परीक्षण
एक अपरिचित मेहीऽको
मीना प्रभु! पलिकडल्या वर्षीच्या साहित्यसंमेलनातील चिखलफेकीच्या मानकरी! (हल्ली हीच ओळख झाली आहे) पण ह्या ओळखीच्याहीपुढे जाऊन बोलतात ती त्यांची पुस्तके. पारंपरिक प्रवासवर्णने या प्रकारात कदाचित त्यांची पुस्तके बसणार नाहित. पण म्हणून ते केवळ रुक्ष दस्तऐवजीकरण असते असे मुळीच नाहि. मीनाप्रभु एखाद्या देशाची केवळ भौगोलिक सफर न घडवता तेथील आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि ऐतिहासिक सफरही घडवुन आणतात. यांच्या लेखनाचे अजुन एक वैषिट्य म्हणजे त्यांचे बर्याचदा एकटीने अपरिचित देशात भटकणे.
आमच्या ऑफिसमधे मेक्सिकोतून परत आलेला एक सहकर्मचारी सांगत होता "अरे जाम बोअर झालो तिथे, बाहेर पडायची सोय नाहि. जो तो बाहेर एकटा पडू नको सांगतो.. आणि पडलास तरी पब्लिक ट्रांसपोर्टने फिरू नकोस ट्याक्सी कर" आणि नेमके योगायोगाने त्याच वेळी बरेच दिवस वाट पाहिलेले मेक्सिकोपर्व हातात पडले. नुकत्याच मेक्सिकोत जाऊन आलेल्या मित्राच्या वर दिलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मीनाताईंचे एकटीने मक्सिकोत फिरणे हे अप्रूपच होते.
मेहीऽको हा मेक्सिकोचा स्थानिक उच्चार. इथे एकेकाळी देश मेहीऽको, भाषा मेहीऽको आणि लोकही मेहीऽको होते. आस्तेक, माया ह्या प्रसिद्ध संस्कृती इथे नांदल्याच त्याच बरोबर ओल्मेक, तोल्तेक, सापोतेक, मिह्तेक संस्कृतींच्या खूणाही जागोजागी पसरल्या आहेत. त्याच बरोबर त्यांच्यावर राज्य करणार्या स्पॅनिशांनी देशातील सांस्कृतिक आणि धार्मिक मोठी उलथापालथ घडवली आहे. मेक्सिकोला स्वतःचा असा कमीत कमी पाच हजार वर्षांचा जूना इतिहास आहे (त्या आधीचा इतिहास कथा रूपात असला तरी दृश्य जोड नाहि). इतक्या मोठ्या कालखंडाचा रोचक इतिहास आपण लेखिकेबरोबर बघु लागतो आणि त्यात नकळत गुरफटत जातो.
स्वतःची इतकी समृद्ध परंपरा असतानाही लेखिकेबरोबरच आपल्यालाही देशातील जबरदस्त ख्रिस्तीप्रभावाबद्द्ल कुतुहल वाटतं. आणि मग समोर येतात चर्चने तेथील जनतेला कॅथलिक बनविण्यासाठी केलेल्या युक्त्या. कडव्या धार्मिक आस्तेकांना, आम्लेकांना, माया लोकांना वेगवेगळ्या युक्त्या वापरून त्यांनी ख्रिस्ताच्या पंखाखाली आणलं आहे. अर्थातच नरबळी वगैरेंसारख्या घातक प्रथा बंद करण्याचे, तसेच सुंदर कलोनिअल वस्त्या घडविण्याचे श्रेयही स्पॅनिशांना लेखिका खुल्या मनाने देते. याबरोबरच, पुस्तकात लेखिकेने मेक्सिकोचे अंतरंग नीटपणे उलगडले आहेत. मेक्सिकोतील शहरे, इतिहास आपल्याला भेटू लागतो. तेथील संस्कृती, जबरदस्त धर्मिक पगडा, मोकळी माणसे भेटू लागतात. त्याच बरोबर मेक्सिकोचा केवळ थक्क करणारा इतिहासही लेखिका एकेक पदर उलगडावा तसा अलगद उलगडून समोर मांडत जाते. मेक्सिच्या शहरांप्रमाणेच तेथील खेळ, खाद्यपदार्थही आपण अनुभवतो. लेखिकेबरोबर बस, लोकलमधून फिरतो. ५००० वर्षांपुर्वीच्या पिरॅमिडच्या आत गेल्यावर तेथील मुळ रहिवाशांच्या आठवणीने लेखिकेला आलेला शहारा आपल्याही अंगावर काटा फुलवतो.
मला सबंध पुस्तकच आवडलं त्याच बरोबर तेथील लोकांच्या स्वतःच्या देशाच्या इतिहासाबद्द्लच अज्ञान चिंतेत टाकणारं होतं . लेखिका एकदा एका बसवाल्याबरोबर गप्पा मारत असते तेव्हा ती त्यालाच मेक्सीकोच्या इतिहासाबद्द्ल सांगते. आपले गाव सोडून कधीही बाहेर न गेलेला तो ड्रायव्हर थक्क होतो. आपल्या अस्ताला गेलेल्या साम्राज्याबद्द्ल त्यालाहि वाचकाप्रमाणेच मनोमन वाईट वाटतं. यानंतर लेखिका समारोपात एक्कूणच सामाजिक परिस्थितीवर रोचक भाष्य करते. मला समारोपातील एका परिच्छेदाने तर आत खोलवर कुठेतरी टोचलं तो असा:
"बाकीच्या जगासारखा अमेरिकेचा पगडा आजच्या मेक्सिकोमधे वाढतो आहे. विशेषतः करोडोंची उलथापालथ करणारी सिने आणि फॅशन इंडस्ट्री अमेरिकेवर बेतली जात आहे. जाणत्या मेक्सिकनांना ते आवडत नाहि.
अमेरिकन टी.व्ही. तून येणारे सांस्कृतिक बदल मात्र ते थांबवू शकत नाहित. राजकीय आक्रमणाविरूद्ध ठामपणे लढता येतं. पण सीमारेषाच नसलेलं हे सामाजिक आक्रमण विषासारखं आतून भिनतं पूर्वी स्पॅनिशांपासून सुटका करून घेणं जमलं; पण आता नव्या अमेरिकन स्वप्नांची भुतं डोक्यावर बसली आहेत. या आचारविचारांची भुरळ थांबवायची कशी? घरोघरी येणारा या महापुराला बंधाला घालायचा कसा? अमेरिकेवर अर्थिक दृष्त्या अवलंबून असल्याने तिच्याशी झगडताही येत नाहि अश्या विचित्र कात्रीत मेक्सिकन्स अडकले आहेत. आम्हा भारतीयांप्रमाणेच तेही नव्या जुन्याच्या संभ्रमात बुडलेले आहेत."
बाकी थोडक्यात सांगायचं तर इतिहास, धर्म आणि प्रगती याबरोबर चाललेला मेक्सिकन माणूस हाच या पुस्तकाचा नायक आहे. हे रंगीत सचित्र पुस्तक खाली ठेवताना मेक्सिकोचं दर्शन व्हावं अशी इच्छा उफाळून न आली तरच नवल!
अभिप्राय
मनिष
मनिष · Mon, 5 Jul 2010 - 08:42
ऋषिकेशने म्हटल्याप्रमणेच मीना प्रभूंची पुस्तके आवडतात ती प्रवासवर्णनांपलीकडे त्य देशाची सर्वार्थाने सविस्तर ओळख करून देतात म्हनून. त्यांची सर्वच पुस्तके वाचून, संग्रही ठेवण्याची इच्छा आहे, बघुया कधी जमतेय! :)
हे बरोबर आहे का? माझा इतिहास (आणि भुगोलही) कच्चाच आहे, पण पिरॅमिड आणि मेक्सिकोत??
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 5 Jul 2010 - 09:30 · उत्तर
मेक्सिकोत माया तसेच आल्मेक संस्कृतीतील लोकांनी पिरॅमिडस बांधले होते. त्यातील इजिप्तपेक्षा वेगळ्या धाणीचे पिरॅमिडस जंगलात लुप्त झाले होते.. अनेक संशोधकांनी त्या घन्दाट अरण्यात ठिय्या देऊन ही पिरॅमिडे /मंदिरे शोधून काढली आहेत (त्याच्या कहाण्याही रोचक आहेत)
बाकी विविध संस्कृतींनी उभारलेले पिरॅमिड्स मेक्सिकोतच काय उभ्या जगभर पसरले आहेत.
पुस्तक वाचेपर्यंत चिचेन इत्साच्या पिरॅमिडबद्दलची भूक ह्या ताकावर भागवता यावी ;)
भोचक
भोचक · Mon, 5 Jul 2010 - 08:45
ऋषी, मीना प्रभूंची पुस्तकं मलाही आवडतात. मेक्सिको पर्वही जाम आवडलेलं. एक तर वेगळ्या प्रदेशाविषयीची माहिती त्यातून मिळाली होती. परिचयही पुस्तकाच्या स्मृती जागृत करून देणारा.
स्वाती दिनेश
स्वाती दिनेश · Mon, 5 Jul 2010 - 10:05
पुस्तकाची ओळख फार छान करुन दिली आहेस ऋ,
स्वाती
अदिती
अदिती · Mon, 5 Jul 2010 - 10:14
हे पुस्तक मी वाचलं आहे. 'पृथ्वीवर माणूस उपराच' मुळे मेक्सिकोची थोडीफार ओळख झाली होती. स्पॅनिश भाषेचं जुजबी ज्ञान मिळवताना कोस्टात्रिकासारख्या लॅटिन अमेरिकन देशातल्या लोकांशी परिचय झाला होता. त्यामुळे मेक्सिकोबद्दल एक गूढरम्य आकर्षण नाही म्हटलं तरी मनात होतंच.
मेक्सिकोपर्व वाचताना हे सगळे संदर्भ तर गवसलेच पण त्याहूनही जास्त काही गवसलं. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जातो आहोत असं वाटणारी धावती लेखनशैली बांधून घालणारी वाटली. मेक्सिकोपर्व आणि दक्षिणरंग ही व्यक्तिश: मला आवडलेली मीना प्रभूंची पुस्तकं आहेत. माझं लंडन तर आहेच पण इतर प्रवासवर्णनांमधे ही दोन पुस्तकं खास आहेत. त्यानंतरची (चिनी माती पासून पुढे) पुस्तके मात्र जरा रटाळ किंवा उरकल्यासारखी वाटतात .
ऋ, तुझा परिचय वाचताना हे सगळं पुस्तकच झरकन डोळ्यांसमोरून सरकल्याचा भास झाला. खूपच छान वाट्लं.
लिहीत रहा. असंच दक्षिअरंगाबद्द्लही लिही एकदा.
--अदिती
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 5 Jul 2010 - 10:14
ॠ ओळख उत्तम झाली आहे..
मॅक्सिको बद्दल वाचायलया आवडेलच
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 5 Jul 2010 - 19:40
ह्म्म. आवडीचा विषय असुनही हे पुस्तक अजून वाचलेले नाही.
वर अदिती म्हणते तसे '...उपराच' मुळे रेड इंडियन्स आणि त्यांच्या संस्कृतीविषयी लहानपणापासुनच अपार कुतुहल आहे.
हे पुस्तक घेणे आता टॉप प्रायोरिटी !
नंदन
नंदन · Tue, 6 Jul 2010 - 06:35
पुस्तकपरिचय. ते पिरॅमिड्स पाहण्याची जुनी इच्छा पुन्हा जागी झाली :(. पुस्तक मिळवून वाचेनच.
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Tue, 6 Jul 2010 - 08:01
खूप छान परिचय ऋषि,
माझ्या संग्रहात पण मीना प्रभूंची बहुतेक सर्व पुस्तके आहेत :)
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 6 Jul 2010 - 12:47
मी मीना प्रभूंचे अजून एकही पुस्तक वाचलं नाही याची खरंतर हा लेख नि त्यावरचे प्रतिसाद वाचताना लाज वाटली.. :(
असो.. 'देर आये दुरूस्त आये' वर भिस्त ठेऊन आहे..
पुस्तक जेव्हा वाचेन.. तेव्हा आणखी प्रतिसाद देईनच. :)
वेदश्री
वेदश्री · Tue, 6 Jul 2010 - 16:46
अजून मी वाचली नाही मीना प्रभूंची पुस्तके. तसे प्रवासवर्णन हे क्षेत्रच मला नविन ठरावे पुलंचा अपवाद सोडता. बघेन कधी जमतेय ते ही पुस्तके वाचायला. पुप एकदम फक्कड झालाय, हेवेसांनलगे.
आनंदयात्री
आनंदयात्री · Tue, 6 Jul 2010 - 20:11
>>मीना प्रभु! पलिकडल्या वर्षीच्या साहित्यसंमेलनातील चिखलफेकीच्या मानकरी! (हल्ली हीच ओळख झाली आहे)
हे काय असावे ? याबाबत उत्सुकता लागुन राहिली आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 6 Jul 2010 - 21:16 · उत्तर
हे वाच:
काहि मराठी संस्थळांवरील टोकाची मते - चर्चा
मटातील बातमी
लोकसत्तातले जाहिर पत्र
आनंदयात्री
आनंदयात्री · Tue, 6 Jul 2010 - 21:26 · उत्तर
धन्यवाद.
भाग्यश्री
भाग्यश्री · Sat, 10 Jul 2010 - 21:23
मीना प्रभुंविषयी आदराने बोलायला भितीच वाटेल असं प्रभुद्वेष्टे वातावरण मला मसंवर दिसत असूनही मला तिची पुस्तके आवडतात असं मी सांगीन!
एकतर इतके सर्वांगाने परक्या देशाबद्दल माहिती मिळणे केवळ अशक्य असते, मराठीतून फारच जास्त अशक्य व रंजकतेने त्याहून जास्त! मला तिच्या पुस्तकात येणारा इतिहास भूगोल याचबरोबर तेथील समाजजीवन, अगदी तिथे भेटलेल्या गाईड व ड्रायव्हर्सची वर्णनं वाचणे देखील आवडते. त्याभागाशी कनेक्ट झाल्यासारखे वाटते.
मेक्सिकोपर्व आत्ताच परत ४थ्यांदा वाचायला घेतले आहे. इथे कॅलिफॉर्नियात आल्यापासून ते पुस्तक वाचताना पडलेला फरक म्हणजे काही स्पॅनिश शब्द इतके ओळखीचे वाटतात. कारण इथे सगळी रस्त्यांची नावं स्पॅनिश. माझ्या अगदी आसपास दिसणारी रस्त्या-घरांची नावं, एल कमिनो रिआल, हॅसिएन्दा, पासिओ इत्यादी शब्द नुसते वाचूनच मला इतकी मजा वाटते! :)
मलाही दक्षिणरंग्,मेक्सिकोपर्व, इजिप्तायन ही पुस्तके जास्त आवडातात. चिनीमाती थोडंसं बोअर झाले होते, तर माझे लंडन जास्त पाल्हाळीक वाटले होते( साहजिक आहे, ती तिथेच राहत असल्याने जास्त तपशिलवार लिहीणार) ग्रीकांजली आत्ता भारतात लायब्ररीतून वाचायला आणले होते, परंतू पुरेसा वेळ न देता आल्याने पूर्ण करता आले नाही. रोमराज्य वाचले नाहीये.
काही गोष्टी अर्थातच खटकतात. तुर्कनामा वाचताना तीला खटकलेला हिजाब कितीही बरोबर असला तरी त्याची इतकी नाराजी पानोपानी सांडलेली वाचताना थोडं अडखळल्यासारखे होते. किंवा तोच मुद्दा भाषेबाबत. पण मी ते चालवून घेऊ शकते कारण बाकीची माहिती जास्त इंटरेस्टींग असते .