- Log in to post comments
रूढी-परंपरा, जात-तमात, उच्च-नीच इत्यादी कल्पनांना अजूनही कवटाळून बसलेल्या भारतीय समाजात इतर अनेक विकसनशील देशांना थक्क करणारे विविध प्रकारचे वैज्ञानिक व तंत्रज्ञान प्रकल्प यशस्वीरित्या राबविले जाताना दिसतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची फळे पण चाखली जात असतात. हे सर्व घडत असतानासुद्धा विज्ञान - तंत्रज्ञानाचा विकास, विकासाचा वेग व त्यात सातत्य इत्यादीसाठी जी परिस्थिती, मानसिकता व प्रोत्साहन हवे ते अजूनही आपल्या देशात नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णपणे रुजला नाही. याच विचाराचा मागोवा लेखक, सुधीर पानसे यांनी आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व आपण या पुस्तकात घेतला आहे. विज्ञानाचा अर्थ समजून घेऊन या समाजाची पुढील वाटचाल कशी असावी यासंबंधीची टिप्पणी लेखक या पुस्तकात करतात.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या योग्य विकासासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याशिवाय गत्यंतर नाही, याची प्रचिती विकसित देशांचा गेल्या 4-5 दशकांचा अभ्यास केल्यास लक्षात येईल. आपल्या देशाची आजची परिस्थितीसुद्धा 14व्या शतकातील युरोपियन देशासारखीच आहे. थोडासा प्रयत्न केल्यास आपला समाजसुद्धा गरुडझेप सहजपणे घेऊ शकेल, याची खात्री अभ्यासकांना आहे. म्हणूनच समाजपरिवर्तन वैज्ञानिकतेतून व्हावे असे सर्व संबंधितांना वाटत आहे. वैज्ञानिक मनोवृत्तीमुळे विकासाच्या चुकीच्या कल्पनांना आळा बसेल. त्यामुळे होणारे नुकसान टळेल. या दृष्टिकोनाच्या अभावी तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेची वा त्याच्या धोक्याची कल्पना येऊ शकणार नाही. परंतु यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमके काय, ती रुजविण्यासाठी काय उपाय करावे लागतील, कुठून सुरुवात करावी, काय किंमत मोजावी लागेल ... इत्यादी गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया, या दृष्टिकोनासाठी अत्यंत आवश्यक असलेला कार्य-कारणसंबंधाचा विचार, प्रयोग करून निष्कर्ष काढण्याची रीत यावर लेखक भर देत आहेत. गृहितकं वा सिद्धांतांची मांडणी व प्रयोगात्मक अशा हायपॉथिसिसचा प्रायोगिक पडताळा यातील अन्योन्यसंबंध लक्षात येणे या दृष्टीने महत्वाचे ठरतात. वैज्ञानिकांची मानसिकता व त्यांचे विज्ञानव्यवहार या गोष्टींच्या अनुषंगाने असले पाहिजेत. ईश्वरावरील श्रद्धेच्या पायावर समाजाची झालेली जडणघडण समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्याच्या मार्गातला अडसर ठरते की नाही यावर लेखकाची टिप्पणी आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात धर्म व नीती व यांचा विज्ञानावर होणारा परिणाम या गोष्टीचा वेध लेखकाने घेतला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान व्यवहाराचा मुख्य गाभा असलेल्या प्रयोगशीलतेला वाव या भारतीय समाजात मिळतो की नाही, स्वत: प्रयत्न करणे, प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, या गोष्टी या समाजाला जमतात की नाही, यावर लेखक विस्तृतपणे चर्चा करतात. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे केवळ उपभोगाची साधने पुरविणारी कामधेनू नसून या सर्व व्यवहारांकडे अधिक डोळसपणे बघायची गरज आहे, असा इशारा लेखक देऊ इच्छितात. विज्ञान व भ्रामक विज्ञान (pseudo science) यांची बेमालूम सरमिसळ नेहमीच व्यवहारात आढळते. किंबहुना भ्रामक विज्ञान इतके प्रभावीपणे पुढे पुढे येत असते की विज्ञान त्यासमोर फिके पडते. विज्ञानाचे कपडे घालून भ्रामक विज्ञान मिरवत असते. यातला नेमका फरक ओळखण्याच्याविषयी लेखकाने कार्ल पॉपरवरील लेखात चर्चा केली आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाढीतील प्रमुख अडसरांमध्ये आधुनिक जीवनपद्धतीतील ताण-तणाव, दैनंदिन जीवनासाठी करावा लागणारा संघर्ष, चंगळवाद इत्यादी मुद्दे नेहमीच पुढे केले जातात. परंतु हे सर्व अनादी काळापासून घडत आहे, याचा आपल्याला विसर पडतो. कुठलाही बदल समाजाला कधीच रुचला नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाला दोष देण्याचे कारण नाही, हे लेखकाचे म्हणणे पटते. एकाच वेळी आपल्याला ही सर्व आधुनिक साधने हवीहवीशी वाटतात व त्याचवेळी त्याबद्दल एकाप्रकारची भीतीसुद्धा वाटत असते. ही मानसिकता अपरिपक्व मनोवृत्तीचे लक्षण आहे. युरोपियन समाजांशी तुलना केल्यास ते समाज त्यामानाने आपल्या पुढे गेले आहेत याचे एक प्रमुख कारण निर्भयतेत आहे. लेखकाच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन वरून लादता येत नाही. काही मूठभर लोकांपुरताच तो मर्यादित ठेवल्यास त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रसंगी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. परिश्रम करावे लागतील. समाजाची वैचारिक बैठकच पूर्णपणे बदलावी लागेल,
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक साक्षरता, वैज्ञानिक मनोवृत्ती व चिकित्सकपणा रुजविण्यातील मुख्य अडचण उच्च वर्गीय व उच्च विद्याविभूषित गटाची आहे. कारण या गटाला समाजात चिकित्सकपणा रुजल्यास त्याच्या हितसंबंधांना व शोषणव्यवस्थेला धक्का बसेल याची सतत भीती वाटत असते. वन्यजीवन, कृषीजीवन, धर्मजीवन व यंत्रजीवन या टप्प्यातून विकसित झालेला आपला समाज विज्ञान व तंत्रज्ञानाला अपरिचित नाही. परंतु गेली 1000 वर्षे बुद्धीभेद केल्यामुळे हा समाज अंधारात चाचपडत आहे. त्याला प्रबोधन, कृती कार्यक्रम, चळवळ, संघर्ष इत्यादी द्वारे जागृत केल्यास कुठलीही गोष्ट असाध्य नाही. केवळ पुस्तकी व्यवहारातून हे साध्य होणार नाही, या लेखकाच्या म्हणण्याबद्दल दुमत असायचे कारण नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण
सुधीर पानसे
लोकवांङ्मय गृह, मुंबई (1997)
मूल्य रु 100
अभिप्राय
सागर
सागर · Wed, 30 Mar 2011 - 09:14
प्रभाकरजी,
तुमचा पुस्तकपरिचय नेहमीप्रमाणेच आटोपशीर आणि उत्तम. याबद्दल दुमत नाहिये.
पुस्तकातील विचार पटले नाहीत म्हणून हे प्रकटन.
गेल्या 4-5 दशकांचा अभ्यास केल्यास लक्षात येईल. आपल्या देशाची आजची परिस्थितीसुद्धा 14व्या शतकातील युरोपियन देशासारखीच आहे.
हे लेखकाचे विधान चुकीचे आहे असे मला तरी वाटते.
डॉ. होमी भाभा यांनी अणूक्षेत्रात भारताला जे स्वालंबन मिळवून दिले आहे त्याबद्दल आजही विदेशी देश स्तिमित आहेत. आज कितीतरी अणूभट्ट्या भारतात आहे जे तंत्रज्ञान आजही खूप कमी देशातील मोजक्याच लोकांना अवगत आहे. भाभांनी रचलेल्या पायावर आज भारतात कित्येक अणुभट्ट्या कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर पोखरणमध्ये अणुस्फोट करुन आपण कोणाचीही मदत न घेता अणुशक्तीत स्वावलंबी होऊ शकतो हे दाखवून दिले.
जयंत नारळी़करांसारख्या नामवंत शास्त्रज्ञाची मदत आजही विदेशी प्रगत राष्ट्रे घेतात.
त्यावर कडी म्हणजे ( जो लेखकाचा सर्वसामान्य लोकांच्याबाबत मुद्दा आहे ) संगणक क्षेत्रात भारतीय लोकांनी मारलेली भरारी पाहता तुलनेने उलट युरोप - अमेरिकेतील देश मागे आहेत. आज खेड्यातील प्रत्येक व्यक्ती (अशिक्षित असली तरीही) आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
विज्ञान क्षेत्रात बौद्धीक संपदा यापूर्वी कधीही नव्हती एवढ्या विपुल प्रमाणात भारतात आहे. तेव्हा हे लेखकाचे विचार दीड-दोन दशकांपूर्वीचे आहेत असे नक्कीच म्हणता येईल. आज तशी परिस्थिती खचितच नाहीये.
लेखकाच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन वरून लादता येत नाही. या विधानाशी मात्र सहमत आहे. पण शिक्षणाची जोड समाजाला मिळाली तर मला वाटते की समाज स्वतःच प्रगल्भ होण्याच्या दिशेने वाटचाल करतो. आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आपोआप विकसित होऊ शकतो. तेव्हा हा दृष्टीकोन मिळण्यासाठी शिक्षणाची गरज जास्त आहे.
बाकी आपल्या देशाने इतके दिवस मागे राहण्याचे कारण राज्यकर्त्यांकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव असे म्हणता येईल. लालूंनी बिहारी लोकांना आहे त्या कूपात जगावयास शिकवले तर राजीव गांधींनी फ्री इकॉनॉमीचा स्वीकार करुन मुख्यतः संगणक तंत्रज्ञान भारतात आणले. त्यामुळेच Y2K च्या अडचणीच्या वेळी भारतीय कंपन्यांनी मोठी भरारी घेतली आणि ती घोड दौड आजही चालू आहे.
चीन ने जी उत्पादन बाजारपेठ काबीज केली आहे त्या लेव्हल ला आज जगातील कोणताच देश नाहीये.
तीच गोष्ट इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील. जपानकडे असलेला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा दर्जा चीनला मिळवायला अजून कित्येक वर्षे जातील. कोरिया व जपानच्या ऑटॉमोबाईल क्षेत्रातील कंपन्या वर्चस्व गाजवत आहेत ते देखील दर्जेदार उत्पादनांमुळे.
एकंदरीत विज्ञानाच्या काही शाखांमधील प्रगतीमुळे देशांना ओळख मिळू लागलेली आहे.
लेखकाचे विचार फारसे पटले नसल्यामुळे या पुस्तकाच्या वाटेला खरे तर गेलो नसतो. पण नानावटीसाहेब तुम्ही परिचय लिहिला आहे म्हणून मिळाले तर वाचून मगच मत ठरवेन या पुस्तकाबद्दल :)
प्रभाकर नानावटी
प्रभाकर नानावटी · Wed, 30 Mar 2011 - 16:35
आपण वाढ (growth) व विकास (development) यामध्ये गल्लत करत आहात असे वाटते. युरोपखंडातील प्रगतीच्यामागे प्रबोधन काळातील वैज्ञानिक दृष्टी होती. त्यामुळे त्या देशांनी प्रचंड प्रमाणात ऐहिक सोई सुविधा पुरविण्यात व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी झेप घेतली. आपल्या येथील वाढीमागे कदाचित जागतिक रेटा असावा. परंतु खर्या अर्थाने तो विकास नव्हे. आपण जागतिक औद्योगिक क्रांतीची फळे चाखत आहोत. आपल्या येथेसुद्धा जर वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला आला असता तर आपणही इतर विकसित देशांच्यापेक्षा कित्येक पटीने प्रगती केली असती. परंतु आपली मानसिकता वैज्ञानिक दृष्टिकोनाला पोषक नाही हे आपण मान्य करायला हवे. शिवाय विज्ञान - तंत्रज्ञानातील प्रगती किंवा त्यांच्या वापरण्यातील कौशल्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला असे होत नाही. प्रयोग, निरीक्षण, चिकित्सा, बुद्धीप्रामाण्य, कॉमन सेन्सचा वापर, तार्किकता, विवेकशीलता इत्यादी गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनात कितपत वापरला जातो यावरून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंदाज येऊ शकतो.
शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधाविषयी आपल्याला फार मोठा टप्पा गाठायचा आहे. आपल्या देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नीचांकी आहे.
यावर जास्त भर देण्यासाठी लेखकानी कदाचित थोडेसे bold विधानं केली असावेत.
सागर
सागर · गुरुवार, 31 Mar 2011 - 09:35 · उत्तर
शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधाविषयी आपल्याला फार मोठा टप्पा गाठायचा आहे.
याबाबतीत सहमत आहे. अलिकडेच आपल्याकडच्या रस्त्यांचा (विशेषतः मोठ्या हायवेज चे) दर्जा सुधारतो आहे. दळण-वळण सुधारते आहे. तरी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे आपल्याला.
जास्त भर देण्यासाठी लेखकानी कदाचित थोडेसे bold विधानं केली असावेत.
शक्यता आहे. पण तरी मी माझ्या आधीच्या प्रतिसादाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे आधी वाचेन मग जास्त अधिकाराने बोलता येईन :)
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर · Mon, 4 Apr 2011 - 16:21
गोष्टी आहेत. आकाशाला भिडणार्या उंच इमारतीचा आराखडा काढणारा स्थापत्यकार वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत असतो. परंतु जर तो गृहप्रवेश करतांना मुहूर्त शोधीत बसला, घरातील वस्तू रचतांना शोभिवंतपणापेक्षा सध्या बोकाळलेल्या वास्तुशास्त्राचा आधार घेत असेल तर त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही असेच म्हणावे लागते.
भलेभले डॉक्टर आज स्वतःचा किंवा निकटवर्तियांचा मानसिक आजार बरा व्हावा म्हणून मानसशास्त्राचा किंवा मनोविकृतीशास्त्राचा आधार न घेता जेव्हा मांत्रिकाकडे जातात तोही प्रकार लाजिरवाणाच आहे.
अगदी मोठे मोठे शास्त्रज्ञ देखील मंदिरात वा मशिदीत जातात व अंनिस ला कोणताहि पाठिंबा देत नाही, झाले तर विरोधच करतात. मनःशांती साठी विपश्यना नावाचे खूळ हल्ली निघाले आहे. संगीतात, कलास्वादात, सहलीत काय मनःशांती मिळत नाही काय? परंतु भ्रष्टाचार करतांना मात्र देवधर्म, तत्वज्ञान वगैरे आडवे येत नाही.
प्रत्येक वर्तमानपत्रातून, चित्रवाणी वाहिन्यावरून, नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणारी भविष्यविषयक तसेच वास्तुशास्त्रविषक सदरे पाहिली तर समाजाची धास्तीच वाटते. अगदी गेल्या आठवड्यात तर भारतीय संघाला चेंडूफळीतला विश्वचषक मिळावा म्हणून सार्वजनिक होमहवन केले गेले. पौषात लग्न करणारा, वास्तुशांत न करता सत्यनारायण न घालता तीन तीन वेळा गृहप्रवेश करणारा मी विरळाच असेन. माझे त्यामुळे काहीही बिघडलेले नाही. किंबहुना सर्वात सुखी माणूस असे मला परिचयातील सर्व लोक म्हणतात. आज असे किती लोक आढळतील?
या बाबतीत आपल्या समाजात तरी वैज्ञानिक प्रगतीमुळे फारसा फरक पडलेला नाही. परदेशी समाजाबद्दल मला अजिबात अनुभव नाही.
सुधीर कांदळकर