परीक्षण

कोसला

परीक्षण मजकूर

-- हे लेखन ह्यापुर्वी मायबोली.कॉम ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले आहे. http://www.maayboli.com/node/17147 ह्या दुव्यावर हे लेखन व त्यावर झालेली चर्चा वाचता येईल. --

बाई मृताचे धर्म : जिवतां प्रति : कैसे निरूपावे ॥

शंभरातील नव्व्याण्णंवास.. मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच एव्हडी भन्नाट सुरु होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त. वर लिहिलेली ओळ ह्याच पहिल्या पानावरची. कोसला. म्हणजे कोष.

कुठल्यातरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वत:ची कथा सांगायला सुर करतो. कथा घडते मुख्यत्वेकरुन ५९ ते ६३च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई-आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडणं, मुळची त्रास देण्याची वृत्ती, वडिलांची क्षुल्लक गोष्टीतली लांडी-लबाडी खोटारडेपणा आणि ह्यात तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान व वरुन घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टाळत ’व्यक्तिमत्व’ घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर, गॅदरिंगला कल्चरल सेक्रेटरी होउन पदरचे पैसे खर्च केलेला सेक्रेटरी, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत ’चमकण्याच्या’ मागे असलेला सांगवीकर, घरुन येणार्‍या पैश्यांची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या-गेलेल्याला चहा-सिगरेटी पाजणारा सांगवीकर, मेस सेक्रेटरी असताना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर इंटरच्या आणि ज्युनिअरच्या वर्षात वाहत जातो. मनू मेल्याचे दु:ख पचवण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैश्याची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात न खुळखुळवणार्‍या मित्रांबरोबर राहूनही एकूणातच सर्वांपासून अलिप्त होत, दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो. आणि मग शेवटी एकूणच परिक्षेत पेपर सोडून शिक्षणाला रामराम ठोकून, गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंदा-कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम बघत, इतर अश्याच शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसचे दिवस ढकलणारा, आता जे होइल ते होवो, सगळेच भंकस, मग का चिंता करा अश्या पराभूत तत्वज्ञानाशी येउन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कथा.

पण ह्या सगळ्या स्थित्यंतरात कोसला ह्या कलाकृतीने किती एक गोष्टी वाचकाच्या समोर आणल्या आहेत. कोसलाची भाषाशैली. सुरुवातीला उदाहरणार्थ, वगैरेचा अतिरेक करुन तेव्हाच्या रुळलेल्या कादंबरीय भाषेला छेद देत कोसला सुरु होते. कोसलात कुठेही, 'आई म्हणाली, "..." - मग अवतरणचिन्हात संवाद वगैरे भानगड नाही. संपूर्ण गद्य सलग शैलीत लोकांमधील संवाद, पांडुरंगाची मानसिकता (पुस्तक प्रथमपुरुषी निवेदनशैलीत आहे) एकामागोमाग येत राहतात. पण वाचकाला कुठेही तुटकता येत नाही, गोंधळ उडत नाही. असे लिहिणे खरेच फार अवघड आहे. कोसलात कुठेही शिवीगाळ नाही, लैंगिक-कामुक वर्णने नाहीत, मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्या श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा बोलताना पाळल्या जातात त्या मर्यादेत संपूर्ण पुस्तकभर भाषा आहे. पण कुठेही ती भाषा मिळमिळीत होत नाही. तसेच रुक्ष मन:स्थिती, वास्तवता दाखवण्यासाठी भडक शब्दांची साथ घेत नाही. तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब कोसलात पडत राहते, आजूबाजूला दिसत राहते. वेगवेगळ्या कुटुंबामधून, आर्थिक स्तरांतून आलेली मुले-मुली, त्यांची राहण्याची-वागण्याची पद्धती, पांडुरंगचा श्रीमंत-गरीब असणाची वर्षे, त्याचे बदलणारे मित्र आणि सिगारेटी कथानक पुढे नेत राहतात. डायरीच्या रुपातून एक आख्खे वर्ष समोर येते. भविष्यातल्या इतिहासकाराच्या नजरेतून आजच्या समजाची टर उडवली जाते. महारवाड्यातल्या वह्यातून जगण्याचं एक तत्त्वज्ञान बाहेर येतं.
पण ह्या सगळ्यातून एक समान धागा, सूत्र वा विचार येत राहतो तो पांडुरंगला पडलेल्या प्रश्नांचा - जगण्याचे प्रयोजन, असण्याचे प्रयोजन, असलोच तर मी असाच का वा दुसरा एखादा तसाच का - शोध, त्यांची न मिळणारे उत्तरे, उत्तरं न शोधता त्यापासून दूर दूर पळणारा पांडुरंग आणि मृत्युमुळे हे सुटेल काय ह्याची खोल मनात तळ करुन असलेली त्याची आशा हे कादंबरीत जागोजागी येत राहतात. ’भटकते भूत कोठे हिंडते?’ अश्या एका तिबेटी प्रार्थनेपासून ह्या प्रश्नाच्या मृगजळामागे पांडुरंगाचा प्रवास सुरु होतो. मनीच्या मृत्युंनंतर तो हे प्रश्न थेट विचारतो. पण तेव्हडेच. बाकी सगळीकडे अप्रत्यक्षपणे, माहिती असून तो प्रश्नांना सामोरा जात नाही. उत्तरं वांझोटीच असणार आहेत असा एक विश्वास त्याला आहे. आणि म्हणुनच त्याच्या हाइटन्ड मोमेन्ट्सनंतर तो भरार पाणी ओतून रिकामा होतो. उदाहरणार्थ, सांगवीकरच्या तिसर्‍या वर्षाच्या खोलीचे एक गहिरे चित्रण करुन, एका स्वप्नातून उभी केलेली हॉस्टेलच्या आयुष्यातली क्षणभंगुरता पण तरिही एकमेकांबरोबर व्यतीत केलेला प्रचंड वेळ ह्या सगळ्याचा अंत एका वहिवाल्याच्या वहीनं होतो:
क्रम संपता दोन्ही भाई भांडती हो भांडती
आत्मा कुव्हीचा नाही कोनी सांगाती हो SSS सांगाती
अन्‌ आत्मा कुव्हीचा नाही कोणी सांगाती SS
पण ह्या इंटेन्स/तीव्र वातावरणात सुर्श्याचा एक जोक लगेच पुढे येतो: ’एकजण अचानक माझ्या खोलीवर टकटक करून बळजबरीनं आत आला. तो म्हणाला, एक्स्क्यूज मी. ही माझी पुर्वीची खोली. आहा. हीच खोली. काय ते दिवस. हीच ती खिडकी. हेच बाहेरचे झाड. असंच माझं टेबल खिडकीशी असायचं. आहा. हीच कॉट. अशीच माझीही होती. हेच माझं कपाट. ह्या कपाटात मी कपडे ठेवायचो. आहा, आणि ह्यात अशीच लपून बसलेली नागडी मुलगी.’ बदबदा पाणी ओतून पांडुरंग रिकामा.

पांडुरंगाची सगळ्याला क्षुल्लक ठरवण्याची वृत्तीच्या मागे मी का जगतोय वा काय अर्थ आहे का ह्याला हा धागा जास्त दिसतो. त्यातून तो सुरुवातीला गावाला, गावातल्यांना, त्यांच्या मानसिकतेला शिव्या देत शहरात रमून जायचा प्रयत्न करतो तर कादंबरीच्या शेवटाला शहराला शिव्या देत गावच बरा म्हणत येतो. नॉस्टॅल्जिया त्याला तो येवून देत नाही, पण खोल तळाशी कुठेतरी त्याला एक एक सोडून जाणारा मित्र, खोली, वर्षे अस्वस्थ करत जाते. शेवटाला तो सगळंच सोडून फक्त प्रवाहात तरंगणारी काडी व्हायला तयार होतो.

’कोसला’ने एक पुस्तक म्हणुन मला स्वत:ला प्रचंड आनंद दिला आहे. पांडुरंग पलायनवादी आहे का? हो, आहे. निराशावादी आहे का? हो, आहे. तो रुढार्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे का? नाही. पण म्हणुन मला कोसला कमअस्सल वाटत नाही. अशी माणसेदेखील असतात, आहेत. कोसलातला पांडुरंग पराभूत होतो, निराश होतो, सत्यापासून पळून जातो म्हणुन कोसला दुय्यम वा अवाचनीय ठरत नाही. उलट एक अतिशय समृद्ध, सकस साहित्यकृतीचा अनुभव वाचकास नक्कीच देते. कोसलातील कित्येक प्रसंगांचे वर्णन अफाट आहे. कुठेही जडबंबाळ, बोजड, अलंकारीक भाषा नाही. वाक्य पण सगळी छोटी-छोटी तुकड्यात. पांडुरंगाला सुर्श्या पहिल्यांदा भेटणे आणि त्यांची दोस्ती होणे हे केवळ ’पण सुरेश सारखा माझ्या डोक्याकडे पहात होआ. शेवटी तो म्हणाला, तुमची बाटली फुटली वाटतं? हे थोरच आहे. मग आमची दोस्ती झाली.’ इतक्याच मोजक्या संवादातून उभे करतो. कोसलामधला विनोद पण सहसा न आढळणार्‍या पद्धतीचा आहे. तो होतो, घडवून आणला जात नाही आणि विनोद केल्यावर लेखक 'बघा मी कसा विनोद जुळवुन आणला' असे न करता मॅटर ऑफ फॅक्टली पुढे जातो. उदा. तांबेचे कविता करणे, त्याच्या जीवनात उद्दिष्ट्य असणे आणि महान नाटके लिहिणे: तांबेच्या नाटकातला एक प्रवेश -
प्रभाकर: (मागे सरुन) सुधा याचं उत्तर दे.
सुधा: अरे पण प्रभा, माझे वडिल माझ्याबरोबर होते, आणि तू हाक मारलीस.
प्रभाकर: (पुढे येत) असं होय? मला वाटलं तू मला माकड म्हणालीस ते मनापासूनच.
हे असले भयंकर लिहीत कोसला तुम्हाला बुडवून टाकते. मावशीच्या नवर्‍याने ’इतिहासच घे बीएला, इतिहासाच्या प्राध्यापकाला दरवर्षी नवीन वाचायला लागत नाही’ असे सांगणे, इचलकरंजीकर, रामप्पा, ते दोघे, सिगरेटी, मद्रास, चतुश्रुंगी-वेताळ टेकड्या, अजंठ्याची सहल सगळेच महान - ओघवते - प्रवाही. अजंठा तर केवळ महान. मनू मेल्यावरची पांडुरंगची तगमग, घरातल्या सर्वांवरचा राग, आपण काही करु न शकण्याचे, क्षुद्र असण्याची जाणीव, पलायनाचे मार्ग शोधणे हे सगळे पुन्हा-पुन्हा येते. तो एके संध्याकाळी पावसात भिजून हॉस्टेलवर परतल्यावर पांडुरंगला झालेला साक्षात्कार की गेली चार वर्षे राहिलेली ही जागा, इतक्या मित्रांसोबत काढलेला वेळ, कुणाचेच कुणी नाही. सगळेच इथे तात्पुरते. आपले काहीच नाही. आणि मग कादंबरीत क्वचितच येणारा थेट प्रश्न - ’मग सगळ्या आयुष्यात हेच - आपल्या कशालाच किंमत नाही’. आणि मग शेवटच्या पेपरात पाय लांब करुन दोनच प्रश्नांची उत्तरं लिहून बाहेर पडलेला सांगवीकर. मी प्रत्येकवेळी हा भाग वाचताना शहारतो - घाबरतो. केवळ उरतो.

भटकते भूत कोठे हिंडते?
पूर्वेकडे? की उत्तरेकडे.
पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.
देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्‍याकोपर्‍यांत विखुरले आहे आणि तुला
ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस
ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू
मार्गस्थ होशील.

तिबेटी प्रार्थना.
(कोसलातील दुसर्‍या पानावरुन).

अभिप्राय

भोचक

भोचक · Mon, 5 Jul 2010 - 08:37

कोसला खूप आधी वाचल्याने आठवणी पुन्हा जागल्या. आता पुन्हा एकदा कोसला वाचावंसं वाटतंय. नवे काही संदर्भ लागतील असं वाटतंय. खरं तर ती चतुष्टीच पुन्हा वाचाविशी वाटतेय.

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 5 Jul 2010 - 18:57

ओय होय, काय परिचय आहे !!
कित्येक दिवस ब्यागेत पडुन असलेले कोसला, कंटाळवाणे आणि निरस वाटणारे कोसला, पुन्हा वाचावेसे वाटेल असे वाटले नव्हते. तुमचा परिचय वाचुन धुळ झटकली जाणार हे निश्चित :)

पुस्तकविश्ववर स्वागत !!

वल्ली

वल्ली · Wed, 7 Jul 2010 - 06:19

सुंदर रसग्रहण. ४/५ दिवसांपुर्वीच कोसला दुसर्‍यांदा वाचून संपवल्यामुळे सर्व संदर्भ ताजेच होते.
नेमाड्यांच्या बिढार, हूल, जरीला, झूल या चांगदेव चतुष्ट्य बद्दल महिती हवीय.

टण्या

टण्या · Wed, 7 Jul 2010 - 08:06

वल्ली, तुम्हाला बिढार, हूल, जरीला आणि झूल बद्दल काय माहिती हवी आहे नक्की?

वल्ली

वल्ली · गुरुवार, 8 Jul 2010 - 05:45 · उत्तर

म्हणजे यांचे कथानक नेमक्या कुठल्या स्वरूपाचे आहे का हे कोसलाचेच एक्स्टेंशन आहे. चतुष्ट्य ने कोसलाचीच उंची गाठलीय का? विकत घेउन संग्रही ठेवण्यासारखे आहे काय?

टण्या

टण्या · गुरुवार, 8 Jul 2010 - 14:11 · उत्तर

चांगदेव चतुष्टय हे कोसलाचे एक्स्टेंशन नव्हे.. नायकदेखील स्वतंत्र आहे, त्याची पार्श्वभुमी वेगळी आहे आणि नायकाच्या आयुष्यातला जो काळ मांडलेला आहे तोदेखील संपूर्णपणे वेगळा (बिढार थोडेसे ओव्हरलॅप होते कोसलाच्या शेवटच्या काळाशी असे म्हणता येईल).. पण कोसला ही प्रामुख्याने पांडुरंगची कथा आहे, त्याच्या अंतर्गत कलहाची कथा आहे.. तिला सामाजिक संदर्भ आहेत पण मध्यवर्ती पांडुरंग आहे..
चांगदेव चतुष्टय मात्र चांगदेवच्या नजरेतून सामाजिक परिस्थिती, तिचे स्खलन, त्याचा इतरांवर व चांगदेवावर पडणार प्रभाव ह्याबाबत अधिक आहे. काहिजणांच्या मते नेमाडे तीच ती गोष्ट चारही पुस्तकातून आळवतात.. थोडेफार नेपथ्य बदलून. मला असे वाटत नाही.
इथे कोसलाच्या धाग्यावर इतकेच असुदे. चांगदेव चतुष्टयावर स्वतंत्र लिहिण्याच्या लायकीचे ते नक्कीच आहे.

हिंदू १५ जुलैला प्रकाशित होत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच प्रकाशनपूर्व नावनोंदणी केलेली आहे. बघू, भ्रमनिरास न व्हावा ही इच्छा आहे.

>> विकत घेउन संग्रही ठेवण्यासारखे आहे काय? >> तुमची आवड काय आहे ह्यावर हे अवलंबून आहे. पण तरिही असे म्हणेन की ग्रंथालयातून आणून वाचा. आवडले तर काय संग्रही ठेवू शकालच.

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Fri, 9 Jul 2010 - 03:18

पुस्तक परिचय आवडला. कोसलावर अनेकानेक लोकांनी केलेल्या भाष्याचेच एक कंपायलेशन प्रसिद्ध आहे : "कोसलाविषयी". यात दिपु चित्रे, चंद्रशेखर जहागीरदार इ. इ. अनेकांचे लेख आहेत.

कोसला आणि कॅचर इन द राय् चा अतूट संबंध दाखवणारा एक उत्तम लेख :
http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html

टण्या

टण्या · Sat, 18 Sep 2010 - 00:41

वर मुक्तसुनीत ह्यांनी उल्लेख केलेले हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. बाबा भांड ह्यांनी 'कोसला'बद्दल ६२-६३ पासून ८०च्या दशकापर्यंत लिहून आलेल्या अनेक लेखांचे संकलन केलेले आहे. ह्यात केवळ कोसलाची नुसतीच स्तुती करणारे लेख नसून कोसलावर कडाडून टिका करणारे लेख पण आहेत. बहुतांशी लेख वाचनीय आहेत.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 12:55

प्रत्येक कॉलेज तरूणाच्या तनीमनी एक 'पांडुरंग' लपलेला असतोच आणि एखाद्या नेमाड्यांनी त्याला शब्दरूप दिल्याचे पाहिल्यानंतर मन ज्या विभोर आनंदाने फुलून येते त्याला तोड नाही. पांडुरंगच नव्हे तर सुर्शा, इचल्या, रमी, बुंदी ही मंडळी आणि हॉस्टेलमधील वातावरण तर अविभाज्य अंगच.

हे झाले कॉलेज....पण तितकेच प्रभावी आहे, पांडबाची उंदीर मारण्याची धडपड....हे तर जीवनाचे एक मेटॅफरच आहे... सापडला सापडला असे म्हणेपर्यंत उंदीर गायब.....आणि शिकार झाली म्हणत असतानाच हाती येतो एक टोबराच. दुसर्‍या प्रयत्नात उंदराला यमसदनाला पाठविण्याचा आनंद क्षणभंगुरच, कारण तो पठ्ठ्या परत पांड्याला वाकुल्या दाखवायला हजरच.....एका तरूणाच्या आयुष्यातील हा सावनभादोचा खेळ म्हणजे प्रत्यक्षात नियतीचाच खो-खो.

छोट्या बहिणीचा मृत्युबद्दल तर पांडूचे दु:ख काय वर्णावे.

....'कॅचर' बरोबर सातत्याने 'कोसला' ची तुलना होत असल्याचे आपण तर पाहतोच पण खुद्द नेमाड्यांनी तर सन १९६३ च्या पहिल्या आवृत्तीपासून पाहिलेले आहे. टिपिकल महाराष्ट्रीयन मेंटॅलिटीचे उदाहरण म्हणजे एखादी कलाकृती गाजली की ती कशी युरोप/अमेरिकन साहित्यावर बेतलेली आहे याचा शोध घेत बसणे ! असली बेतलेली तर असो, काय बिघडते त्यामुळे आपल्या आनंदाचे ? आणि अशा किती कादंबर्‍या आहेत मराठी भाषेत, ज्याचे स्थान 'ज्याचे नाव ते' अशा लेबलला पात्र आहेत? असो. (सचिनने कितीही पराक्रम केला तरी मराठी माणसातदेखील अशी काही सतत ओवा खाणारी मंडळी आहेत की, ते न विचारताच मताची एक पिंक टाकतातच; "केलं हो शतक, पण ऑस्ट्रेलियाचे नेहमीचे गोलंदाज आले नव्हते दौर्‍यावर....म्हणून..." काय बोलायचे अशा नतद्र्ष्टांबाबत ?)

आपल्याला 'सांगवीकरां'ने जो आनंद दिला आहे तो अतुलनीय अशा स्वरूपाचाच आहे....आणि आम्ही त्याबद्दल श्री.भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी कृतज्ञताच व्यकत करतो.

इन्द्रा

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 16 Oct 2010 - 09:27 · उत्तर

>>आपल्याला 'सांगवीकरां'ने जो आनंद दिला आहे तो अतुलनीय अशा स्वरूपाचाच आहे....

मला हे समजुन घ्यायला आवडेल.
"या कादंबरीत सांगवीकर या व्यक्तिरेखेचे अगदीच चारचौघांचे आयुष्य अगदीच निरसपणे लिहले आहे", असे माझे मत मला बदलायला आवडेल. (उदाहरणार्थ मिलिंद बोकिलांच्या शाळेचा नायक वाचतांना निरागसता दाखवतो, त्याचा आनंद सर्वसामान्य वाचकाला घेता येतो.)
सांगवीकर ही व्यक्तिरेखा "उदाहरणार्थ" चा अतिरेकी वापर करते यातुन एक सर्वसाधारण खेडेगावात वाढलेला मुलगा पुण्यासारख्या मोठ्या शहरात शहरी व्हायचा प्रयत्न करतो असे दाखवायचे आहे का ?

टण्या

टण्या · Sat, 16 Oct 2010 - 00:18

इंद्रजीत, मला तुमची 'कोसला' प्रिती व कॅचरशी सतत तुलना करुन ती कशी 'ढापलेली' कादंबरी आहे असे सतत अधोरेखीत करण्याच्या लोकांच्या प्रयत्नांबद्दलची चीड हे दोन्ही भावले.
पण वर मुक्तसुनीतने दिलेला दुवा खरेच वाचण्याजोगा आहे (ही अनुदिनी पुस्तकविश्ववरच्याच एका सदस्याची आहे). त्यात दोन्ही कलाकृतींची सौंदर्यस्थळे, समान धागे, फरक वगैरे उत्तम मांडले आहेत.

'कॅचर इन द राय' ही तिच्याजागी एक महान कलाकृती आहेच.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 16 Oct 2010 - 09:43 · उत्तर

".....'कॅचर इन द राय' ही तिच्याजागी एक महान कलाकृती आहेच..."

नक्कीच....आणि बीबीसीच्या "One Hundred Best Novels of The Century" मध्ये कॅचरला मानाचे स्थान आहे; जी मी स्वतः वाचलेली आहेच. पण मग मराठी शारदेच्या प्रांगणात फक्त एकटी 'कोसला'च आहे का जी एखाद्या पाश्च्यात्य कलाकृतीवर बेतलेली आहे? फडक्यांच्या 'प्रतिभासाधन' वर काय कमी गोंधळ उठला होता? पेंडशांची 'रथचक्र' काय आणि व्यंकटेश माडगुळकरांचे 'सत्तांतर' ही अकादमी विजेती पुस्तके अशाच वादात नव्हती काय? हे झाले ललित बद्दल....पण ज्यावेळी रा.भा.पाटणकरांच्या 'सौंदर्यमीमांसा'ला आणि प्रभाकर पाध्यांच्या "सौन्दर्यानुभावा" ला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले त्यावेळी 'ललित' सारख्या साहित्यविषयक मासिकात "पारितोषिक पाटणकरांनी की रिचर्डसला?' असे टोमणे आले होते. ही एक वाङ्मयीन प्रक्रिया असते जी कुठल्याही भाषेतील लेखक अंगिकारतो. अशी योजना ज्यावेळी आपल्या लेखनासाठी तो वापरतो त्यावेळी त्याच्या डोक्यात त्यांने गावात, सोबत्यात, कॉलेजजीवनात, नोकरीपेशात व्यतीत केलेल्या क्षणांचे प्रतिबिंब येणे नैसर्गिकच आहे. मग तो लेखक 'कोसला' चा असो वा 'कॅचर'चा....'जीन्स' मध्ये फरक नसतो, असतो तो कातडीच्या रंगात.

बर्‍याच वेळा आपण असे वाचतो की, "सचिन तेंडुलकर डिट्टो ब्रॅडमन सारखा खेळतो..." यात तेंडुलकरच्या पराक्रमाला गालबोट लागत नाही. त्याने शिकले असतील त्या महान व्यक्तीकडून एकदोन धडे, पण शंभरातील नव्व्याण्णव फटके त्याचे स्वतःचेच आहेत ना? मग "पांडुरंग आणि होल्डन कॉल्फिल्ड" हे दोघेही एकाच सायकलवर बसलेले "टीनएजर्स" आहेत इतपतच साम्य आणि इतपतच दोन कादंबर्‍याची तुलना ठीक आहे. दोघांनीही एका विशिष्ट वळणावर फारकत घेतली आहे. पण झाले आहे असे की, टीकाकार नावाची एक राखुंडी जमात आपल्या मराठी प्रांगणार आहे जी, 'गाजतोस काय लेका, बघ तुला कसा पकडतो आता..." यातच मश्गुल असते.

"कॅचर" ला आपण महान म्हणतो पण खुद्द अमेरिकेत कॅचरपेक्षा कॉलीन मॅक्ईन्सच्या 'अ‍ॅब्सोल्युट बिगिनर्स" ला तेथील कॉलेजकुमार डोक्यावर घेतो हेदेखील नोंदवावे लागेल.

इन्द्रा

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Sat, 16 Oct 2010 - 13:43 · उत्तर

मला वाटतं कॅचर इन द रायशी केल्या जाणार्‍या कोसलाच्या तुलनेमागे निव्वळ टीकाकारांची चौर्यकर्म पकडण्याची हिरिरी नाही, तर नेमाड्यांचा देशीवादही काही प्रमाणात त्याला कारणीभूत आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी साहित्य पुष्कळ परपुष्ट आहे. असं पुष्ट होणं हे सुदृढ होण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून मोकळेपणानं घेतलं गेलं तर ते सहज मान्य करून पुढे जाता येतं. जी.ए., तेंडुलकर, एलकुंचवार, दिलीप चित्रे, विलास सारंग असे अनेकजण पाश्चिमात्य साहित्याविषयी आपलं प्रेम भरभरून आणि मोकळेपणानं मांडतात. पण नेमाडे देशीवाद मांडताना पाश्चिमात्यांना खूप झोडतात. म्हणून मग त्यांच्या साहित्याच्या परपुष्टतेविषयी टीका/चर्चा अधिक होते असं वाटतं.

नंदन

नंदन · Sat, 16 Oct 2010 - 14:34 · उत्तर

पण मग मराठी शारदेच्या प्रांगणात फक्त एकटी 'कोसला'च आहे का जी एखाद्या पाश्च्यात्य कलाकृतीवर बेतलेली आहे?

इन्द्रा, हा युक्तिवाद पटला नाही. खोडकरपणा करताना एखाद्या मुलाला कोणी पकडलं तर त्याच्या आईने 'सार्‍या गावात माझाच मुलगा तुम्हांला खोडकर म्हणून सापडला का?' असा प्रश्न विचारावा आणि 'सगळे मेले माझ्याच मुलाच्या वाईटावर टपलेत' म्हणून शेरा मारावा त्यातला थोडा प्रकार वाटला.

टीकाकार नावाची एक राखुंडी जमात आपल्या मराठी प्रांगणार आहे जी, 'गाजतोस काय लेका, बघ तुला कसा पकडतो आता..." यातच मश्गुल असते.

ही बाब (राखुंडे टीकाकार) निव्वळ मराठीपुरती मर्यादित नसावी. वर चिं.जं.नी दिलेल्या कारणाशी सहमत आहेच, पण जर 'जे जे प्रसिद्ध ते ते टाकाऊ' हे अतिरेकाचं एक टोक झालं, तर त्याचा प्रतिवाद करताना बर्‍याचदा दुसरं टोक गाठलं जातं आणि आपल्या आवडत्या लेखकाला सारे कसे उपेक्षेने मारून राहिले आहेत, अशी भूमिका घेतली जाते. दोन्ही अभिनिवेश बाजूला ठेवून विचार करण्याचा प्रयत्न केला तर 'कोसला'चं प्रेरणास्थान म्हणून 'कॅचर'कडे बोट दाखवण्यात कुणाचा आक्षेप असू नये. सचिन-ब्रॅडमनपेक्षा इथे सलील चौधरी-इतना ना मुझसे तू प्यार बढा-मोझार्टची चाळिसावी सिम्फनी हे उदाहरण अधिक सयुक्तिक ठरावे. त्यांनी मोझार्टची प्रेरणा मान्य करून मूळ कलाकृतीला दिलेल्या भारतीय रुपड्याकडे लक्ष वेधलं होतं. नेमाड्यांनी तसं कुठे केलेलं दिसत नाही.याच न्यायाने अजून थोडे बदल करून 'ती फुलराणी'ही स्वतंत्र नाटक म्हणून खपवता आलं असतं की.

"कॅचर" ला आपण महान म्हणतो पण खुद्द अमेरिकेत कॅचरपेक्षा कॉलीन मॅक्ईन्सच्या 'अ‍ॅब्सोल्युट बिगिनर्स" ला तेथील कॉलेजकुमार डोक्यावर घेतो हेदेखील नोंदवावे लागेल.

अ‍ॅब्सल्युट बिगिनर्स ही कॅचरपेक्षा कॉलेजकुमारांत अधिक लोकप्रिय आहे किंवा कसे, याबद्दल खात्री नाही.(वैयक्तिक निरीक्षण याउलट आहे, पण आकडेवारी माहीत नसल्याने तसं गृहीत धरून चालू.) समजा असं असलं तरी कॉलेजकुमारांतली पुस्तकाची लोकप्रियता = पुस्तकाची महत्ता असा अर्थ या वाक्यातून ध्वनित होऊ शकतो. इतकं सुलभीकरण तुला अभिप्रेत असावं असं वाटत नाही, तेव्हा ह्या मुद्द्याचे कोसला-कॅचर चर्चेतले प्रयोजन समजले नाही.

टण्या

टण्या · Sat, 16 Oct 2010 - 16:59

माझ्या मते कोसला व कॅचर ह्यांची तुलना होणे हे स्वाभाविक आहे. तसेच त्यात गैर काही नाही. कॅचरशी तुलना झाल्याने कोसला उणी होत नाही. कॅचरशी तुलना होणे, इतर जागतिक साहित्यातील कलाकृतींचा/प्रवाहांचा असलेला प्रभाव (केवळ ह्याच नव्हे तर इतर मराठी कादंबर्‍या/कथासंग्रहांबाबतदेखील) हे एकूण वाचकाच्या अनुभवांना अधिक समृद्ध करणारे ठरते.

इंद्रजीत ह्यांच्या प्रतिक्रियेतून 'कॅचरशी तुलना करण्यामागे कोसला ही उपरीच वा ढापलेली कादंबरी आहे हे सिद्ध करणे हा हेतू आहे' असा सूर उमटतो आहे असे मला वाटले. ज्यांना 'कोसला'ला कुठल्यातरी कारणास्तव खाली खेचायचे आहे ते कॅचरच्या माध्यमातून वा इतर काही मार्गाने ते काम करतील.
जसे कोसला अतिशय आवडणारे वाचक आहेत तसेच कोसला न आवडणारे वाचकदेखील असू शकतात. त्या सर्वांचे नेमाडेंशी वाकडे असेल असे नाही (जसे कोसला आवडणार्‍या माझ्यासारख्या अनेकांना नेमाडे हे व्यक्तिम्हणून माहिती असण्याचा काही संबंध येत नाही). त्यामुळे त्यांची मते ही कोसला आवडणार्‍यांच्या मतांइतकीच प्रामाणिक असू शकतात/असतात.

मुळात कोसला/सात सक्कं त्रेचाळीस/एम टी आयवा मारू/चांगदेव चतुष्टय/ काम्यु/ काफ्का/ मार्क्वी वगैरे वगैरे (सुटे सुटे, एकत्रित वगैरे) आवडणे हेच अस्सल व बाकी कमअस्सल हे ही थोडे अतिरेकीच होते. काही वर्षांपुर्वी वपु वगैरे वाचणारा व त्यांच्या लिखाणाचा उल्लेख करणारे लोक बघितले किंवा पुल हे सर्वश्रेष्ठ मराठी 'लेखक' हे हिरिरीने मत मांडणारे 'पुल सोडून काहिही न वाचलेले लोक' बघितले की मला भांडायची खुमखुमी यायची. आता गंमत वाटते. उदा. कालच पार्टनरचे पुस्तक परिक्षण पुस्तकविश्ववरच वाचले. अजूनही ते (पक्षी पार्टनर) भंपक/सवंगच वाटते. पण आता त्याचा राग येत नाही. उलट गंमत वाटते. हेदेखील साहित्य आहे, ह्याचीदेखील जनमानसात गरज आहे, ह्याचेदेखील वाचक आहेत हे मान्य केले पाहिजे अशी भुमिका हळुहळु येते (हा वयाचा परिणाम असावा का? :) ). हा सगळाच प्रवास फार गंमतशीर आहे हे खरे!

@ चिंतातूर जंतू - नेमाड्यांच्या विध्वंसक टिकेने अनेक शत्रू निर्माण केले हे खरे. त्यातून मनुष्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मुद्दाम झोडपण्यासाठी कोसलाला ढापलेली कादंबरी सिद्ध करण्याचे प्रयत्न झालेही असतील. पण मग ते काही योग्य नाही. खुद्द नेमाड्यांचा देशीवाद त्यांच्याच चतुष्टयात तोडमोडून पडतो (अर्थात चतुष्टय ग्रेटच). त्यामुळे समीक्षक नेमाडे आणि लेखक नेमाडे हे एकत्र न केलेलेच उत्तम.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 16 Oct 2010 - 17:12 · उत्तर

संयत प्रतिक्रिया.
आपल्याला कोसला आवडली आहे, मी वर इंद्राला एक प्रश्न विचारला आहे, आपण आपले मत त्यावर नोंदवु शकता का ?

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Sun, 17 Oct 2010 - 14:07 · उत्तर

नेमाड्यांच्या विध्वंसक टिकेने अनेक शत्रू निर्माण केले हे खरे. त्यातून मनुष्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मुद्दाम झोडपण्यासाठी कोसलाला ढापलेली कादंबरी सिद्ध करण्याचे प्रयत्न झालेही असतील. पण मग ते काही योग्य नाही. खुद्द नेमाड्यांचा देशीवाद त्यांच्याच चतुष्टयात तोडमोडून पडतो (अर्थात चतुष्टय ग्रेटच). त्यामुळे समीक्षक नेमाडे आणि लेखक नेमाडे हे एकत्र न केलेलेच उत्तम.

मला वाटतं एकाच व्यक्तीच्या दोन बाजूंना हे असं वेगळं काढणं अशक्य होऊन बसतं याचं कारणच हे आहे की देशीवादी नेमाडे आपल्यावरचा पाश्चिमात्य प्रभाव मान्य करायला तयार नाहीत, कारण तसं करणं हे त्यांच्या देशीवादी भूमिकेशी विसंगत ठरतं. पण म्हणून कोसलाचं मराठी साहित्यातलं महत्त्व कमी होत नाही; आणि म्हणूनच आपण हा त्यांच्यावरचा प्रभाव जितक्या मोकळ्या मनानं मान्य करू तितके आपण मोकळ्या मनानं कोसलाचं गुणवर्णनही करू शकतो असं वाटतं. पण हा प्रभाव मान्य केला नाही तर आपल्या गुणवर्णनाला सतत एक काळी किनार राहते.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Sat, 16 Oct 2010 - 17:27

श्री.चिं.जं.आणि श्री.नंदन.... दोघांच्याही प्रतिक्रियांचा सूर शुद्ध कल्याणातीलच असल्याने त्या संदर्भात माझे मत एकत्रीतच मांडतो....अर्थात हेही इथे प्रथम सुस्पष्ट केले पाहिजे की मी नेमाडे यांची 'कोसला' संदर्भातील बाजू मांडताना त्यांची साहित्यविषयक सर्वच मते पटतात असे म्हणत नाही. त्यामुळे चर्चेच्या ओघात कोसला हा माईलस्टोन आहे इतपतच माझी भूमिका दर्शवित असतो.

१. कोसला >> नंदननी खोडकर कार्ट्याचे आणि त्याची बाजू घेणार्‍या आईचे दिलेले उदाहरण मी स्वीकारतो ते अशासाठी की काहीवेळा त्या कार्ट्याने झाडाचा एकजरी नारळ पाडला असला तर मालक 'तुमच्या पोराने आख्खे झाडच बिनफळाचे केले' अशी हाकाटी मारली तर ती आई काहीवेळापुरते का होईना आपल्या पोराची बाजू घेईलच. श्री.ना.पेंडसे यांची 'गारंबीचा बापू' किती गाजली असेल त्या काळात (१९५२) हे आपण आता निव्वळ त्यावेळेच्या दप्तरावरून समजू शकतो. तर ही कादंबरी वाचून 'बेहोष' झालेले मामा वरेरकर, पेंडश्यांना भेटल्याक्षणी उदगारले, "अरे, तू शरदबाबूंच्या इतक्या कादंबर्‍या वाचल्या आहेस हे मला माहितच नव्हते !" काय बोलणार श्री.ना. यावर मामांना? ते तर म्हणतात त्या क्षणापर्यंत 'शरदच्चंद्र चटर्जी' नावाचा एक प्रख्यात बंगाली कादंबरीकार आहे इतपतच त्यांना माहिती होती. एकही पुस्तक त्यांनी वाचले नव्हते. पण टीकाकारांना असे काही खोलवर मूळ सापडते का ते पाहाण्याची खुमखुमी असतेच असते. तुलनेचे असे निकष फक्त मराठी कादंबरीला लावणं हा अन्याय आहे. तशी वृत्ती मनी ठेवली तर मग तो एक तेजोभंग करण्याचा एक धंदाच होऊन बसेल.

नेमाड्यांनी येथील एका व्याख्यानात 'कोसला' बद्दल बोलताना (त्यावेळी 'देशीवाद' हा विषय नव्हता..) सांगितले होते की, कॉलेजजीवन व होस्टेलजीवन भलतेच वास्तवतेने रंगविल्यामुळे, तसेच ते रंगविताना वापरलेला भाषेचा रोखठोक पोत वाचकाला जास्त भावला; कारण तोपर्यंत मराठी कादंबरीचा नायक म्हणजे स.प. चा किंवा डेक्कनचा केशव हा लायब्ररीच्या आवारात खांद्यावर निळा ब्लेझर टाकून स्कॉलरच्या थाटात उभा आहे, आणि त्याच्याकडे चोरटेपणाने पाहणार्‍या गोर्‍या गुबगुबीत गालाच्या कावेरीचे कटाक्ष झेलत आहे, असेच चित्र होते. आता हा केशव काय आणि केंब्रिजच्या आवारात उभा असलेला क्लाईव्ह काय, दोघांचाही त्या जीवनातील ल.सा.वि. एकच ना? मग थेम्सकाठी राहणार्‍या कुणीतरी एकाने त्याच्याबद्दल तिथे लिहिले काय किंवा मुळामुठेच्या तिरी बसून इथल्या एकाने लिहिले काय....आशय, अनुभती महत्वाची असताना, हकनाक थेम्सच्या पाण्यामुळे मुळेचे पाणी गोड झाले असे म्हणण्यात अर्थ नाही.

जी.ए., मर्ढेकर, एलकुंचवार, सारंग हे साता समुद्रापलिकडील साहित्याबद्दल भरभरून बोलतात; पण म्हणून त्यांच्या कलाकृतीवर कुणाची छाप आहे का, हे शोधण्याचा एक उद्योगच होऊन बसतो. जी.ए. 'कवठे' बद्दल स्पष्ट लिहितात की, ती जेनेसिसवर आधारित आहे; तिला स्वतंत्र संबोधू नका.... तीच गोष्ट 'यात्रिक'ची... इतकेच काय एकदा त्यांच्या लिखाणाबद्दल भरभरून पत्र लिहिलेल्या वाचकाला त्यांनी लिहिले की. 'तुम्ही माझ्या कथांचे कौतुक केले इतपत ठीक आहे, पण इथेच थांबू नका. पुढे जावून डोस्टोव्हस्की वाचण्याची क्षमता मिळवा, वाचा... अन् मग लिहा आणि मला सांगा की आता जी.ए. तुम्हाला आवडतो का."

ही नम्रता कदाचित नेमाडे यांच्याकडे नसेल, पण म्हणून 'कोसला' चे स्वतंत्र अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते असे होणार नाही.

२. अ‍ॅब्सल्युट बिगिनर्स ~~ नंदन, या कादंबरीचा उल्लेख शिकागोमधील एका नेट मित्राने ई-मेलमध्ये 'त्या बेस्ट १००' वर आम्ही चर्चा करत असताना केला होता. मी 'कॅचर' चे गुणगान केल्यावर त्याने लिहिले होते (तो त्यावेळी लॉ करीत होता...पण अमेरिकन साहित्याचा जबरा अभ्यास...) की, (त्याच्याच भाषेत लिहितो...) "Well, Indra, I am not against your views on Catcher, in toto, but personally to me, thats a vastly overrated book. To many American brats, Catcher speaks to a certain segment of teenagers, but it doesn't mean Caulfield speaks to all teenagers. If possible obtain Colin McInnes' 'Absolute Beginners' instead...its got an energy and verve... We collegians (though not anymore teenagers) prefer Absolute to Catcher..."

या मित्राचे हे मत मी प्रातिनिधिक म्हणून गृहीत धरले....प्रत्यक्षात अ‍ॅबसोल्युटचे मी फक्त परिक्षण वाचले...कादंबरी मला मिळालीच नाही.

पण असो...तुम्हा दोघांकडून काही नवे मुद्दे वाचायला मिळाले, हा आऊटपुटही चांगलाच आहे.

इन्द्रा

टण्या

टण्या · Sun, 17 Oct 2010 - 04:32

इन्द्रा,

उत्तम पोस्ट. मला वाटते की मला (वा नंदनलादेखील) तुझा मुद्दा पहिल्यापासून पटत आहे. कोसलाला मुद्दामहून एक कॉपी वा ढापलेली कलाकृती असे सिद्ध करून तिचा कलाकृती म्हणुन दर्जा कमी करण्याचा जर प्रयत्न होत असेल (आणि तसे ते तेव्हा झालेही. नेमाड्यांनी काही कमी शत्रू पैदा करुन ठेवले नव्हते) तर ते अयोग्यच आहे. आज पन्नास वर्षांनी मात्र आपण अधिक वस्तुनिष्ठ दृष्टीकोणातून त्याकडे पाहू शकतो असे मला वाटते. माझा मुद्दा इतकाच होता की कॅचर आणि कोसलाची तुलना होणे अपरिहार्य आहे. दोन्ही कलाकृतींनी ढवळलेला तळ similar (मला 'समान' हा शब्द वापरायचा नाहिये आणि similar ला पर्यायी शब्द आठवेना) आहे. दोन्ही कलाकृती त्यांच्या त्यांच्या समाजात घट्ट रुतलेल्या आहेत. कोसला मला अधिक भिडते कारण हा समाज माझ्या अधिक जवळ आहे, त्यातील खाचाखोचा/भाषिक लकबी/त्या समाजाचे पदर 'माझेच' आहेत. कॅचरही मला तितकीच भावते पण अर्थात अमेरिकेत मी फारसा न राहिल्याने तुलनाच करायची म्हटली तर कॅचरमधील अनेक पदर/reading beyond the obvious पद्धतीची अनूभुती मला मिळाली नसण्याची शक्यता आहे. पण तरीदेखील मला ह्या दोन कलाकृतीत एक समांतर धागा आढळतो, त्यांना बाजूबाजूला ठेवून एकत्र बघण्याची इच्छा होते हे दोन्ही कलाकृतींच्या प्रामाणिक मांडणीचे/शैलीचे/बांधणीचे यशच नाही का? गोलार्धाच्या दोन पाठपाठच्या भुभागांमधून निर्माण झालेल्या कलाकृतींमधील पात्रांचे एका विशिष्ट वयातून होणारे संक्रमण एव्हडे सिमिलर होते हे त्या दोन्ही कलाकृतींचा प्रचंड सच्चेपणा दर्शविते.

आता तू दिलेले श्रीनांचे उदाहरण घेऊ (मला वाटते हे 'एक मित्र' मध्ये आहे ना?). श्रीनांनी जरी शरदबाबू वाचले नसतील तरी जर मामांना त्यात शरदबाबूंची छाप आढळली आणि ते त्यांनी तसे बोलून दाखवले तर लगेच त्याला 'टिकाकारी खाली खेचणे वृत्ती' असा निष्कर्श काढणे थोडे premature किंवा based on thin evidence नाही का? (अर्थात मराठीत हे होण्याची शक्यता जास्तच :) ). मला वाटते श्रीनांनीही असा अर्थ त्यातून काढलेला नाही. आणि पुढे जाऊन श्रीनांनी जे आपले वाचन वाढवले, समृद्ध केले त्यातून त्यांच्याही काही पात्रांवर प्रभाव पडलाच की (उदा. रथचक्रमधली कृष्णाबाई त्यांनीच प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे एका हंगेरिअन कादंबरीतील पात्रावरुन स्फुरलेली वा प्रभावित झालेली). वाचनाचा लिखाणावर पडणारा प्रभाव अपरिहार्य आहे. श्रीनांनीच त्याच प्रस्तावनेत बहुतेक प्रादेशिकतेवर लिहिले आहे आणि त्यात त्यांनी अगदी पुर्वी लिहायला घेतलेल्या एका कम्युनिस्ट तरुणाच्या कादंबरीचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी संपूर्ण काल्पनिक (स्वतःला कुठलाही अनुभव नसलेल्या) कथानकाचा कसा बोर्‍या वाजतो, ते कसे दांभिक होते वगैरे विषद केले आहे. आणि मग ते मुळांकडे, प्रादेशिकतेकडे वगैरे वळतात. आता ही लेखकाची मुळे, लेखकाचे अनुभव, लेखकाच्या बनलेल्या विचारधारा, विश्लेषण/विरेचन वगैरेंमध्ये त्याचे वाचन हा अविभाज्य भाग आहे. जितका लेखकाला स्वतःच्या बालपणातून, तारुण्यातून, रस्त्यावर भेटणार्‍या माणसांमधून लिखाणासाठी कच्चा माल मिळत असतो तितकाच त्याला त्याच्या वाचनातून मिळतो.
plagiarism वा संपूर्ण उचलेगिरी ही निंदनीयच व आपण त्याचा इथे उहापोह करणे देखील व्यर्थ आहे.

आता थोडेसे फुटकळ (किंवा byproduct म्हणु): ही अशी तुलनात्मक चर्चा (चांगल्या वा वाईट, कुठल्याही हेतूने) होते म्हणुन माझ्यासारख्या सामान्य वाचकांना - ज्यांचे शिक्षण कलाक्षेत्राशी संबंधित नाही, ज्यांचा मित्रपरिवार/सहकर्मचारी इत्यादी वाचनापासून कोसो मैल दूर असतात - विविध भाषा/प्रांत/संस्कृती/देशातील पुस्तकांची ओळख होते हेही ग्रेटच नाही का. :) कोसला आणि कॅचर हे मी मला वाटते कॉलेजात असताना पहिल्यांदा अनिल अवचटच्या (आयला ही एक ironyच की) कुठल्यातरी पुस्तकात वाचले होते बहुदा. मग मी कॅचर आणून वाचली. त्याच प्रकारे नेमाडे/पेंडसे/जीए/गाडगीळ/दळवी/व्यंकटेश माडगूळकर इत्यादी लेखकांच्या स्फुट/टिका लेखातून जी पुस्तके (ज्यांचा बरेचदा 'तुलना' करण्यासाठी उपयोग केला जात असे) कळली ती वाचल्याने एक वाचक म्हणुन मी कितीतरी आनंदी/समृद्ध झालो आहे. तेव्हा अशी तुलना करण्यास मी भरघोस पाठिंबा देत राहीन. :)

नंदन

नंदन · Sun, 17 Oct 2010 - 08:16 · उत्तर

त्याच प्रकारे नेमाडे/पेंडसे/जीए/गाडगीळ/दळवी/व्यंकटेश माडगूळकर इत्यादी लेखकांच्या स्फुट/टिका लेखातून जी पुस्तके (ज्यांचा बरेचदा 'तुलना' करण्यासाठी उपयोग केला जात असे) कळली ती वाचल्याने एक वाचक म्हणुन मी कितीतरी आनंदी/समृद्ध झालो आहे. तेव्हा अशी तुलना करण्यास मी भरघोस पाठिंबा देत राहीन.

सहमत आहे. पुलंच्या लेखनातून वूडहाऊस, सुनीताबाईंमुळे सांतेक्झ्यूपेरी, जीएंमुळे रिक्टर अशी अनेक उदाहरणं. आता याच चर्चेचं उदाहरण घेतलं तर अ‍ॅब्सोल्युट बिगिनर्सची वाचायच्या यादीत भर पडली आहे :)

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 18 Oct 2010 - 07:54

".....माझा मुद्दा इतकाच होता की कॅचर आणि कोसलाची तुलना होणे अपरिहार्य आहे.

Kosla

~ हे मान्यच व्हावे. मग यानंतर दोन्ही कलाकृतीचे परिशीलन स्वतंत्र पातळीवर करून आनंदही तसाच घ्यावा असे मी म्हणतो. नंदनच्या ब्लॉगवर त्याने तर फार चांगला एक विचार मांडला आहे या संदर्भात "शैलीतील सारखेपणा वरवरच्या वाचनातही जाणवण्यासारखा आहे. पण त्याचवेळी कोसला ही कॅचरची नक्कल आहे असे म्हणणे चुकीचे, अन्याय्य ठरेल." असे तो म्हणतो ~ आपण तरी दुसरे काय सांगत आहोत इथे? मी निर्देशीत करत होतो ते हे की, नेमाड्यांच्या पांडुरंगात शहरी जीवनाबद्दल एक प्रकारची तुच्छता दिसते....उदा. "....मावशी भयंकर नट्टापट्टा करायची. पुण्यात स्त्री-पुरुष सगळेच नटतात. पण आपल्या मावशीनं नटणं आणि मिरवणं हे इतकं बरं नाही. मावशी नटून रोज फिरायला जाते. चार मूलं असून देखील. हे फार वाईट आहे. हे मी नानांना एकदा चुकतमाकत सांगितलं. तेव्हापासून मावशीचे आणि माझे संबंध बिघडले. नाना म्हणाले, तू इथे आल्यावर तुला जेवण मिळतं ना? मग पुरे झालं. मी पुण्यात नवीन होतो, असं म्हणणारच. पहिल्याच दिवशी जेव्हा मी पुण्यातल्या चांगल्या भागात फिरायला गेलो तेव्हा म्हणालो, पुण्यात वेश्या खूपच दिसतात, पण इतकं करूनही प्रत्येकीचा नवरा जर तिला बायकोच म्हणतो, तर आपण कशाला बोला?...." ही पांडोबाची जी छिन्द्रान्वेषी भूमिका आहे तिची नाळ आपणास न्यू यॉर्क स्क्वेअरमध्ये न सापडता इथल्या मातीतच मिळेल आणि हा जो देशापणाचा फटका आहे त्यामुळेच कोसलाच्या स्वतंत्रपणाचे यश प्रकर्षाने अधोरेखीत करते.

पुढे कॉलेजमध्ये बाकावर शेजारी बसल्यावर इचलकरंजीकर वर्गात त्याला विचारतो :
तर तुमचे आडनाव काय?
मी म्हणालो, पांडुरंग
तो हसून म्हणाला, तर माझं मधुमिलिंद
तेव्हा मी जोरानंच हसलो.

......असे संवाद तर पुणेच काय पण राज्यातील जवळपास सर्वच शहरातील महाविद्यालयातील अनेक अविभाज्य घटकांपैकी एक. नेमाड्यांना अभिप्रेत असलेली कथानकाची बिजे ही त्यांच्या कॉलेज जीवनातच उमलली होती हे निर्विवाद सत्य मानू या....जिथले अनुभव तुम्ही काय, नंदन, आनंदयात्री, चिंतातर जंतू किंवा मी काय....कमीजास्त प्रमाणात तसले अनुभव आजही मनी रुंजी घालत असतातच. (आमीरखानच्या 'थ्री इडियट्स' मध्ये वेगळे काय आहे?) नेमाडे तुमच्यामाझ्या पुढे एक पाऊल पुढे गेले आणि त्यांनी ते अघळपघळ, रोखठोक भाषेत शब्दबद्ध केले...भले तसल्या धाटणीची प्रेरणा परजिवी असली तरीदेखील.

नंदनने अनुदिनीत म्हटल्याप्रमाणे, 'कोसला' वरील राळ (त्याकाळी किंवा तदनंतरही...) ही केवळ नेमाडे यांनी प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे धाडस केले म्हणूनच उठली होती. प्रस्थापितांना धक्का देणे त्याकाळी कमालीच्या धार्ष्ट्याची बाब असणार. शिवाय आचार्य अत्रे नावाची एक मुलुखमैदान तोफ तर सदैव 'मराठा' नावाचा पलिता लावायचीच वाट पाहात असे. ज्या अत्र्यांनी माधव ज्युलियन, मर्ढेकर सारख्या नवप्रयोगशीलतेची पाठराखण करणार्‍या ज्येष्ठांना सोडले नाही त्या काळात एक पंचविशीतील तरूण कादंबरीच्या ढाच्याला 'उदाहरणार्थ' धक्का देतो, ही बाब पचनी पडणे अशक्यच होते. दि.पु.चित्र्यांच्या 'केसाळ काळेभोर पिल्लू' किंवा खानोलकरांची 'अजगर' अत्र्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी या दोघांना तर राहू देच पण भागवत बंधूना देखील कच्चे खाल्ले होते हा इतिहास आहेच. तरीही त्याकाळात ज्या दोघातिघांनी रचनेत क्रांती घडविली असे म्हटले जाते तीत भालचंद्र नेमाड्यांच्या 'कोसला' ला वरचा 'सा' दिला तर तुम्हालाही आनंदच होईल. शेवटी या मंथनातून एक गोष्ट तर सूर्यकिरणांइतकी स्पष्ट आहे की, कुठेतरी मनी-हृदयी आपण 'कोसला' चे महत्व मान्य केले आहे. तुलना होती ती अशा इतिहास घडविणार्‍या कलाकृतीची....

वरील एका प्रतिसादात नंदनने 'सलिल चौधरीं' चे उदाहरण दिले आहे. तिथेही सलीलदांनी मोझार्टच्या रचनेला दिलेले भारतीय रूप महत्वाचे ठरते. शांतारामबापूंच्या 'पिंजरा' सर्वार्थाने गाजल्यानंतर टीकाकारांच्या लेखण्या आतुरतेने पुढे सरसावल्या की त्याची मूळ प्रेरणा मार्लिन डिट्रीचने साकारलेल्या 'ब्ल्यू एंजेल' वर आहे हे दाखवू लागल्या. ते सत्यही होतेच पण बापूंनी तिला इथल्या मातीतील जो बाज दिला होता तो इतका अस्सल होता की रसिकांना 'पिंजरा' जर्मनीतून आणला आहे का हे विचारण्याची गरजच भासली नाही.

शेवटी रसिक हा साहित्यातील आनंद निरपेक्षबुद्धीने शोधत असतो आणि या सार्‍या शोधात कुठलेही आग्रह, विग्रह, पूर्वग्रह येऊ नयेत अशी त्याची मनापासून इच्छा असते, तसा त्याचा मनापासून प्रयत्न असतोच....'कोसला' विषयीचे त्याचे प्रेम त्याच जातकुळीतील आहे.

इन्द्रा

[जाताजाता : ललित लेखनात Similar साठी मराठीत 'साधर्म्य' असे रूप वापरले जाते]