परीक्षण

मुलगा माझाच

परीक्षण मजकूर

लायब्ररीत विजया जोशी यांचे "मुलगा माझाच" हे पुस्तक हातात पडले. मलपृष्ठावरील सारांश वाचून उत्सूकता चाळवली गेली म्हणून घरी आणले.. आणि वाचायला सुरूवात केली ते सगळी (शे-दिडशे) पाने वाचेपर्यंत पुस्तक खाली ठेवलेच नाहि. आजपर्यंत अनेक नाटकांतून, कथा कादंबर्‍यांतून "नवरा" ह्या विषयावर शेकडो पाने लिहिली गेली. त्यात क्वचित चांगले व बायकोला नीट सांभाळून घेणारे नवरेही रंगवले गेले मात्र बहुतांश वर्णन नवर्‍यांनी केलेल्या छळाचं होतं. या सगळ्यात कडी केली ती "नॉट विदाअऊट माय डॉटर" म्हणणार्‍या बेटी मेहमुदी यांनी. इराण मधील - तिसर्‍या जगातील - मुस्लिम देशातील ही कथा वाचून अनेकांनी आपापल्या वकुबानुसार इराणी, तिसर्‍या जगातील किंवा मुसलमान नवर्‍यांच्या क्रुरपणावर बोटे मोडली होती.

मात्र ह्या पुस्तकातील कथा घडते ती पहिल्या जगातील पहिल्या देशात - अमेरिकेत. ती ही एका परदेशी नवर्‍याची कहाणी नसून - एका भारतीय नवर्‍याच्या जुलूमांची कहाणी आहे. ही एका परधर्मियाची कहाणी नसून - किंवा उत्तरप्रदेशातील किंवा मागास राज्यातील कहाणी नसून -- एका हिंदु-मराठी कुटुंबाची कथा आहे. ही सत्यकथा आहे लेखिकेच्या मुलीची. लेखिका शिकलेल्या घराची, पुरोगामी विचारसरणीची, स्वतंत्र विचारांची -आचारांची. तेच बाळकडू घेऊन मुलगी मोठी झालेली. चांगली शिकून विमान कंपनीत नोकरी करू लागलेली. वय झाल्यावर लेखिका मुलीसाठी स्थळ शोधु पाहते तेव्हा मुलगी नकार देते. एका स्वातंत्र्यप्रिय मुलीला बळजबरी करण्याचा प्रश्नच नसतो. पुढे मुलगी नव्या नोकरीसाठी अमेरिकेत जाते. आणि अचानक दोन महिन्यात फोन येतो की मुलीने परस्पर लग्न ठरविले आहे. बरं प्रेमविवाहदेखील नाहि तर नीट जाहिरात देऊन, मुलं बघुन, मुलीने कारभार परस्पर केला आहे. आणि नवरा जवळजवळ दुप्पट वयाचा घटस्फोटीत आहे. लेखिकेला नाहि करायचा अवधी मिळायच्या आत लग्न होतं.

आपण केलेले संस्कार इतकेही नकलादु नसतील व मुलीने स्वतःला आवडलेल्या एका चांगल्या मुलाशी लग्न केले असेल अशी लेखिकेला असलेली आशा किती फोल आहे हे २-३ महिन्यातच कळू लागते. त्यातच मुलीला दिवस राह्तात आणि मुलाचा जन्म होईपर्यंत ती नवर्‍याचा त्रास सहन करते. बाळंतपणासाठी जेव्हा लेखिका तिथे जाते तेव्हा हादरून जाते. मुलीचा नवरा अत्यंत सनातनी, बायकोला कस्पटासमान लेखणारा तर असतोच पण त्याही पुढे, तो खुनशी व बायकोवर प्रेम करणारा दिसत नाहि. पुढे मुलाचा जन्म झाल्यावर तर त्याचा आक्रस्ताळेपणा वाढतच जातो. तो लेखिकेकडे पैशाची मागणी करतो. ती नकार देताच लेखिकेला घराबाहेर जाण्यास सांगतो. त्यालाही नकार देताच त्या रात्री लहान बाळाला बाहेर बर्फात सोडून येतो. शेवटी लेखिका घर सोडून दुसरीकडे रहाते.

आता मात्र त्यांना कळून चुकतं की त्याला बायको-सासूची पडली नसून त्याचा इंटरेस्ट फक्त मुलात आहे. आणि मग त्यांच्यापुढे पलायनाशिवाय मार्ग उरत नाहि. तरीही त्या दोघी घरातून तर पळून जातात.. मात्र हा त्यांचा पिच्छा सोडत नाहि. आधी अमेरिकन कायदे, तिथून पलायन पुढे १४ वर्षे भारतातील विविध कोर्टे करून शेवटी लेखिकेच्या मुलीस काय व कसा न्याय मिळतो हे वाचण्यासाठी हे पुस्तक वाचाच!

नवर्‍याचा त्रास हा एखाद्या विशिष्ट प्रांताची, समाजाची , शैक्षणिक वर्गाची मक्तेदारी नसून तो प्रश्न अगदी तुमच्या आमच्या घराशेजारी कसा घडतो आहे याचे हे पुस्तक म्हणजे जाज्वल्य उदाहरण आहे. केवळ त्या नवर्‍याचीच नव्हे तर विविध स्तरावर समाजाची मानसिकता किती पुरुषकेंद्री व त्याहिपेक्षा किती वैभवकेंद्रीत आहे याचे समर्पक वर्णन ह्या कथेत मिळते. लेखिकेने, तिच्या मुलीने, नातवाने आणि इतर काहि भेटलेल्या सहृदांनी १५ वर्षे अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत दिलेला हा लढा खचितच स्फुर्तीदायक आहे.

मुलाच्या कस्टडीसाठी त्या नवर्‍याने केलेले "उपाय" भयंकर आहेत. आणि त्याविरुद्ध लढताना यांनी अवलंबिलेले कित्येक प्रसंग "कल्पनेहून सत्य अद्भुत" या प्रकारात मोडणारे आहे. मात्र या आत्मचरित्रपर कथेत लेखिकेच्या कुटुंबाची फरफट अस्वस्थ करतेच पण त्याहून अस्वस्थ करते ते ह्या सगळ्या मान खाली घालायला लावणार्‍या गोष्टी "त्यांच्या"कडे घडत नसून "आपल्या"कडे, आपल्या परसात घडताहेय ही!

अभिप्राय

यशोधरा

यशोधरा · Tue, 4 May 2010 - 20:01

हे पुस्तक तर घेणारच आहे!

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 4 May 2010 - 20:02

इथे माझ्याकडे ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र आहे ते कसे चढवायचे?

मृदुला

मृदुला · गुरुवार, 6 May 2010 - 01:36 · उत्तर

पुस्तकाच्या पानावर, संपादनाच्या कप्प्यात चित्र चढवण्याचे बटण दिसते आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश · गुरुवार, 6 May 2010 - 05:28 · उत्तर

अरे वा! धन्यवाद..
चित्र डकवले आहे बहुदा ते कोणीतरी अप्रुव केले की दिसेल

आनंदयात्री

आनंदयात्री · गुरुवार, 6 May 2010 - 19:36

अरे बाप रे !! खतरनाकच पुस्तक दिसतेय .. मग पुस्तकाचे नाव असे कसे ?
"मुलगी माझीच" हवे होते ना ?