परीक्षण
'आवरण'
"बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यानंतरच्या काळात अल्पसंख्यांकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी सरकार काही धोरणे आखते. बुद्धीवादी, मार्क्सवादी, जातीनिरपेक्षवाद्यांना हाताशी धरून इतिहासातल्या काही विवक्षित सत्यांना दडपायचा प्रयत्न करते. इतिहास पुनर्लेखनाचे संकेत मिळायला लागतात. या धडधडीत खोटेपणाविरुद्ध नायिका आपल्या परीने कशी उभी राहते, तिचे विचारमंथन, मानसिक द्वंद्व, स्वत:च्या निष्ठांशी अविचल राहण्याचा तिचा बाणेदारपणा, सत्याचा अटटाहास, यात तिच्या संसाराची झालेली वाताहत, सरकारचा शहाजोगपणा, लाळघोटेपणा करून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकरता वाटेल ते करायची तयारी असलेले लुब्रे सोशालिस्ट्स, प्रत्यक्षात पुराणमतवादी असलेले आणि वरून पुरोगामी असल्याचा आव आणणारे बुद्धीजिवी..." म्हणजे अवघ्या २ वर्षात २० आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी एस.एल.भैरप्पांची कादंबरी ’आवरण’..!
असत्य बिंबवणारया कार्याला ’विक्षेप’असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणारया या क्रियेला ’अविद्या’ तर सामूहीक आणि जागतिक पातळीवर चालणारया या क्रियेला ’माया’ असे म्हटले जाते. आणि विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारया मायेला ’आवरण’ म्हणतात.
’आवरण’ मध्ये वेगवेगळी माणसं आहेत, त्यांची स्वत:ची अशी वेगळी विचार-बैठक आहे. कादंबरीची Protagonist रझिया (जी पुर्वाश्रमीची लक्ष्मी असते. आमीर नावाच्या वर्ग-मित्राबरोबर लग्न केल्यानंतर तिने धर्म बदललेला असतो). तिच्या आयुष्यातला एक कालखंड कोणीतरी लिहून ठेवलेला असावा आणि त्या अनुषंगाने तिच्या परिघात आलेल्या इतरांचाही पंचनामा व्हावा अशा रितीने कादंबरी लिहिली गेलेली आहे. संपूर्ण पुस्तकात ’ हा बघ पुरावा, आहे की नाही सत्य??’ असा रोकडा सवाल आणि जवाब (जर पुरावा असेल तर अर्थात! नाहीतर आक्रस्ताळेपणा) अशा अभिनिवेषातले जाबसाल आहेत.
’आवरण’ची कथा उलगडते कर्नाटकमधल्या हंपीमध्ये. भग्नावषेशांवर डॉक्युमेंटरी करायला आलेली रझिया तिथली भग्न नरसिंहाची मूर्ती पाहून विषण्ण होते. त्या भग्नावषेशांचं कारण वैष्णव-शैव यांच्यामधला वाद सांगीतला गेलेला असला तरी हिंदु संस्कारात वाढलेल्या रझियाला हिंदु लोकांकडून असे कदापिही होणे शक्य नाही याची मनात कुठेतरी खात्री असते, त्यामुळेच काहीतरी चुकत असल्याची जाणीव तिला होते. त्याला पुष्टी मिळते तिच्या स्वर्गवासी वडीलांनी ’इस्लाम’वर केलेल्या अभ्यासाच्या टिपणांनी. त्या वाचनातून बाहेर आलेल्या सत्याने ती हादरुन जाते. ’आवरणा’ची सर्वात प्रथम जाणीव रझियाला तेव्हाच होते. मग झाकोळ दुर झाल्यावर ती आपलं ज्ञान इतरांबरोबर वाटायचा प्रयत्न करते तेव्हा डोळ्यांवर झापडं ओढून बसलेल्या लोकांपर्यंत तिला काय सांगायचेय ते कसं पोहोचत नाही, पोहोचत असलं ते स्वीकारायला नाखूष कसे असतात, त्यातून तिची निर्भत्सनाच कशी होते हे सर्व त्या ’आवरणा’च्या जाणीवेबरोबर आलेले आहे.
’आवरण’ मधली सर्वात प्रभावित करणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे रझियाने देऊ केलेली थोडक्यात भैरप्पांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेली दिड-एकशे पुस्तकांची संदर्भसूची. ’आवरण’मध्ये रझिया तिच्या पुस्तकावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर म्हणते, "माझ्या कादंबरीला या सर्व पुस्तकांचा आधार आहे. जर माझ्या पुस्तकांवर बंदी घालायची असेल तर त्याआधी या प्रत्येक ग्रंथावर बंदी घातली पाहिजे." या माणसाचा व्यासंग पाहून चकीत व्हायला झालं आणि त्यांच्याबद्दलचा आदरही दुणावला. त्यांच्या ’पर्व’ बद्दल कुठेतरी वाचलं होतं की ती कादंबरी लिहीण्याच्या आधी सहा-साडेसहा वर्षं ते फ़क्त महाभारतावरच्या पुस्तकांचं वाचन करत होते. ’लई भारी’ म्हणून संदर्भसूची चाळायला लागतो आणि थबकायला होतं...
इथं एक मेख आहे.
सीताराम गोयल- हिंदुत्ववादी लेखक, राम स्वरूप-हिंदुत्ववादी, व्ही.एस.नायपॉल-Anti-Islamic लेखक, अरूण शौरी-इस्लामचे टिकाकार. या सर्वांची पन्नासेक पुस्तकं आहेत.
’आवरण’ मध्ये कुठेतरी भैरप्पा म्हणतात की "ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता, थेट त्याच्याकडे बघण्याचा प्रामाणिकपणा हवा". विशिष्ठ वर्गाचा कैवार घेऊन लिहीणारया या सर्व लेखकांच्या लिखाणाचे दाखले देऊन भैरप्पा काय सुचवू पाहतायेत??
अल्बेरूनी, जदुनाथ सरकार, प्रियोळकर, स्टॅनली-पूल ही सर्वसमावेशक नावं संदर्भसूचीकरता आणि पुस्तकात दाखले देताना मात्र सीतराम गोयल बियल प्रभृती असा प्रकार झालाय असं वाटायला लागतं. मागचे पुढचे सर्व संदर्भ वगळून आपल्याला सोयिस्कर तेव्हढीच सत्यं उचलायची आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायचं. म्हणजे अंगावर शेकलंच तर "बघा बघा, मी याच पुस्तकातून संदर्भ घेतलाय. माझ्या पुस्तकावर बंदी आणायचिये तर या पुस्तकावर पण आणा" असा कांगावा सहज करता येतो. असं बरेच लेखक करतात. असो, मी ही सर्व पुस्तकं वाचलेली नाहीएत त्यामुळे भैरप्पांच्या लिखाणावर याहून जास्त शंका घ्यायचा मला हक्क पोहचत नाही.
’आवरण’च्या कथेमध्ये आणखी एक समांतर कथाप्रवाह आहे तो म्हणजे मूळ राजपुत असलेल्या पण नंतर खोजा (तृतीयपंथी) बनवल्या गेलेल्या ख्वाजाजहानचा. रझिया ’औरंगजेबाच्या’ काळावर एक कादंबरी लिहीते आहे त्यातले हे मुख्य पात्र. शेवटच्या क्षणी कच खाऊन इस्लाम स्वीकारलेला नंतर समलिंगी संभोग, जबरदस्तीने नपुंसक करणे इ. नी अपमानित केलेला ख्वाजाजहान. रझियाचा मनात चाललेले द्वंद्व, तर्ककुतर्क, भरकटलेपण या ख्वाजाजहानच्या कहाणीत सहीसही प्रतिबिंबीत झालेले आहे. या लिखाणाला तिच्या वडीलांच्या मॄत्यूची पार्श्वभूमी आहे. तिने धर्मांतर केल्याने कायम दुरावलेल्या वडीलांचं आपण क्रियाकर्मही करु शकलो नाही ही खंत तिला खाते आहे. आपण मुळातच धर्म बदलला ते चूक की बरोबर, मग मूळत: ज्या धर्मात होतो तो धर्म आपण आहोत त्या धर्माहून किती सहिष्णू आहे याबद्दल तिला वारंवार येत असलेली प्रचिती, त्यासाठी तिच्या वडीलांनी इस्लामवर केलेल्या गाढया अभ्यासाची टिपणं आदीची मदत होते, मग तिचे होणारे मतपरिवर्तन हे सर्व सर्व ख्वाजाजहानच्या कहाणीतही आहे. म्हणजे थोडक्यात ती कुठेतरी रझियाचीच कहाणी आहे. ख्वाजाजहान आणि एका तपस्व्याची गंगेच्या काठावर पडलेली गाठ आणि त्यांच्यामधला धर्मावरचा संवाद केवळ वाचावा असाच आहे.
छोट्याछोट्या वाक्यातून किंवा प्रतीकांमधून वाचकाला सुन्न करण्याची भैरप्पांची हातोटी विलक्षण आहे. रझिया आणि तिच्या वडीलांमधल्या संवादाची या ३०० पानी पुस्तकात फ़क्त सहा-एक वाक्यं आहेत. त्यातलं एक वाक्य असं आहे- "तू एकटीने आपल्या आयुष्याचं काय करून घेतलंस हा प्रश्न नाही. तुझ्या पोटी जन्मणारं मूल किंवा त्याचं मूल, कुठल्या ना कुठल्या पिढीत आपल्या देवालयाचा नाश करेल. ते पाप तुझ्या डोक्यावर राहील, लक्षात ठेव!"
हे वाचून आपण दुसरया वाक्याकडे वळतो न वळतो तोच त्यातल्या गंभीर शक्यता ध्यानात यायला लागतात आणि आपण गडबडून जातो. मग तो ख्वाजा-जहानच्या Castrationचा प्रसंग. तो इतका भीषण आहे की वाचक "स्स.." केल्याशिवाय राहत नाही. किती लोकांना तृतीयपंथी बनवले गेले, किती स्त्रियांना जनान्याची वाट दाखवण्यात आली, किती हिंदु मंदिरं तोडून मशिदी बनवल्या गेल्या इ. औरंगजेबांच्या जनतेवरच्या अत्याचाराचा लेखाजोखा वाचून आपण मूळ रझियाच्या कहाणीत येतो तेव्हा तिच्याशी इतके समरस झालेलो असतो की राजधानीच्या शहरातल्या एका रस्त्याला या कॄर, असहिष्णु राजाचे नाव दिलेले बघून रझियाबरोबर आपणही उद्विग्न होऊन जातो.
’आवरण’ मधलं एकही पात्र विना-प्रयोजन नाही.
लक्ष्मी उर्फ़ रझिया, तिचा नवरा आमीर-त्याचे कटटर मुसलमान आई-बाप, लक्ष्मीचे वडील, प्रोफ़ेसर शास्त्री (हे पात्र भैरप्पांचे वैचारीक प्रतिस्पर्धी यु.एन.अनंतमुर्तींवर बेतल्याचे म्हटले जाते, त्यावर अनंतमुर्तींनी सडकून टिका केल्याने ’आवरण’वर वाचकांच्या आणखी उडया पडल्या), रझियाचा सौदीमध्ये असलेला कटटर मुसलमान मुलगा नझीर-आजच्या आधुनिक जगातही कटटरपणाची कास पकडून चालणारया मुलांचे प्रतिनिधीत्व करणारा, शास्त्रींचे आई-वडील-मुलगा-सुन-बायको, केंचप्पा आणि इतर सर्व. धर्मांतराच्या मुद्द्यावरून, Post-धर्मांतर परिस्थितीवर रझियाचे बरेच मोनोलॉग्ज आहेत.(इथे मला भैरप्पांनी RSSच्या व्यासपीठावरुन धर्मांतराविरुद्ध चळवळी चालवल्या होत्या त्याची आठवण झाली), टिपू हा प्रत्यक्षात क्रूर राजा आणि कटटर मुसलमान असला तरी त्याला सहिष्णु रंगवण्यात हात असलेल्या लेखकांचा संदर्भ आहे. इथे गिरीश कर्नाडांनी ’टिपु हा आतापर्यंतचा थोर कन्नडीगा आहे’ असे उद्गार काढल्याचा आणि त्यांच्या टिपुवरच्या ’The Dreams of Tipu Sultan’ किंवा ’बळी’या नाटकाचा आणि त्यातून कर्नाडांनी टिपूच्या केलेल्या उदात्तीकरणाचाही अप्रत्यक्ष उल्लेख येतो.. मात्र.. प्रोफ़ेसर शास्त्रींच्या कॅथलिक बायकोने आई-वडीलांच्या मर्जीविरुद्ध शास्त्रींशी लग्न केलेले असताना तिच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला तिचा कडवा विरोध का असावा किंवा रझियाचे वडील मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करताना फ़क्त देवस्थानांच्या विध्वंसांबद्दल आणि मुस्लिम राजांनी ओलीस ठेवुन घेतलेल्या राजपुत्रांबद्दलच टिपणं का काढून ठेवतात याचा उलगडा होत नाही. आपल्या सोयीची तेव्हढी सत्यं इतिहासातून उचलण्याचा आणखी एक प्रकार इथे जाणवला. ह्या छोट्या गोष्टी सोडल्या तर कादंबरी आपल्याला बरयाच ठिकाणी अंतर्मुख करून जाते, विचार करायला भाग पाडते.
ही कादंबरी वाचताना काही वर्षांपूर्वी ’शिक्षणाचे भगवीकरण’ झाले होते त्याची आठवण येणे साहजिक आहे. पाय-उतार झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या सो कॉल्ड मुस्लिमधाजिर्ण्या धोरणाला सणसणीत प्रत्युत्तर म्हणून NDA सरकारने ही खेळी केली होती. पाठ्यपुस्तकं बदलली, मध्ययुगीन काळात( म्हणजे दिल्ली सल्तनतीच्या, मोघल काळात थोडक्यात ’मुस्लिम’ कारकिर्दीत) भारताची किती आणि कशी वाताहत झाली (जे तद्दन खोटं आहे असंही मी म्हणणार नाही, पण जे तद्दन खरंही नाहीये) याची रसभरीत वर्णनं घुसडली. पण सुदैवाने त्या सरकाराला पाय-उतार व्हायला लागले आणि आपल्यासकट आपल्या पुढच्या पिढ्यांना adulterated इतिहास वाचावा लागण्याची आफ़त टळली. I wonder, RSSप्रणित ’या’ आवरणावर भैरप्पांनी लिहीलं असतं का?
कोणाच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवणं ही शिकवण हिंदु धर्म देत नाही. (मला आठवत असलेले) पुष्यमित्र शुंगाने बौद्ध स्तूपांची तोडफ़ोड केल्याचे उदाहरण वगळता हिंदू राजांनी इतर धर्माच्या लोकांना त्रास दिलेला नाही, ना त्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवला. उलट त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा होती. हिंदु राजांनी अरब व्यापारयांना मशिदी बांधण्यास परवानगी दिल्याचे( जरी त्यामागे त्यांचा आर्थिक हेतु होता तरी)दाखले इतिहासात आहेत. हा हिंदु धर्माचा मोठेपणा आहे. देवळात जायचं की नाही हे ठरवायचं स्वातंत्र्य हिंदु धर्मातल्या लोकांना आहे, वेळप्रसंगी आपण आपल्या दैवतांची चेष्ठाही करु शकतो. पण.....हिंदु धर्माचे दाखले देऊन इस्लाम कसा क्रूर हे दाखले देण्यात काहीच हशील नाही. प्रत्येक धर्म आपपल्या परीने वेगळा आहे, प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबरांनाच ’अल्लाह’ असे म्हटले जाते, मूर्तीपूजा त्यांच्यात वर्ज्य आहे, कुठल्याही ’दार-उल-हरब’(अमुस्लिम) प्रांताला ’दार-उल-इस्लाम’ बनवणे म्हणजे मेल्यानंतर पैगंबरांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही शिकवण त्यांना दिली जाते. काफ़ीर (अमुस्लिम) माणसापुढे दोनच उपाय- मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. मग पुढे दिल्ली सल्तनतीच्या राजांनी मांडवली करून त्यात ’जिझिया’ वगैरे घातला. असं सगळं असताना इथे राज्य करायचं स्वप्न घेऊन आलेल्या या ’गाझी’ लोकांनी त्यांचा धर्म सांगेल ते केलं. ते समर्थनीय मुळीच नाही. कोणाचा धर्म काहीही सांगो, माणसाने माणसांविरुद्ध जे काही केलं ते निंदनीयच आहे. राजेशाहीत, एकाधिकारशाहीत राजवटींकडून जनतेवर बरेच जुलूम होत आले आहेत. त्याला हिंदु राजेही अपवाद नाहीत. वैदीक काळात मनुवाद्यांनी जे केलं ते तिरस्करणीयच आहे. पण हिंदू धर्माने मनुच्या चुकांची जबाबदारी प्रांजळपणे घेऊन त्यत सुधारणा घडवण्याची तयारी दाखवली (असं भैरप्पा म्हणतात) आणि तेच इस्लामकडून अपेक्षित आहे. झाला तो इतिहास आहे. आपण त्याबद्दल ’आज’ काही करु शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्याकडे तटस्थपणे पाहायची वृत्ती जोपासणं, त्यातल्या चुकांमधून धडे मिळवणं अपेक्षित आहे. पण त्याकाळात तू माझी देवळं फ़ोडली म्हणून आज मी तुझ्या मशिदी फ़ोडतो असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्याने प्रश्न अजून धगधगत राहणार आणि चुकांमधून शिकण्यापेक्षा त्यांचं समर्थन करण्याची, जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढीस लागेल. भैरप्पा म्हणतात, "इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती, आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही." दुर्दैवाने ही गोष्ट आज कोणी ध्यानात घेताना दिसत नाही.
कादंबरीचा रागरंग काहीही असला तरी पण कादंबरीचा शेवट आमीरच्या किंवा लक्ष्मीच्या धर्मांतराने झालेला नाही. परस्पर-सामंजस्य हे सत्यावर टिकून राहतं, दिशाभूल करुन नाही. आपला धर्म अजूनही सनातन आहे, आपल्या धर्मात स्त्रियांना शिक्षण नाही, इतिहासातल्या आपल्या धर्माकडून घडलेल्या चुकांना बेमालूम झाकून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या चुकांची पुनरावृत्ती घडता कामा नये, "आमच्या पुर्वजांच्या चुकांना आम्ही जबाबदार नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत" हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे , हे आमीरने प्रांजळपणे स्वीकारणं यात भैरप्पांना कादंबरीचा शेवट आशादायक करायचा आहे हे आलंच. आणि इथेच भैरप्पा इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
"आवरण शक्तिस्तावदल्पोsपि मेघोsनेकयोजनायत्मादित्यमंडलमवलोकयितृ
नयनपथपिधायकतया्सच्छादयतीव..."
एखाद्या लहानशा ढगानेमध्ये येऊन अनेक योजने विस्तार असलेल्या सूर्यमंडळाला दृष्टीआड करावं , त्याप्रमाणे आवरण शक्ती सत्याला झाकोळून टाकते.
’आवरण’ वाचून आपल्या बुद्धी-विचारांवरची झापडं काही प्रमाणात दूर झाली आणि आपण असत्यापासून मुक्त होऊ शकलो तर ते ’आवरण’चे आणि पर्यायाने ’एस.एल.भैरप्पा’सारख्या सिद्दहस्त लेखकाचे यश मानले जाईल.
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:42
पु. वि. वर स्वागत!
सुरेख परिचय आहे! पुस्तक वाचायच्या यादीत अॅडवत आहे :)
वल्ली
वल्ली · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:51
पुस्तक घेतलेले आहेच यथावकाश वाचेनच.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 13 Jan 2011 - 04:59
दिवसाची सुरुवातच इतक्या सुरेख लेखाच्या वाचनाने व्हावी यापेक्षा अन्य आनंद नाही. पुस्तकविश्ववर 'मणिकर्णिका' यांचे मनःपूर्वक स्वागत. लेखातील भाषा स्पष्टच संकेत देते की तुमचे वाचन किती अफाट आणि विविध आहे. केवळ 'आवरण' चे हे परिक्षण नसून त्या निमित्ताने धर्म, धर्मग्रंथ, चालिरिती, लेखकाचा कल, समाजदर्शन, व्यावसायिक तेढ, आदी अनेक बाबी यावर तुमचे स्वतःचे असे जे मत आहे त्याची प्रचिती वाक्यावाक्याला येते. म्हणून अमुक एक पुस्तक आवडले एवढ्यासाठीच त्याचा परिचय न देता त्या अनुषंगाने काही खटकलेल्या बाबीदेखील तितक्याच थेटपणे देणेही अगत्याचे असते ही बाब तुमच्या लिखाणाने अधिक ठळक केली आहे.
"...इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. ..." भैराप्पांच्या या वाक्यात फार गहन असा अर्थ दडला आहे आणि तो मानला तर कालच्या 'अ' च्या महानतेच्या नावाखाली आजच्या शेंगदाण्याएवढ्या 'ब' ने आदळापट करून 'क' ला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणे हा प्रकार निदान काही प्रमाणात कमी होईल. [दुर्दैवाने आमच्यातील संधीसाधू राजकारण्यांना नेमके हेच नकोसे झाल्ये...असो, हा एक वेगळा विषय आहे, जो पु.वि.च्या मार्गदर्शक तत्वात बसू शकत नाही.]
"आवरण" ही वाचनखूण म्हणून ठेवत आहे. इथले सर्वच वाचनप्रेमी या कलाकृतीचा वाचन आनंद घेतील यात संदेह नाही.
इन्द्रा
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · गुरुवार, 13 Jan 2011 - 06:32
सर्वप्रथम पुस्तकविश्व वर स्वागत,
आवरण अशातच वाचल्यामुळे अजुन मनातुन त्याचा इम्पॅक्ट अजुन पुसला गेलेला नाही.मला या पुस्तकाने तर भारावुन टाकले असे नक्कीच म्हणता येईल. पुस्तकाच्या विषयापेक्षा लेखकाने केलेली मांडणी त्याने उभे केलेले कॅरेक्टर्स हे खासच म्हणावे लागतील. त्यात वर परिचयात उल्लेखलेले रझिया आणि तिच्या वडिलांमधिल संवादाच्या वाक्यासारखी वाक्ये हे कादंबरीचे षिशिष्टे म्हणावी लागतील.
परिचयातली काही वाक्ये निश्चितच खटकली. पण एकुणच एका सुंदर पुस्तकाचा परिचय करुन दिल्या बद्दल धन्यवाद.
अजुन एक हा लेख जालावर http://shabd-pat.blogspot.com/2010/10/blog-post.html इथे सापडला. या आपणच का????
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 14 Jan 2011 - 01:09 · उत्तर
धन्यवाद निखिल,
हो, ती मीच आहे.
अवलिया
अवलिया · गुरुवार, 13 Jan 2011 - 07:07
आवरण कादंबरी वाचली आहे.
त्यात आलेले अनेक संदर्भ आणि घटना आधीच माहिती असल्याने फार आश्चर्याचा धक्का बसला नाही. कॉग्रेसप्रणीत मुस्लिम तुष्टीकरणाच्या नितीची अगदी व्यवस्थित माहिती असल्याने भैरप्पांच्या भुमिकेबद्दल आश्चर्य नाही. उलट एक कौतुक आहे. कादंबरी वाचल्यावर जे संदर्भ मला माहित नव्हते ते मी शक्य तेवढे तपासले. कुठेही चूक आढळली नाही.
आवरण कादंबरी जरुर वाचा अशी माझी शिफारस आहे त्याचबरोबर जमल्यास त्यातील संदर्भातील पुस्तकांचे पण वाचन करा.
वरती दिलेल्या परिचयातल्या काही वाक्यांबद्दल आक्षेप आहे. दुसरी बाजु नीट न तपासता अशी वाक्ये यावीत याचे वाईट वाटले. असो. त्यावर चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे.
यशोधरा
यशोधरा · गुरुवार, 13 Jan 2011 - 07:09
छान परिचय मणि. अक्षरधाराच्या पुण्याच्या प्रदर्शनात आवरण घेतली होती. जेव्हा वाचायला घेतली तेह्वा झपाट्याने वाचून काढली. अतिशय सुरेख कादंबरी आहे, कादंबरीत लक्ष्मी जे संदर्भ शोधत जाते, त्यावर लिहिण्यासाठी स्वतः लेखक, भैरप्पांनी किती वाचन केले असेल, किती पुस्तकांचा धांडोळा घेतला ह्याचा विचार मनात येऊन अतिशय थक्क व्हायला झालं होतं.
स्पष्टपणे आणि निर्भयपणे इतिहासाबद्दल मांडलेली मते, तो कसा बदलला जातो, का बदलला जातो, त्यासाठी घडली जाणारी राजकारणे आणि वस्तुतः प्रोफेसरांसारखी मुळात बांडगुळाप्रमाणे असलेली व्यक्तीरेखा, त्यांची स्वतःचा फायदा आणि नाव करुन घेण्याची प्रवृत्ती आणि इतरांच्या स्तुतीपाठक प्रवृत्तींमुळे अशा काडीचीही किंम्मत द्यायची गरज नसलेल्या लोकांचा फायदा कसा होतो, व शेवटी ते खर्या इतिहासालाच कसे मारक ठरु शकते, हे फार प्रभावीपणे मांडलेले आहे. ल़क्ष्मीची व्यक्तीरेखा फार आवडली.
इतक्या स्पष्ट लिखाणाला आणि लेखकाला सलाम. प्रवाहाविरुद्ध आणि मुख्य म्हणजे सो कॉल्ड लोकप्रियतेविरुद्ध जायचे धैर्य फार थोड्यांमधे.
मणि, छान लिहिलेस. तुला पुविवर पाहून आनंद झाला :)
सागर
सागर · गुरुवार, 13 Jan 2011 - 07:22
मणिकर्णिका,
पहिल्यावहिल्या लेखानेच तुम्ही पुवि वर एकदम दमदार प्रवेश केला आहे याबद्दल तुमचे अभिनंदन :)
आवरण अलिकडेच मी विकत घेतली आहे. तुमच्या परिचयामुळे लवकरच वाचेन आता
भैरप्पांच्या पुस्तकांचा मला मोह पडला तो 'पर्व' वाचून. पर्व मध्ये जे परंपरागत रुढींना तडा देणारे स्फोटक वातावरण भैरप्पांनी निर्माण केले आहे तसेच आवरणमध्ये असेल याची खात्री तुमच्या 'आवरण' वरच्या या पुस्तक परिचयावरुन पटली.
पुस्तकविश्ववर माझ्याकडूनही तुमचे मनापासून स्वागत आहे :)
धन्यवाद,
~सागर
आरागॉर्न
आरागॉर्न · गुरुवार, 13 Jan 2011 - 07:33
पुविवर स्वागत. :)
सुरेख परिचय. पुस्तक वाचायच्या यादीत टाकले आहे.
रोचीन
रोचीन · गुरुवार, 13 Jan 2011 - 12:27
इथे कधि आलीस??
लेख छानच आहे!! बाकिच्या धाग्यांवरहि तुझी टिप्पणी अपेक्षित आहे!!
मस्त कलंदर
मस्त कलंदर · गुरुवार, 13 Jan 2011 - 20:01
मी या विकांताला या पुस्तकाचा परिचय लिहिणार होतेच, त्या आधी तुम्हीच इथे तो प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
मी काही वर्षांपूर्वी भैरप्पांची सर्वात आधी 'जा ओलांडूनी-दाटू' वाचली होती. ती वाचतानाच त्यांच्या लेखनातलं वेगळेपण जाणवलं होतं. गेल्या आठवड्यात 'आवरण' आणि 'वंशवृक्ष'ही वाचून झाल्या. एकाच लेखकाची तीन वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचल्यानंतर त्या लेखकाविषयी आणि पुस्तकांविषयीही माझं मत आणखीच चांगलं बनलं आहे.
पुस्तकाबद्दल माझं मतः हिंदू-मुस्लिम दंगे आपल्या देशात कमी नाहीत. बाबरी मशिदीच्या पाडावानंतर तर त्यांनी अधिकच तीव्र रूप धारण केलंय. या मंदिर-मशिदींच्या ठिकाणी मूळ वास्तू नक्की कोणती होती हा अनंतकाळापासून चालत आलेला आणि अजूनही तग धरून असलेला वादग्रस्त मुद्दा आहे. या मुद्यांचा आपल्या तशाकथित हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष, दोन्ही प्रकारचे राजकारणी वापर करत आहेत. भैरप्पांनी या अतिशय संवेदनशील असलेल्या गोष्टीवर संशोधन करून त्याचं फलित या पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडलं आहे.
इतिहास हा तसा कंटाळवाणा विषय. त्याला रंजक बनवण्यासाठी तो एका कथानकातून मांडला आहे. लक्ष्मी, ही स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. तिने वडिलांच्या इच्छेविरूद्ध मुस्लिम मुलाशी लग्न केलंय. प्रोफेसर शास्त्री म्हणतात म्हणून, आणि नवरा 'हा केवळ उपचार आहे' असं सांगतो म्हणून फक्त ती धर्म बदलते. दोन्ही धर्मांकडे ती तितक्याच तटस्थपणे पाहते आणि म्हणूनच त्या-त्या धर्मातील विसंगती तिला खटकतात. बाकी कथानक पुन्हा एकदा लिहिण्यात अर्थ नाही. परंतु तितल्या पात्रांविषयी लिहिल्याशिवाय प्रतिसाद पूर्ण होऊच शकणार नाही.
कादंबरीतलं प्रत्येक पात्र अगदी व्यवस्थितपणे खुललं आहे. एकही त्यात नसतं तरी चाललं असतं असं वाटत नाही. प्रोफेसर शास्त्रींचा दांभिकपाणा, नवर्याचा अप्पलपोटेपणा, मुलाची धर्मांधता, बाबांचा आधीचा मानीपणा आणि नंतर 'मुलगी असं का वागली असावी' याचा शोध, सगळं अगदी सही सही चितारलं गेलंय. कुणीही आपल्या व्यक्तिरेखेपासून तसूभरही ढळत नाही. त्यामुळे लक्ष्मीचं पुन्हा हिंदू पद्धती अंगिकारणं खोटं किंवा तोंडदेखलं वाटत नाही. राजकारण्यांचा दुष्टपणाही तितकाच नजरेत भरतो आणि इतिहास कसा बदलला जात असावा हेही त्यातून समोर येतं. हे सगळं लिहित असतानाही भाषेत एक प्रकारचा संयतपणा आहे. ना कुठे कुठल्या जाती-धर्माचं स्फुल्लिंग चेतवणारं वाक्य येतं, आणि ना कुठे रक्त सळसळवणारं. अपवाद काही एकदोन प्रसंगाचाच असावा. एक म्हणजे शेवटी जिथे लक्ष्मी पहिल्या कॉन्फरन्समध्ये प्रोफेसरांविरूद्ध बोलते, तिथेच काय ती थोडीशी आक्रमक वाटते तीही आक्रमक भाषेशिवाय. आणि दुसरा प्रसंग म्हणजे त्या खोजाच्या खच्चीकरणाचा. तो प्रसंग रक्तबंबाळ शब्दांशिवाय अंगावर अगदी काटा आणतो.
एकूणात पुस्तक कोणताही आक्रस्ताळेपणा न करता सत्य समोर आणण्यात यशस्वी ठरले आहे हे माझे मत!!!
आता वरील परिचया काही खटकलेल्या मुद्यांबद्दलः
[कदाचित माझी विचारसरणी लेखिकेपेक्षा वेगळी असण्याचाही तो परिणाम असू शकेल. स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व, पण मला हा परिचय काहीसा पूर्वग्रहदूषित वाटला. ]
१. संदर्भसूची: हा मुद्दा काहीसा पटण्यासारखा आणि काहीसा न पटण्यासारखाही. मी आता पुन्हा ती संदर्भसूची चाळून पाहिली. त्यांचे काही संदर्भ जरी शौरीं-गोयलसारख्यांचे आहेत- अगदी कादंबरीचा मुख्य विषय असलेल्या काशीविश्वेश्वर मंदिराबद्दलचे संदर्भ शौरींचे आहेत-तरी हेच ते सगळे संदर्भ नाहीत. बरेचसे संदर्भ मुस्लिम-मुघल राजांच्या बखरकारसदृश्य व्यक्तींनी लिहिलेल्या ग्रंथांचे अथवा त्यांच्या भाषांतरित बाडांचे आहेत. प्रेषित-प्रवादींबद्दलची माहिती ज्या ग्रंथातून घेतली आहे, त्या ग्रंथाला सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी उत्तम म्हणून गौरवलेलं आहे, म्हणजेच तो त्या लोकांना मान्य आहे. भारतीय भाषांत असं संशोधनात्मक फारसं साहित्य येत नाही[चूभू देघे]. अशा वेळेस माहिती चुकीची असेल तर कुणी इतकं संदर्भसूचीसह तेही अगदी पुस्तक, आवृत्ती, प्रकाशक, प्रकाशकाचा पत्ता इतकं डिटेल्स देत बसणार नाही.
आक्रस्ताळेपणा या शब्दाला साजेसं, निदान मला तरी पुस्तकात एकही वाक्य दिसलं नाही, तेव्हा तो मुद्दा बाजूस सारून, राहिलेल्या वाक्याप्रमाणे लिहिलं नसतं, तर कादंबरीतील लक्ष्मीच्या पुस्तकाचं जे झालं, तेच 'आवरण'चं झालं असतं!!!
३. आपल्या सोयीची तेव्हढी सत्यं इतिहासातून उचलण्याचा आणखी एक प्रकार इथे जाणवला.
या वाक्याचा संदर्भ काही कळाला नाही. या पुस्तकात मांडलेली सत्यं: टिपूचं आजवर समोर न आलेलं रूप, मुस्लिम राजांची धर्मांधता आणि जुलुमीपणा,अकबरासारखे राजे सहिष्णू असल्याने त्यांच्या दृष्टीने वाईट तर औरंगजेबासारखे कट्टर असल्याने चांगले, मंदिरं पाडून त्या ठिकाणी मशिदी उभ्या करतानाची त्यांनी लिहिलेली टिपणं. हे सगळं मुस्लिम बखरकारांनी रंगवलेल्या त्यांच्या राजांच्या चरित्रांतूनच आलं असल्याने त्याला भैरप्पा जबाबदार आहेत असं मला वाटत नाही.
असो. वाचनीय आणि संग्रहणीय पुस्तक हा या प्रतिसादाचा सारांश. :-)
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 14 Jan 2011 - 01:25
सगळी लोकहो,
धन्यवाद.
भैरप्पांसारखा लेखक आणि त्याहून वादग्रस्त ठरलेलं त्याचं पुस्तक, त्यामुळे मी जेवढ्या शक्य तेवढ्या सर्व बाजूंचं नीट वाचन करुन मगच हा परिचय लिहीला आहे, त्यामुळे तो पूर्वग्रहदूषित आहे हे मी साफच नाकारते. हा परिचय पूर्वग्रहदूषित म्हणजे मला भैरप्पा किंवा ते ज्या संघटनेच्या व्यासपीठावरुन बोलतात त्या आर. एस.एस बद्दल आकस आहे असे म्हणणे होईल जे खरं नाही. ज्या गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या सत्य दिसल्या त्या मी लिहील्या आहेत. प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे संदर्भ आहे. काही गोष्टी सुटल्या असतील, काहींबद्दल मी अंधारात आहे असं तुम्हाला वाटत असेल पण त्यावर चर्चा करायची ही जागा आहे असे वाटत असेल तर आपण मला व्य.नि करु शकता.
प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, दृष्टी-बुद्धीवर झालेले संस्कार वेगळे, राजकीय मतप्रवाहांबद्दलची स्वतःची वाचून-ऐकून बनवलेली मतं वेगळी. त्यामुळे अपल्यापैकी प्रत्येकाने आवरणचा परिचय लिहायचा तर भैरप्पांच्या लिखाणाच्या हातोटीबद्दलचा आदर हा मुद्दा सगळीकडे सारखा राहिल, बाकी गोष्टी बदलतील.
आणि इथे भैरप्पांबद्दलचा 'आवरण'चा लेखक म्हणून आदर वाटतोय तो मला महत्वाचा वाटतो. बाकी मतं ज्याने-त्याने पुस्तक वाचून आपापली बनवायची आहेत.
जरुर वाचा. आणि आपापली मतं बनवा.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 14 Jan 2011 - 07:12
माझं मत काहीसं असंच झालंय. मला परिचय वाचताना पुस्तक तर आवडले पण भैरप्पांची मतं पटत नाहीत असं वाटलं. जर ते तसं नसेल तर माझं झालेलं मत चुकीचं आहे. पण असे पूर्वग्रह होतात आणि मीही त्याला अपवाद नाही. मागे 'नवीन काय वाचताय' मध्ये मी 'राजा रविवर्मा' बद्दल लिहिलं होतं. मला ते वाचताना देसाईंच्या लेखनशैलीची माधवी देसाईंनी केलेली चिरफाडच सतत आठवत राहिली आणि ती वर्णनं माझ्या मनापर्यंत पोचली नाहीत. त्यामुळं त्यांच्या इतर पुस्तकांइतकं हे पुस्तक नाही आवडलं. नंतर इतरांचे अभिप्राय ऐकले-वाचले तेव्हा त्यांनाही पुस्तक न आवडल्याचं कळालं तेव्हा मग जरा बरं वाटलं.
याबद्दल सहमत. बाकी, असहमतीबद्दल लिहायचं तर ते मी इथं लिहिले आहे, आणि सगळ्यांनी इथंच लिहावं. तरच चर्चा होऊ शकेल. वरती अवलिया आणि निखिल यांनीही त्यांना काही खटकले आहे असं लिहिलंय, तर नक्की काय खटकलं तेही येऊद्यात. पुस्तक ज्यांनी वाचलं आहे, त्यांचीही सविस्तर मते यावीत.
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर · Fri, 14 Jan 2011 - 16:21
अवरण वाचायला. सार्थ, वंशवृक्ष वगैरे वाचल्यानंतर कुतूहल होतेच. दीडशेची बिब्लीओग्राफी म्हणजे अचाटच आहे.
धन्यवाद
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Wed, 19 Jan 2011 - 09:22
पुस्तक एकांगी आणि काहीसे प्रचारकी असावे अशी शंका येते आहे. म्हणून काही प्रश्नः
मणिकर्णिका
मणिकर्णिका · गुरुवार, 20 Jan 2011 - 01:17 · उत्तर
तुमच्या वरील सगळ्या प्रश्नांचं उत्तर 'नाही' असंच आहे. पण तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळलं.
आवरण ही 'कादंबरी' आहे. त्यामुळे कल्पनाविलासाला भरपूर वाव आहे. ती सत्यकथेवर आधारीत आहे असं भैरप्पा कादंबरीत कुठेही सुचवत नाहीयेत. याचा अर्थ रझिया,आमीर, प्रोफेसर शास्त्री सारखी माणसं नाहीतच असं नव्हे तर ती होती/नव्हती किंवा असूही/नसूही 'शकतील' हे कळावं.
कादंबरीत घडलंय ते तसंच्या तसं घडलंय समजायची गरज नसली तरी घडू शकतं या शक्यतेला जागा असावी.
ही प्रातिनिधिक कहाणी आहे, भैरप्पांच्या दृष्टीकोनातून मांडलेली. त्यामुळे त्यातली पात्रं, कहाणी 'वैश्विक'सत्यं आहेत असंही समजायची गरज नाही.
आपण आपल्या अनुभवांवरुन, आजूबाजूंच्या पात्रांशी सांगड घालून, सर्वच कथेकडे त्यांच्यापेक्षा वेगळ्या दॄष्टीकोनातून पाहू शकतो. तुम्ही बघायचा प्रयत्न करत आहात असं वाटलं.
पटतं ते घ्यावं-नाही पटत ते बाद करावं.
आनंदयात्री
आनंदयात्री · Wed, 19 Jan 2011 - 16:26
सुरेख परिचय, इतक्या छान पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
आपली मते आपण स्पष्टपणे मांडली आहेत, नीट कळली. वर निखिल म्हणतो तसेच सगळ्या मतांशी सहमती नाहीच, पुस्तक विकत घ्यायला जावे म्हणतोय.
मित्रांनो, पुण्यात पाथ फाईंडर मधे हे मिळेल का ?
मणिकर्णिका
मणिकर्णिका · गुरुवार, 20 Jan 2011 - 02:23
सुधीर,
जरुर वाचा.
सार्थ, वंशवृक्ष माझी वाचायची राह्यली आहेत. कशी आहेत?
आनंदयात्री
डिसेंबरमध्ये 'पाथफाईंडर'मध्ये बघितले होते. मिळून जाईल.
नाहीच मिळाले तर मेहतांकडे नक्कीच मिळेल.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · गुरुवार, 20 Jan 2011 - 07:24
कादंबरीत एकांगीपणा किंवा प्रचार असायला ती सत्यघटनेवर आधारित असण्याची गरज नाही. 'प्रातिनिधिक' आणि 'भैरप्पांच्या दृष्टिकोनातून' हे शब्द महत्त्वाचे आहेत. या धाग्याबाहेरही कादंबरी वाचलेले काहीजण आढळले. त्यांच्या कादंबरीविषयीच्या वक्तव्यावरूनही असं वाटलं की कादंबरीतली पात्रांची योजना ही विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणारी आहे. म्हणून हे प्रश्न विचारावेसे वाटले. माझ्या सर्व प्रश्नांना तुमचं उत्तर 'नाही' असं आहे. त्यामुळे कादंबरीतली तशी (म्हणजे ज्यांयोगे माझ्या प्रश्नांचं उत्तर 'नाही' असं देता येईल) काही पात्रं, त्यांचे विचार, त्या अनुषंगाने कादंबरीत घडणार्या घटना यांविषयी थोडं अधिक सांगितलंत तर मदत होईल. धन्यवाद.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 22 Jan 2011 - 19:54
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा असं होऊ नये, असं म्हणतात. झालं असल्यास माफी असावी.
फसलेली कादंबरी. म्हणजे कादंबरी हा फॉर्म म्हणून फसलेले पुस्तक असा अर्थ नाही या म्हणण्याचा. कथावस्तू म्हणून फसलेली रचना (त्यामुळे फसलेली कादंबरी).
वर काहींनी कादंबरीतील व्यक्तिरेखा पक्क्या बांधलेल्या आहेत, असं म्हटलं आहे. मी असहमत. सुरवात रझिया - लक्ष्मीपासून. नंतर क्रम आमीरचा. पुढे लक्ष्मीचे वडील, मग प्रोफेसर शास्त्री, लक्ष्मी-रझिया आणि आमीरचा मुलगा नाझीर. इतिहासाच्या संदर्भात काही मांडणी करू पाहणाऱ्या कादंबरीतील या प्रमुख व्यक्तीरेखा भुसभुशीत आहेत. ना इकडच्या ना तिकडच्या. आधुनिकतेचा दावा करणारे दोघे धर्मांतराचा निर्णयही घेऊ शकतात काय, गांधीवादी म्हणून चितारलेले व्यक्तीमत्व केवळ इस्लामी राजवटीसंदर्भातील संशोधनातूनच पुढे येते काय, पद्मविभूषण पदापर्यंत पोचलेला प्रोफेसर कुणालाही न कळता केवळ भंपकपणा किंवा लबाडी करून मोठा होतो काय, पेट्रोलियममध्ये एम.एस. केलेला मुलगा अल्लाने सौदीच्या भूमीत पेट्रोल ठेवले म्हणतो काय किंवा असेच सारे काही... तद्दन भुसभुशीत व्यक्तीरेखा. या व्यक्तिरेखांमधील हे कच्चे दुवे आहेत तरी का, हे काही कादंबरीतून कधीही कळत नाही. निदान त्यातून या अशा पोकळ व्यक्तीरेखा आहेत हे तरी कळले असते. पण ते कळत नाही. म्हणून त्या भुसभुशीत ठरतात आणि त्यांच्यासंदर्भात जे घडते ते पटत नाही. म्हणजे, जे घडतेय ते वास्तववादी नसेल हेही ठीक; पण त्यातील कल्पनारम्यताही इतकी भुसभुशीत होतेय की नाहीच पटत. म्हणून कथानक, म्हणूनच कादंबरी फसते.
व्यक्तिरेखा कशा असाव्यात हा लेखकाच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. पण त्याविषयी वाचक म्हणून माझी मते असू शकतात. पण...
इस्लामी धर्मांधता हा लिहिण्याचा विषय जरूर आहे. तो कांदबरीसारख्या (कादंबरीच कशाला, नाटक लिहा, कथा लिहा, एकांकिका लिहा) आकृतीबंधातून मांडला जावा हा अधिकार आहे. त्याच अधिकारानं एखादी व्यक्ती हिंदू धर्मांधता याविषयी लिहू शकतेच. तेच ख्रिश्चन आणि ज्यू यांच्याबाबत होईल. भैरप्पांनी कादंबरीत गुंतवलेले संदर्भ (दीडशे की एकशेपस्तीस?) असा एक मुद्दा वर आला आहे. जे संदर्भ आले आहेत, ते या कादंबरीच्या संहितेचा भाग म्हणून आले आहेत. कादंबरीच्या संहितेच्या पलीकडे त्यांची मांडणी केलेली नाही. इथेच खेळी आहे. संहितेत मांडलेले संदर्भ हे भैरप्पांनी कादंबरीत उभ्या केलेल्या कादंबरीलेखकाने, म्हणजेच लक्ष्मी-रझियाने (किंवा तिच्या पित्याने), गोळा करून मांडलेले संदर्भ आहेत. ते तिनं केलेल्या वाचनाच्या एकचतुर्थांश असल्याचा कादंबरीतच दावा आहे आणि ती यादी पुढेही पूर्ण होत राहणार आहे, असे कादंबरी सांगते आणि इथेच विषय संपतो! त्या व्यक्तीरेखेच्या अभ्यासाची ती मर्यादा, किंवा तितकीच तिची व्याप्ती, आहे. त्यामुळे त्या तशा मर्यादित अभ्यासातून आलेल्या कथावस्तूला उगा महत्त्व देण्याचे कारण नाही. हे संदर्भ असे मांडण्यामागे खेळी काय आहे? असे संदर्भ कादंबरीत पेरून दिले की त्यातील कथावस्तूचे वजन वाढते? नाही. संदर्भ दिले, यादी केली याने भारावून जाण्याचे कारण नाही. इस्लामी राजवटींच्यासंदर्भात अभ्यासाचा दावा करताना दीडशे ही संख्या दर्यामें खसखस आहे (हे या चतुर लेखकाला ठाऊक असावे, म्हणूनच तर या यादीला एकूण वाचनाच्या एकचतुर्थांश म्हणून ठेवले असावे). पण त्या संख्येचाही प्रभाव पडू शकतो. तितक्यांपर्यंत आपल्याला जे पोचवायचे आहे ते पोचवता येतेच, हे भैरप्पांना नक्कीच ठाऊक आहे. 'प्रोफेसर शास्त्री' चितारताना ती माहिती त्यांच्याकडे असावी हे दिसतेच. हे सारे संदर्भ कादंबरीच्या संहितेबाहेर ठेवले असते तर? तर मात्र, बरीच टीका खुद्द भैरप्पांच्या क्षमतेसंदर्भातही करता येते (कारण मणिकर्णिका यांनी या लेखात या संदर्भांच्या गुणवत्तेविषयी मांडलेले काही मुद्देही आहेतच). आत्ता ती संधी नाही. आता या लेखाच्या लेखिका म्हणतात, तशी पळवाट आहे. एरवी, ते संदर्भ कादंबरीच्या बाहेर आले असते तर भैरप्पांना कादंबरी लिहिण्याची गरज नव्हती. थेट इतिहासाच्या मांडणीच्या स्वरूपात त्यांना ते लिहिता आलं असतंच. पण मग तिथं त्या पद्धतीच्या छाननीलाही सामोरं जावं लागलं असतं. आता तो धोका तितका नाही.
भैरप्पा लेखक म्हणून मोठे आहेत, ही प्रतिमा 'वंशवृक्ष'मुळं निर्माण झाली होती. 'सार्थ', 'पर्व', 'काठ'मध्येही तसं जाणवलं होतं (तिथंही काही गोष्टी अशा इकडं-तिकडं असल्या तरी त्या इतक्या कमी आहेत की राहून गेल्या प्रकारात मोडता येतात). पण...
भैरप्पांबाबत फसणाऱ्या व्यक्तिरेखेचा अनुभव 'मंद्र'च्या वेळेसही आला होता. या दोन्ही अनुभवांतून असं वाटतंय की हा माणूस आता का लिहितोय? त्यानं थांबावं. 'वंशवृक्ष'च पुरेसं आहे. पण...
या कादंबरीतच पाच-सात ठिकाणी एका अर्थानं येणारं एक वाक्य मुद्दाम लिहितो (सर्वांनी कादंबरी वाचा, पण ही आपापली मते असल्याने),
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 11 Mar 2011 - 04:46
पुस्तक वाचलं आणि स्पष्ट सांगायचं तर नाही आवडलं. लेखकाला जी माहिती आहे ती देण्यासाठी जर कादंबरीचा फॉर्म पकडायचा आहे तर ती एक कांदंबरीच असली पाहिजे असे वाटते. इथे मात्र स्वतःकडे असलेली माहिती वाचकांसमोर ठेवताना त्याभोवती कथेचे 'आवरण' घातले आहे. माहिती कथेला पोषक/सहज अशी न येता बर्याचदा कृत्रिमपणे येते.
एकाही पात्राने माझ्या मनाची तरी पकड घेतली नाही. एखाद्या पात्राची योजना करावी लागणे, प्रत्येक प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्त्व 'योजणे' या तोलून मापून उभ्या केलेल्या कथेला तितपतच जीव आहे
दुसरे असे की पुस्तक एकांगी तर वाटलेच पण त्याच बरोबर जरा रटाळ/एकसुरी, काहिश्या बालिश मतांनी बनलेले वाटले.
तिसरे असे की हे पुस्तक काहि नवी माहिती देते का? तर नाही! याहून कितीतर सुंदर शब्दांमधे हीच माहिती, अत्यंत चित्रदर्शी वर्णन सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' मधे कित्येक दशके आधीच आलेली आहे. (म्हणजे यांनी पुन्हा लिहु नये असे नाही पण मुखपृष्ठावर भारतीय डा विंची कोड म्हणताना नवी/धक्कादायक माहिती नसावी याची गंमत वाटाली)
असो.. लेखकाच्या वाचन व्यप्तीमुळे त्यांचा आदर वाटतोच तरीही ही कादंबरी मात्र ज्या आशेने उघडली होती (त्यामुळे की काय कोण जाणे) त्यापुढे अगदीच फसलेली वाटली
वल्ली
वल्ली · Fri, 11 Mar 2011 - 05:06 · उत्तर
ॠ चे म्हणणे पटले नाही.
रजियाचे (लक्ष्मी) पात्र तर निश्चितच पकड घेते. शिवाय कुठलेही पात्र विनाप्रयोजन आहे असेही वाटत नाही. अगदी शेवटी प्रो. शास्त्रींचा अकारण विरोध तसा पटत नाही.
एकांगी तसे म्हटले तर आहे. धर्माधांचा अत्याचार, धर्मांतर, मुर्तीभंजन तर आपल्यालाही लहानपणापासून माहित आहेच. नव्हे तो तर आपण प्रत्यक्ष बघितलेला आहे. कोकणात जवळपास संपूर्ण रायगड जिल्ह्यात धर्मांतराचे परीणाम दिसतात. तिकडच्याच काही काही गावात तर शिवाजीमहाराजांचा जयजयकार करायला आजही भीती वाटते. विजयनगरच्या हंपीत, वेरूळच्या कैलास लेण्यांत, काशी, मथुरा येथे, अगदी पुण्याजवळच्या भुलेश्वरातही मुर्तीभंजन जागोजागी दिसते. मग त्याच अनुषंगाने जर कादंबरी लिहीली तर त्यात वावगे ते काय?
औंरंगजेबाचा धर्मांधपणा तर सर्वज्ञात आहेच.
याच्याशी पूर्णपणे सहमत. कारण ही माहिती आपल्याला आधीपासूनच आहेच. सावरकर आदींनी ते आधीपासून लिहून ठेवले आहेच. आणि 'सहा सोनेरी पाने' आवरण पेक्षाही निश्चितच चांगले आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 14 Mar 2011 - 07:13 · उत्तर
वावगे काहिच नाही. मात्र 'इतिहासावर' आधारीत कादंबरी लिहिताय तिथपर्यंत हा बाज ठिक आहे, मात्र ती ससंदर्भ असल्याने 'अभ्यासपूर्ण' असण्याची हवा निर्माण केली आहे तर इतिहासातील 'हवे तेच' पेक्षा 'हवे तितकेच' उचलणे थोडे गैर वाटते. एखाद्या लेखाने/ कादंबरीने एकांगी असण्यात गैर काहीच नाही/नसते/नसावे, मात्र जेव्हा तुम्ही तीच कादंबरी तथ्याधारीत किंवा 'आवरण' हटवू पहाणारी म्हणताय तर पुढे आलेले चित्र 'संपूर्ण' हवे. दुसरी बाजु इथे प्रकाशातच येत नाही. त्यावेळचे राजकारण कसे होते, मुसमलान राजवटी खाली नसणार्या राज्यांमधे सर्वत्र 'आलबेल' होते का? का तिथेही वेगळ्या प्रकारचे शोषण होते. इतका अत्याचार होत होता तरीही हिंदु जनता तिथेच चिकटून का होती? वगैरेंची उत्तरे मिळत नाहीत , शोधली नाहीत का मुद्दाम वगळली आहेत?
छ. शिवराय भारतासाठी बरेच नवे होते. त्यांचे राज्य-प्रशासन कसे आहे हे भारतात पसरायला अवकाश होता. मात्र इतर हिंदु राज्यांचे काय? हिंदु धर्मातील जातींमुळे चाललेल्या शोषणाचे काय? शिवाय, ज्या जुलमाने मुसलमान झालेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात घ्यायला नकार दिला गेला व अधिक कडवे मुसलमान तयार केले त्यांचे काय?
एक अजेंडा ठेऊन कादंबरी लिहावी मात्र मग ती अभ्यासपूर्ण/'संपूर्ण' सत्य सांगणारी म्हणू नये असे वाटते :)
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Fri, 11 Mar 2011 - 07:30
बुकगंगाच्या वेबसाईटवरून स्वा. सावरकरांचे सहा सोनेरी पाने डाऊनलोड केले... फ्री...........