शांती योग
योग ‘ हा विषय तसा अवघडच . कारण ते एक दार्शनिक तत्त्वज्ञान आहे . यामध्ये बुद्धीला पटलेले तत्त्वज्ञान स्वअनुभवानेच सिद्ध करायचे असते . प्रयोग करायचा असतो तो स्वत : वरच ; तेही आत्मज्ञानासाठी , मुक्तीसाठी … हे सर्व साध्य करणे कठीण वाटत असले तरी तशी भीती मनात बाळगण्याचे कारण नाही . योगामुळे जीवन जगण्या – अनुभवण्याची कला अवगत होऊ शकते तसेच जीवनविषयक तत्त्वज्ञानाची ओळख होऊ शकते . म्हणूनच असा व्यापक आवाका असलेला ‘ योग ‘ दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतोय ; परंतु प्रत्यक्षात हे साधायचे कसे याविषयी गुरुजींनी ( योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार ) सोप्या शब्दांत मांडणी करून ठेवली आहे . त्याचेच विवेचन गीता अय्यंगार यांनी या पुस्तकात समर्थपणे केले आहे . या पुस्तकातून लेखिकेने योग हा विषय जीवनप्रवाहासारखा प्रवाहित करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे ; अवघड विषय सोपा करून सांगितला आहे , त्याचप्रमाणे योगसाधनेतील अडचणी लक्षात घेत मार्गदर्शन केले आहे . त्यामुळे सामान्यजनांना योगशास्त्र समजेल आणि त्यांना ते अनुभवताही येईल अशी शाश्वती या पुस्तकातून मिळते . या पुस्तकाचे वाचन , मनन व चिंतन करून सर्व योगसाधकांना निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल .