- Log in to post comments
‘किमया’ ही एक वाटचाल आहे, दैनंदिन जीवनांतील रूक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने ‘फुली फुलून’ आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे.
लेखक माधव आचवल हे व्यवसायाने आर्किटेक्ट. कलात्मक दृष्टी लाभलेलं, मनात निर्माण होणार्या भावनांना तितक्याच अलवारपणे शब्दरुप देणारं संपन्न व्यक्तिमत्त्व! रेती-माती-दगड-विटांमध्ये वावरत असताना त्यातील सौंदर्यामध्ये रमणारा हा लेखक.
पृथ्वी-आप-तेज-आकाश-वायु-आकार-रेषा-घर-शिल्प ह्यांविषयीच्या प्रत्येक ललितलेखातून लेखकाची सौंदर्यपूर्ण नजर सतत जाणवत रहाते. ह्या प्रत्येक घटकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते कसं आहे आणि ते तसं का आहे ह्याचा मूलभूत विचार मांडत घेतलेला वेध आहे. भूमितीचा अभ्यास करताना शिकलेल्या ह्या संकल्पनांचं लेखकाच्या नजरेतून आपल्याला होत जाणारं आकलन थक्क करणारं आहे.
निसर्ग-सान्निध्यात फिरताना, ताजमहालाचं सौंदर्य न्याहाळताना, रंगमंचावरील नृत्याविष्कार बघताना, रिकाम्या रस्त्यावरून चालताना, आजूबाजूच्या घरांचे अनोखेपण टिपताना लेखकाच्या संवेदनशील मनात किती तर्हांचे तरंग उमटत असतात!
लेखकाचं बरचसं वास्तव्य, शहरी राहणीमानापासून दूर, बडोद्यासारख्या निवांत आणि घरांची विविधता असलेल्या ठिकाणी झालं.
आपणा सर्वसामान्यांच्या दृष्टीने घर म्हणजे जिथे राहतो ते आपलं घर!
लेखक मात्र म्हणतात, ‘माणसाला अवकाशाच्या प्रचंडतेची भिती वाटत असावी. नाहीतर त्याने घरे का बांधली? ह्या अथांग विस्तीर्णतेत आपल्या स्वत:ला अनुरूप असा अवकाशाचा आकार घडवण्याची इच्छाही त्याच्या मनात असली पाहिजे.’
‘वास्तूने आकारलेले अवकाश ही एक स्वतंत्र, स्वत:चे जीवन असलेली वस्तू आहे याची जाणीव झाली की मग घर बांधणे म्हणजे संडासाच्या फरशा आणि न गळणारी स्लॅब एवढेच नसून एक फार मौजेची आणि मन व्यापून उरणारी गोष्ट आहे असा अनुभव येतो.’
‘घरावर, घरातील वस्तूंवर प्रेम करण्याचं जर आपण सोडून दिलं तर ते त्याचा सूड आपल्यावर उगवतात. आपलं घर आणि आपल्या घरातील वस्तू जर आपण स्वच्छ, जागच्या जागी नीटनेटक्या आवरून ठेवल्या नाहीत तर त्या आपली सौंदर्यदृष्टी मारून टाकतात.’
हे वाचताना वाटलं, शहरवासीयांची आजच्या काळातील एकाच छापाच्या गृहसंकुलातील, एकासारखी एक असलेली, जणू कारखान्यातील साच्यांतून तयार झालेली घरे त्यांनी बघितली असती तर?
प्रत्येक लेखातील काही-काही ओळी वाचता-वाचता अचानक थबकायला होतं.
‘त्या तिथे...पलिकडे’ ह्या लेखात एका टेकडीची ओळख करून देताना आचवल लिहितात, ‘एक लहानशी टेकडी. धरणीला माता म्हणतात, पण प्रथम ती स्त्री असते ह्याची जाणीव देणारी, मृदू, हळूवार. द्यायला आणि घ्यायला उत्सुक, स्वत:चे मूड्स असणारी टेकडी!’
‘प्रकाशाचे संगीत’ सांगते, ‘प्रेमाला प्रकाश हवा पणतीचा. सौम्य, मंद. खोलीच्या काही भागात काळोखाचे गूढ कोनाडे निर्माण करणारा. प्रियतमेच्या चेहर्यावर पूर्वी कधी न जाणवलेले सुप्त सौंदर्य प्रकट करणारा. प्रेमाला प्रकाश हवा कुजबुजीइतका हलका. दोन जिवांतले नाजूक धागे करपून जाणार नाहीत असा...’
‘रूप पाहता लोचनी:३-वास्तु’ मध्ये आचवल म्हणतात, ‘कलाकृती ही जत्रेच्या कोलाहलात बघण्याची वस्तु नाही. ती बाहेरच्या (आणि आतल्याहि) शांततेच एकट्याने, क्वचित दोघांची अनुभवायची असते.’
‘कलाकृतीसमोर उभे असताना, ती कलाकृति एवढेच सत्य असते. ताजमहाल ही एक वास्तु आहे आणि वास्तुकलेचा अनुभव हा आपल्या स्पर्श-रूप-नाद-गंधादि संवेदनांनी घ्यायचा आहे. त्या जेव्हा इतर सारी अवधाने दूर सारून समोरच्या कलाकृतीला सामावून घेण्यास आतुर आणि सज्ज होतील तेव्हाच खरा संवाद साधण्याची शक्यता आहे. कलाकृतींचे सौंदर्य प्रथमत: संवेदनांना सहजपणे जाणवावे लागते. बुध्दि मग ह्या जाणिवेचा पाठपुरावा करील. म्हणून समजावून घेण्याच्या अशा प्रयत्नांतून जे शोधायला जावे तेच निसटते.’
मनातले भाव आणि ते व्यक्त करणारे शब्द ह्यांचा वापर इतका अचूक आहे की आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीदेखील नव्या भासतात. ते दृश्य जसंच्या तसं आपल्यासमोर उभं रहातं.
ताजमहालाचं पाण्यात ‘डुचमळणारं’ सौंदर्य, आगगाडी अंधार्या बोगद्यात शिरून उजेडात बाहेर पडणं...
आपणही बोगद्यांतून अनेकवेळा प्रवास केलेला असतो. मग तो बोगदा मुंबई-पुण्याच्या वाटेवरचा असो किंवा जम्मू-श्रीनगर वाटेवरील लांबलचक जवाहर बोगदा असो! लेखकाने केलेल्या वर्णनांतून हे अनुभव नवेच भासू लागतात.
‘किमया’सारख्या पुस्तकांच्या एका वाचनाने कधीच समाधान होत नाही. ती अधून-मधून, पुन:पुन्हा वाचावीशी वाटतात. आपलं रोजचं जगणं अर्थपूण बनवण्यासाठी ते फार आवश्यक असतं.
जी. ए. कुलकर्णींनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात त्यांना आवडलेल्या किंवा न आवडलेल्यादेखील अनेक देशी-विदेशी लेखकांविषयी, त्यांच्या पुस्तकांविषयी मोकळेपणाने लिहिले आहे. त्याअनुषंगाने त्यांना (जी.एं.ना) कशा प्रकारचे पुस्तक आपल्या नावावर हवे असे वाटत असे त्याविषयी लिहिले आहे. ‘असे पुस्तक.... जे उंच देठावर उमलून राहणारे, शालीन तालेवारपणे जगणारे असेल!’ त्यातील एक पुस्तक म्हणजे ‘किमया....’
अभिप्राय
टण्या
टण्या · Wed, 16 Mar 2011 - 19:27
सुंदर परिक्षण.. >> प्रत्येक लेखातील काही-काही ओळी वाचता-वाचता अचानक थबकायला होतं. >> अगदी मनातलं वाक्य बोललीस..
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 17 Mar 2011 - 04:36
पुस्तक वाचलेलं नाही.. आता मिळालं की नक्की सोडणार नाही :)
सागर
सागर · गुरुवार, 17 Mar 2011 - 06:46 · उत्तर
पुस्तक वाचलेलं नाही.. आता मिळालं की नक्की सोडणार नाही
अगदी अगदी... सेम टु सेम असेच म्हणतो :)
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 17 Mar 2011 - 11:54
चित्रा, छान लिहिलंस.
आचवलांची किमया, जास्वंद, पत्र सारीच पुस्तके सुरेख आहेत. जास्वंद आणि पत्रबद्द्लही लिहिणार का?