परीक्षण
चाकोरीबाहेरचं-’कोबाल्ट ब्लू’
सचिन कुंडलकर हे नाव प्रायोगिक नाट्यकर्मींना सुपरिचित आणि ’गंध’मुळे जगाच्या काना-कोपरयात पोहोचलेलं. लघुपट-’द बाथ’, छोट्याशा सुट्टीत, चेतन दातारच्या ’१, माधवबाग’चं रुपांतर ’ड्रीम्स ऑफ़ तालिम’, ’पूर्णविराम’ अशा अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. पण त्याने लेखनातून केलेल्या प्रयोगाबद्दल लोकं अजून अनभिज्ञ आहेत असं दिसतं. सचिन कुंडलकरची २००६ मध्ये प्रकाशित झालेली ’कोबाल्ट ब्लू’ ही अशीच एक अत्यंत छोटेखानी अशी ९० पानांची कादंबरी आहे. आजच्या इंस्टंट जमान्यात इंस्टंटली वाचून होईल अशी. प्रकाशन गॄह- मौज. गौरी देशपांडे, चि.त्र्यं, पु.ल यासारख्या दिग्गजांची पुस्तकं प्रकाशित केलेल्या ’मौज’ प्रकाशनाने ’कोबाल्ट ब्लू’ प्रकाशित करावे यात कादंबरी दर्जेदार असणार असं वाचकांनी समजायला हरकत नसावी.
कोबाल्ट ब्लू आहे तनय-अनुजा या भावंडांची आणि त्यांच्या घराच्या मनोरावजा खोलीत राहायला आलेल्या मुलाची (आपण याला ’नि’ म्हणूयात). आणि मग या तिघांच्या अनुषंगाने आलेल्या त्यांच्या कुटुंबांची, दोस्तांची, वैयक्तिक लढ्यांची सुद्धा.
या ’नि’च्या प्रेमात तनय-अनुजा आपापल्या पातळीवरुन पडतात.
तनयला आपल्या वयांच्या मुलांप्रमाणे मुली न आवडता मुलं आवडतात. कळायला लागल्यापासून तनयला आपल्यातलं वेगळेपण छळतंय आणि त्यातून तो एकाकी होत गेलाय. या एकाकीपणातून, आपण आहोत तसे स्वीकारलं जाण्याच्या डेस्परेशनमधून मैत्रीचा हात पुढे करणारया ’नि’मध्ये आणि त्याच्यात चटकन मैत्रीचे, मग पुढे शारिरीक-मानसिक बंध तयार होतात. आणि मग पुढे त्याच्या कित्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रेमात पडत ’नि’मय होऊन जातो. तर अनुजाला भावतो तो ’नि’चा सहजभाव, कसलेही प्रश्न न विचारणारं-कसल्याही बदल्यात कुठलीच उत्तरं न मागणारं त्याचं तुटक वेगळेपण.
तनय आणि ’नि’ यांनी वरच्या खोलीत यांनी घालवलेले दिवस, रात्रींमधून ’नि’च्या स्वभावातल्या बारीक बारीक बारकाव्यांना तोलत-जोखत आपण दोघे कधीतरी एकत्र राहायला लागूच अशी स्वप्नं तनय बघतो आहे तर अनुजाला त्याचा बेफ़िकीरपणा, कलंदरपणा आवडलाय. पण या दोन्ही भावंडांना एकमेकाच्या मनोव्यापारांची कल्पनाच नाहीये. आणि त्याचमुळे अनुजा ’नि’बरोबर निघून जाते तेव्हा "आपल्याला कधीच कसं कळलं नाही?" हया धक्क्याने खचलेल्या तनयचं फ़सवले गेल्यासारखं वाटणं जेन्युईन वाटतं. पुढे ’नि’ अनुजालाही एकटंच टाकून निघून जातो, अनुजा विचित्र मन:स्थितीत परत घरी येते तेव्हा तिच्याही बाबतीत ’नि’ने तेच केलं जे आपल्या बाबतीत केलं हे जाणवून आपल्याला कळल्यासारखा वाटणारा ’नि’ आपल्याला मुळात तेव्हढासा कळला नव्हता हे तनयला कळतं.
अनुजा आणि तनय मग आपापल्या कुवतीनुसार ’काय चुकलं असावं?’ (त्यांचं-’नि’चं नाही. एव्हढं सगळं होऊनही तनय काय आणि अनुजा काय, थेट ’नि’ला दोष देताना आढळतच नाहीत.), ’काय सुटून गेलं असावं?’ याचा भूतकाळात डोकावून मागोवा घ्यायचा प्रयत्न करतात, आपल्यापुरता उत्तरं मिळवतात, जुनीच नाती नव्याने कळल्यासारखी वाटून त्यांचा क्वचित आधारही घेतात. अनुजाला फ़क्त ’नि’बरोबर दिवसाचे अखंड चोवीस तास घालवून मिळवायचा आनंद, किंवा तनयचं ’नि’वरचं प्रेम हे तनय-अनुजाच्या घरचे जरासुद्धा समजून घेतील अशी अपेक्षा नसते. विस्कटलेल्या मन:स्थितीत घरी परतलेल्या अनुजाला मानसोपचारतज्ञाचे उपचार सुरु असताना कुठेही बभ्रा होऊ नये, झाल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये याकरता मावशीच्या घरी ठेवले जाते तेव्हाही अनुजाच्या "गॅरेजमध्ये गाडी न्यावी तसं मला ठिकठाक करुन इथून घेऊन जाणार." या उद्गारांनी तनय-अनुजाच्या सोवळ्यात बांधून ठेवलेल्या लोणच्याच्या छानशा बरणीसारख्या कुटुंबाविषयी पूर्ण कल्पना आपल्याला तोपर्यंत येऊन चुकलेली असते. पण कोणी दखल घेवो ना न घेवो- आयुष्य तर चालू राहणारच असतं-मग ते आता जरा एकटं जगून बघूयात म्हणून नंतर तनय-अनुजा आपापले मार्ग निवडून चालती होतात.
या कादंबरीतलं तनय-अनुजाचं निवेदन थेट आहे, प्रामाणिक आहे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता आलेलं आहे. तनय विमनस्क मन:स्थितीत असताना आलेल्या निवेदनात त्याच्या डोक्यात काहीकाही विचार-अतिप्रिय प्रसंगांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यातून प्राथमिक शारिरिक गुंतवणूकीला पार करुन आलेली तनयची भावनिक आणि मानसिक गुंतवणूक खूप खोलवरुन आल्याचे जाणवते.
पण ’नि’?
या दोघांच्याही निवेदनातून वजा करुन तो उरतोच आहे. दाट धुक्याच्या पलीकडे, अस्पष्ट, धूसर, ज्याच्यापर्यंत पोहोचायला डोक्यापयंत कळ आणणारया ठोकरा खातच पोहोचायला हवं. कोणत्याही चाकोरीत स्व्त:ला अडकवून न घेणारा, कॅन्व्हासवर ओढलेल्या निळ्या रंगाच्या एकच फ़टकारयात (ज्याने या पुस्तकाचं मुखपृष्ठ सजलंय) गराड्यातलं उकटेपण सगळं असूनही काहीच नसल्याचं चितारणारा, आपली स्पेस हक्काने मागून घेणारा ’नि’. ’नि’ला खरंच प्रिय असणारया दोन व्यक्तींना सोडून तो का निघून जातो, त्यांना मनावेगळं करु शकत नसताना? तो गुंतलेला असतोही आणि नसतोही- हे कसे काय, त्याचं बायसेक्शुअल असणं हे जाणून घ्यायला ’नि’च्या मानसिकतेत डोकावण्याची ओढ लागून राहते.
अनेकदा आपण नात्याला अपेक्षांनी, गृहितकांनी भाग द्यायचा प्रयत्न करतो. बाकी शून्य आली की मग सर्वकाही आपल्या ताब्यात, आपल्या मनासारखं होतंय असा छानछान फ़ील येतो. पण बाकीच जास्त उरत असेल तर मग असुरक्षित वाटायला लागतं, अनिश्चिततता येते, घुटमळ वाढते. पण या अनिश्चितेतही ’मी’, ’माझं’, ’कायमचं’ हा विचार मनाबाहेर ढकलता येत नाही.अतिउत्साहात म्हणा किंवा प्रेमाबरोबर आपल्याही नकळत ओघाने येणारया गृहीत धरण्याच्या सवयीमुळे बरयाचदा आपण जे शोधतोय, आपल्याला जे हवंय ते समोरच्याला वेगळ्या पद्धतीने हवं असू शकतं, याचा विचार आपल्याकडून होत नाही. समोरच्याला बांधून घातल्यासारखं वाटू शकतं. कोणा एकाच्या आनंदात दुसरयाची फ़रफ़ट होऊ शकते.मग सहजीवनातल्या ’सह’ ला फ़ार केविलवाणा अर्थ उरतो. ’नि’ला कदाचित तनय आणि अनुजा बरोबर राहताना असंच वाटलं असावं. पण ’नि’ तनय अणि अनुजाच्या निवेदनातून जेव्हढा उमटतोय, मूर्त होतोय तेवढ्यावरुनच अंदाज बांधायला लागतात.
स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या नात्यांच्या खूप वेगवेगळ्या त~हा असतात, वेगवेगळे कंगोरे असतात. डिक्शनरीत बघून सांगीतल्यासारखे एकेक बारकावे उकलून नाही दाखवता येत-कितीही दाखवायचे म्हटले तरी. आणि दोन मनुष्यमात्रांमधलं प्रेम हे इतक्या प्रतीचं असतं की चाकोरीतून येणारया प्रेमाच्या फ़ूटपट्टीत त्याला नाही मोजता येणार. ते पुरुषाने स्त्रीवरच केलं पाहिजे किंवा स्त्रीने पुरुषावर अशा ठोकळेबाज चौकटीत त्याला बसवायचा प्रयत्न केला की ते अनाकलनीय रहायचीच शक्यता जास्त. या कादंबरीचे नायक भलेही गे, बायसेक्शुअल असतील पण त्यांचं तसं असणं ही पूर्ण कादंबरीची ओळख ठरत नाही किंवा फ़क्त त्यावरुन कादंबरी वाचणं-न वाचणं ठरणं योग्य ठरत नाही. त्यामुळे या पुस्तकाची संभावना सरसकट ’Queer Literature’मध्ये करून या पुस्तकाच्या वाटेला न जाणे हा या पुस्तकावर शुद्ध अन्याय आहे. २ जुलै, २००९ नंतरही जर आपल्या विचारसरणीत थोडाफ़ार बदल व्हायची शक्यता नसेल तर याहून मोठे दुर्दैव ते काय.
राहता राहिलं पुस्तकाचं शीर्षक- कोबाल्ट ब्लू. का?
शुद्ध निळा- त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ नसते. जशी त्यात काळ्या-पांढरयाची भेसळ होते तसा तो होतो कोबाल्ट ब्लू! प्रशियन ब्लू, रॉयल ब्लू या आपल्या प्रतिष्ठीत भावंडांमध्ये काहीशा उपेक्षित राहिलेल्या या रंगाला प्रतिष्ठा मिळवून दिली व्हिन्सेंट व्हॅन गॉगने.
शुद्धतेच्या बाबतीत परिपूर्ण नसला तरी कोबाल्ट ब्लू अपूर्णत्वातच किती परिपूर्ण वाटतो, अलगरित्या डिफ़ाईन होतो, स्वतंत्र स्पेस निर्माण करतो. पण हे सर्व असूनही त्या शुद्ध निळ्याशी नाळ जोडून असतो.
तनय आणि अनुजा आपल्या परिने परिपूर्ण नाती उभी करु पाहतात. पण एकाच माणसाकडून नाकारली गेलेली ही माणसं आपापली आयुष्य़ गोळा करतात, सावरुन जगू पाहतात. पण हे करताना ती त्याचं अस्तित्व नाकारत नाहीत. आपण आज जे आहोत त्यात त्याचाही वाटा आहेच हे प्रांजळपणे मान्य करुन आपापल्या वाटा चालायला लागतात, त्याच्या निळ्याशार अस्तित्वाचा ठसा मनात वागवतच.
म्हणून कोबाल्ट ब्लू!
अभिप्राय
सागर
सागर · गुरुवार, 3 Feb 2011 - 18:54
मणिकर्णिका,
तुला शतशः धन्यवाद.
मी शक्यतो स्वतः वाचल्यावरच माझे मत ठरवतो, पण जशी प्रत्येकाची स्वतःची एक टेस्ट असते त्याप्रमाणेच माझ्या टेस्ट मध्ये समलैंगिगता या विषयाचे वावडे आहेच. पण त्या विषयावरची ही कादंबरी असल्यामुळे मी ही कादंबरी वाचत नव्हतो. तुझा लेख वाचून माझ्या मनावरचे मळभ दूर झाले.
आता हे पुस्तक मी नक्की वाचणार आहे.
आताच फ्लिपकार्टवर ऑर्डर दिली आहे.
नक्की वाचेन हे पुस्तक आता मी.
कोबाल्ट ब्लू वर सविस्तर लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :)
आनंदयात्री
आनंदयात्री · Fri, 4 Feb 2011 - 02:21
नि पुढे कुठे जातो काय असे काही वर्णन आहे का ? कथावस्तुत गुंतायला झाले.
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Fri, 4 Feb 2011 - 05:30 · उत्तर
यात्री, या कादंबरीचा प्रवास तनय आणि अनुजाच्या कथनापासून सुरू होतो आणि त्यांच्या आयुष्यात ते पुढे कसे जातात तिथे संपतो.
काही वर्षांपूर्वी मिपावर मी आणि मेघना भुस्कुटेने थोडंफार याच पुस्तकाविषयी लिहीलं होतं त्याची आठवण झाली.
पुस्तकाची ओळख आणि 'कोबाल्ट ब्लू'चे स्पष्टीकरण आवडले. वर दिलेल्या लिंकमधल्या चर्चेत हा प्रश्न विचारला गेला होता आणि कोणालाही त्याचं उत्तर समजलं नसावं. Queer Literature संदर्भातलं स्पष्टीकरणही पटण्यासारखं.
अवांतरः मी हे पुस्तक एकाच बैठकीत संपवलं होतं. असं करायला नको होतं असं थोड्या वेळाने वाटायला लागलं.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 4 Feb 2011 - 13:16 · उत्तर
अदिती,
मी तो पूर्ण धागा वाचलाय. कितीकिती भरकटून सुद्धा त्यातून घेण्यासारखे बरेच मुद्दे होते. बरीच मोठी चर्चा मग त्यातून तू दिलेला परीचय सुद्धा वाचलाय.
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · Fri, 4 Feb 2011 - 09:50
गेलेल्या माणसाला दोष न देणं हा मला कादंबरीचा एक गुण वाटतो. कादंबरीचा आशय हा गौरी देशपांड्यांच्या साहित्याच्या जवळ जाणारा आहे असं मला कादंबरी वाचून वाटलं होतं. मी ज्याला 'नागर तरुणाईच्या संवेदना' म्हणतो त्यात 'नातं टिकलं तर आनंद आहे, ते नाही टिकलं तर दु:खही आहे, पण उगाच टिकवून धरण्याच्या अट्टहासापेक्षा सरळ ब्रेक-अप झालेला बरा' हे कुठेतरी (पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक मोकळेपणानं) मान्य आहे. त्यामुळे हा गेलेल्या माणसावर दोषारोप करण्याचा प्रकार दिसत नाही असं वाटतं.
मला स्वतःला कादंबरीचा घाट रोचक वाटला होता. पहिला भाग भावाची डायरी आहे, तर दुसरा भाग बहिणीची डायरी आहे. एकाच व्यक्तीच्या ते दोघंही प्रेमात आहेत/होते, पण दोघांच्या जाणिवा वेगळ्या आहेत त्यामुळे त्या व्यक्तीविषयी वेगवेगळी परिप्रेक्ष्यं मिळत जातात. प्रत्यक्ष ती व्यक्ती मात्र कादंबरीत नाही. तिचा अभाव, तिच्याबद्दलच्या (व्यक्तिसापेक्ष) आठवणी यांतून आपल्याला फक्त काही अंदाज येऊ शकतो. म्हणजे 'राशोमॉन'सारखं, वास्तव नक्की काय आहे ते कळणार नाहीच आहे हे गृहित आहे.
'राशोमॉन'शी संबंधित अजून एक मुद्दा जाताजाता: या धाग्यावर आणि मिपावरच्या धाग्यावरही 'निवेदनात काही गोष्टींची पुनरावृत्ती होते' असे उल्लेख आहेत. माझ्या मते ते जाणीवपूर्वक आहे. कारण दरम्यान घडलेल्या गोष्टींच्या पश्चात आणि त्यामुळे वेगळं परिप्रेक्ष्य लक्षात आल्यानंतर मग पूर्वीचं काहीतरी वेगळ्या प्रकारे जाणवू/कळू लागतं अशातला तो प्रकार आहे.
दुसरी गंमत म्हणजे त्या अनुपस्थित व्यक्तीमुळे भाऊ-बहीण दोघंही कमालीचे समृध्द झालेले आहेत. त्यांच्या सरळमार्गी, एकरेषीय मध्यमवर्गीय आयुष्यात कशाचातरी प्रचंड अभाव आहे याची दोघांनाही प्रकर्षानं जाणीव करून देणारी व्यक्ती एकच असणं आणि तिच्याशी (कदाचित त्यामुळेच) झालेल्या जवळीकीमुळे दोघा भावंडांना आपापले जगण्याचे मार्ग दिसू लागण्याच्या शक्यता निर्माण होणं हे रोचक आहे. यामुळे इथे अनुपस्थित व्यक्ती ही एक कॅटालिस्ट होती असं वाटतं. आणि त्यामुळेच तो या दोघांच्याही आयुष्यातून दूर जाणं हे अपरिहार्यदेखील वाटतं. कारण आपल्याला समृध्द करणार्या कशाचा तरी (किंवा कोणाचा तरी) शोध त्यालासुद्धा असणार हे साहजिक आहे.
लैंगिकता: गेलेला 'तो' बायसेक्शुअल होता का? की त्यानं भावंडांपैकी एका कुणाला तरी फसवलं? की स्वतःलाच फसवलं? ही कादंबरी समलैंगिकतेविषयी आहे का? माझ्या मते हे प्रश्न गौण आहेत. अनुपस्थित व्यक्ती कलंदर, संवेदनशील आणि मुख्य म्हणजे आयुष्यात समोर येईल त्याला खुल्या दिलानं सामोरी जाणारी अशी आहे. त्यामुळेच ती या दोघा मध्यममार्गी चाकोरीतल्या भावंडांना भावते आणि समृद्ध करते. स्नेहसंबंध एका विशिष्ट पातळीपुढे आल्यानंतरची शारिरीक जवळीक (स्नेह्याला हवी असेल तर, अर्थात) असा माणूस सहजपणे घेऊ शकेल असं वाटतं. त्याचा संबंध त्याच्या लैंगिकतेशी नाही (पण भावंडांच्या कदाचित आहे). एवढं आणि इतकं साधं ते आहे.
जाताजाता:
साहित्यप्रेमींनी शक्यतो अशी वर्तुळं स्वतःभोवती आखून घेऊ नयेत असं म्हणेन, पण आग्रह अर्थातच नाही.
सागर
सागर · Fri, 4 Feb 2011 - 10:48 · उत्तर
साहित्यप्रेमींनी शक्यतो अशी वर्तुळं स्वतःभोवती आखून घेऊ नयेत असं म्हणेन, पण आग्रह अर्थातच नाही
सहमत आहे. तसा मी शक्यतो वाचनासाठी विषयाचे बंधन ठेवत नाही कधीच.
पण का कोणास जाणे जेव्हा जेव्हा हे पुस्तक हातात घेतले तेव्हा तेव्हा वाचायची इच्छा झाली नव्हती.
आता माझे मत बदलले आहे. मिळाले की वाचेनच.
या निमित्ताने मला माझेच अवलोकन करता आले. :)
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 4 Feb 2011 - 13:17 · उत्तर
आता बदललेल्या दॄष्टीकोनातून तुला ही कादंबरी कशी वाटली हे इथे कळवायला विसरु नकोस आणि इतरांना सांगायलाही.
सागर
सागर · Fri, 4 Feb 2011 - 13:37 · उत्तर
मणि,
नक्की हे पुस्तक प्राधान्य देऊन वाचेन. सोमवारी किंवा मंगळवारी हातात येईनच.
शक्यतो पुढच्या आठवड्यातच वाचून पूर्ण करेन.
वाचल्यावर माझे मत सांगेनच. :)
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 4 Feb 2011 - 13:10 · उत्तर
चि.जं,
तुमचं विवेचन सुरेख. बेहद्द आवडलं. माझ्याकडून थोडंसं.
'काही निवेदनांची पुनरावृत्ती'बद्दल-
तुम्ही ज्या प्रकारे इंटरप्रीट केलंय तो प्रकार, किवा मला जाणवला तो 'प्रिय' आठवणी मनात पुन्हा पुन्हा घोळवत बसण्याचा/ किंवा 'काही तरी सुटले का?' हा विचार करताना उलट-सुलट तपासण्याकरता तो विचार पुनपुन्हा करायचा प्रकार, किंवा मेघना-आदितीने मिसळपाववर याबद्दल केला असेल तो वेगळा विचार, पण पुनरावॄत्ती आहे हे खरं! असा प्रकार याआधी मी कुठल्या पुस्तकात पाहिला नव्हता.
'नि'च्या बायसेक्शुआलिटीला मध्ये घुसडण्याचा आधी माझा बिलकुल हेतू नव्हता, त्याच्याकडून जे होईल ते सहजच झाले असावे असे मलाही वाटले होते-मग त्याच्या लहानपणी त्याच्या मावशीच्या नवरयाने त्याच्यावर केलेल्या जबरदस्तीचा उल्लेख कादंबरीत का झाला असावा? काहीतरी दूरगामी परीणाम असतीलच ना? 'चुरगळलेलं सर्टीफिकेट', 'तापलेली पायरी' यातून 'नि'ला वाटणारा कडवटपणा तनयच्या निवेदनातूनसुद्धा आलेला आहे. या बायसेक्शुआलिटीची मुळं या लहानपणीचे जे काच पडलेत त्यामध्ये असतील असं मला वाटतं. तुमचं काय मत?
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 4 Feb 2011 - 11:20
मणिकर्णिका,
अनेक आभार! इतक्या सुंदर परिचयाबद्दल तर आभार आहेतच, त्याच बरोबर सारे काही सांगुनही बरेच समजायचे बाकी आहे हा फिल जागा ठेवल्याबद्दलही आभार.
परिचय चांगला आहे. या पुस्तकाबद्दल उत्तरोत्तर उत्सूकता वाढली आहे. बुकगंगा वरून लगेच मागवले आहे.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 4 Feb 2011 - 13:19 · उत्तर
तू चावी मारली होतीस 'दशकातील दहा'वर! मग म्हटलं, काय हरकत आहे लिहायला. घे! लिहीलं. :) :)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 4 Feb 2011 - 13:40 · उत्तर
मणकर्णिका उत्तम परिचय...
खुप दिवसांपासुन वाचायचे आहे पण राहुन जातय... आता पुढच्या खरेदीत नक्की घेउन वाचणार..
ॠ अशीच चावी मारत जा म्हणजे सगळे जण पुस्तकांबद्दल सविस्तर लिहितील आणि आपल्याला काय चांगले वाचायचे राहुन गेले आहे ते कळेल.
नंदन
नंदन · Fri, 4 Feb 2011 - 21:06
अतिशय उत्तम परिचय! चिंजंचा प्रतिसादही सुरेख
-- सहमत आहे.
आरागॉर्न
आरागॉर्न · Sat, 5 Feb 2011 - 09:01
सुरेख परिचयाबद्दल अनेक आभार. चिंजंचा प्रतिसादही उत्तम.
पुस्तक वाचायच्या यादीत टाकले आहे.