परीक्षण

इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही

परीक्षण मजकूर

'इ.स. १९६६ ते १९८४ हा इंदिरा . गांधींचा राजकीय नेतृत्वाचा कालखंड होय. या काळात त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार आले, वादळं निर्माण झाली पण त्याच कालखंडात बँकांचे राष्ट्रीयीकरण, बांग्लादेश युध्द, सिमला करार, सिक्कीमचे विलीनीकरन, आणीबाणी, काँग्रेसचा पराभव अश्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांच्या या कारकिर्दीचे जवळचे साक्षीदार असलेले पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख पी.एन. धर यांनी या पुस्तकात इंदिरा गांधींच्या निर्णय क्षमतेचा, निर्णय प्रक्रियांचा आणि त्यामागील घडामोडींचा सुक्ष्मदर्शी वेध घेत या घटनांचा परामर्ष घेतलेला आहे'

७० च्या दशकात अनेक वादळं भारतीय राजकारणात आली. त्यातील सर्वात मोठं वादळ म्हणजे आणीबाणी. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णय प्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांदी व चौकडींच्या कारवाया व इंदिरा गांधींची त्याबाबतची भूमिका. जयप्रकाश नारायण यांच्याशी झालेल्या गुप्त चर्चा आदि सर्व बाबींचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे.

पुस्तकात एकून ८ प्रकरणे आहे. धरांच्या काश्मिरी पारिवारीक पार्श्वभूमीवरून सुरू होऊन शिक्षण तसेच नोकरी निमीत्ताने धर,हिंदू महाविद्यालय दिल्ली (शिक्षण), पेशावर (अध्यापन), हिंदू महाविद्यालय (अध्यापन), न्यु गियाना (सरकारचे आर्थीक सल्लागार) असा प्रवास करीत दिल्लीच्या 'इन्स्टीट्युट ऑफ इकॉनॉमीक ग्रोथ' या संस्थेच्या संचालकपदी स्थिरावलेले दिसतात व धरांच्या अर्थविषयक निबंधांमुळे त्यांचे नाव चर्चेत असायचे.

इंदिरा गांधींचे तत्कालीन सचिव पी.एन. हक्सर यांनी पी.एन. धरांना पंतप्रधान कार्यालयात सहभागी व्हायला निमंत्रण दिले. पुढे हळूहळू हक्सर निवृत्त झाल्यावर धर स्वत: सचीव झाले.

पुढील प्रकरानांत त्यांनी १९७१ च्या पुर्वपाकिस्तानातील अनागोंदी विषयी लिहीलेले आहे. पुढे बांग्लादेश युध्दाचे वर्णन आहे. त्यापुढील सिमला करार, भुत्तोंसोबतच्या वाटाघाटी सविस्तर दिलेल्या आहेत.

२६ जून १९७५ ला जाहीर झालेली आणीबाणी, त्याआधी घडलेल्या घडामोडी, अलाहाबाद न्यायालयाचा निकाल,
संजय गांधींचा आग्रह आदी सर्व घटना. आणीबाणी दरम्यान तयार झालेले पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील किचन कॅबीनेट आदींबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

यासोबतच सिक्कीमचे १९७४-७५ च्या दरम्यान भारतातील विलिनीकरणाच्या घटनेचा सुध्दा सविस्तर आढावा घेतलेला दिसतो.

अंतीम प्रकरणात लेखक भारतीय लोकाशाही, प्रशासन, सामान्य जनता, नोकरशाही, आरक्षण आणि धार्मीक अल्पसंख्यांक अश्या अनेक सामाजीक व राजकीय प्रश्नांवर आपले मत मांडतात. एकंदरीत हे पुस्तक भारतीय राजकारण, इतिहास याचे जाणकार आणि अभ्यासु यांसाठी अतिशय उत्तम संदर्भ आहे असं म्हणता येतं.

इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही
लेखकः पी. एन. धर अनुवाद : अशोक जैन
पाने: ३२७
किंमतः जनआवृत्ती ( १२५ रूपये)
प्रकाशकः रोहन प्रकाशन, पुणे
पुस्तक प्रकारः राजकीय

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Sun, 23 May 2010 - 16:09

हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आहे.. खूपच रोचक माहिती आणि विचार.. स्वातंत्र्योत्तर इतिहास जाणण्यासठी एक मस्ट रिड पुस्तक.
मलाही पुस्तक आवडलं..

परिक्षणही खूप सुरेख.. इथे दिल्याबद्दल आभार

-ऋ

आनंदयात्री

आनंदयात्री · Tue, 25 May 2010 - 07:39

साधारणपणे भारत स्वतंत्र झाला की सर्वसाधारण भारतीय विद्यार्थाच्या आयुष्यातला "भारताचा इतिहास" हा चित्रपट संपतो ! पुढचे आणी स्वातंत्रल्कढ्या मागचे काही माहितच नसते.
पुस्तक वाचायला हवे.