निराळं जग निराळी माणसं
भारतीय समाज वा जगातील इतर कोणताही समाज त्या अर्थाने परिपूर्ण नाही. या समाजात समाजानेच निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे अनेक लोक अत्यंत दुर्दैवी जीवन जगत आहेत. रोज आपले चाकोरीतील जीवन जगणाऱ्या समाजापेक्षा या वंचित लोकांचे जीवन निराळे आहे. त्यात वेश्या आहेत, निराधार व अपंग आहेत, मनोरुग्ण आहेत. समाजाने अनेक प्रकारे व रितीने झिडकारलेले लोक आहेत. ती माणसेच आहेत, पण त्यांना माणुसकीची वागणूक मिळत नाही. त्यामुळे या उपेक्षितांचे जग निराळे व दुर्लक्षित आहे. या निराळ्या जगाला माणुसकीची वागणूक देणाऱ्या, त्यांसाठी तन, मन, धन अर्पण करणाऱ्या काही संस्था आहेत तसेच काही सेवाभावी माणसे आहेत. या लोकसेवकांचेही स्वतःचे असे निराळे जग आहे. या निराळ्या जगावर व माणसांवर, या दोन्ही जगांचे प्रतिनिधित्व करणारे सहृदय समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या समर्थ लेखणीने ‘निराळं जग, निराळी माणसं’ द्वारा प्रकाशझोत टाकला आहे… हे पुस्तक वैचारिक / सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींची विवेकबुद्धी नक्कीच जागी करील.
– डॉ. अशोक चौसाळकर