सोंग घेऊन हा पोर
रफीक सूरज यांची कविता गरगरून टाकणाऱ्या वास्तवाच्या खोल आत दडलेल्या भयावह आक्रमक दहशतीला चिमटीत पकडून व्यक्तीच्या आत आवर्तात सापडलेल्या भीतीला शब्दरूप देते. आजच्या जगण्यातील संघर्षाला, ताणतणावाला, असहिष्णू होत जाणाऱ्या वैचारिक / सामाजिक स्वभावाला प्रतिक्रिया देता देता मानवी जगण्यातील सनातन सत्त्व उजागर करते. सततच्या एकटेपणाच्या पोकळीत सोबत शोधताना एकटेपणाच्याच पोकळीची सोबत गोंजारत मानवी नात्याचा अन्वय लावते. कधी आत्मरत तर कधी खुली होत ही कविता खेड्याभोवती निम्न शहराचे आवरण पसरत असताना होणाऱ्या घालमेलीला आपल्या अवकाशाशी एकरूप करून घेते. जगण्यातील भरडपणा या कवीच्या कवितेतील शैलीत आपोआप पाझरतो. त्यामुळे ही कविता वरकरणी थेट वाटत असतानाच आशयघन बनून जाते. नित्याच्या बोलीतील शब्दांना कवितेच्या अवकाशात आणून नवे अर्थस्तर प्रदान करून हा कवी काव्यभाषेचे नवे रूप घडवतो. आजच्या समकालीन कवितेत अपवादात्मक ठरावी अशी ही कविता आहे, म्हणूनच ती महत्त्वाची ठरते.
– राजन गवस