- Log in to post comments
भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मिळवण्यासाठी स्त्रियांच सक्षमीकरण आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत तिला स्थानं हवं. हे व्हायचं तर तिच्याभोवतीचं सामाजिक पर्यावरण बदलायला हवं. आजच्या घडीला एका बाजूला जागृत झालेल्या आकांक्षा आणि दुसर्या बाजूला परिघाबाहेर वेगानं फेकलं जाण्याची क्रिया यात सामान्य माणसं - विशेषत बाई माणसं - भरडली जात आहेत. चळवळींना पोषक वातावरण नाही असं असूनही आपल्या जिद्दीनं शोध घेणारा हा दस्तऐवज!
मलपृष्ठावरील वर उल्लेख केलेल्या मजकूराप्रमाणे हे संकलन खरोखरच स्त्रियांच्या लढ्याचं, जिद्दीचं, सहिष्णुतेचं व त्याचप्रमाणे पुरुषी अहंकाराचं, उदासीनतेचं दस्तऐवज आहे. या पुस्तकातील लेखनासाठी महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणार्या 36 लेखिका (व काही लेखक) यांचा बहुमूल्य सहभाग आहे. काही तुरळक अपवाद वगळता फील्डवर प्रत्यक्ष कार्य करणार्यांचेच अनुभव कथन व विचार असल्यामुळे लेखनातील सच्चेपणा आणखी उठून दिसू लागतो. पुस्तकातील विषय विविध तसे लिहिणारेही नानाविध. विषयांचा आवाकाही भरपूर मोठा. स्त्रियांच्या आरोग्याच्या- शिक्षणाच्या समस्या, परित्यक्त्यांचे जीवन, आदिवासी स्त्रियांचे सर्वस्वी वेगळे असे प्रश्न, जंगल जमीन आणि आदिवासी स्त्री, शरीर विक्रय करणार्या स्त्रियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक विषमता, कामगार - मजूर स्त्रियांचे प्रश्न .... अशा अनेक समस्यावर कार्यकर्त्या स्त्रियांनी आपली मतं मांडली आहेत.
पुष्पा भावे यांनी संपादन समितीचे मनोगत लिहिले आहे. या मनोगतात पुष्पा भावे यांनी स्त्रियांच्या चळवळीपुढे असलेले आव्हाने याविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. त्यांच्या मते एक काळ असा होता की दलित आदिवासी समुदायाबरोबर काम करणारे गट होते. पण हळू हळू परिवर्तनवादी चळवळीतही आदिवासीसांठी आदिवासी, दलितांसाठी दलित ही वृत्ती निर्माण झाली. मुळातच स्त्रियांचे प्रश्न फार गुंतागुंतीचे आहेत. आजही आपल्या ग्रामीण भागातील बहिणींना पिण्याचे पाणी, जळण्याचे लाकूड मिळवण्यासाठी पायपीट करावी लागते. देहधर्माला आडोसा नसतो. तिचे जगणे प्राणीपातळीवरचे असते. तिला माणूसपणापर्यंत आणणे हाच कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा, बुवाबाजी, पुरुषशाही यांच्याशी लढत असतानाच स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबविणे, अंदाज पत्रकात तरतूद करणे, अनुकूल कायदे करणे व राबविणे यांना अग्रक्रम देणे गरजेचे आहे.
शमा दलवाई आपल्या परित्यक्त्यांच्या विषयीच्या लेखात महिलावरील कुटुंबांतर्गत होणार्या अन्यायाची दुसरी बाजू म्हणजे परित्यक्तांचा प्रश्न असे मांडतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि हा प्रश्न झटपट सुटला पाहिजे असे त्यांना वाटते. प्रतिमा जोशी यांनी 93 टक्के असंघटित कामगारांमध्ये स्त्रियांचीच संख्या जास्त आहे, असे आकडेवारीने दाखवून देतात. कंत्राटी पद्धत, कामगार संघटनांचे खच्चीकरण, शासनाची उदासीनता, मालकांच्या मनमानीमुळे बंद पडत असलेले उद्योग इत्यादीमुळे बेरोजगारीत भर पडत आहे. आर्थिक दुरवस्था आणि अनिश्चितता यामुळे महिलांच्या सामाजिक दर्जावर परिणाम होत आहेत, आणि स्त्रिया परिघाबाहेर फेकल्या जाण्याची, शोषण, आणि दमनाची प्रक्रिया वेग घेत आहे. उल्का महाजन यांचा रोख सार्वजनिक वितरण (अ)व्यवस्थेमुळे गरीब स्त्रियांची होत असलेल्या होरपळीकडे आहे. मुळातच गरीब रेषेची व्याख्याच अजूनही ठरत नाही. गरीबामध्ये फूट पाडणर्या अंत्योदय योजना, पिवळे कार्डधारक इत्यादी गोष्टींचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. विद्या कुलकर्णी पाण्याच्या दुर्भिक्षाची कारणं शोधत आहेत. त्यांच्या मते स्त्रियांना पाण्यासाठी राबवत असल्यास तिची स्वप्रतिमा कधीच फुलणार नाही. विजया चौहान यांनी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न उचलला आहे. शाळेत जाण्यासाठी मुली का घाबरतात याचा शोध घेताना त्यानी शाळांच्या दुरवस्थेलाच कारणीभूत ठरवले आहे. त्यांचे मागासलेपण घालवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी मूलभूत व दूरगामी योजनांची गरज आहे. मीनाक्षी आपटेंच्या मते मुलींच्या शिक्षणासाठी केवळ बघ्यांची भूमिका न घेता इतर सुशिक्षित स्त्रियांनी पुढाकार घेऊन प्रशासनावर दबाव आणल्यास थोडी फार तरी प्रगती होऊ शकेल. मनीषा गुप्ते यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबतीत काही परखड विचार मांडले आहेत. स्त्रियांच्या आरोग्याबाबत बोलताना लग्न न केलेल्या, विधवा, परित्यक्ता, अल्पसंख्य दलित, समलिंगी अशा सर्व स्त्रियाबाबत आपण बोलत आहोत याचे भान ठेवले पाहिजे. सतीश अग्निहोत्री यांनी खालावत चाललेल्या स्त्री-पुरुष जन्मदरांच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शैलजा सांगळे मच्छीमार व्यवसायातील महिलांचे प्रश्न मांडत आहेत. रझिया पटेल यांना धर्मांध नेतृत्वामुळे व मुस्लिम स्त्री प्रश्नांच राजकारण केल्यामुळे मुस्लिम स्त्रियांना असुरक्षितता वाटते व त्या विकास प्रक्रियेत मागे ढकलले जात आहेत, असे वाटते. प्रा. नीता माने महाराष्ट्रातील स्त्रियांमध्ये चळवळीच्या परंपरेतून एक आत्मभान निर्माण झाले आहे असे आवर्जून नमूद करतात. डॉ. विजय साठे, कुमुद पावडे इत्यादींचे लेख उत्कृष्ट आहेत.
कामगार स्त्री, कातकरी स्त्री, दलित स्त्री, अत्याचारित स्त्री, चुकीच्या विकास आराखड्याखाली हरवलेली स्त्री, सामाजिक परिस्थितीला शरण गेलेली स्त्री, पंचायतराज्याच्या नुसत्या गप्पांना कंटाळलेली स्त्री, असे स्त्रियांच्या अनेक रूपांचे विदारक चित्र या लेखिका उभ्या करत आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, शिक्षणाविषयी अनास्था, आरोग्य अव्यवस्था, यात स्त्रिया भरडल्या जात आहेत. 21व्या शतकात महासत्ता होण्याचे मनसुबे रचणार्यांना या लेखिकांनी चपराक दिली आहे. या समस्यांना योग्य उत्तरं शोधल्याशिवाय आपल्याला एकही पाउल पुढे ठेवता येत नाही, हे जितक्या लवकर समजेल तितके सर्वांना हितावह ठरेल, असेच या लेखिकांना म्हणायचे आहे.
शोध बाई ’माणसाच्या’ जिण्याचा
सं:पुष्पा भावे व इतर
अक्षर प्रकाशन, मुंबई, (2004)
पृ.सं: 358, किं: 250 रुपये
अभिप्राय
रोचीन
रोचीन · Mon, 25 Oct 2010 - 08:30
वाचायला हवे!!
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Mon, 25 Oct 2010 - 16:32 · उत्तर
जिव्हाळ्याच्या विषयावरच्या पुस्तकाचा परिचय आवडला.
रोचीन
रोचीन · Mon, 25 Oct 2010 - 08:35
२ वेळा पडली!! :)
रोचीन
रोचीन · Mon, 25 Oct 2010 - 08:33
२ वेळा चूकून टाकला गेला आहे का??
यशोधरा
यशोधरा · Tue, 26 Oct 2010 - 08:13
तुम्ही आजवर उत्तम पुस्तकांचा परिचय करुन दिलेला आहे. तुमची लेखन शैलीही आवडते. धन्यवाद.
इतर माहिती, जसे प्रकाशन, किंमत वगैरे आवर्जून देता हे उत्तम, कारण ही माहिती घेऊन पुस्तक शोधणे आणि मिळवणे सोपे पडते.
सागर
सागर · Tue, 26 Oct 2010 - 09:09
प्रभाकर,
नेहमीप्रमाणेच आपण अजून एका छान पुस्तकाचा परिचय करुन दिलात.
या पुस्तकाच्या निमित्ताने एका संवेदनशील व ज्वलंत विषयाची माहिती समस्त मराठी जनांना या पुस्तकाद्वारे होईल.
या पुस्तकाच्या वाचकवर्गात तरी किमान नक्कीच समाजप्रबोधन होईल.
अशा एका महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे. नेहमीप्रमाणेच तुमच्या इतर पुस्तकांबरोबर हे ही पुस्तक वाचायचे आहे या यादीत जोडले आहे.
धन्यवाद
ज्योति कामत
ज्योति कामत · Sun, 31 Oct 2010 - 18:00
लवकरात लवकर वाचेन.