परीक्षण

ध्यासपंथ जाणावा

परीक्षण मजकूर

लोकसत्ताच्या `चतुरंग' पुरवणीत प्रसिद्ध झालेले `ध्यासपंथ' पुस्तकाचे परीक्षण!

ध्यासपंथ जाणावा...
शुभदा चौकर , शनिवार, २४ एप्रिल २०१०
‘चतुरंग’ पुरवणीत यापूर्वी सामाजिक पर्यटन (सोशल टुरिझम) विषयावर लेख प्रसिध्द झाले आहेत. तेव्हापासून अनेक वाचक सुटीत निव्वळ लोकप्रिय पर्यटनस्थळांना न जाता, अशा काही सामाजिक प्रकल्पांना भेटी दिल्याचे कळवतात. समाजाला उपकारक किंवा पथदर्शक प्रकल्प साकार करणाऱ्या निर्मात्यांना भेट देण्याचे समाधान अलौकिक असते, प्रेरणादायी ठरते, असा अनेकांचा अनुभव आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी ज्यांच्याबद्दल वेळोवेळी वाचले आहे, अशा काही व्यक्ती आणि संस्थांबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी ऐसपैस गप्पांची मैफल जमवून केलेले बहारदार लेखन ‘ध्यासपंथ’ पुस्तकाच्या रूपात वाचायला मिळाले. नऊ ध्यासपंथींना निवांत भेटून, त्यांचा प्रकल्प आस्थेने पाहून, त्यांचे काम नीट समजून घेऊन गुणे यांनी हे पुस्तक साकारले आहे. प्रत्येक लेखात तो नवनिर्माता आणि त्याने फुलवलेली बाग यांची सुंदर शब्दचित्रे आहेत. ती वाचून आपण भारावले जातो. जगात स्वार्थभावाची डबकी ठिकठिकाणी दिसत असली, तरी माणुसकीचे झरेही जिवंत आहेत, हा दिलासा मिळतो. मळलेल्या वाटेवर प्रवास करत लौकीक यशाच्या शिखराकडे प्रवास करणाऱ्यांचा ट्रॅफिक जाम चुकवून स्वत:ची नवी पाऊलवाट शोधणाऱ्या ध्यासपंथीची ओळख करून घ्यायला हवी, त्यांचे प्रकल्प पाहायला हवे- असे मनोमन वाटून जाते.
या पुस्तकात भटक्या पारधी समाजाला उपेक्षेच्या शापातून मुक्त करू पाहणाऱ्या गिरीश प्रभुणेंबद्दल वाचायला मिळते. एकीकडे या समाजाचा पध्दतशीर अभ्यास करून ग्रंथ साकारणे आणि दुसरीकडे यमगरवाडीत व चिंचवडला प्रकल्प साकारून जिवंत प्रकल्प उभा करणे, असे दुहेरी काम करणाऱ्या प्रभुणे यांची या समाजाशी असलेली बांधिलकी आणि स्वीकार-क्षमता जाणून थक्क व्हायला होते. बांबूच्या वस्तूंचा उद्योग उभारता उभारता, त्या बांबूच्या ताकदीतून मेळघाटातील आदिवासींच्या उत्कर्षांचा मार्ग आखणाऱ्या सुनील व निरुपमा देशपांडे यांच्याबद्दल वाचायला मिळते. त्यांनी ‘संपूर्ण बांबू’द्वारे त्या आदीम लोकांचे जीवन फुलवले आहे. शेतीतज्ज्ञांचे व शेतक ऱ्यांचे आकर्षण ठरलेल्या कोल्हापूरच्या शेखर धर्माधिकारी यांनी स्वयंप्रेरित विकासाची चळवळ कशी चालवली आहे, याचे मॉडेल या पुस्तकातून समोर येते.
काहीतरी अगतिकतेतून किंवा अजाणपणातून स्वत:चे घर सोडून, मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या आणि बिनछत्राचे पोरके आयुष्य जगणाऱ्या लहानग्या पोरांना आपले म्हणत, त्यांना मार्गी लावणारा विजय जाधव म्हणजे देवदूतच. विजय सातत्याने अशा मुलांना कवेत घेतोय, त्यांचे मनपरिवर्तन घडवून आणतोय आणि त्या पोरक्या पाखरांच्या घरटय़ाचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या कुशीत परत पाठवतोय. शंकरच्या प्रातिनिधिक गोष्टीतून गुणे यांना हे काम क थेच्या रुपात लिहिले आहे.
मुंबईच्या शेजारातील जव्हार हा हिरव्या डोंगरांनी वेढलेला प्रदेश. पण तेथील पाडय़ांवरच्या आदिवासींपर्यंत मुंबईच्या लखलखाटाचा प्रकाशकिरणही पोहोचत नाही. त्यांना प्रगतीची पाऊलवाट दाखवणाऱ्या सुनंदा पटवर्धन यांच्या प्रगती प्रतिष्ठानच्या प्रगतीचा आलेख यात रेखाटला आहे.
लैंगिक बाजारात भरडल्या जाणाऱ्या महिलांना मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या, त्यांच्या मुलांना चांगलं जीवनाची सावली देणारे ‘स्नेहालय’ पाहून लेखक थक्क होतो. उच्चविद्याविभुषित गिरीश कुलकर्णींना करीअरच्या कितीतरी वाटा पायघडय़ा पसरून सज्ज असताना त्यांनी ही अनवट वाट चोखाळणे, त्यावर स्नेहशीलतेचा सडा शिंपून, उपेक्षितांसाठी घर बांधणे- हे ध्यासाने प्रेरित झालेला प्रेषितच करू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावात स्वयंपूर्ण शेती आणि त्यानिमित्ताने स्थानिक शेतक ऱ्यांचा बहुअंगी विकास घडवून आणणारे डॉ. प्रसाद व डॉ. हर्षदा देवधर यांच्याबद्दल ‘भगीरथाचे पुत्र’ या प्रकरणात सविस्तरपणे वाचायला मिळते. दूरदृष्टी आणि कल्पकतेच्या बळावर एक तरुण जोडपे एखाद्या पंचक्रोशीचा कायापालट कसा साधू शकते, हे वाचून थक्क व्हायला होते.
ठाण्यात ‘पर्यावरण दक्षता मंच’ नावाची चळवळ उभारणारे डॉ. विद्याधर वालावलकर. जैववैद्यक कचऱ्याची विल्हेवाट, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, ठाण्यातील खाडीची देखभाल, पर्यावरण शाळा, नैसर्गिक घटकांच्या साह्याने दिवाळी, रंगपंचमी हे सण साजरे करणे, रक्षाबंदनाला वृक्षबंधन- अशा एकात एक अनेक कल्पना साकारत काम विस्तारत नेणाऱ्या या चळवळीला आता हजारो हात जोडले गेले आहेत.
लातूरला कचरा व्यवस्थापनाचा नवा पॅटर्न उभारणाऱ्या संजय कांबळे यांचे कामही अलौकीक आहे.
दिनेश गुणे हे एक मनस्वी पत्रकार. पत्रकारांना सतत नवे, वेगळे अनुभव घेण्याची संधी मिळत असते. पण त्यातही वेगळया, विलक्षण व्यक्तिमत्त्वांचा वेध घोण्याची आस गुणे यांना आहे. मुंबईत गेली २२-२५ वर्षे पत्रकारितेत वावरणारे गुणे सासत्याने अशा व्यक्तिरेखांचा शोध घेत असतात. त्यातूनच अशा काही ध्यासपंथींशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या ध्यासातून साकारलेली मानवतेची मंदिरे गुणे यांनी मनापासून पाहिली. त्यातील काही जणांबद्दल त्यांनी वृत्तपत्रात आस्थेने लेख लिहिले. त्या लेखांना अर्थातच शब्दसंख्येचे बंधन होते. ‘परममित्र’ प्रकाशनाशी पुस्तकाबद्दल ठरल्यावर गुणे यांनी त्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे काम यावर पुनश्च विस्तृत लेखन केले. पुस्तकात या ध्यासपंथींच्या, त्यांच्या प्रकल्पांच्या छायाचित्रांची उणीव राहिली आहे.
हा ‘ध्यासपंथ’ जरूर वाचावा, जमल्यास त्या प्रकल्पांना भेट द्यावी. उन्हाळी सुटीत सामाजिक पर्यटनाचा असा एखादा अनुभव आपली सुटी समृध्द कराणारा ठरू शकेल.. वर्षभरासाठी पुरेल इतकी प्रेरणा देऊन जाईल.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=64642:2010-04-23-12-15-56&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194#JOSC_TOP

अभिप्राय

मनिष

मनिष · गुरुवार, 24 Jun 2010 - 08:10

स्वतः लेखकाने आपल्या पुस्तकाचा परिचय देण्याची ही इथली पहिलीच वेळ. पुस्तकाचा विषय आणि परीचय दोन्हीही आवडले, नक्कीच घेऊन वाचेन! :)

वेदश्री

वेदश्री · Wed, 30 Jun 2010 - 13:08

झक्कास! दिनेशकाका, तुमचे येथे स्वागत आहे. पुस्तकपरीचय आवडला आणि आता ते घ्यावेसेदेखील वाटते आहे. पुण्यात कुठे मिळू शकेल सांगाल का?

पुस्तकपरीचय तुमच्याच शब्दात वाचायला जास्त आवडला असता असे वाटते. त्यानिमित्ताने या फिराफिरीत जमलेली तुमची अनुभवशिदोरी आम्हालाही चाखता आली असती जरा (पुस्तकात लिहिलेय त्यापेक्षा थोडी वेगळी) म्हणून. :)

पुपुलेशु. (पुढील पुस्तकलेखनास शुभेच्छा)

वेदश्री

वेदश्री · Wed, 30 Jun 2010 - 13:12 · उत्तर

तुमच्या स्वाक्षरीसहितचे पुस्तक मिळणार असल्याने आता ते माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणार असलेले ३-४ दिवसदेखील दम धरवत नाहीये. शिजेतो निघतो पण निवेतो दम धरवत नाही म्हणतात तसेच काहीसे! :)

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · गुरुवार, 24 Jun 2010 - 10:20

पुस्तक परिचय वाचला आवडला... मिळवुन वाचायला प्रयत्न करेनच
याच सोबत दिनेशजी या पुस्तक निर्माणात तुम्हाला आलेले अनुभव तसेच पुस्तक निर्माणाची कथा एका वेगळ्या लेखात लिहुन ईथे आमच्या सारख्या वाचकासमोर मांडली तर आम्हाला आवाडेलच :-)

आनंदयात्री

आनंदयात्री · Fri, 25 Jun 2010 - 18:09 · उत्तर

हेच म्हणतो दिनेश साहेब.
आपले अनुभव लिहाच. आपल्याला हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा कशी मिळाली, हा प्रवास कसा पुर्ण होत गेला हे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

धन्यवाद.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · गुरुवार, 24 Jun 2010 - 13:24

वेदश्री आणि निखिलशी सहमत.. दिनेशजींनी इथे स्वतःच्याच शब्दांत लिहिलेलंही वाचायला आवडेल.. अर्थातच पुस्तकही नक्कीच मिळवून वाचेन

माया ज्ञानेश

माया ज्ञानेश · Mon, 28 Jun 2010 - 21:37

नक्की वाचणार हे पुस्तक.
पुस्तक परिचय आवडला.