परीक्षण
बाकी शून्य - कमलेश वालावरकर
-- हे लेखन ह्यापुर्वी मायबोली.कॉम ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झाले असून लेखन व त्यावरील अधिक चर्चा http://www.maayboli.com/node/13668 ह्या दुव्यावर वाचता येईल---
मराठीत मी वाचलेल्या काही सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक पुस्तक. पहिल्याच पानापासून जबरदस्त पकड घेत हे पुस्तक एका विशिष्ट वेगाने जयदीप सरदेसाई नावाच्या इंजिनिअर-पत्रकार-सेल्समन-दारुडा-वेश्याबाज माणसाची कहाणी मांडते. कदाचित ह्या पुस्तकातले ज्युनिअर कॉलेज, आजूबाजूचा परिसर, इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिकची अंबड एमआयडीसी आणि तिथली एक बंगाली लोकांची वरचश्मा असलेली कंपनी अश्या अनेक गोष्टी समान असल्याने हे पुस्तक मला थेटच भावले. त्यामुळे कदाचित बाकी काही गोष्टींकडे कानाडोळा झाला असेल. पण त्यामुळे हे पुस्तक भिडले पण खूप जोरात.
अनेक लोकं करतात म्हणुन सुरु केलेले ग्रॅज्युएशनचे शिक्षण, जन्मतःच असलेली टोकाची संवेदनशीलता पण त्याच तोडीच्या सर्जनशीलतेचा अभाव आणि त्यामुळे होणारे विचित्र कॉकटेल - ज्यात व्यक्ति ना धड चांगली कलाकार (निर्मिती करणारा/री) होउ शकते ना धड सामान्य (नॉर्मल) माणूस.. आणि मग एक विचित्र घुसमट.. त्यात जोडीला उभे राहणारे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न.. कादंबरीच्या नायकाला अधून मधून पडणारे प्रश्न, त्याचे संस्कृती-समाज-व्यक्ति ह्याबाबतची वक्तव्य हे सगळे ह्या मानसिकतेच्या-जडणीच्या(मोल्ड) व्यक्तिचे अतिशय सही सही वर्णन करते. अप्रतिम.
मी आहे म्हणुन जग आहे, माझ्या दृष्टीकोनातून जगाचे अस्तित्व माझ्या जन्माबरोबर सुरु होते आणि मृत्युबरोबर संपते, ज्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण जास्त तो समाज अधिक प्रगत, जातीव्यवथा, आरक्षणाचे समर्थन, जीवनाच्या निरर्थकपणामुळे येणारी टोकाची निराशा ह्या सगळ्याच गोष्टी फार प्रभावीपणे मांडलेल्या आहेत.
अनेकांना हे पुस्तक शिवराळ वाटू शकेल, भडक वाटू शकेल. पण मला स्वतःला तसे एकदाही वाटले नाही. माझ्या कॉलेजात जवळपास इतपत शिव्या अश्या प्रकारच्या सगळ्या मुलांच्या तोंडी असत. स्त्रीदेहाबद्दलचे आकर्षण, मुला-मुलींच्यात असलेले अनैसर्गिक अंतर, लैंगिक अतृप्ती आणि त्यातून येणारी विकृती (मग कधी ती मुलींना वर-खाली अधाशी नजरेने बघण्यातून व्यक्त होते तर दुसर्या टोकाला शारिरीक अत्याचारातून) हे देखील तसेच्या तसे आलेले आहे.
लेखक कुठेही कश्याचेही समर्थन करत नाही. नायकाच्या मनःस्थितीचे उदात्तीकरण तर मुळीच करत नाही. पण म्हणुन त्या मनःस्थितीचे, ती मनःस्थिती उद्भवण्यास कारणीभूत घटकांना (समाज, जन्मानेच आलेले गुण इत्यादी) बाइज्जत-बरी पण करत नाही.
बाकी शून्य वाचताना कोसलाची आठवण येणे आणि म्हणुनच तुलना होणे अपरिहार्य. कोसला भाषिक सौंदर्याच्या निकषावर नक्कीच उजवी आहे. भाषेला गोडवा आहे. बाकी शून्य अधिक रखरखीत आहे, लेखक म्हणुन देखील नेमाडे वालावलकरांपेक्षा उजवे आहेत. पण कोसला ही फार थोड्या कालाचे वर्णन करते व मुख्यतः विद्यार्थीदशेतच मर्यादित राहते तर बाकी शून्यचा विस्तार बराच मोठा आहे. दोन्ही कादंबर्यातले ठसठशीत साम्य म्हणजे दोन्ही कादंबर्या निश्कर्षाप्रती पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या अध्यायात फसतात. निरर्थकतेच्या जाणीवेतून आणि समाजापासून विलग झाल्याच्या भुमिकेतून आलेली निराशा आणि तिचे टोकाचे रुप हे तिथेच सोडून न देता त्याला एक अंतिमता देण्याचा प्रयत्न दोन्ही कादंबर्यात फसलेला वाटतो कारण कदाचित ह्याला अंतिमताच नाहिये. बाकी शून्यची अजून एक कमी म्हणजे शेवटी शेवटी ही कादंबरी खर्याखुर्या प्रतलास (रिआलिस्ट) सोडून जुळवून आणलेल्या घटनांच्या मागे जाते (त्याचे उगाचच लोकांना वाटणारा साधू-चमत्कारी होणे, मिशेल बरोबर राहताना हमाली करणे आणि शेवटी देवयानीबरोबर लग्न).
ऑल इन ऑल, ही एक जबरदस्त कलाकृती आहे.
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 6 Jul 2010 - 11:33
श्री. टण्या,पहिलाच प्रतिसाद नकारात्मक काहीसा मिळतोय म्हणून राग मानू नका.. मी ही या पुस्तकाबद्दल आधी खूप वाचले होते.. आणि लोकांची मते दोन्ही टोकाची होती. म्हणून पुस्तक आवर्जून वाचले.. जरी पुस्तक वाचताना पहिल्या काही पानातच त्या शिवराळ भाषेचा कंटाळा आला, तरीही नेटाने पूर्ण केलेच..
पुस्तकातल्या काही गोष्टी बिल्कुल पटल्या नाहीत.. पहिली गोष्ट म्हणजे अतिभडक भाषा.. सतत म्हणजे अगदी लहानपणापासून (५वी म्हणजे पौगंडावस्था नव्हे) अंगावर येणारा सेक्स... आणि सगळ्यात कहर म्हणजे त्याचे पानोपानी येणारे तत्वज्ञान. त्या तवज्ञानात हशील काहीच होत नाही.. बरे, हा एवढा संवेदनशील आहे, तर त्याला इतर कुणाच्या संवेदना कळतात असेही नाही..
देवयानीची व्यक्तिरेखा तर खूपच स्टिरिओटाईपड वाटते.. म्हणजे, श्रीमंत बापाची, त्यात आणखी मिडियामध्ये काम करणारी उत्तर भारतीय मुलगी जशी इतर माध्यमांतून रंगवली गेलीय त्यात नि यात काहीच फरक नाही.. त्यामुळे ती स्वतःहून त्याला आमंत्रण देते अथवा एखाद्या मुलीला पाहून तिच्या अति उठावदार शरीराची वाहवा करते अशा वेगळ्या वर्णनांची गरज नव्हती.. अर्थात हे माझे वैयक्तिक मत..
बाकी शून्यबद्दलची आणखी मते इथे वाचायला मिळतील..
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Wed, 7 Jul 2010 - 09:53
मलाही नाही आवडलं बाकी शून्य.
कोसलाची आठवण येणं अपरिहार्यच. मला कोसला आवडलं ते - तू वर म्हटलं आहेस तसं - त्यातल्या भाषेच्या गोडव्यासाठी मुख्यत्वेकरून. अर्थात बाकी कारणं आहेतच, पण हे मुख्य.
त्या आघाडीवर इथे अंधार आहे, बरं, हा अंधार काही महत्त्वाचं कलात्मक कार्य करतो आहे, असंही नाही.
पुस्तकातनं मिळतं काय, हा प्रश्न फारच बाळबोध आणि 'शुभंकरोति' छापाचा आहे, हे मान्यच आहे. पण या पुस्तकातून धड अस्वस्थताही मिळत नाही, असं माझं मत.
वाचक
वाचक · Wed, 7 Jul 2010 - 12:26
पुस्तक माझ्या सासूबाईनी मला भेट म्हणून दिलेल. बघूनच आकार आवडला, कारण जेवढ जास्त जाड पुस्तक तेवढ मला जास्त वाचायला मिळणार (आणि बायको पुस्तकाला हात लावायची शक्यता बरीच कमी :) ) म्हणून मी खुश होतो. (लहानपणी लायब्ररीतून 'खूप पाने' एवढ्या एकाच निकषावर पुस्तके घरी आणलेली आठवतात.)
मला तरी शेवटची ८०-९० पाने सोडता आवडले पुस्तक, एकदम ग्रिपिंग आहे. शिवाय सुरुवातीचे धाडसी उल्लेख वगैरे वाचून 'अरे वा, मराठीत पण आले का हे सगळे?' आनंद झाला होता :)
सविस्तर पुन्हा कधी तरी.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 7 Jul 2010 - 15:35
बाकी शून्य उत्साहाने वाचलं. कमलेशचा आणि माझा एक समानधर्मी मित्र आहे, त्याच्या शिफारशीने. विकत घेऊन वाचलं. सुरवातीला मी या लेखनानं प्रभावित झालो होतो. कादंबरी अस्तित्त्ववादी आहे का वगैरे मुद्यांवर चर्चा झाली होती. कमलेशशीही एकदा भेट झाली आणि चर्चा झाली होती. माझे एक मत आजही कायम आहे - हे इतकं लिहून ठेवल्यानंतर कमलेश यापुढं आणखी काय लिहिणार आहे? बहुदा हे अवघड काम होईल त्याच्यालेखी.
मकचा मुद्दा थोडा अवाजवी आणि थोडा रास्त आहे. थोडा अवाजवी अशासाठी की,
हे टण्या यांचे म्हणणे बरोबर आहे. पण हाच मुद्दा थोडा रास्त यासाठी की, कादंबरीभर त्याची व्याप्ती इतकी आहे की जणू तेच फक्त जगणे ठरावे. इतर काही गोष्टी येतात त्या जणू केवळ अनुषंगीक. जगणे तसे नसते. हां, आता मी असेच जगलो असे जर म्हणायचे ठरवले तर हे पुस्तक वास्तववादीच म्हणावे लागेल. पण मग त्यातील अनुषंगीक गोष्टींसाठी ते महत्त्वाचे ठरणार नाही. महत्त्वाचे ठरेल ते फक्त या विशिष्ट जगण्यासाठी आणि तशा परिस्थितीत या पुस्तकाऐवजी वात्सायन वाचलेला उत्तम.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Fri, 9 Jul 2010 - 03:22
या कादंबरीवर अन्यत्र झालेले समीक्षण व चर्चा : http://www.misalpav.com/node/1906
या चर्चेतला माझा प्रतिसाद :
..... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे.
तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ?
काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे.
माझे आक्षेप :
आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.
वेदश्री
वेदश्री · Fri, 9 Jul 2010 - 07:38
ह्म्म्म.. कोणी हे पुस्तक वाचायपुरते देऊ शकेल का? जसे होते तस्से अगदी सुखरूप परत मिळेल याची खात्री बाळगावी.