मुखपृष्ठ
प्रसंगोपात : भाग २ – अनुवाद आणि मार्क्सवाद

माझे शेल्फ

प्रसंगोपात : भाग २ – अनुवाद आणि मार्क्सवाद

सारांश

प्रस्तुत पुस्तक एकाचवेळी अनेक महत्त्वाच्या बौध्दिक सिद्धांतनांची सखोल, जिवंत चर्चा आपल्यासमोर आणतं आणि त्याचवेळी प्रासंगिक नव्या-जुन्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या आणि काही घटितांच्या निमित्ताने आपलं चिंतनही पुढे मांडतं.

मानवी जीवनाचे गतीशास्त्र आणि अशा अनिश्चिततेतही, एकत्र येऊन सामुदायिक जीवनाला आकार देण्याची मानवाची धडपड ह्या दोन संदर्भबिंदूंच्या मधल्या सगळ्या मानवी व्यवहाराचं विश्लेषण या ग्रंथात अत्यंत विचक्षणपणे मांडले आहे. आजचे जग समजून घेण्यात अडचणी येऊ नयेत असं वाटत असेल तर मार्क्सच्या द्वंद्वात्मकतेचा साकल्याने विचार होणं, त्या विचारांची पध्दत समजून घेण कसं गरजेचं आहे ते कोसांबी, ओलमन ह्यांच्या लेखनाच्या विश्लेषणातून शरद नावरे सिध्द करतात.

ते मार्क्सवाद, नव-मार्क्सवाद अशा सर्वच पोथीनिष्ठ, झापडबंद तात्त्विक चौकटी नाकारत औद्योगिक आणि उत्तर औद्योगिक काळातली परात्मता— ते माणसाची प्रेमाची भूक— ते मार्क्सवादी साहित्य समीक्षा असा चौफेर संचार पूर्णतः समकालीन भारतकेंद्री दृष्टिकोनातून नव्याने करतात.

आधुनिकतेच्या युरोपीय मूल्यांमधून जगात मुक्तीचे वातावरण निर्माण होईल अशी भाबडी आशा कशी खोटी ठरली, त्याची कारणे भांडवलशाहीच्या बदलत्या स्वरूपात कशी होती, हे ते सिद्धांतनांच्या चिकित्सक अभ्यासातून भाष्य करत स्पष्टपणे विशद करतात. तसंच खुलेपणाने मुक्त बाजार आणि उदारमतवादी लोकशाही योग्य मानणाऱ्या पिकेटीसारख्या अभ्यासकाच्या मांडणीची ते सखोल चिकित्सा करतात.

भारतातच नव्हे, तर जगभर भांडवलशाही ही अत्यंत लवचिक, परिवेशाप्रमाणे रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे रूप बदलत राहिली आणि टिकली. भांडवलशाहीच्या लवचिकतेतून, आणि तिला पर्यायच नाही, असे मानणाऱ्या विचारप्रवृत्तींचे अनुयायी जगभर वाढल्याने आज ती जणू अजेय भासते आहे. तिच्या राज्यसंस्था, संस्कृती आणि सामाजिक संबंधांवरही असलेल्या नियंत्रणामुळे आज ग्राम्शीचे ‘सहमतीतून अधिमान्यता’ आणि त्यातून वर्चस्व साधण्याचे तिचे कसब नावरे चपखल उदाहरणांतून दाखवून देतात. ह्या अतिरेकातून उद्भवलेल्या आजच्या शोषणाची विविध रूपे आणि पातळ्या ह्यांचे विश्लेषण ते करतात. केवळ आर्थिक शोषणच नव्हे, तर सांस्कृतिक शोषण तेही वंचितांच्या सहमतीने लादणाऱ्या ह्या व्यवस्थेतूनच युध्दखोरी ते भारतीय एकाधिकारशाहीची ताजी आवृत्ती कशी पुढे येते, हे ते सप्रमाण दाखवतात.

श्रुती तांबे

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
280
भाषा
मराठी
किंमत
500.00
ISBN
9788199877139