्यादृष्टीने मोठी जमेची बाजू.

तिढा असो, किंवा नोंदी अश्यातश्या.. संयत मांडणी, परंतु विचार करायला भाग पाडेल अशी योग्य तो संदेश त्यातुन पोहोचवण्याची हातोटी हे मला नेहमीच मोडकांच्या लेखनाचं एक महत्वाचं शक्तीस्थान वाटत आले आहे.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Mon, 31 May 2010 - 17:48

प्रतिसाद लिहायचा लिहायचा म्हणत राहून गेले होते.. बट इटस बेटर लेट दॅन नेव्हर!!! :)
तर, तिढा एका संध्याकाळी कधीतरी निखिलकडून घेतली नि दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत वाचूनही झाली होती.. कादंबरी कशावर आहे हे वरती निखिलने लिहिले आहेच.. यातले धर्माचे वर्णन अगदी शब्द न् शब्द पटते.. कादंबरी वाचताना मध्ये मध्ये पुष्कळशी वैचारिक चर्चा आढळते.. इथे प्रत्येक व्यक्तिरेखेला एक धाटणी आहे.. एक विचारांची बैठक आहे.. आणि ती पूर्ण कादंबरीभर व्यवस्थित जपली गेलेली आहे.. एका लेखकाने हे करणं अपेक्षित असतंच.. पण अशी गल्लत होऊ न देणं हे यश मात्र नक्कीच म्हणायला हवं...

हे पुस्तक वाचेतो मोडकांशी माझा परिचय नव्हता.. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्याशी बोलणं याच गोष्टीवर नि याच मुद्द्यावर झालं हे अर्थातच सांगायला नको!!! :)

वेदश्री

वेदश्री · गुरुवार, 3 Jun 2010 - 09:12

तिढामधले मला सर्वात जास्त आवडलेले व्यक्तीचित्र आहे ते अवंतीचे! अगदी मोजक्याच प्रसंगांमध्ये मोजक्याच वाक्यांचे असे जरी तिचे स्थान असले तरी अगदी आपलेसे वाटले ते मला. धर्माच्या चित्रणात जी गोष्ट, जे वागणे काहीसे मुद्दामहून आणल्यासारखे वाटले (आणि काहीठिकाणी त्याचा स्वतःचाच आदर्शवाद त्याने स्वतःच उल्लंघल्यासारखे झाल्याचे वाटले) त्यापेक्षा कित्येक पटींनी सहज पण शब्दांच्या पलिकडील भाषेत ते अवंतीत अवतरले आहे असे वाटते. अवंतीचा स्वार्थासहित परमार्थ खूपच पटला आणि म्हणूनच बहुतेक अत्यंत प्रॅक्टीकल आणि जवळचा वाटला. संग तरीही निस्संग असेच काहीसे अवंतीचे वागणे अगदी सहज तर वाटतेच पण सुयोग्यही वाटते.

तिढामधले आदिवासींचे चित्रण, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमागील तत्त्वांबद्दलचे विवेचन यातून नेहमीपेक्षा वेगळे शिकायला मिळाले.

निखिल,

तिढा हा केवळ राजीव, विदीशा आणि उर्मिलेतला अथवा राजीव, उर्मिला आणि धर्मातला नसून अजूनही बरेच तिढे आहेत या कादंबरीत जे या दोन तिढ्यांहून जास्त महत्त्वाचे आहेत. त्या तिढ्यांनाही तुझ्या पुस्तकपरीचयात स्थान मिळायला हवे होते असे वाटते. पुपुपशु (पुढील पुस्तकपरीचयास शुभेच्छा).

श्रावणला पुपुलेशु (पुढील पुस्तकलेखनास शुभेच्छा).

नीधप

नीधप · Sat, 27 Nov 2010 - 04:44

पुस्तक वाचलेय. पूर्ण आवडले असे नाही म्हणता येणार.
पहिल्या १८० पानापर्यंत फारच अप्रतिम पद्धतीने रंगत जाते कादंबरी.
अनेक व्यक्तिरेखा तर मी प्रत्यक्ष बघितलेल्यांपैकी होत्या असं वाटलं.
पण मग नंतर कुठेतरी पकड सुटून जाते.
माफ करा श्रामो पण हे प्रामाणिक मत मी तुम्हालाही बहुतेक सांगितले होते. :)

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sat, 27 Nov 2010 - 06:22 · उत्तर

'माफ करा' कशाबद्दल? काहीतरीच.
प्रामाणिक मत मला आजच पहिल्यांदा सांगितलेस. याआधी तुझे वाचन सुरू असताना बोलूया असे ठरले होते, पण नंतर तूही व्यग्र झालीस, मीही. विसरलो. :)
हे मत असणारी तू एकटी नाहीस. अगदी याच शब्दांत, "नंतर पकड सुटून जाते", इतर काहींनीही मत मांडले आहे. :)
आता अगदी पत्रकारासारखं "मग तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का" असे विचारू नकोस म्हणजे मिळवली... :)

नीधप

नीधप · Sat, 27 Nov 2010 - 08:36 · उत्तर

:)
मी असं काही विचारणार नाही.. चिंता नसावी.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Sat, 27 Nov 2010 - 06:37

छानच ओळख करून दिलीस निखिल. वाचले पाहिजे नक्कीच. :)

चर्चा प्रकार