परीक्षण

कादंबरीसारखं वाचनीय सौंदर्यशास्त्र

परीक्षण मजकूर

खेळ नाटकाचा - एक पडदा आणि तीन घंटा
राजीव नाईक
अक्षर प्रकाशन, प्रथमावृत्ती - नोव्हेंबर २००३

सौंदर्यशास्त्र या विषयाची ओळख निदान मला तरी ’ए-क-अ-क्ष-र-क-ळ-ल-त-र-श-प-थ’ या पुलंच्या उपहासात्मक वाक्यातून आणि तितकीच होती. कलाकृतीच्या रचनेचे, रूपाचे, आकाराचे काही सैल नियम असतात; या नियमांचं पालन आणि त्यांच्या विरोधात केलेली बंडखोरी यांच्यातला तोल सांभाळण्याचा निर्णय कलाकार आपल्या विवेकाला स्मरून घेत असतो; परंपरा म्हणजे अखेरचा शब्द नव्हे आणि परंपरेचं नेमकं ज्ञान असल्याशिवाय 'निव्वळ बंडखोरीकरता म्हणून केलेल्या' बंडखोरीला कलाविश्वात अर्थ नव्हे - या सार्‍याचा साक्षात्कार राजीव नाइकांच्या ’खेळ नाटकाचा’ या पुस्तकामुळे मला झाला.

नाटकातला काळ आणि नाटकातला अवकाश (टाइम ऍण्ड स्पेस इन थिएटर) हे या पुस्तकाचं सूत्र. अगदी मुळापासून - म्हणजे काळ आणि अवकाश यांच्या कोशगत व्याख्यांपासून - लेखक विषयाला सुरुवात करतो. (कोशगत व्याख्या उद्धृत करणं, आपल्या विषयातलं त्या व्याख्येचं उपयोजन (ऍप्लिकेशन!) करणं आणि त्याबरहुकूम संज्ञा (टर्म) निश्चित करून घेणं हे संपूर्ण पुस्तकात पाळलं आहे. त्यामुळे विषयातला ओ की ठो माहीत नसलेल्या माझ्यासारख्या माणसालाही स्पष्टीकरणं दुर्बोध वाटत नाहीत.)

असीम अवकाश -> सीमित अवकाश (उदा. घर, मंदिर) -> नाट्यावकाश (उदा. नाटकघर) -> उपलब्ध / दत्त अवकाश (उदा. व्यावसायिक नाटकासाठी पुण्यात उपलब्ध असलेलं बालगंधर्व नाटकघर किंवा मुंबईत प्रायोगिकवाल्यांसाठी असलेलं माहीमचं म्युन्सिपल हायस्कूल) -> मंडपावकाश = रंगमंच + प्रेक्षकावकाश (रंगायतनचा कमानी रंगमंच किंवा एनसीपीएमधला समीप रंगमंच - दोन्हीत प्रेक्षक आणि मंच यांची रचना निरनिराळी आहे) -> मंचावकाश (उदा. मंच आणि त्याला लागून आडवी रॅम्पसदृश रचना असणारा जपानी मंच किंवा गोलाकार ग्रीक मंच किंवा सध्या आपण सररास वापरतो तो कमानी रंगमंच) -> नाटकातला अवकाश (उदा. दिवाणखाना) -> नटनिर्मित अवकाश (उदा. माइम कलावंत आपल्या हालचालींनी सभोवताली सोसाट्याचा वारा असल्याचा आभास निर्माण करतात. त्या प्रकारचा अप्रत्यक्ष / आभासी अवकाश)

--- अशा टप्प्यांतून लेखक नाटकातला अवकाश अभ्यासत जातो. त्यात निरनिराळ्या अवकाशांच्या प्रकारांची उदाहरणं येतात. आकार आणि रचना स्पष्ट करणार्‍या आकृत्या येतात, त्यांचे निरनिराळ्या नाट्यविषयांशी आणि नाट्यप्रकारांशी असलेले लागेबांधे येतात, या अवकाशाच्या निवडीतून कलाकार जे काही विधान करू पाहत असतो त्याचे तपशील अनेकानेक उदाहरणांतून दिले जातात. नाटकातून वापरल्या गेलेल्या स्थळांबद्दल आणि त्यांच्या वारंवारितेबद्दल, लोकप्रियतेबद्दल, सोईस्करपणाबद्दल, त्यातून दिसणार्‍या नाटकाच्या जातकुळीबद्दल चर्चा होते. (उदा. सुखांतिकांतून वारंवार दिसणारा दिवाणखाना, नाट्यांतर्गत रोमॅण्टिक गप्पासांठी पुन्हापुन्हा भेटणारी बाग). तसंच हे लागेबांधे अंतिम नाहीत. ते मुद्दामहून किंवा अभावितपणे मोडून कलाकार काही चांगलं साधू शकतो, अशी जाणीवही लेखक करून देतो. (उदा. ’झू स्टोरी’मधली दोन अनोळखी इसम भेटतात ती बाग).

नाटकातल्या काळाचा अभ्यास करतानाही लेखक अशाच असीम व्याख्येकडून नाट्यांतर्गत व्याख्यांकडे जातो. नाटकाचा कालिक आवाका किती आहे आणि नाटकाचा प्रत्यक्ष वेळ किती आहे यावर नाटकाची गती ठरते - आणि ही गती काहीएक विधान करत असते हे स्पष्ट करण्यासाठी (आणि इतरत्रही अनेक वेळा) पुस्तकात नाटकाखेरीज इतर कलांची परिणामकारक उदाहरणं येतात. (उदा. नेमाड्यांच्या ’जरीला’मधली संथ, काहीशी कंटाळवाणी, पुनरावृत्त गती आणि मुक्तिबोधांच्या ’सरहद्द’मधली जीवनाभिमुखतेचं दर्शन घडवणारी तेज गती.) आवर्तन हे काळाचं वैशिष्ट्य दर्शवणारं ’तुंबाडचे खोत’चं उदाहरण आणि हेच आवर्तन ’वाडा चिरेबंदी-मग्न तळ्याकाठी-युगान्त’ या त्रिनाट्यधारेतून कसं भेटतं त्याचं स्पष्टीकरण रोचक आहे. काल दर्शवण्यासाठी वापरली जाणारी रंगसाधनं (फ्लॅशबॅक, काळांतर्गत काळ (सूत्रधाराचा काळ - गोष्टीचा काळ!), काळाच्या उड्या, काळ गोठवण्याची युक्ती - फ्रीझ); युगगती, शहराची गती, संस्कृती-समाजाची गती यांचा नाट्यांतर्गत काळावरही होणारा परिणाम; नाटकातला काळ आणि आशय-विषय यांतले लागेबांधे (संध्याकाळ - हुरहुर / रोमान्स) यांची उदाहरणं येतात. कथा आणि कथानक (स्टोरी आणि प्लॉट) यांतला फरक समजावून सांगताना लेखकानं ’पडघवली’मधल्या कालिक उड्या वापरल्या आहेत. (गोष्टीतल्या घटनांचा खरा क्रम गोष्ट सांगताना बदलल्यामुळे कथानक कसं परिणामकारक होऊ शकतं याचं हे थोर उदाहरण माझा या दोहोंतला गोंधळ कायमचा दूर करून गेलं!) नाटकातलं नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, संवाद हे सगळं या काळाला आणि अवकाशाला अनुसरून असतं आणि त्यांच्या काही ढोबळ जोड्याही ठरवता येतात असं लेखक सोदाहरण स्पष्ट करतो (आणि ’मात्र या जोड्या म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे’ हा इशाराही देतो!)

नाटकीय सौंदर्यशास्त्र आणि इतर कला यांतली साम्य-फरक दाखवणारी उदाहरणं आणि सगळ्याच कला आपापल्या मर्यादा ओलांडण्यात धन्यता मानत असतात हे निरीक्षण (नृत्यात गोठवली जाणारी चित्रसदृश मुद्रा, फोटोतून / चित्रातून करून दिला जाणारा गतीचा आभास, संगीतातून एखादा भाव ’मूर्तिमंत’ करण्याचं कसब इत्यादि) विलक्षण आहे.

अनेक संकल्पना समजावून सांगताना अतिशय सोपे आणि नेमके मराठी प्रतिशब्द वापरले जातात (उदा. असोसिएशन्स = लागेबांधे) वाचकाचा गोंधळ होऊ नये म्हणून कंसात इंग्रजी शब्द देण्याचं पथ्य पाळलेलं आहे. मात्र ’पारिभाषिक शब्द म्हणजे संस्कृताळलेले शब्द’ असा अट्टाहास त्यात नाही, तसाच मराठी प्रतिशब्द शोधणं सोडून इंग्रजी शब्द धडकावून वापरण्याचा आळसही नाही.

कोशगत व्याख्या, काही संकल्पनांची अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणं, अभ्यास समजून घ्यायला मदत करणारे स्वाध्याय इत्यादि परिशिष्ट पुस्तकाला नेमकेपणा देतात.

इतक्या अवघड विषयाचं इतकं सोपं (म्हणजे बाळबोध नव्हे) आणि एखाद्या कादंबरीइतकं रोचक विश्लेषण करणारं पुस्तक मी याआधी वाचलं नव्हतं. त्यातून मला - केवळ नाटकाच्याच नव्हे, तर - एकंदरीत कलेच्या सौंदर्यशास्त्राचं भान आलं. निव्वळ अज्ञानामुळे मी या पारिभाषिक संज्ञांपासून आणि या सुरेख विषयापासून दूर पळत असे, ते संपलं. त्याबद्दल मी या गुणी पुस्तकाची कायम ऋणी राहीन.

अभिप्राय

श्रावण मोडक

श्रावण मोडक · गुरुवार, 18 Nov 2010 - 08:08

चांगला परिचय. ­अगदी मेन्यूकार्ड नसलेला परिचय ब­ऱ्याच काळाने ­पहावयास मिळाला.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · गुरुवार, 18 Nov 2010 - 11:25

हे पुस्तक वाचलेलं नाही, पण राजीव नाईकांना बोलताना ऐकलेलं आहे. अगदी रसाळ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्यांची ती रसाळ शैली निव्वळ नाटकाच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता या पुस्तकामुळे पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. परिचयाबद्दल धन्यवाद!

अवांतरः त्यांचं मिथकांबद्दलही एक पुस्तक आहे - 'नाटकातलं मिथक'. तेही कदाचित तुम्हाला रोचक वाटेल.

ऋषिकेश

ऋषिकेश · गुरुवार, 18 Nov 2010 - 11:55

फारच छान ओळख.. वाचायच्या यादीत अ‍ॅडवतो तर आहेच ..
शिवाय खरंतर केवळ

अनेक संकल्पना समजावून सांगताना अतिशय सोपे आणि नेमके मराठी प्रतिशब्द वापरले जातात. वाचकाचा गोंधळ होऊ नये म्हणून कंसात इंग्रजी शब्द देण्याचं पथ्य पाळलेलं आहे. मात्र ’पारिभाषिक शब्द म्हणजे संस्कृताळलेले शब्द’ असा अट्टाहास त्यात नाही, तसाच मराठी प्रतिशब्द शोधणं सोडून इंग्रजी शब्द धडकावून वापरण्याचा आळसही त्यात नाही.

हे वाचूनच पुस्तक वाचावसं वाटु लागतंय.. बाकी नाट्य हा विषयही आवडता आहेच

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 18 Nov 2010 - 16:43

मेघना यानी यापूर्वी श्री.नाईक यांच्या या पुस्तकाचा उल्लेख केला असल्याने त्याविषयी सविस्तर वाचण्याची इच्छा होतीच, ती त्यानी सर्वार्थाने आणि आपल्या प्रतिभाशाली सादरीकरणाने कशी पूर्ण केली आहे ते दिसतेच. त्या म्हणतात त्याप्रमाणे 'सौंदर्यशास्त्र' प्रांतात सहजपणे भटकंती होऊच शकत नाहीत त्यामुळे का कोण जाणे त्या शास्त्राचा अभ्यास करणे हे फक्त एक कंटाळवाणे असे 'अ‍ॅकॅडेमिक' काम आहे की काय अशी काहीशी सर्वसामान्य वाचकाच्या मनी समजूत होऊन बसली आहे. तिला छेद देण्याचे काम श्री.राजीव नाईक यांच्यासारखे लेखक 'नाट्य' सादरीकरणातील सौंदर्य आविष्कारद्वारे करीत आहेत हे त्या पुस्तकाचे प्रमुख कार्य आहे असे समजले पाहिजे. खुद्द भरतमुनिच्या नाट्यशास्त्रातही भारतीय सौन्दर्यशास्त्राच्याच मूळतत्वांचे मूल्य विस्ताराने सांगितले आहे. नाटक सादरीकरणातील सौन्दर्यशास्त्राची भूमिका ही खरे तर वैदिक सभ्यतेचीच एक खूण त्या काळापासून मानली गेली आहे.

'वसंतसेने' चे शरीर निव्वळ अलंकाराने मढविले जाणे आणि त्याच्या सुटकेची कळ तिने चारूदत्तालाच सांगणे ही सर्वार्थाने 'सौन्दर्यशास्त्रा'ची एक मोहक व्याख्या आहे, जी नाटकाच्या मांडणीच एक महत्वाचे काम करू लागली. अर्थात हेही तितकेच सत्य होते की, भरताची नाट्यशास्त्रातील सौन्दर्यदृष्टी ही कुठल्या जमिनदाराच्या, सामंताच्या वा राजाच्या नावे विकसित झाली नाही तर त्याची चेतना भारत देशाच्या सामाजिक विकासगतीशी निगडित मानली गेली...समाजातील सौन्दर्य टिपणे हे नाटककाराचे महत्वाचे काम बनले, मग ते सौन्दर्य भले पारंपारिक अर्थाने वा बाळबोध व्याख्येने घेणे नसेलही. क्रूरता, पाशवीपणा, बिभत्सता, भीती, उग्रता हीदेखील नाटकाच्या मांडणीतील सौंदर्यस्थळेच असतात, जिचा आविष्कार सौंदर्यशास्त्राचा अभ्यासक मंचावरील मांडणीद्वारे अधिक प्रकर्षाने करू शकतो, जी कित्येकवेळा नाटककाराच्या शब्दापेक्षा प्रेक्षकाच्या मनावर प्रभाव टाकू शकते.

खूप लिहिता येईल या विषयावर....पण हेही तितकेच खरे की त्या अगोदर श्री.राजीव नाईक यांचे या पुस्तकाबद्दल तसेच त्याची ओळख करून दिल्याबद्दल मेघना यांचे आभार मानने अत्यंत आवश्यक आहे.

इन्द्रा

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · गुरुवार, 18 Nov 2010 - 17:01 · उत्तर

"....कसचं कसचं!

वेल.... गंमत म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये ज्या आठ रसांचा समावेश होतो तीत 'विनयशीलते'चा का कोण जाणे उल्लेख नाही. आता हे मेघना यांचं 'कसचं कसचं!' वाचल्यावर वाटते की भरताने विनयाचा एक नववा रस आपल्या शास्त्रात घ्यायला हवा होता...!!! याने सौंदर्यशास्त्राची खुमारी नक्कीच वाढली असती.

इन्द्रा

नंदन

नंदन · गुरुवार, 18 Nov 2010 - 22:26

पुस्तकपरिचय! परीक्षण वाचून गेल्या खेपेला मिळवलेलं हे पुस्तक वाचण्याआधीच गहाळ झाल्याची खंत पुन्हा नव्याने जाणवली :(.

नाटकीय सौंदर्यशास्त्र आणि इतर कला यांतली साम्य-फरक दाखवणारी उदाहरणं आणि सगळ्याच कला आपापल्या मर्यादा ओलांडण्यात धन्यता मानत असतात हे निरीक्षण (नृत्यात गोठवली जाणारी चित्रसदृश मुद्रा, फोटोतून / चित्रातून करून दिला जाणारा गतीचा आभास, संगीतातून एखादा भाव ’मूर्तिमंत’ करण्याचं कसब इत्यादि) विलक्षण आहे.

क्या बात है! इथे एलकुंचवारांच्या मौनरागमधलं साधारण याच आशयाचं विश्लेषण आठवलं (...सगळ्याच कलांना संगीत व्हायचं असतं.)

अवांतर - 'झू स्टोरी'चा प्रयोग मराठीत झाला आहे का? त्या नाटकातली बाग - म्हणजे सेंट्रल पार्क हा 'कॅचर इन द राय'शी जुळवलेला सांधा आहे, असं उडत उडत वाचल्याचं आठवतं. (पराभूत मानसिकतेची पात्र इ. इ.)

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Fri, 19 Nov 2010 - 08:22 · उत्तर

दिलीप प्रभावळकरांच्या 'एका खेळियाने'मधे त्यांनी हे नाटक मराठीतून केल्याचा उल्लेख केला आहे. मला वाटतं आधारित असल्यामुळे नाव निराळं होतं.

सागर

सागर · Fri, 19 Nov 2010 - 07:12

मेघना,

तुझा लेख वाचूनच हे पुस्तक वाचायची इच्छा झाली आहे.
हा विषय माझ्या फारसा वाचनात कधी आला नाही. आवडीनिवडीमुळे असेल कदाचित. पण या विषयावरच एकंदरीत माझे वाचन नाही. लेख सुरेख आहे यात शंका नाही. म्हणूनच हे पुस्तक माझ्या वाचायचे आहे या यादीत अ‍ॅडवले आहे :)

नीधप

नीधप · Fri, 26 Nov 2010 - 14:50

या पुस्तकाबद्दल लिहिल्याबद्दल थेन्कू..
या पुस्तकापलिकडे जाऊन राजीव सरांचं शिकवणं याच विषयातलं अनुभवलेल्या काही भाग्यवंतांपैकी मी एक. ललित कला केंद्राच्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवत शिकवत ह्या पुस्तकाच्या मांडणीकडे सर पोचले त्या पहिल्या एक दोन बॅचेस पैकी.
पुस्तक काय उत्तमच आहे. आम्हाला पुस्तक मिळालं नाही पण सर प्रत्यक्ष मिळाले. आता पुढच्या विद्यार्थ्यांना सर मिळाले नाही मिळाले तरी पुस्तक आहेच.
पण सरांच्याकडून या गोष्टी शिकण्यात आणि अधूनमधून कान पिळून घेण्यात अजून मजा! :)

आरागॉर्न

आरागॉर्न · Fri, 26 Nov 2010 - 14:56

सुरेख परिचयाबद्दल आभार. पुस्तक वाचायच्या यादीत टाकले आहे.