परीक्षण
बरेच काही उगवून आलेले...
एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता – आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.
संदिप खरेची कवितांची पुस्तके हजारोंनी खपत असतांना ह्या पुस्तकाचे नावही पुस्तकांच्या दुकानदारांना महित नव्हते हे बघून अतिशय दु:ख झाले, एक पुस्तकासाठी १० दुकाने पालथी घातली तेंव्हा ‘साधना’ मध्ये एकदाचे ‘युरेका’ झाले. अर्थात दुःख झाले, पण आश्चर्य नाही वाटले – संदिप खरे, सलिल कुलकर्णी presentation (सादरीकरण? बापरे! :) ) मुळे लक्षात राहतात शिवाय त्यांच्या कविताही सहज-सोप्या आणि लोकप्रिय. असो! मुद्दा संदिप खरेच्या कवितांचा नाही (त्यावर लिहिणारे बरेच आहेत) – द. भा. धामणस्कर ह्यांच्या कवितांचा आहे. ह्या कविता एका वेगळ्याच अभिरुचीच्या आणि जाणिवेच्या आहेत – धामणस्कर ह्यांच्यावर जे. कृष्णमुर्ती ह्यांच्या विचारांचा प्रभाव आहे; त्यांच्या कवितांमध्ये आस्था व समंजसपणा प्रसन्नतेने दरवळतांना जाणवतात. त्यांच्या कवितांमधे दुःख असले तरी वैफल्य, उद्वेग नाही; एक सहज, समजुतदार स्वीकार जाणवतो. त्यांच्या कविता ह्या expression (अविष्कार, उस्फुर्त प्रतिक्रिया ह्या अर्थानी) पेक्षा reflection (चिंतन) च्या पातळीवर आहेत असे वाटते. आपल्या अनुभवांकडे, भावनांकडे सह्रद्यतेने पण दूरस्थपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता धामणस्करांकडे आहे. त्यातूनच हे ‘बरेच काही उगवून आलेले’ बहरून आले आहे.
त्या पुस्तकातील माझ्या काही आवडत्या कविता -
साधना
तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही…
कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही…
परिपक्व झाडे
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…
समुद्राविषयी
१.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.
२.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने किनार्यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात जमणारे पाणी मागे
खेचणार्या निग्रहाला ओहोटी?
अजून काही ओळी ‘नक्षत्रे’ कवितेतील…
नक्षत्रे
……..
४.
रात्रभर,
सगळे तारे माझेच असल्यासारखा मी
त्यांच्याकडे पाहत राहिलोय;
उजाडताना, मीही आकाशासारखाच
पुन्हा कफल्ल्क होणार आहे…
आणि ही शेवटची एक अफलातून कविता; ‘सार’ म्हणावे ह्या योग्यतेची. सगळ्या आयुष्याच्या प्रवासाकडे, त्यातल्या अनुभवांकडे, त्यातून उमगलेल्या आणि झिरपलेल्या ज्ञानाकडे बघण्याचा एक विलक्षण दृष्टीकोन!
बरेच काही उगवून आलेले
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले….
अजूनही कित्येक मोती विखुरले आहेत या पुस्तकात. पुस्तकातील सगळ्याच कविता इथे देण्याचा उद्देश नाही; मला अतिशय आवडलेल्या ह्या कवितांच्या पुस्तकाची ओळख करून द्यावी असे वाटले, एवढेच. आवर्जून विकत घेऊन वाचावे असे हे – बरेच काही उगवून आलेले!
अभिप्राय
मनिष
मनिष · Mon, 10 May 2010 - 07:55
नंदनने ह्या पुस्तकावर इतरत्र खूप छान लिहिले आहे, त्याने ते इथे डकवावे ही विनंती!
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 10 May 2010 - 08:09
मनिष परत एकदा उत्तम कविता संग्रहाची ओळख करुन दिलीत..
आपण दिलेल्या कवितेतल्या ओळी तर खुप आवडल्या..
तसे कवितेतले काही कळत नाही तरीही नक्की मिळवुन वाचलेच पाहिजे असे वाटते..
@ नंदन :- तुझ्या प्रतिसादाची वाट पहात आहे.
नंदन
नंदन · Mon, 10 May 2010 - 09:10
लेख. अगदी साधेपणाने, अनाग्रही शैलीत लिहिलेल्या कविता हे ह्या कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यातही झाडांबद्दल त्यांनी अगदी समरसून लिहिलं आहे. मुलांना वाढवताना येणार्या अनुभवांपासून ते अगदी लहानग्या नातवापर्यंत ही आवड पोचलेली पाहून झालेला आनंद व्यक्त करताना.
--- अगदी, अगदी.
मनिषने म्हटल्याप्रंमाणे एका जुन्या लेखातील ह्या संग्रहाबद्दलचा हा काही भाग, पुनरावृत्तीचा दोष पत्करून -
जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे -
...तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून...
मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात - तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच...
स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.
दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.
'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच -
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही...
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...
कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.
कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी
कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी
पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ
भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे
व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ
उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -
कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात
अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...
shweta joshi
shweta joshi · Fri, 14 May 2010 - 16:08 · उत्तर
very nice i am sorry i dont know how to write in marathi but pls try to understand i am a regular reader of marathi books i love reading and this poets are simply suparb i dont have words to explain my feelings but from bottom of my heart i m saying thanks for uploading such nice poems with meaning full words i like the poem samudra very nice i love ocean but i didnt think of this side of ocean very true as well toching also thanks again
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 10 May 2010 - 10:27
हा घागाही असाच फुलत राहो...
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Wed, 12 May 2010 - 17:28
कधी तरी नकळत सुटून गेलेल्या कवितेची तुम्हा सर्वांमुळे पुन्हा भेट होते आहे..
मनापासून आनंद होतोय.. धन्यवाद..
अप्रतिम ' साधना ' ! वा !
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 14 May 2010 - 18:51
नंदनच्या लिहिण्यानंतर लायब्ररीत शोधले होते.. पण मिळाले नाहि
आता विकत घेईन म्हणतो
ह्या छान लेखाद्वारे पुन्हा एकदा ह्या पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्द्ल आभार
आनंदयात्री
आनंदयात्री · Tue, 13 Jul 2010 - 20:42
इतका नितांतसुंदर कवितासंग्रहाचा परिचय नजरेतुन कसा सुटला असावे बरे असे राहुन राहुन वाटतेय.
पुन्हा पुन्हा वाचुन आस्वाद घेतोय, सध्या प्रतिसादासाठी शब्द नाहीत !!
धन्यवाद मनिष !
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Wed, 14 Jul 2010 - 09:10
आमेन....
मनिष
मनिष · Wed, 14 Jul 2010 - 15:09 · उत्तर
हे कशासाठी?
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 15 Jul 2010 - 06:52 · उत्तर
इतक्या सुरेख पुस्तकाला इतकी सुरेख-उत्कट दाद मिळाली... आता अजून शब्द कशाला खर्चायचे? म्हणून!
यशोधरा
यशोधरा · Sun, 18 Jul 2010 - 13:04
सुरेख!