परीक्षण

हॉरसशू क्रॅब्स अँड शोअर बर्ड्स

परीक्षण मजकूर

माझ्या मुलीबरोबर मी बॉर्डर्स या पुस्तकांच्या दुकानात प्रवेश केला आणि आम्ही दोघी एका टेबलवर आपापल्या पुस्तकामध्ये रममाण होऊन गेलो. नेहमी हे असच होतं पुस्तकांच्या दुकानात प्रवेश, मी कॉफी घेते आणि मग एका टेबलवर आम्हा दोघींची २ वेगवेगळी विश्व साकार होऊ लागतात. जिवंत, अतिशय मोहमयी, आम्हाला हरवून टाकणारी. त्यात खंड पडतो तो फक्त एक पुस्तक बदलून दुसरं घेण्याकरता.
आज मी जरा बदल म्हणून कविता किंवा स्वयंसुधारणा (सेल्फ्-इंप्रूव्हमेंट) ही नेहमीच्या विषयांची पुस्तकं न घेता माझ्या मुलीकरता म्हणून काही मिळत आहेत का हे बघत होते. मला माहीत नव्हत एक अतिशय सुंदर, शब्दांनी चित्र रेखाटणारे आणि चित्रांतून कविता बोलणारे असे पुस्तक मला मिळणार आहे.सहज म्हणून मी "हॉरसशू क्रॅबस अँड शू बर्ड्स" हे पुस्तक चाळू लागले. पहीलं जाणवलं ते हे की पानापानावर समुद्राच्या पोटातील गूढरम्य सृष्टी चित्रकाराने त्याच्या समर्थ कुंचल्याच्या फटकार्‍यातून उभी केलेली आहे.
पुस्तकाची सुरुवातच खिळवून टाकणारी आणि उत्सुकता ताणणारी आहे. "वसंतातील दाट धुक्याने आछादलेल्या चांदण्या रात्री , डेलावेअरच्या खाडीमध्ये खोल समुद्रतळातून एक पुरातन जीव आपला प्रवास सुरु करतो आहे....कोण आहे हा प्राणी?" आणि मग प्रत्येक पानागणिक आपल्याला नवी , अद्भुत माहीती मिळत जाते त्या प्राण्याबद्दल. त्याचा जीवनपट, त्याचे जीवनचक्र (लाइफ्-सायकल) आपल्या समोर उलगडत जाते आणि आपण हॉरसशू खेकड्याच्या प्रेमात कधी पडतो ते आपल्याला कळतही नाही. परत हे सर्व वाचत असताना पुस्तकात विविध मोहमयी आकृतीबंध इतस्ततः पाहून हा खेकडा अगदी डोळ्यासमोर साकार होतो. त्याला असलेले १० पाद, एखाद्या कोळ्यासारखं त्याचं चालणं, त्याची हिरव्या मोत्यांसारखी अंडी, त्याचं पाण्यात उलटं पडून पोहणं सारं काही डोळ्यासमोर उभं राहतं.
जसजसा वाचक गुंतून पुढे पुढे वाचत जातो तसतसा त्याला या खेकड्याचे पर्यावरणातील विशिष्ठ स्थान (नीश) कळते. दक्षीण अमेरीकेतून जेव्हा रेड नॉट पक्षी आणि तत्सम अने दुर्मीळ पक्षी जेव्हा स्थलांतर करून येत असतात तेव्हा डेलावेअर खाडीमधे घरट्यात हॉरसशू खेकड्याची मादी असंख्य अंडी घालत असते. हे रेड नॉट पक्षी जेव्हा डेलावेअर खाडीमध्ये विश्रांतीकरता उतरतात तेव्हा हीच अंडी समुद्राच्या लाटांनी किनार्‍यावर पसरतात. आणि पक्षांकरता मेजवानी ठरतात. पक्षांना हे अतोनात सोईस्कर ठरते कारण स्थलांतर करून आल्याने या पक्षांमध्ये एवढे त्राणच उरलेले नसते की ते मासे पकडून खाऊ शकतील अथवा कवचधारी प्राण्यांचे कवच फोडू शकतील. अशा रीतीने निसर्गच साक्षात या पक्षांची काळजी वहात असतो.
या खेकड्यांचे हे पर्यावरणातील स्थान आता कुठे माणसाला कळते आहे. आतापर्यंत मानव यांना कापून माशाच्या गळाला अमीष म्हणून लावत असे.त्यामुळे खेकड्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. पक्षी, या खेकड्यांवर अवलंबून असलेल्या पक्षांचे अस्तिवदेखील धोक्यात येऊ पहात होते.
मला हे पुस्तक खूप आवडले.यामागील कारण कदाचित हे असेल की डेलावेअर हे मला "घर" वाटते. आम्ही खूप फिरलो- कॅलिफोर्निआ, डेलावेअर, पेससिल्व्हेनिआ, व्हरमोंट, टेक्सास पण स्थैर्य आणि आनंद डेलावेअरला लाभला. हे पुस्तक "डेलावेअर" विषयी असल्याने येथील "लोकल" या भागात सापडते. पुस्तक वाचनिय आहेच. ज्यांना निसर्गप्रेम आहे त्यांच्यासाठी मी जरूर शिफारस करेन.

अभिप्राय

निवांत पोपट

निवांत पोपट · Sun, 5 Dec 2010 - 02:49

चांगला परिचय.पुस्तक 'वाचायचे आहे' मधे जोडलेले आहे.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sun, 5 Dec 2010 - 04:26

छान आणि रसाळ पुस्तकपरिचय. धन्यवाद :)

ऋषिकेश

ऋषिकेश · Sun, 5 Dec 2010 - 05:43

पुस्तक परिचय अत्यंत आवडला.. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने सहज बोलताना एखाद्या पुस्तकाचे छान वर्णन करावे असे वाचताना वाटले.

पुविवर स्वागत!

आरागॉर्न

आरागॉर्न · Sun, 5 Dec 2010 - 06:07

मस्त परिचय. मला निसर्गाबद्दलची पुस्तके आवडतात. परिचय वाचून पुस्तक वाचण्याच्या यादीत लगेच टाकले आहे. :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sun, 5 Dec 2010 - 06:53

व्वा ! वेलकम शुचिताई...तुम्हाला कदाचित आठवत असेल की त्या 'बायरन' धाग्याच्यावेळी मी तुम्हाला आग्रहाने विनंती केली होती की, साहित्यावर इतके चांगले लिखाण तुम्ही करत आहात, तर ते 'पुस्तकविश्व' वर आवर्जुन करा...त्याला कारणही नेमके हेच की इथे पुस्तकांविषयी आनंदाचा जो लुत्फ घेता येतो तो अन्यत्र (इन्क्लुडिंग मि.पा.) घेता येत नाही. 'हॉर्सशूज क्रॅब अ‍ॅण्ड शोअर बर्डस" निमित्ताने तुम्ही इथे आला त्याचे स्वागत इथले सर्वच सदस्य करतील यात संदेह नाही.

पुस्तकाविषयी आणि हॉर्सशूजविषयी तुम्ही आत्मियतेने लिहिले आहेच अन् मी एकदा असेच विद्यापीठात घडलेल्या निसर्गविषयक कार्यशाळेत यांच्याविषयीची माहिती आणि स्लाईड शोजही पाहिले होते. मला वाटते निसर्गप्रेमी श्री.मारूती चितमपल्ली यानीही विविध जातीच्या खेकड्यांच्या जीवनशैलीविषयी मौजेच्या (किंवा दीपावलीच्या...) अंकात प्रदीर्घ लिहिले होते...नक्की अंक आठवत नाही.

"डेलावर बे" चा तुम्ही उल्लेख केलेला आहेच, पण त्या स्लाईड शो मध्ये भारतासह, जपान आणि इंडोनेशिया या देशातील सागरी किनारपट्टीवर हॉर्सशूजची (किंवा तत्सम फॅमिलीची) खूप पैदास होत असल्याचे दर्शविले होते. मुळात जीवशास्त्रज्ञ "हॉर्सशूज क्रॅब्ज" ना "स्पायडर" जातीत समजतात, केवळ ते आपल्या पायाने ते भक्ष्य चिरडतात (कोळीही पायाचाच वापर करतात, पण त्यानंतर थेट त्याला गट्टम करतात...) व तुकडेतुकडे करून त्याने अन्नपदार्थ म्हणून पोटात ढकलतात, म्हणून थोडेसे वेगळे मानले जातात. भोजनाची ही प्रक्रिया चांगलीच वेळखाऊ असते....मला वाटते तुम्ही लिहिलेल्या हॉर्सशूजना आयुष्यही भरपूर असते...साधारणतः १५ वर्षेतरी ठिकठाकपणे हे महाराज जगू शकतात.

असो....एका निसर्गनवलाईच्या पुस्तकाचा तुम्ही इथे उल्लेख करून त्यावर तितक्याच सुंदरतेने लिहिल्याबद्दल धन्यवाद.

इन्द्रा