परीक्षण

गूढ, रहस्यमय, अद्भुत : हारूकी मुराकामी

परीक्षण मजकूर

सवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. डिकन्स म्हटल की दु:ख, दु:ख, दु:ख आणि मणमोहण देसाई लाजतील असे योगायोग. पण माणसाच्या मनात डोकावण्याचे कसब विलक्षण. आणि एखादे वाक्य इतके अप्रतिम की तिथे थांबून दहा मिनिटे विचार करावा लागतो. सॉमरसेट मॉमचे वैशिष्ट्य म्हणजे कथा साध्या, सरळ शब्दांमध्ये सांगितलेली. पण परत मनोव्यापारांची गुंतागुंत समोर आणायची हातोटी विलक्षण.

पण कधीकधी असे एखादे पुस्तक हाती लागते की आपले सगळे अंदाज ढासळून पडतात. (थोडक्यात मस्त स्विंगींग यॉर्करवर आपली दांडी उडते. ) असेच एक पुस्तक परवा वाचले. हारूकी मुराकामीचे 'Kafka on the shore'. पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही पानात एक अंदाज बांधला, तो ढासळल्यावर दुसरा, त्यानंतर तिसरा. असे चार-पाच वेळा झाल्यावर शरणागती पत्करली आणि मुकाट मुराकामी नेईल तिथे त्याच्यामागून जाऊ लागलो. यातले सर्वच विलक्षण, काहीसे फँटसीच्या अंगाने जाणारे. सुरूवातीला तर्कशुद्ध मन हे असे का, ते तसे का असे प्रश्न विचारत रहाते. नंतर गोष्टीत रंगून गेल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे लक्षातही रहात नाही. मग नाकाता मांजरांशी बोलतो किंवा जळवांचा पाऊस पाडू शकतो अशा गोष्टी 'रूटीन' वाटायला लागतात.

गोष्ट सुरू होते तेव्हा जवळपास प्रत्येक प्रकरणात एखादा नवीन धागा येतो. काही काळ आपण भंजाळतो. काय चाललय काहीच कळत नाही. नंतर रूबिक क्युबचे चौरस जुळावेत तसे धागे जुळत जातात. याच्या जोडीला निवेदन इतकं प्रभावी की पुस्तक खाली ठेवायचा प्रश्नच येत नाही. फँटसी आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ. मग आधीच्या काही प्रश्नांची उत्तरेही मिळत जातात. सुप्रसिद्ध ओडीपल थीम भेटते. (यामुळेच या कादंबरीला मॉडर्न ग्रीक ट्रॅजेडी म्हटले आहे.) काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित रहातात. मुराकामीच्या मते प्रत्येक वाचकाची उत्तरे वेगळी असतील. पुस्तकातील विनोदही आलाच तर अगदी कळेल-न-कळेल असा. गूढतेला कुठेही तडा न जाऊ देणारा. The kind of fallen-from-grace building you find in any city, the kind Charles Dickens could spend ten pages describing. यावरून आठवले. डिकन्स किंवा इतरही काही प्रसिद्ध लेखक त्यांच्या जाडजूड पुस्तकांमध्ये पानेच्या पाने वर्णने देत बसतात. आणि खरे सांगायचे तर हे वाचायला कंटाळा येतो. बर, वाचल्याशिवाय रहावतही नाही कारण एखादे अप्रतिम वाक्य सुटायला नको. मुराकामीचे असे अजिबात नाही. शक्यतो वर्णन नाही, जिथे आहे तिथे इतके प्रभावी की वाचल्याशिवाय रहावतच नाही. मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरूणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

यातली सर्व पात्रे नॉर्मलच्या थोडी बाहेर जाणारी आहेत, किंबहुना ऍबनॉर्मल म्हटलं तरी चालेल. मुराकामीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला 'जरा हटके' पात्रांबद्दल जास्त उत्सुकता असते. यात दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानमध्ये घडलेल्या एका गूढ प्रसंगाचे अमेरिकन संरक्षण खात्याने नोंदलेले वर्णनही आहे, अर्थातच काल्पनिक (The Rice Bowl Hill incident). पण मुराकामी स्वतः पत्रकार आहे आणि त्याला याबद्दल अधिक विचारले असता त्याने फक्त 'नो कमेंट्स' एवढेच उत्तर दिले.

बरेचदा कलाकृतींमध्ये इतर प्रसिद्ध लेखकांचे संदर्भ आले तर लेखकाचे स्फूर्तीस्थान कळते. साइनफेल्डमध्ये वूडी ऍलनचा संदर्भ पाहिल्यावर त्याचा दर्जा फ्रेंड्सपेक्षा इतका वर का हे लक्षात येते. इथे तर नावातच काफ्का, त्यामुळे कथा अब्जर्ड असल्यास नवल नाही. (आणि काफ्का त्याचा आवडता लेखक असल्याचे मुराकामीनेही सांगितले आहे.) इतरही बरेच संदर्भ आहेत. ग्रीक ट्रॅजेडी, अरेबियन नाईट्स, मॅकबेथ, प्लेटोचे सिंपोझियम, मोझार्ट आणि शूबर्ट यांच्या संगीतातील बारकावे किंवा पुचिनीचा ला बोहेम ऑपेरा. लेखकाचा व्यासंग किती अफाट आहे याची यावरून कल्पना येते. शिवाय हेही लक्षात येते की या आणि अशा प्रकारच्या बर्‍याच लेखकांना/पुस्तकांना मुराकामी कोळून प्यायला आहे. तो जे लिहीतो आहे त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ही सगळी नावे केवळ नेम-ड्रॉपिंगच्या उद्देशाने दिलेली नाहीत.

जर तुम्हाला गूढ, रहस्यमय, काहीशा फँटसीच्या अंगाने जाणार्‍या कथा आवडत असतील तर काफ्का ऑन द शोर वाचून बघायला हरकत नाही.

अभिप्राय

सागर

सागर · Tue, 9 Nov 2010 - 12:43

ऑरागॉर्न,

ह्या लेखकाचे हे पुस्तकच काय पण कोणतेही पुस्तक मी अजून वाचलेले नाहिये. पण एकंदरीत या परिचयावरुन हे पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे. वर जे लेखकाच्या शैली बद्दल उल्लेख केला आहे ते मला फ्रेडरिक फोर्सिथच्या मध्यस्थमध्ये (द निगोशिएटर) ही दिसले होते. फ्रेडरिक फोर्सिथएवढे प्रचंड गुंतागुंतीचे कथानक निर्माण करुन शेवटी सगळे धागे जुळवणारा लेखक आजपर्यंत मी पाहिला नाही. (कदाचित माझे वाचन मर्यादित असेल :( )
तशाही गूढकथा आवडतात मला. त्यामुळे हे पुस्तक वाचायचे आहे या यादीत जोडले आहे.
नक्की वाचेन मी.

एका गुंतागुंतीच्या आणि अंदाजांना धक्का देणार्‍या या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 12:55 · उत्तर

सागर,

मी फोरसिथची ओडेसा फाइल आणि डेव्हिल्स अल्टरनेटीव्ह ही दोनच पुस्तके वाचली आहेत. त्यावरून फोरसिथ आणि मुराकामीमधील जाणवलेला एक ठळक फरक असा की मुराकामी सर्व धागे शेवटी जुळवतोच असे नाही. काही प्रश्न अनुत्तरित रहातात. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल. याखेरीज मुराकामीच्या कथा रोजच्या आयुष्यातील असतात. रोजच्या रूटीन गोष्टीमधून गूढ आणि रहस्यमय वातावरण निर्माण करणे ही त्याची खासियत म्हणता येईल.

सागर

सागर · Tue, 9 Nov 2010 - 13:17 · उत्तर

या दोन लेखकांत गुंतागुंतीचे कथानक ही एक समानता म्हणता येईल.
मुराकामी मी वाचलेलाच नाही त्यामुळे माहिती नाही. अर्थात तुम्ही दोघे वाचले आहे त्यामुळे तुमचा अनुभव मोठा आहे :) तेव्हा प्रत्येक लेखकाची एक खासियत असते तशी मुराकामी ची अनेक उत्तरे असणारे प्रश्न टांगते ठेवणे हे त्याच्या यशाचेही एक गमक असू शकेल.

मी पण वाचेन मुराकामी. फोर्सिथ चे मध्यस्थ वाचले नसेल तर अवश्य वाचा. माझ्यामते ती त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. फोर्थ प्रोटोकॉल ही देखील फोर्सिथची अजून एक कलाकृती (यावर द फोर्थ प्रोटोकॉल हा जेम्स बॉन्ड फेम पिअर्स ब्रॉसननचा आणि मायकल केन या २ दिग्गज अभिनेत्यांचा चित्रपटही आहे.)

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 13:23 · उत्तर

अनुभव माझाही फारसा नाहिये हो. :) मुराकामीची दोन-तीनच पुस्तके वाचली आहेत.
फोर्सिथचे मध्यस्थ वाचले नाही. मिळाले की वाचेन. शेवटपर्यंत प्रत्येक पानावर उत्कंठा ठेवणे ही त्याची खासियत म्हणता येईल. ओडेसा फाइल मी तीनचारदा तरी वाचले असेन.

फोर्थ प्रोटोकॉलही नाही बघितला. मला वाटले की मी ब्रॉस्ननचे सगळे मुख्य चित्रपट पाहिले आहेत. तो माझा आवडता बाँड होता. :) बघायला हवा.

सागर

सागर · Tue, 9 Nov 2010 - 14:23 · उत्तर

नक्की बघा हा चित्रपट. कधी मधे तो स्टार मुव्हीज वर पण लागतो.

यात पिअर्स ब्रॉसनन चा निगेटीव्ह रोल आहे. जेम्स बाँड करण्यापूर्वी या भूमिकेतील थंड निर्दयपणा त्याला उपयोगी पडला असावा.
झकास आहे चित्रपट यात शंका नाही... :)
मायकल के आणि ब्रॉसनन ची मस्त जुगलबंदी आहे. कोण कोणावर कुरघोडी करते हे पाहणे मनोरंजक आहे.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Tue, 9 Nov 2010 - 13:01

सुरेख, नेटक्या (आणि आस्वादायच्या पुस्तकाखेरीज स्वत:चे व्यक्तिमत्त्व असलेल्या) परिचयाबद्दल धन्यवाद.
अवांतर: मी त्याचे एक पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता. पण माझे इंग्रजी भलतेच कच्चे असावे बहुतेक. कारण मला थोड्याच पानांत प्रचंड झोप येऊ लागली. तश्शी पाने ढकलून, गाळगाळून मी निर्लज्जपणे पुढे गेले खरी. पण काही मजा आली नाही.
आता मी पुन्हा प्रयत्न करीन. :)

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 13:17 · उत्तर

मुराकामी सर्वांना आवडेलच याची ग्यारंटी नाही. मात्र एकदा आवडला की त्याची सर्व पुस्तके वाचावीशी वाटतात हे मात्र नक्की. :)
त्याचा ब्लाइंड विलो, स्लिपींग वुमन नावाचा कथासंग्रह आहे तो मला विशेष आवडला नाही. छोट्या कथांपेक्षा दीर्घ कादंबर्‍या तो अधिक चांगल्या लिहीतो हे माझे वैयक्तिक मत.

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 9 Nov 2010 - 13:22

वाचावे लागेल यांचे लेखन.

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 13:25 · उत्तर

अवश्य वाचून पहा. कसा वाटला ते ही सांगा. :)

यशोधरा

यशोधरा · Tue, 9 Nov 2010 - 15:09

पुस्तक परिचय आवडला, पण अख्खे पुस्तक वाचेनच असे नाही! :)
पहिली काही पाने आवडली तरच पुढे जाणार..

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 15:38 · उत्तर

पहिली काही पाने आवडली तरच पुढे जाणार..

फेअर इनफ. :)
मी बहुतेक वेळा दुकानातच एखाद्या कोपर्‍यात जाऊन पहिली काही पाने वाचतो. आवडले तर घेतो.

यशोधरा

यशोधरा · Wed, 10 Nov 2010 - 06:34 · उत्तर

>>मी बहुतेक वेळा दुकानातच एखाद्या कोपर्‍यात जाऊन पहिली काही पाने वाचतो. आवडले तर घेतो.

डिट्टो :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Tue, 9 Nov 2010 - 16:12

छान परिचय. "पुस्तक वाचावेच लवकर" अशी हुरहुर लावणारा परिचय.
धन्यवाद आरागॉर्न.

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 18:09 · उत्तर

प्रतिसादाबद्दल तुमचे आणि बाकी सर्वांचेही आभार.

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Tue, 9 Nov 2010 - 17:38

कादंबरीचा पहिला चॅप्टर :
http://www.nytimes.com/2005/02/06/books/chapters/0206-1st-murak.html?_r=1

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 9 Nov 2010 - 17:57 · उत्तर

अनेक आभार, मुक्तसुनीत.
आता पहिला चॅप्टर वाचून लोक निर्णय घेऊ शकतील.
बाय द वे, पुस्तक वाचायचे ठरवले तर या पहिल्या चॅप्टरवरून पुढे काय होईल त्याचे अंदाज बांधा आणि मग वाचा. (माझी दांडी उडाली, मग तुमची का नको? :) )

मला पहिला चॅप्टर वाचून कॅचर इन द रायची आठवण झाली. नंतर हा अंदाज किती येडपट होता ते कळाले.

टण्या

टण्या · Wed, 10 Nov 2010 - 03:59

आरागोर्न, अतिशय मस्त परिचय करून दिलात.. मुराकामी भारी लिहितो (असे ऐकून आहे खात्रीशीर सुत्रांकडून).. मी त्याचे What I talk about when I talk about running हेच तेव्हडे पुस्तक वाचले आहे. हे त्याच्या नेहेमीच्या शैलीपेक्षा हटके आहे (विषयही पूर्ण भिन्न). तरी मला आवडले होते.
kafka on the shore अनेक दिवसांपासून विश-लिस्ट मध्ये होतेच. आता घेइनच.

तुमचे परिक्षण खासेच आवडले. त्यातली काही वाक्ये ही अनेक वाचकांची स्वतःची म्हणुन पण खपतील. उदा:
>>> सवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. >> हे अगदी अगदी!!

>>> डिकन्स किंवा इतरही काही प्रसिद्ध लेखक त्यांच्या जाडजूड पुस्तकांमध्ये पानेच्या पाने वर्णने देत बसतात. आणि खरे सांगायचे तर हे वाचायला कंटाळा येतो. बर, वाचल्याशिवाय रहावतही नाही कारण एखादे अप्रतिम वाक्य सुटायला नको. >>> दस्तोयव्हस्की अगदी उत्तम उदाहरण. पानेच्या पाने बोअर करतो. ह्याविरुद्ध चेकॉव्ह. गोळीबंद. मराठीत जीए, एक शब्द इकडचा तिकडे हलवू शकत नाही. हिंदू-पूर्व नेमाडे - पर्फेक्ट.

>> बरेचदा कलाकृतींमध्ये इतर प्रसिद्ध लेखकांचे संदर्भ आले तर लेखकाचे स्फूर्तीस्थान कळते. >> हो, आणि त्यामुळे आपले वाचन वाढते. बरेचदा अजिबात संदर्भ नसलेल्या पुस्तकातून काही वेगळीच पुस्तके हाती लागतात. माडगूळकरांच्या कुठल्यातरी पुस्तकाच्या प्रस्तावनेत मला All quiet on western front हे नाव कळले आणि एक अप्रतिम पुस्तक हाती लागले.

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 10 Nov 2010 - 07:33 · उत्तर

अनेक आभार, टण्या.
व्हॉट आय टॉक अबाउट हे मुराकामीचे आत्मचरित्र नव्हे पण आत्मचरित्राच्या जवळ जाणारे लेखन म्हणता येईल. मी मुराकामीच्या कादंबर्‍या वाचल्यानंतर हे वाचले त्यामुळे या कादंबर्‍यांच्या मागचा लेखक कसा आहे हे कळायला मदत झाली.

>>दस्तोयव्हस्की अगदी उत्तम उदाहरण. पानेच्या पाने बोअर करतो.
द्स्तोयेव्हस्की वाचलेला नाही पण डिकन्स अगदी शेवटच्या प्रकरणांमध्येही, कथा उत्कर्षबिंदूवर आलेली असताना, हवा कशी होती, घर कसे होते हे सांगत बसतो तेव्हा ओरडून सांगावेसे वाटते की निदान क्लायमॅक्सला तरी थोडी दया दाखवा. :) हे अर्थातच टंग-इन-चीक अर्थाने घ्यावे. अन्यथा डिकन्सबद्दल म्या पामराने काय बोलावे? फ्रॉइडच्या ५० वर्षे पूर्वीचे लेखन, पण त्याच्या व्यक्तिरेखांमध्ये फ्रॉइडची प्रिंसिपल्स-इन-अ‍ॅक्शन दिसतात.

नंदन

नंदन · Wed, 10 Nov 2010 - 07:46

(दुपारी लिहिलेली प्रतिक्रिया इथे दिसत नाही. आठवेल तशी पुन्हा टंकतो)

मुराकामीचा परिचय अतिशय आवडला. त्याचं लेखन कुठल्याही साच्यात बसवणं कठीण असल्यामुळे त्याचा परिचय करून देणंही तितकं सोपं काम नाही. मात्र एकदा त्याचं लेखन आवडू लागली, की बालगंधर्वांप्रमाणे समग्र मुराकामी आवडू लागतो. कदाचित सुरुवात म्हणून 'एलिफंट वॅनिशेस' सारख्या लघुकथासंग्रहाने केली तर नवीन वाचकाला त्याच्या शैलीशी जुळवून घेणं अधिक सोपं जाईल.

इतरही बरेच संदर्भ आहेत. ग्रीक ट्रॅजेडी, अरेबियन नाईट्स, मॅकबेथ, प्लेटोचे सिंपोझियम, मोझार्ट आणि शूबर्ट यांच्या संगीतातील बारकावे किंवा पुचिनीचा ला बोहेम ऑपेरा. लेखकाचा व्यासंग किती अफाट आहे याची यावरून कल्पना येते.

पूर्ण सहमत. मात्र किंचित अवांतर लिहिण्याचं स्वातंत्र्य घेऊन म्हणायचं झालं तर एका विशिष्ट कालखंडात झालेला जन्म (१९४९) हेही यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल. एका वाचलेल्या थिअरीप्रमाणे; दुसर्‍या महायुद्धात संपूर्ण खच्चीकरण झालेल्या जपानी समाजाने त्यातून सावरण्यासाठी आपलं सारं लक्ष युद्धानंतर काही दशकं औद्योगिकीकरणाकडे आणि आर्थिक सक्षमतेकडे पुरवलं होतं. अशा वेळी - सार्‍या संस्कृतीशी संबंधित गोष्टी उदा. खेळ, संगीत, साहित्य - हे सारं पश्चिमेतून (विशेषतः अमेरिकेतून) जसंच्या तसं आयात केलं गेलं. (इथे थोड्याफार फरकाने सावरकरांनी साहित्य संमेलनात केलेलं 'लेखण्या मोडून बंदुका हाती घ्या' हे आवाहन आठवतं.) परिणामी युद्धोत्तर जपानमध्ये बेसबॉलसारखा खेळ असो वा जॅझसारखा संगीतप्रकार लोकप्रिय होण्यामागची ही कारणं आहेत, असं म्हटलं जातं. (योगायोगाने पूर्ण वेळ लेखक होण्यापूर्वी मुराकामीचा ह्या दोन्ही गोष्टींशी जवळून संबंध आला होता.)

अर्थात, हे आसपासच्या गोष्टींचा लेखनावर कसा प्रभाव पडतो हे जाणून घेण्याचा छोटा प्रयत्न म्हणून. मुराकामीसारखा प्रतिभावंत लेखक जरी 'मेजी' काळातल्या बंदिस्त जपानी समाजात जन्मला असता, तरीही त्याचं लेखन निराळं पण तितकंच कसदार झालं असतं.

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 10 Nov 2010 - 08:08 · उत्तर

नंदनने एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. मुराकामीच्या म्हणण्यानुसार त्याच्या सर्व कादंबर्‍यांमध्ये काफ्का आकलनाला सर्वात अवघड आहे. ही कादंबरी मूळ जपानीत प्रकाशित झाल्यानंतर प्रकाशकांनी जपानी वाचकांसाठी एक संकेतस्थळ उघडले होते. इथे वाचक त्यांचे प्रश्न, त्यांच्या शंका विचारत असत आणि मुराकामी जमेल तशी उत्तरे देत असे. त्यामुळे पहिल्यांदा मुराकामी वाचणार्‍यांनी एलेफंट व्हॅनिशेसपासून सुरूवात करावी असे वाटते. (मी हे वाचलेले नाही पण नंदनच्या रेकमेंडेशनवर पूर्ण विश्वास आहे. :) )

>>मात्र किंचित अवांतर लिहिण्याचं स्वातंत्र्य घेऊन म्हणायचं झालं तर एका विशिष्ट कालखंडात झालेला जन्म (१९४९) हेही यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकेल. एका वाचलेल्या थिअरीप्रमाणे; दुसर्‍या महायुद्धात संपूर्ण खच्चीकरण झालेल्या जपानी समाजाने त्यातून सावरण्यासाठी आपलं सारं लक्ष युद्धानंतर काही दशकं औद्योगिकीकरणाकडे आणि आर्थिक सक्षमतेकडे पुरवलं होतं. अशा वेळी - सार्‍या संस्कृतीशी संबंधित गोष्टी उदा. खेळ, संगीत, साहित्य - हे सारं पश्चिमेतून (विशेषतः अमेरिकेतून) जसंच्या तसं आयात केलं गेलं.

सहमत आहे. आणि हा कालखंड आणि मुराकामी जिथे रहात होता ते ठिकाण या दोन्हींचा परिणाम झाला असावा असे वाटते. मुराकामीच्या शहरात बरेचसे अमेरिकन खलाशी येत असत. त्यांच्या सहवासात त्याच्यावर जपानी संस्कृतीच्या तुलनेत पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला. नंतर त्याने सुरू केलेल्या क्लबमध्येही जॅझ संगीत वाजवत असत. या सर्वांच्या खुणा त्याच्या लेखनात दिसत रहातात. कदाचित यामुळेच जपान बाहेर मुराकामी स्विकारायला लोकांना अवघड गेले नसावे.

एखादा प्रसिद्ध लेखक त्याच्या कालखंडापसून वेगळ्या काळात जन्माला आला असता तर काय झाले असते ही कल्पना रोचक आहे. शेक्सपिअर आत्ता असता तर? :)

अवांतर : कोटेशन बटण चालत नाही असे दिसते.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Wed, 10 Nov 2010 - 13:24

या निमित्तानं इथं मुराकामीविषयी वाचायला मिळालं याचा आनंद झाला. माझ्या मते मुराकामी हा खास आजच्या जपानचा लेखक आहे. त्याच्यावर 'आधुनिकोत्तर' असंही एक विशेषण लावता येईल. तंत्राधिष्ठित प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर आलेल्या जपानी समाजातलं एक हरपलेपण, एकटेपणा, उदासी अशी त्याच्या अनेक व्यक्तिरेखांमध्ये दिसते, पण आधुनिकोत्तर समाजाकडे पाहण्याचा एक खास खेळकर खट्याळपणाही असतो. त्याच्या लिखाणातल्या प्रत्येक घटकाचा स्पष्ट संबंध शेवटपर्यंत लागेलच असं नाही. कारण कारण-परिणामांच्या सुस्पष्ट होणार्‍या गुंत्याची गोष्ट उकलून सांगण्यापेक्षा एखाद्या अभिजात संगीताच्या तुकड्याप्रमाणे विशिष्ट भाव निर्माण करणं हे त्याला मुळात अभिप्रेत असतं. सुरुवातीला वाचण्यासाठी मी 'On Seeing the 100% Perfect Girl One Beautiful April Morning', 'The Second Bakery Attack' या कथा किंवा 'After Dark' ही कादंबरिका सुचवेन.

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 10 Nov 2010 - 14:54 · उत्तर

कारण कारण-परिणामांच्या सुस्पष्ट होणार्‍या गुंत्याची गोष्ट उकलून सांगण्यापेक्षा एखाद्या अभिजात संगीताच्या तुकड्याप्रमाणे विशिष्ट भाव निर्माण करणं हे त्याला मुळात अभिप्रेत असतं.

मुराकामीचे हे वर्णन खूप आवडले. मुराकामीच्या गोष्टींमध्येही अभिजात संगीत - बीथोवन, मोत्झार्ट वगैरेंचे उल्लेखच नाही, तर विस्तृत वर्णने येत रहातात. विशेष म्हणजे आपल्या रोजच्या, काहीशा कंटाळवाण्या जगण्याच्या प्रक्रिया तो अशा खुबीने मांडतो की त्याभोवती आपोआप एक गूढ वलय तयार होते. विंड-अप बर्ड क्रॉनिकलमध्ये अगदी सुरूवातीला नायक स्पॅघेटी शिजवतो आणि त्याला एक फोन येतो या साध्या प्रसंगाचे वर्णन त्याने जसे केले आहे ते मुराकामीच करू जाणे.

याच पुस्तकाचे शेवटचे वाक्य असे आहे. "In a place far away from anyone or anywhere, I drifted off for a moment." तीन खंड, ६०० पाने चाललेल्या इंटेन्स अशा कथानकाचा शेवट असा झाल्यावर आपण काही क्षण स्तब्ध होतो. मनात ज्या भावना उचंबळून येतात त्या शब्दांमध्ये पकडणे कठीण जाते. अशा वेळी तुम्ही केलेले वर्णन चपखल बसते.

ऑन सीइंग अ १००% परफेक्ट गर्ल इथे वाचता येईल.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 10 Nov 2010 - 14:15

The Second Bakery Attack'चा 'अनुभव'च्या एका अंकात प्रकाशित झालेला अनुवाद वाचला होता. तो आवडला होता.

ऋषिकेश

ऋषिकेश · Fri, 12 Nov 2010 - 05:52

पुविवर स्वागत!
पुस्तक परिचय छान.. पुस्तक मिळाल्यास नक्की वाचेन.. फक्त विंग्रजी असल्याने आणि मेघना म्हणते तसे जर कठिण विंग्रजी असेल तर किती वाचेन माहित नाहि :P

आरागॉर्न

आरागॉर्न · Fri, 12 Nov 2010 - 07:51 · उत्तर

पुविवर स्वागत!

धन्यु. :)

चिंतातूर जंतूंशी सहमत आहे. मुराकामीचा इंग्रजी अनुवाद कराणारे ठरलेले अनुवादक आहेत. फिलीप गॅब्रिएल, जे रूबिन आणि तिसर्‍याचे नाव विसरलो. पैकी या दोघांचेही अनुवाद वाचायला सोपे आहेत. मात्र भाषा सोपी असली तरी आशय गहन असला तर कधी कधी कळायला वेळ लागतो.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Fri, 12 Nov 2010 - 07:20

> कठिण विंग्रजी असेल तर किती वाचेन माहित नाहि <

मला वाटतं मुराकामीची भाषा कठीण नाही, पण आशयाच्या गुंत्याची उकल होणं कठीण आहे त्यामुळे ओळखीचे शब्द, पण तरीही अर्थ धूसर असं काहीसं भंजाळायला होत असावं असा माझा अंदाज आहे.