परीक्षण
कणेकरी
एके रात्री निद्रादेवी आमच्यावर अंमळ रूसली.. नि एका बेसावध क्षणी मी पुस्तकांचे कपाट उघडले.. नाहीतरी शनिवारची जंगी खरेदी खुणावत होतीच.. मोठं पुस्तक आख्खी रात्र खाईल म्हणून छोट्सं नि हलकंफुलकं पुस्तक निवडलं-- कणेकरांचं गोतावळा.. पुढे दोन-अडीच तासांत ते संपलं नि मी बाजूला ठेवलेलं झाडाझडती पुन्हा उचललं हे काय आता वेगळं सांगायला हवं?
कणेकर कोणे एके काळी सामनाच्या रविवारच्या पुरवणीतून शब्दचित्रं रेखाटायचे त्याचं हे संकलन. गोतावळा म्हणजे शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर जमणारे इरसाल लोक.. नि अर्थातच त्यांचं शब्द चित्रण. प्रस्तावनेतच कणेकर म्हणतात की ,"यावेळच्या लेखात हवी तशी हजामत नाही झाली" असे अभिप्राय त्यांना मिळाले.. आपण हजामत केल्यासारखी लोकांची खेचतो हे त्यांना स्वत:लाच आवडले नाही.. मग त्यांनी त्या लोकांना यावर खास छेडताच असे काही नाही, उलट आमची लोकप्रियताच वाढली असे सर्वांनी त्याना सांगितले, असे कणेकर म्हणतात!!!! त्यांच्या या गोतावळ्यात अविनाश खर्शीकर, नंदू जूकर, संजय मोने, बाळ ठाकरे, ओ. पी. सारखी सुमारे बावीसशे व्यक्तीचित्रे आहेत..
पुस्तक वाचायला जसं हवं होतं तसं हलकेफुलके आहे.. नि काही अपवाद वगळता , उदा. त्यांचा मावसभाऊ सुभाष, कर्णिक वकील, ते लेखातून हजामत करतात हे वाक्य अगदी पटले.. चारपानी लेखाची पहिली ३ पाने त्या व्यक्तीचित्राची वाट लावण्यात खर्ची पडतात.. नि राहिलेल्या जागेत कधी आणखी एखादा राहिलेला अनुभव आणि "मेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये" च्या चालीवर त्या माणसाबद्दल शेवटी कुठेतरी चांगलं लिहिलं आहे...
सांगायचंच झाले तर अविनाश खर्शीकर बद्दल, "काहीही फुकट मिळेल ते घेऊन ठेवणारा माणूस.. मग ते मित्राच्या गाडीतले प्लास्टीकचे फनेल का असेना", "अवीच्या घरात अन्न शिजत नाही","अविनाशची दोन्-तीन वर्षांनी एकदा होणारी पार्टी म्हणजे एका वड्याच्या बदल्यात आपल्याला त्याला किमान चाळीस चिकनची जेवणं खायला घालणं", "त्याला नाटकाला सेटस लागत नाहीत, लाइटिंग लागत नाही, प्रेक्षकही लागत नसावेत" इ. इ. ओ पी नय्यरच्या तिरसटपणाबद्दलही तेच.. एकूण काय, थोडक्यात 'हजामतच!!'
या हजामतीत एक प्रकरण त्यांनी स्वतःवरही खर्ची घातलंय. स्वतःलाही थोडेफार चिमटे काढले आहेत, पण इतरांच्या चिमट्यांच्या तुलनेत हे काहीच नाहीत. त्यांच्याच गोतावळ्यातल्यातले एक संपादक कणेकरांनी चित्रपट समीक्षकांवर(यांत कणेकरही होते) कणेकरी शैलीतल्या लेखावर काट मारताना, "आपणच आपल्याला मारलेली थोबाडीत आपल्याला लागत नाही" असे म्हणतात ते इथे अगदी पटले..
थोडक्यात काय?
अगदीच न वाचले तरी काही हुकल्याची खंत नाही.. वाचलं तरी वेळ अगदीच वाया गेला असेही नाही छापाचे पुस्तक!!!
टीपः सदर परिचय छोटा डॉन यांना समर्पित!!!!
अभिप्राय
छोटा डॉन
छोटा डॉन · Sat, 19 Jun 2010 - 21:13
हे पुस्तक आम्हाला फार आवडले
( अर्थात आम्हाला कणेकरांचे कुठले पुस्तक अथवा लेख आवडत नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकेल ).
मान्य आहे, कणेकरांनी ह्या पुस्तकात त्याम्च्या मित्रांची खुपच खेचली आहे, अगदी प्रमाणाबाहेर.
पण एक सांगा, आपण कुणाची एवढी खेचतो हो ?
ज्याम्च्यावर आपला जीव असतो, ज्यांच्यावर आपला जीव असतो त्यांचीच ना ? कुणा त्रयस्थाची आपण एवढी खेचतो का ?
असो.
आम्ही आता ह्या पुस्तकातलाच एक संदर्भ सांगु इच्छितो, लेखिका इथे अविनाश खर्शीकरबद्दल कणेकरांचे एक वाक्य देतात "काहीही फुकट मिळेल ते घेऊन ठेवणारा माणूस.. मग ते मित्राच्या गाडीतले प्लास्टीकचे फनेल का असेना".
मान्य, अगदी १००% मान्य.
अहो पण लेखाचा शेवट काय आहे.
कणेकर म्हणतात "मी मुंबईत असताना रोज अविनाशचा फोन येतो, खास काही नाही माझी ख्यालीखुशाली विचारायला. फोन फक्त १ रुपायाचा, तो मी ही करु शकतो पण मी तो करत नाही. अविनाश मात्र रोज न चुकता फोन करतो, अगदी निस्वार्थीपणे".
विषय संपला, असे किती मित्र आहेत हो आपल्याला आयुष्यात जे असे रोज नित्यनियमाने निस्वार्थी फोन करतात ?
बाळ ठाकर्यांचे मान्य, मोठ्ठा माणुस आहे, जपुनच लिहायला हवे, त्यात काहीच वाद नाही.
संजय मोन्यांच्या भाग उत्तम, मी जेवढा संजय मोन्यांना ओळखतो अगदी तोच संजय मोने कणेकर कट टु कत आपल्या लेखातुन मांडतात. आमच्या दॄष्टीने संजय मोने ह्यापेक्षा वेगळा नाहीच.
सुभाषकाका हे कणेकरांच्या आयुष्यातले हळवे प्रकरण, कणेकर अगदी स्वतःच्या "डॉ. कणेकरांचा मुलगा" ह्या आत्मचरित्रात ह्या सुभाषकाकाचा उल्लेख आवर्जुन करतात. त्या काळच्या ब्राम्हण समाजात 'भाई ' असणारा कणेकरांचा काका जरी सर्व कुटुबियांच्या बाबतीत व्हिलन असला तरी अजुन एका पुस्तकात कणेकर त्याच्या बाबतीत लिहतात "सुभाषकाका म्हणजे डॉ. कणेकरानंतर ह्या फॅमिलीतला सर्वात सभ्य आणि लोकप्रिय पुरुष".
बाकी बरेच लिहण्यासारखे आहे माझ्याकडे ह्या पुस्तकाबाबत पण लेखनभयास्तव इथे थांबतो.
अवांतर :
व्यक्तीचित्र लिहणे ही कणेकरांची खासियत.
सुधीर जोशी, संजय मोने, सुभाषकाका, वरेरकर मामा, शिवाजी पार्कवरचा इराणी, त्यांच्या एडीटर बी.आर.व्ही. राव, नंदु होनप आदी कणेकरांनी आजरामर केलेली व्यक्तिचित्रे.
खास असे काही नाही पण मैत्री आणि ॠणानुबंध कसे असावेत ह्याचे आमच्य दॄष्टीने उत्तम उदाहरण.
अतिअवांतर :
रसिक प्रकाशानाचय अधिकॄत माहितीनुसार ( कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये आम्ही ह्या पुस्तकाचे पैसे भरुन ४ महिने झाले आहेत ) हे पुस्तक सध्या "आउट ऑफ स्टॉक" आहे.
कुनाकडे ह्याची जादा प्रत उपलब्ध असल्यास कॄपया आमच्याशी संपर्क साधावा.
कणेकरांच्या आमच्याकडे नसलेल्या मोजक्या पुस्तकापैकी हे एक, आधी होते पण एका मित्राला वाचायला दिल्यावर ते परत आले नाही व येण्याचीही शक्यता नाही.
- छोटा डॉन
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sat, 19 Jun 2010 - 21:56 · उत्तर
डॉण्राव, मुंबईत या आणि ही कॉपी घेऊन जा.. अर्थातच सध्या ती निदे कडे आहे.. तिकडून परत येईल का ते माहित नाही.. त्याच्याकडून मिळवण्याची जबाबदारी तुझी!!!
छोटा डॉन
छोटा डॉन · Sat, 19 Jun 2010 - 22:29 · उत्तर
पुस्तकाच्या मजकुराविषयी जे काही लिहले आहे ते मान्य.
पण पुस्तकप्रेमींनी इथपर्यंतच मर्यादित न राहता इतरही बाबींवर भाष्य करावे असे वाटते.
उदा :
पुस्तकाची क्वालिटी कशी होती ?
बांधणी आणि हाताळणी कशी होती ?
दिलेल्या किमतीला पुस्तक वर्थ वाटले का ?
पुस्तक बाजारात कितपत सहजतेने मिळते ?
वगैरे वगैरे ...
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 20 Jun 2010 - 18:40 · उत्तर
पुस्तकाची क्वालिटी कशी होती ?
चांगली.. पुस्तकाचे मुखपृष्ट, मलपृष्टाचा तसेच आतला कागद चांगल्या प्रतीचे आहेत
बांधणी आणि हाताळणी कशी होती ?
चांगली आहे..
दिलेल्या किमतीला पुस्तक वर्थ वाटले का ?
हो.
पुस्तक बाजारात कितपत सहजतेने मिळते ?
याची उत्तरे सापेक्ष आहेत.. मी जिथे राहाते, तिथे मराठी पुस्तकांची दुकानेच नाहीत.. त्यामुळे तसे ते सहजतेने मिळत नाही असेच म्हणावे लागेल ;)
पण वाट बरीचशी वा़कडी करून ठाण्याच्या मॅजेस्टीकमध्ये गेलात, तर अगदी समोरच दिसते.. म्हणजे जरी खास हेच पुस्तक घ्यायला म्हणून तुम्ही जरी गेला नाहीत, तरीही ते दिसतेच. मग घ्यायचे की नाही ते तुम्ही ठरवू शकता.
कालच बाकी शून्य वाचून संपल्यामुळे अजून प्रश्नांचा विचार करायला डोके नकार देत आहे.. कुणाला सुचल्यास पाठवा, उत्तर देण्यात येईल.
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 21 Jun 2010 - 03:59 · उत्तर
>>कालच बाकी शून्य वाचून संपल्यामुळे अजून प्रश्नांचा विचार करायला डोके नकार देत आहे.. कुणाला सुचल्यास पाठवा, उत्तर देण्यात येईल.
शून्यातुन बाहेर पडा .. धक्कादायक दु:स्वप्नातुन बाहेर पडा !!
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 23 Jun 2010 - 20:38 · उत्तर
डॉनराव या पुस्तकात सुभाष या त्यांचा मावसभावा बद्दल लेख आहे. त्यांनाच तुम्ही काका म्हणत आहात का??? किंवा सुभाष काका हे वेगळे कॅरेक्टर आहे???
या पुस्तकात सुधिर जोशी, शिवाजी पार्क वरचा इराणी, नाहीएत.. या शिवाय वररेकर मामांचेही व्यक्तिचित्र नाहिए. एक एडवणकर मामा आहेत.. बाकी व्यक्तीचित्रे कुठल्या पुस्तकातले आहेत.
सध्या माझ्याकदे उपलब्ध असलेलेई प्रत ही तिसर्या आवृत्तीतली आहे. ही मे २०१० ची आवृत्ती आहे. जरा रसिक कडे तपासुन घ्या :-)
छोटा डॉन
छोटा डॉन · गुरुवार, 24 Jun 2010 - 05:36 · उत्तर
नक्की आठवत नाही आता, म्हणजे त्यातले संदर्भ वगैरे आठवत असले तरी तो मावसभाऊ ( ह्याबाबत साशंक आहे, काका असावा, पाहुन सांगतो ) की काका ही गडबड होत आहे.
पुस्तक वाचुन बरेच दिवस झाले अहेत व आता हातातही नाही.
पण कणेकरांच्या बर्याच पुस्तकात ह्या "सुभाषकाका"चा उल्लेख येतो, अगदी त्यांच्या आत्मचरित्र टाईप असलेल्या 'डॉ. कणेकरांच मुलगा' ह्यातही ते सुभाषचा उल्लेख आवर्जुन करतात.
असो, बघतो अणि जे काही बरोबर असेल ते लिहतो.
( मला एक सांगा हा सुभाष म्हणजे तोच ना भाई वगैरे असतो, त्याच्यावर सुर्याचा वार होतो, रुईया कॉलेजमध्ये टाय लाउन हिंडणारा हाच ना सुभाष ?
उत्तर होय असेल तर मग तो बहुदा 'सुभाषकाका'च आहे.
असो, सांगतो नंतर )
होय खरे.
'गोतावळा' हे त्या शिवाजी पार्कवरच्या इरसाल नगांना समर्पित पुस्तक आहे.
बाकी व्यक्तिचित्रे कुठल्या पुस्तकात आहेत ते आता लगेच आठवत नाही.
माझ्याकडे आहेत बरेच पुस्तके कणेकरांची, त्यात पाहुन इथे लिहीन असे सांगतो.
तुर्तास माहीत नाही असे सांगतो.
काय माहित ?
त्यांनी २ आठवड्यापुर्वी मला 'व्यासपर्व' पाठवले व त्यासोबत हे 'गोतावळा' सध्या उपलब्ध नसल्याचे सांगितले.
असो, नव्या आवृत्तीच्या माहितीच्या आधारे तपासुन पहातो.
धन्यवाद.
- छोटा डॉन
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 21 Jun 2010 - 05:39
मस्त परिचय.
पुस्तक एकंदरित कलंदरबाईंना आवडलेले दिसत नाही. पण डॉनरावांना आवडलेले दिसते .. त्यांनीही याच पुस्तकावर एक परिक्षण/परिचय येउ द्यावा ही विनंती.
बाळ ठाकर्यांच्या प्रकरणात काय आहे ?
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 21 Jun 2010 - 06:01
पुस्तक वाचले आहे.. मला ते फारसे आवडले नव्हते.. कितीही जवळचा असला तरी मित्राची हजामत अशी भर चौकात कोण करतं? व्यक्तीचित्र म्हणून विचाराल तर मला बर्याचदा कणेकर भडक वाटतात. या पुस्तकात काहि व्यक्तींची पूर्ण ओळख न होता केवळ हजामत हा उद्देश वाटतो मात्र काहि व्यक्ती काहि काळ डोक्यात घर करतात हे ही तितकेच खरे.
+१
बाकी, सध्या पुस्तक-भस्म्याने ग्रस्त मक आणि कणेकर फ्यान, वायदेआझम डॉन्या यांनी केलेल्या चर्चेमुळे (ज्याला वादही म्हणता येईल पण ते असो ;) ) ह्या पुस्तकाला फुकटचे व अवास्तव मिडीया कव्हरेज मिळू नये असे वाटते ;)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 21 Jun 2010 - 13:51
पुस्तक सध्या वाचतोय..
फारसे काही आवडतेच आहे असे नाही..
पुर्ण वाचुन झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देउच
परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार · Tue, 22 Jun 2010 - 08:31
कणेकर गुर्जीं म्हणजे लै भारी माणुस.
अक्षर न अक्षर वाचण्यासारखे.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 23 Jun 2010 - 20:32
काही पुस्तके हातात घेतले की वाचुन संपल्याशिवाय खाली ठेवल्या जात नाही तर काही पुस्तक उगाच रेंगाळतात. माझे गोतावळा असेच रेंगाळले होते शेवटी काल वाचुन संपवले. तसे मुळात कणेकरांची टिपीकल असलेली स्टाईल ही नेहमी आवडुन जाते. पण या पुस्तकात तितकीशी आवडली नाही. या पुस्तकात वर सांगीतल्या प्रमाने कणेकरांनी आपल्या आजुबाजुंच्या मित्रांचे व्यक्तिचित्रे लिहिली आहेत. व्यक्तीचित्रे म्हणले की फक्त पुलंच नाव डोळ्यासमोर येते. कदाचीत पुलंच्या व्यक्तीचित्रांचा असलेला पगड्यामुळेच हे पुस्तक फारसे आवडत नाही का काय??
या पुस्तकातले काही प्रकरण मस्तच झाले आहेत त्याबद्दल वाद नाहीच.. संजय मोने बद्दल लिहिलेले आवडुन जाते, त्याच सोबत सुभाष या त्यांचा मावस भावाबद्दलच्या आठवणी छानच मांडलेल्या आहेत...
काही प्रकरण रंगलेले नाहीएत.. त्यातल्या त्यात बाळासाहेबांबद्दल फारसे काही नवीन काही कळत नाही फक्त मलाच बाळासाहेब खुप समजलेत अशी लेखकाही आढ्यता दिसुन येते.
त्याच बरोबर कर्णिक वकिल यांचा बद्दल तर एकही शब्द चांगला लिहिलेला नाहिए..कारण काय असावे.. तो माणुस कणेकरांना चांगले लिहित जा असा सल्ला देतो म्हणुन तर नाही..एकुणच कर्णिक वकिल हे प्रकरण "गोतावळा" या पुस्तकासाठी सुट होत नाही असे वाटते.
हे पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही असे वाटते.