परीक्षण
एक प्रांजळ आत्मकथन : आय. अझिमॉव्ह
मी सहसा आत्मचरित्रे वाचायचे टाळतो. बहुतेक वेळा त्यात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न असतो, हे विशेषत: चित्रपट अभिनेत्यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते. दुसरे म्हणजे ज्यांच्या आयुष्यात काय काय कसे कसे झाले याबद्दल उत्सुकता वाटावी अशा व्यक्ती फारशा नाहीत. मग मुराकामीचे 'व्हॉट आय टॉक अबाउट व्हेन आय टॉक अबाउट रनिंग' हे पुस्तक वाचले. याला खर्या अर्थाने आत्मचरित्र म्हणता येणार नाही पण मुराकामीने त्याची लेखनप्रक्रिया आणि त्याचे धावणे यातील काहीसा गुंतागुंतीचा संबंध सुरेख प्रकारे उलगडून दाखवला आहे. यावरून एक आडाखा ठरला की निदान लेखकांची आत्मचरित्रे वाचल्यानंतर नुसत्या घडामोडींशिवाय काहीतरी वेगळे हाती यावे.
नुकतेच आयझॅक अझिमॉव्हचे 'आय, अझिमॉव्ह' हे आत्मचरित्र वाचले. यातील पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे कथानकाचा प्रांजळपणा. अझिमॉव्ह कुठेही नम्रता, संकोच न बाळगता जसे आहे तसे वर्णन करतो. या वर्णनात त्याचे गुण आणि दोष दोन्ही येतात. गुण सांगताना तो उगाच कमीपणा घेत नाही आणि दोष सांगताना स्पष्टीकरणही देत नाही. मी सुरूवातीपासूनच वर्गात सर्वात हुषार मुलगा होतो हे सांगितल्यानंतर मी प्रशंसेला हमखास बळी पडतो अशी कबुलीही तो तितक्याच सहजतेने देतो. टाइम आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्टवर येऊनसुद्धा न्यूयॉर्करने आपल्या एकाही पुस्तकाची दखल घेऊ नये याची त्याला खंत वाटते. या सर्वातून एका खर्याखुर्या माणसाचे चित्र उभे राहते आणि पुस्तक संपेपर्यंत हा माणूस आपल्याला आवडून जातो. ज्याप्रमाणे घरातल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीचे दोषही आपण डोळ्याआड करतो तसे काहीसे इथेही होते.
अझिमॉव्हच्या म्हणण्यानुसार त्याच्या आयुष्यात कुठल्याही रोमांचक घटना घडलेल्या नाहीत, गॉसिप वगैरेंचाही प्रश्न नाही. सचोटी, प्रामाणिकपणा यावर आधारलेले एक साधे सरळ आयुष्य. त्यामुळे आपले आत्मचरित्र लोक वाचतील किंवा नाही याबद्दलही त्याला शंका होती. पुस्तक संपल्यावर आपल्यालाही नक्की काय आवडले हे सांगता येत नाही. मात्र पुस्तक संपेपर्यंत खाली ठेवावेसेही वाटत नाही. हे खरे तर अझिमॉव्हचे दुसरे आत्मचरित्र. याआधी त्याचे आणखी एक आत्मचरित्र दोन भागात प्रकाशित झाले आहे. पहिल्या आत्मचरित्रात त्याने सर्व घटना जशा घडल्या तशी त्यांची नोंद केली आहे. याउलट ह्या वेळेस त्याने आपल्या आयुष्याचा आढावा घेत असताना त्याचे विचार, त्याच्या प्रतिक्रिया यांना अधिक महत्त्व दिले आहे आणि त्यांच्या अनुषंगाने घटना जशा येतील तसे त्यांचे वर्णन केले आहे. वाचताना जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे अझिमॉव्हची विपुल शब्दसंपदा. पुस्तक वाचल्यानंतर शंभर-एक नवीन शद्ब हाती लागावेत. (वर्डस्मिथच्या तीन महिन्यांच्या नोंदणीची भरपाई एका पुस्तकात - सौदा वाईट नाही.) याखेरीज शब्द निवडताना त्यांच्या नेमक्या छटा निवडण्याचे कौशल्यही अफलातून.
सायन्स फिक्शनचे पंखे असलेल्या बहुतेक लोकांना अझिमॉव्हचे नाव नवीन नसावे. फाउंडेशन आणि रोबो या दोन सिरीजमुळे त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. रोबोटिक्स हा शद्ब घडवण्याचे श्रेयही अझिमॉव्हला जाते. पण हे फक्त हिमनगाचे टोक आहे. अझिमॉव्हची ग्रंथसंपदा पाहिली तर अवाक व्हायला होते. रायटर्स ब्लॉक नावाचा प्रकार त्याला कधीही शिवला नाही. सायन्स फिक्शन, डिटेक्टीव्ह कथा/कादंबर्या, कथासंग्रह हे तर आहेच. याशिवार गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायन आणि जीवरसायनशास्त्र, जीवशास्त्र यासारख्या विषयांवर निबंध, एनसायक्लोपिडीया, पुस्तके आणि मासिकांतून लेख; साहित्य, विनोद यांवर पुस्तके,लेख. अगदी अझिमॉव्हस गाइड टू शेक्सपिअर आणि अझिमॉव्हस गाइड टू बायबल सुद्धा आहेत. सर्व मिळून त्याच्या नावावर ५१५ पुस्तके आहेत.
सतत लिहीत रहाणे हे अझिमॉव्हचे एकमेव आवडीचे काम होते. त्याने रसायनशास्त्रात पीएचडी केली, नंतर नऊ वर्षे प्राध्यापकाची नोकरीही केली. मग विभागप्रमुखांशी भांडण झाल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. नोकरीत असताना संशोधनाकडे त्याचा फारसा कल नव्हता. या कालावधीतही त्याने लिहीणे थांबवले नाही. त्याला कल्पनाशक्ती श्रीमंत असण्याची देणगी उपजत होती.
एकदा त्याच्या एनसायक्लोपिडीयाची गॅली प्रूफे तपासण्यासाठी आली होती. ती तपासत असताना गॅलक्सी मासिकाच्या संपादकाचा कथा पाठवा म्हणून फोन.
"मी कथा लिहीत बसलो तर हे कोण तपासणार?" त्याचा सवाल.
"दे ना कुणाला तरी तपासायला. तूच केले पाहिजे असे कुठे आहे?" संपादकाचे उत्तर.
अझिमॉव्हने अर्थातच नकार दिला. स्वतःचे सर्व काम कुठल्याही सहाय्यकाची मदत न घेता करायचे असा त्याचा खाक्या होता. फोनवर बोलणे संपले आणि तो स्टडीमध्ये जाण्यासाठी जिना चढू लागला. जिन्याच्या पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत जाताना त्याला एक कल्पना सुचली. गॅली प्रूफ तपासणारा यंत्रमानव असेल तर? लगेच सगळे बाजूला ठेवून त्याने गॅली स्लेव्ह ही कथा लिहीली. (हा प्रसंग या आत्मचरित्रात नाही. त्याच्या रेस्ट ऑफ द रोबोट्स कथासंग्रहात नमूद केला आहे.)
अझिमॉव्हच्या आयुष्यात घडलेल्या रोचक घटना, योगायोग यांनी हे पुस्तक अधिक वाचनीय केले आहे. त्याच्या सर्वाधिक गाजलेल्या फाउंडेशन सीरीजची सुरूवात कशी झाली ही कथाही रोचक आहे. अझिमॉव्हला इतिहासामध्ये पीएचडी करायची होती. ते शक्य झाले नाही पण त्याचा इतिहासामधील रस कायम राहीला. मग त्याच्या वाचनात 'हिस्टरी ऑफ द डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर' हे पुस्तक आले. त्यावरून त्याला गॅलॅक्टीक एम्पायरचा इतिहास लिहीण्याची कल्पना सुचली. फाउंडेशन सीरीजमधील शेवटची कादंबरी 'फॉरवर्ड द फाउंडेशन' लिहीताना अझिमॉव्हला स्वत:चा मृत्यु समोर दिसत होता. या कादंबरीतील नायक हारी सेल्डनला मारताना त्याने एका तर्हेने स्वतःचेच आयुष्य संपवले.
आज २ जानेवारी. अझिमॉव्हचा ९१ वा वाढदिवस. त्याच्याच शब्दात, "मला भविष्य बघायला मिळणार नाही याची खंत नाही. हारी सेल्डनप्रमाणेच मीही जे करू शकलो आहे त्यात मला समाधान आहे. मी बर्याच भविष्यांची कल्पना केली आहे, त्यांचा अभ्यास केला आहे आणि त्यांच्याबद्दल लिहीले आहे - इट्स ऍज इफ आय हॅव्ह बीन देअर."
अभिप्राय
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Sun, 2 Jan 2011 - 07:31
मस्त आहे परिचय. मिळवून वाचीन मी हे.
यशोधरा
यशोधरा · Sun, 2 Jan 2011 - 08:25
मस्त परिचय. वाचेन.
सागर
सागर · Sun, 2 Jan 2011 - 09:00
आरागॉर्न ,
एका छान पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आयझॅक ऑसिमॉव्ह या बुद्धीमान प्राण्याने एवढी ग्रंथसंपदा कशी निर्माण केली याचेच आश्चर्य आहे.
यांचे काही ग्रंथ मी वाचले आहेत. अप्रतिम बुद्धिमत्ता झळकते त्यांच्या लेखनातून.
हे पुस्तक नक्की मिळवून वाचीन :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 3 Jan 2011 - 04:34
अरे वा वाचले पाहिजे! मला आत्मचरीत्र त्यात (फारच आत्मस्तुती / आत्मकेंद्रीतपण वगैरे वगैरे नसला) तर वाचायला आवडतात
दोन महिन्यांपूर्वी वाचलेले "इट्स जस्ट नॉट अबाउट थ बाईक" हे लान्स आर्मस्स्ट्राँगच्या आत्मकथनानंतर मी आत्मचरित्रच न वाचल्याचे जाणवते आहे.. आता काहितरी शोधायला हवे
आरागॉर्न
आरागॉर्न · Mon, 3 Jan 2011 - 05:29
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. :)
रैना
रैना · Tue, 4 Jan 2011 - 12:00
धन्यवाद.
मिहिर
मिहिर · गुरुवार, 13 Jan 2011 - 11:38
मस्त परिचय. नक्की वाचेन.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Fri, 14 Jan 2011 - 00:57
माझं आत्मचरित्रांचं वाचन तेव्हढसं ग्लोबल नाहीये. इट्स नॉट अबाऊट द बाईक, तेहेमिना दुराणी चं 'माय फ्युडल लॉर्ड', फिडेल चे 'माय लाईफ', 'मेमॉयर्स ऑफ गेशा' आणि 'माईन काम्फ'. बस्स!
त्यामुळे पुस्तक परिचय वाचताना मला पहिले मुराकामी गूगल करायला लागला, त्याच्या अनुषंगाने काफ्का, नंतर अ झिमॉव्ह...मग यादी वाढत गेली..नंतर मी नाद सोडला.
आणि हे अभिमानास्पद नक्कीच नाहीये.
तू परिचय तर सुंदर करुन दिलायेस त्यामुळे हे पुस्तक मी विकत घेऊन वाचणारेय.
आपल्याकडच्या लेखकांच्या, प्रसिद्ध व्यक्तींबद्दल इथे लिहीणारे बरेच जण असतील पण या अभारतीय लोकांबद्दल वाचणारे कमी आणि त्यावर लिहीणारे त्याहून कमी.
तू लिहीत जा, मी वाचत राहते, काय? :)
आरागॉर्न
आरागॉर्न · Fri, 14 Jan 2011 - 13:23
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
@मणिकर्णिका : माझेही आत्मचरित्राचे वाचन फारसे नाही. कोण माणूस लिहीतो आहे त्यावरून वाचायचे की नाही ते ठरवतो. सहसा अभिनेते आणि राजकारणी टाळतो. माइन काम्फबद्दल उत्सुकता आहे. त्याबद्दल लिही ना काहीतरी.
लिहीणे-वाचणे दोन्ही दिशांनी व्हावे असे वाटते. :)
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Sun, 16 Jan 2011 - 01:40 · उत्तर
हिटलर म्हटला की आपल्याला पहिल्यांदा आठवतो ऑश्विट्झ, गेस्टापो आठवतात, ’हाईल हिटलर’ करून स्वत:चा जयजयकार करुन घेणारा प्रचंड आत्ममग्न मनुष्य आठवतो. सोनेरी केस आणि निळे डोळे असलेल्या माणसांचेच जग असण्याच्या कल्पनेने पछाडलेला माणसाचं ’खलनायक’पण आठवतं. पण हे सर्व वजा करुनही हिटलर बराच काही होता.
या पुस्तकाचा परिचय Herculean Task आहे, मला दिसलेला हिटलर मी समर्थ शब्दात आणू शकेन याची माझी मलाच खात्री नाही. त्यामुळे ते वेडगळ धाडस मी अद्याप केलेले नाही.
पुढे मागे प्रयत्न करीन पण खात्री नाही.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Sun, 16 Jan 2011 - 06:23 · उत्तर
"....त्यामुळे ते वेडगळ धाडस मी अद्याप केलेले नाही...."
~ करूही नका. माईन काम्फ माझ्याकडे आहे आणि त्याच्या आधारे 'हिटलर' चितारायचा म्हणजे "कूरकर्मा" हिटलर समोर येतच नाही. १९२४ ते १९२६ या कालखंडात त्याने लिहिलेला (बॉव्हेरियन तुरुंगात शिक्षा भोगत असताना पहिला भाग व तुरुंगातून सुटल्यानंतर, तसेच फ्रेन्च फौजाही रुहर प्रांत सोडल्यानंतर दुसरा भाग) जर्मनीचा इतिहास आणि त्याची त्या देशाबद्दलची स्वप्ने. या कालखंडात देशप्रेमाने प्रेरीत झालेला तो एक धडपड्या तरूण होता आणि त्याचे हे लिखाणही त्याच पठडीतील आहे. प्रत्यक्षात तो (आणि त्याचा पक्ष) ज्यावेळी सत्तेवर आला त्यावेळेच्या सत्तेच्या उन्मादाने प्रमत्त झालेला हिटलर आणि 'स्वप्नाळू' हिटलर यांच्यात जमीनअस्मानाचे फरक पडले होते. या पृथ्वीतलावरून एक जमात कायमची नाहीशी करून युरोपमध्ये "प्युअर आर्यन रेस' असे एक कहर माजविणारे रक्तबंबाळ स्वप्न त्याच्या मनी होते आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याने जे अघोरी उपाय केले ते प्रत्यक्षात सैतानालाही लाजविणारे होते.
~ १९४५ साली [युद्ध समाप्तीनंतर] दोस्त राष्ट्रांच्यावतीने चित्रीत केली गेलेली "Nazi Concentration Camp 1945" ही चित्रफित पाहाताना अक्षरशः भोवळ येते....(मी पाहिली आहे....दहा मिनिटेही पाहू शकलो नाही आणि जेवढा भाग पाहिला त्यामुळे त्या रात्री जेवू शकलो नव्हतो). ही चित्रफित जाणीवपूर्वक 'पब्लिक' प्रदर्शनासाठी ठेवलेली नाही, यावरच त्यातील कंटेन्ट लक्षात येते. मानवी संहाराची त्यातील दृष्ये पाहून खुद्द नागरी जर्मनांना रडे आवरणे कठीण जात होते, तिथे आपली काय कथा.
थोडक्यात....माईन काम्फ वाचणे आणि विसरून जाणे, हेच योग्य.
इन्द्रा
यशोधरा
यशोधरा · Sun, 16 Jan 2011 - 12:25 · उत्तर
मणि, काम्फ तर आत्मकथाच आहे नं हिटलरने लिहिलेली. त्याच्या दृष्टीकोनातून लिहिलेली,आणि त्याचे स्वतःचे जे काही सिद्धांत वा समजुती होत्या त्या अनुषंगाने लिहिलेली.त्यामुळे त्यात "हिटलर" ह्या व्यक्तीत्वाचे उजवे चित्रण असल्यास आश्चर्य नाही.
शिंडलर्स आर्क (पुस्तक), लिस्ट (सिनेमा), अॅन फ्रॅंकची डायरी, डिप्लोमॅट हीरोज ऑफ होलोकॉस्ट, इन माय हॅंड्स ही अकही वानगीदाखल पुस्तके, आणि अ़जून एक आहे मराठीत अनुवादित झालेले. एका नर्सनेच लिहिलेले आहे. (नाव आठवत नाही.) त्या पुस्तकावरचा नर्सचा हसरा, शांत चेहरा मला अजूनही आठवतो. पुस्तकात त्या नर्सवर झालेले अत्याचार आणि त्यातही तिने डोके शांत ठेवून इतराना केलेली मदत वाचताना अवाक् व्हायला होते.
हे सारे वाचले की हिटलरविषयी चांगुलपणाच्या भावना उरत नाहीत.
तरीही पुस्तक परिचय वाचायला आवडेल. हिटलरचेही स्वातंत्र्य आहेच की त्याची मते मांडायचे ;) तेह्वा जरुर लिही.
कधी लिहितेस? :)
सागर
सागर · Sun, 16 Jan 2011 - 19:17 · उत्तर
माईन काम्फ बद्दल सर्वप्रथम मी वाचले ते कानिटकरांच्या नाझी भस्मासुराचा उदयास्त मध्ये.
या स्वतंत्र पुस्तकात शेवटी संक्षिप्त स्वरुपात कानिटकरांनी माईन काम्फ चा अनुवाद दिला आहे.
मराठीत अलिकडेच माईन काम्फ चा संपूर्ण अनुवाद श्रीराम ढवळीकर यांनी 'माझा लढा' या नावाने केला आहे.
माईन काम्फ बद्दल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की हिटलरने माईन काम्फ लिहिले तेव्हा तो तुरुंगात होता. तेव्हा दुसरा काही उद्योग नसल्यामुळे हिटलरने माईन काम्फ च्या रुपाने जर्मन साम्राज्याचा भव्य दिव्य स्वप्नपट जनतेसमोर ठेवला. या कालात हिटलरने स्वतःचे खूप आत्मपरिक्षण केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हिटलरने जो इतिहास घडवला तो जर माईन काम्फ बरोबर आपण तपासून पाहिला तर, पुढे काय काय करायचे होते हे हिटलरने आधीच ठरवलेले होते हे दिसून येते.
दोस्त राष्ट्रे जेव्हा जगाला दुसर्या महायुद्धाच्या खाईत लोटल्याबद्दल हिटलरला दोष देत होते तेव्हा त्यांचे परराष्ट्र राजकारण साफ चुकलेले होते हे हेतु:पुरस्सर विसरले होते. हिटलरने माईन काम्फ मध्ये जे लिहिले होते त्याचा जर दोस्त राष्ट्रांच्या कूटनितीतज्ज्ञांनी सविस्तर अभ्यास केला असता तर हिटलर सत्तेवर येताच पुढे काय होणार याचा किमान अंदाज तरी आला असता.
माईन काम्फ बद्दल महत्त्वाची गोष्ट ही की हिटलरने एकदा यातून त्याची जी ध्येयधोरणे म्हणून ठरवली होती ती काळ्या दगडावरची रेघ होती. पुढे हिटलरने त्याच्या या मूलभूत विचारसरणीत काडीचाही बदल केलेला नव्हता.
एकदा जागतिक महायुद्ध चालू झाल्यावर हिटलरला पुन्हा स्वतःचे आत्मावलोकन करण्याची फारशी संधीच मिळाली नसावी अन्यथा त्याने त्याचे विचार नक्की नोंदवून ठेवले असते. ही संधी बहुतेक हिटलरला त्याच्या शेवटच्या आत्महत्या करण्याच्या काळातच कदाचित मिळाली असेल.
माईन काम्फ चे वाचन हिटलरच्या मनोवृत्तीवर आणि अत्याचार सहन केलेल्या जर्मन राष्ट्राचा एक कणखर नेता म्हणून नक्कीच प्रकाश टाकते.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Mon, 17 Jan 2011 - 01:43 · उत्तर
यशो (:)),
तिचं नाव ओल्गा लेंग्येल. ते पुस्तक आपल्या जी.एन्नी 'एक रात्र वैरयाची' नावाने मराठीत आणलंय.
यशो, इंद्रराज पवार, आणि खाली सागर,
नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅंप बद्दल मी पहिले वाचलं ते अर्थात ’ऍन फ़्रॅंक्स डायरी’मध्ये. नंतर वरचं पुस्तक. ते वाचून-ती चित्रं बघून डोक्यात तिडीक बसली. नंतर शटर आयलंड मधला दाखाव कॅंप, द रीडर मध्ये, शिंडलर्स आर्क, लाइफ़ इज ब्युटीफ़ुल सगळ्यामध्ये जे दाखवलंय तो ’माईन काम्फ़’च्या वाटेला जाणारच नाही पहिल्यांदा. ’हैवानाचं कसलं आलंय आत्मचरीत्र’-इति माझे काका.
हिटलरने ज्यूंचं जे शिरकाण केलं ते घृणास्पदच आहे आणि काहीही- ऍबसोल्युट काहीही त्या घॄणेची तीव्रता कमी करु शकत नाही. पण... ही झाली हिटलरची एक बाजू. त्याच्या राजकीय कारकीर्दीचा भलेही वादळी पण छोटा भाग.ज्यूं चं शिरकाण ही रिऍक्शन मानली तर ज्या कृतीला/घटनेला ही रिऍक्शन होती, ती कालखंड/घटना खरंच एव्हढी मोठी रिऍक्शन देण्याइतकी मोठी होती का? याचाही विचार केलाच पाहिजे ना?
मी इतिहास शिकतेय. आणि आम्हाला इतिहासात नेहमी सांगतात की कोणताही माणूस १००% टाकाऊ कधीच नसतो, १००% सैतान कधीच नसतो. आणि इतिहासाचे विद्यार्थी म्हणून त्याच्या खूप सारया वाईट गोष्टींबरोबर त्या मूठभर चांगल्या गोष्टी जगासमोर मांडणं हे आपले कर्तव्य आहे.
इतका नरसंहार करणारा हिटलर जर डोक्याने विकृत असता तर त्याला हजारोंच्या संझ्येने येऊन मिळालेल्या नाझी सैनिकांचं काय? नक्कीच कुठेतरी असंतोष होता, काहीतरी खदखदत होतं. बरं, त्या हजार सैनिकांना भलेही डोकं नसेल स्वत:च, भाळले असतील हिटलरच्या वक्तृत्वाला कदाचित, पण मग गोबेल्स, हिमलर, गोअरींग सारखी हुशार, मुत्सद्दी माणसं त्याच्या भजनी का लागतात? का शेवटपर्यंत निष्ठावान राहतात?हे ही जाणून घेणं गरजेचं आहे. ते जाणण्याने ज्यूंचं हत्याकांड जस्टीफ़ाय होणार नाही,ते कधीच शक्य नाही, पण इतिहासातल्या हिटलरचा विचार करताना फ़क्त ’निरपराध ज्यूंंना हकनाक मारणारा पाशवी वृत्तीचा माणूस’ अशीच होऊ नये असं मला वाटतं, आणि मला तसं लिहायला आवडेल पण ते मी करु शकेन की नाही याबद्दल मला सॉलिड डाऊट आहे असं म्हणाले मी.
एखादा तरुण पावाच्या तुकडयाकरता एखाद्याचा खून करतो या घटनेला बरयाच दृष्टीकोनातून बघता येतं. भुकेलेल्या बेरोजगार तरुणाचा दृष्टीकोन, पोलिसांचा दृष्टीकोन, आणि सकाळी कांदापोहे खात पेपर वाचत ’छे! काय माथेफ़िरु आहे. पावाच्या एका तुकड्याकरता खून करतात, कलियुग आहे झालं!’ असं उदगारणारया पांढरपेशा माणसाचा दॄष्टीकोन. सगळ्या बाजू अशा प्रकाशात आल्या की आपापलं मत बनवता येतं. त्याशिवाय मत बनवणं मला अडाणीपणा वाटतो.
इतिहास नेहमी जेते लिहीतात.आणि हिटलर पराभूतांपैकी एक होता.त्यामुळे जेत्यांनी जगापुढे उभ्या केलेल्या हिटलरशिवायही जे काही मला हिटलरबद्दल कळलं ते सांगायचा प्रयत्न असेल.
आणि आपण आरागॉर्नच्या 'अझिमॉव्ह'च्या धाग्यावर 'माईन काम्फ'ची चर्चा करत बसलोय. तो इसिल्डूरची तलवार घेऊन मारायला येईल उद्या. तेव्हा मी थांबते.
यशोधरा
यशोधरा · Mon, 17 Jan 2011 - 05:03 · उत्तर
आणि आपण आरागॉर्नच्या 'अझिमॉव्ह'च्या धाग्यावर
हो गं, खरं आहे. सॉरी आरागॉर्न.
यापुढंच तुझ्या विचारपुशीत लिहिते मणि. :) एक रात्र वैर्याची, बरोबर. धन्यवाद.
आरागॉर्न
आरागॉर्न · Mon, 17 Jan 2011 - 07:08 · उत्तर
काळजी नको. आरागॉर्न शांतताप्रिय आहे. :)
सागर
सागर · Mon, 17 Jan 2011 - 08:07 · उत्तर
खरेतर ही चर्चा या धाग्यावर अप्रस्तुतच आहे. पण तरी थोडक्यात सांगतो
इतका नरसंहार करणारा हिटलर जर डोक्याने विकृत असता तर त्याला हजारोंच्या संझ्येने येऊन मिळालेल्या नाझी सैनिकांचं काय? नक्कीच कुठेतरी असंतोष होता, काहीतरी खदखदत होतं.
मणिकर्णिकाशी मी सहमत आहे.
ज्यूंचे शिरकाण हिटलरने करण्यामागे मुख्य कारणे २ होती.
१. जर्मनीतील (आणि ऑस्ट्रीयातीलही) बहुसंख्य उद्योगधंधे ज्यूंच्या ताब्यात होते
२. जर्मन स्त्रियांना ज्यूंनी वेश्यावृत्तीस जुंपले होते. याबद्दल हिटलरने वेळोवेळी त्याच्या मनात येणारा संताप व्यक्त केलेला आहे. तेव्हा शुद्ध आर्य वंशाचा पुरस्कर्ता असलेल्या हिटलरने सर्व जर्मन जनतेच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या. जर्मन स्त्रियांना ज्यूंनी ज्या प्रकारे वेश्यावृत्तीच्या मार्गाला लावले होते ते जर्मन जनतेस माहिती होतेच. हे ही एक कारण होते की जे हिटलरला जर्मन जनतेचे वंश रक्षण करणारा तारणहार मानत होते
थांबतो इथेच
रोचीन
रोचीन · Mon, 17 Jan 2011 - 10:18 · उत्तर
>>जर्मन स्त्रियांना ज्यूंनी ज्या प्रकारे वेश्यावृत्तीच्या मार्गाला लावले होते
हा संदर्भ समजला नाहि, थोडं स्पष्ट करशिल का??
सागर
सागर · Mon, 17 Jan 2011 - 10:40 · उत्तर
रोचीन,
हिटलर जेव्हा ऑस्ट्रिया मधे (व्हिएन्ना मध्ये) असताना त्याने पाहिले होते की ऑस्ट्रियामध्ये असणारी बहुतेक सर्व वेश्यालये ज्यूंच्या हाती होती. आणि या वेश्यालयांत जर्मन स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर आणवले जायचे. बहुतेक सर्व जर्मन स्त्रियाच असायच्या. या स्त्रियांना बळजबरीने उचलून आणलेले असायचे किंवा पैशासाठी देहविक्रयास भाग पाडले जायचे. माईन काम्फ मध्ये हिटलरने यावर प्रकाश टाकला आहे. हिटलर व्हिएन्नामध्ये असतानाचा कालखंड खूप हलाखीचा आणि गरीबीचा होता असे हिटलरने माईन काम्फ मध्ये म्हटले आहे. या कालावधीत त्याने डोक्यात पक्की ठसवलेली जी तत्त्वे होती त्यात ज्यूंचा द्वेष हा प्रमुख होता. व्हिएन्नात असताना हिटलर आधी ज्यूंच्या विरोधात तितका नव्हता. पण व्हिएन्नातील वास्तव्यात हिटलरने जे वाचन केले, ज्या एक दोन नेत्यांच्या विचारांतून प्रभावित झाला, त्यानंतर हिटलरने स्वतः निरिक्षण केले आणि हे सर्व ज्यूंचे वागणे तसेच असल्याचे आढळून आले. जर्मन स्त्रियांवरची बळजबरी आणि उद्योगधंदे आपल्या हातात ठेवून जर्मन बेरोजगारीला कारणीभूत ही दोन प्रमुख कारणे हिटलरच्या ज्यू द्वेषाची होती
रोचीन
रोचीन · Tue, 18 Jan 2011 - 05:03 · उत्तर
वाचायला हवं!!
सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर · Fri, 14 Jan 2011 - 14:39
सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.
हे पुस्तक मी दोन वर्षापूर्वी विकत घेतले. एका अॅसिमॉव्हप्रेमी मित्राने वाचायला नेले ते अजून दिलेले नाही. अर्थात ते सुरक्षित आहे. मलाच वाचायला वेळ झालेला नाही. आता आठवण झाली. त्वरित या मित्राला दूध्व केला. आता तो एकदोन दिवसात आणून देईल.
त्यांच्या साहित्यातून त्यांची संवेदनशीलता लपत नाहीं. त्यांची सामाजिक बांधिलकीहि त्यांच्या कथाकादंबर्यातून दिसते. जीवनाबाबत त्यांचा सकारात्मक आणि उन्नत दृष्टिकोन पाहून आदरानें आपली मान झुकते. ते नास्तिक होते. त्यांच्या आयुष्यातली एक सत्य घटना मननीय आहे. छोटा आयझॅक तेव्हां दहा वर्षांचा होता. शाळेंत शिकत असतांना इतिहासाचे शिक्षक एकदां शिक्षक म्हणाले ‘आणि देवाच्या कृपेनें त्या २३ वर्षांच्या जवान योद्ध्याचा त्या लढाईत विजय झाला. त्या योद्ध्याचें नांव जॉर्ज वॉशिंग्टन.’ त्यानेंच नंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचें नेतृत्त्व केलें. छोटा आयझॅक म्हणाला ‘देव कांहीं अमेरिकन नव्हता. त्याला दोन्हीं बाजूचीं माणसें सारखींच होतीं. जर तो खरेंच दयाळू असता तर त्यानें युद्धांत माणसें मरूं देण्याऐवजीं युद्धाशिवायच प्रश्न सोडवला असता आणि दोन्हीं बाजूंच्या सैनिकांची प्राणहानि टळली असती.’ शिक्षकांनीं रुद्रावतार धारण केल्यामुळें छोट्या आयझॅकची मात्रा चालली नाहीं. इतक्या लहान वयातील ही स्वतंत्र तर्कशुद्ध विचारधारा आणि न्यायाची जाणीव आश्चर्यकारकच आहे.
त्यांचे नायक नायिका सहसा मामुली अपराध्याला ठार करीत नाहींत. थोडा मार देऊन सोडून देतात. पददलितांबाबत सहानुभूति दाखवतात. ‘फाउंडेशन’मध्यें बिलीबॉडन नामक झोपडपट्टीतल्या एका दरिद्री मुलाला - राइशला - नायक हॅरी सेल्डन मार्गाला लावतो आणि एका शिक्षण अर्धवट सोडून कामगार झालेल्या प्रतिभावंत तरुणाला - युगो एमरिलला - त्याच्या शिक्षणाची सोय करून गणिती बनवतो. त्यांच्या साहित्याबद्दल विख्यात समीक्षक जेम्स गन म्हणतात, "हाणामारी आणि प्रणय यांचे ग्रंथत्रिवेणीच्या यशाशी फ़ारसे देणेघेणे नाही - वरकरणी सगळी हाणामारी पडद्या आडच होते आणि प्रणय जवळजवळ बेपत्ता आहे - पण या कथा गुप्तहेरकथात असते तशी उत्सुकता निर्माण करतात, सोबतीला ‘रचनावैविध्य’ आणि ‘कलाटण्या’ असतातच."
खरेंच ऍसिमॉव्ह कोठेंहि अनावश्यक हिंसा, मोडतोड, दंग्याचें वर्णन करीत नाहींत. खून मारामार्या फारशा नाहींत. अनावश्यक प्रणयाच्या वर्णनांचा मसाला घालत नाहींत. तरीहि कथानकातली उत्सुकता वाढती ठेवून वाचकाला खिळवून ठेवायचें सामर्थ्य त्यांच्या लेखणींत आहे आणि त्यातच त्यांचे मोठेपण आहे. दुसरें म्हणजे गेलीं किती शतकें कोणास ठाऊक, पण सगळ्यांत लोकप्रिय विषय आहे राजकारण आणि युद्ध. राजकारणाचा वा युद्धाचा जनजीवनावर परिणामहि त्वरित होतो. वृत्तपत्रें घ्या वा चित्रवाणी वृत्तवाहिन्या. बातम्यांच्या अग्रस्थानीं असतें राजकारण. ‘फाउंडेशन’चा मुख्य विषय आहे राजकारण आणि युद्ध. कॅनव्हास फक्त वापरला आहे विस्तीर्ण खगोलशास्त्रीय विश्वाचा. मग लोकप्रियता कशी कमी पडेल? माझ्या मतें त्यांच्या लोकप्रियतेचें हेंच गमक आहे.
सुधीर कांदळकर
आरागॉर्न
आरागॉर्न · Sat, 15 Jan 2011 - 17:37 · उत्तर
सुरेख प्रतिसादाबद्दल आभार.
अझिमॉव्हच्या कथांमध्ये प्रणय-हिंसा नसते यामागचे कारण रोचक आहे. अझिमॉव्ह लहान असताना पल्प फिक्शनची कॉमिक्स येत असत. यातील स्त्री पात्रे अगदी नावाला घालायची म्हणून घातलेली असत. त्यांची सवय झाल्यामुळे अझिमॉव्हने लिहायला सुरूवात केल्यावर त्याच्या सुरूवातीच्या कथांमध्ये स्त्री पात्रे अजिबातच नाहीत. नंतर त्याने ही सवय मोडली पण तरीही भडक वर्णने करणे त्याला कधीच जमले नाही.
पुस्तक जरूर वाचावे. नक्की आवडेल.
टण्या
टण्या · Sat, 15 Jan 2011 - 19:18
अतिशय सुंदर परिचय करुन दिला आहे. मी खरेतर अझिमॉव्हचे काहीच वाचलेले नाही. त्यामुळे आता थोडेफार त्याचे साहित्य वाचून मग हे पुस्तक वाचेन.
साहित्यिकांची आत्मचरित्रे बरेचदा वाचनीय असतात (इतर क्षेत्रातील लोकांपेक्षा उदा: चित्रपट वगैरे) कारण आत्मचरित्रकाराचा धंदा-कसबच शब्द कागदावर उतरवणे हे असते. तसेच घोस्ट-राइटेड चरित्रे साहित्यिकांच्या बाबतीत अभावानेच असतात.
नंदन
नंदन · Tue, 18 Jan 2011 - 09:18
परिचय. आत्मचरित्रांचा कल एक तर आत्मस्तुतीकडे झुकतो (थेट किंवा इतरांच्या निंदेतून) किंवा प्रसंगी अनाठायी आत्मताडनाकडे. ह्या दोन्ही दोषांचा या पुस्तकात अभाव आहे, असं परीक्षणातून वाटतंय. बाकी टण्याच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे - आधी अझिमॉव्हची थोडी पुस्तकं वाचून मग आत्मचरित्र वाचेन म्हणतो, म्हणजे संदर्भ सुटायचे नाहीत.
आरागॉर्न
आरागॉर्न · Tue, 18 Jan 2011 - 13:31
नाइटफॉल ही अझिमॉव्हची पहिली गाजलेली कथा. एका ग्रहावर सहा सूर्य असतात त्यामुळे तिथे रात्रीचे अस्तित्व नसते. फक्त २००० वर्षांनी एकदा ग्रहण आल्यावर काही तास रात्र होते. या लोकांनी आयुष्यात तारे कधीच पाहिलेले नसतात. अंधाराची सवय नसलेले लोक या ग्रहणाला कसे सामोरे जातात याची कथा म्हणजे नाइटफॉल.
नाइटफॉल इथे वाचता येईल.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 19 Jan 2011 - 04:22 · उत्तर
वॉव! कथासुत्र - कल्पनाच लय भारी आहे.. लगेच पीडीएफ डाऊनलोडवली आहे.. वाचायला लगेच सुरूवात करतो :)
आरागॉर्न
आरागॉर्न · Wed, 19 Jan 2011 - 05:51 · उत्तर
एन्जॉय :)
नंदन
नंदन · Sat, 5 Feb 2011 - 05:35 · उत्तर
'नाइटफॉल'च्या दुव्याबद्दल धन्यवाद :). आत्ताच वाचून काढली. निव्वळ विज्ञानकथा म्हणून नव्हे, तर त्यातली सांकेतिकता (कल्टिस्ट्स, धर्मग्रंथांची रचना सत्यावर आधारित असली तरी काळाच्या ओघात त्यांचे भ्रष्ट झालेले स्वरूप, विज्ञानाच्या मर्यादा आणि त्यांची जाणीव हे त्याचे शक्तिस्थानही आणि या सार्यापलीकडे - धार्मिक आणि वैज्ञानिक अशा सार्यांच्याच मानवी व्हल्नरॅबिलिटीज्) अधिक महत्त्वाची वाटली.
आरागॉर्न
आरागॉर्न · Wed, 19 Jan 2011 - 05:51
अझिमॉव्ह वाचायला कुठल्याही पुस्तकापासून सुरू केला तरी चालेल. अपवाद फाउंडेशन सीरीज. यातील सर्व पुस्तकांचे कथानक एकमेकात मिसळलेले आहे त्यामुळे पहिल्या पुस्तकापासून सुरूवात केली तर संगती लागण्यास सोपे होईल.
फँटास्टिक व्हॉयेज वाचायला घेतलेत तर भाग १ ऐवजी भाग २ घ्या. भाग १ खरे तर आधी एक चित्रपट होता. त्यावरून अझिमॉव्हला कादंबरी लिहायला सांगण्यात आले. त्याने काही नाखुषीनेच ते केले पण त्यातील कथानकाला आपण स्वतंत्रपणे अधिक चांगला न्याय देऊ शकलो असतो असे त्याला नेहेमी वाटत राहीले. मग त्याने स्वतंत्रपणे भाग २ लिहीला. आणि तो नक्कीच उत्कंठावर्धक आहे.