परीक्षण
पाडस
नमस्कार मंडळी,
'यस्तु संचरते देशान् सेवते यश्च पंडितान्।
तस्य विस्तारिता बुद्धिः तैलबिन्दुरिवम्भसि॥ '
असे एक सुभाषित आहे. याच सोपा अर्थ सांगायचा झाला तर तो असा होईल ---
केल्याने देशाटन,पंडितमैत्री सभेत संचार,
शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार॥
सध्याच्या काळात परदेशगमन पूर्वीपेक्षा फारच सोपं झालं आहे. पण परदेशगमनाइतकंच मनोरंजक असतं ते
परदेश समजून घेणं जे बरेचदा तिथे प्रत्यक्ष जाऊनही जमत नाही. पण परभाषांमधल्या उत्कृष्ठ साहित्यात ही
किमया करण्याची शक्ती असते. त्या त्या प्रांतातल्या साहित्यकृतींमधून तिथल्या लोकजीवनाचं, त्यातल्या
प्रेरणांचं,सुखदुःखाचं आणि एकूणच साऱ्या मानवी जीवनाचं एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. एक असं
प्रतिबिंब जे खरं असतं. निर्मळ असतं. आपल्या मनातले विचार समाजातीत इतरांना सांगण्याच्या प्रक्रियेतून
जन्माला आलेलं असल्यामुळे ते अतिशय प्रामाणिक, क्वचित रोकठोक सुद्धा असू शकतं. या साहित्याचा जर
मुळातून आस्वाद घेता आला तर ते फारच छान असतं पण जगातल्या सर्वच भाषा सगळ्यांना येणं जे अशक्य
आहे. म्हणून आपल्यासमोर पर्याय उभा राहतो तो भाषांतराचा. भाषंतरीत पुस्तकं बऱ्याचदा मूळ
पुस्तकाइतकाच आनंद देतात.
माझं सर्वात आवडतं अनुवादित पुस्तक आहे पाडस. "मार्जोरी किनन रॅलिंग्ज" (*Marjorie Kinnan Rawlings*) नावाच्या लेखिकेने साधारण १९३२ च्या सुमारास हे पुस्तक लिहिलं आहे. मूळ पुस्तकाचं नाव आहे "the yearling". अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातल्या एका जंगलात आपल्या वयस्कर आई-वडिलांबरोबर राहणाऱ्या एका बारा वर्षांच्या मुलाच्या - ज्योडीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठीत राम पटवर्धन यांनी अतिशय सुबोध आणि नेमका अनुवाद केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच अनुवाद ही सुद्धा श्रेष्ठ कलाकृती झाली आहे असं मला वाटतं.
छोटा ज्योडी जंगलात जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो. त्याच्या आईवडिलांची त्याच्या आधीची सर्व मुले
जन्माला आल्यानंतर काही काळातच देवाघरी गेलेली असतात. त्यामुळे खूपच उशीरा जन्माला आलेल्या आणि
जगलेल्या - वाढणाऱ्या या मुलाकडे पाहाण्याचा आईचा - ओरी बॅक्स्टर चा दृष्टीकोन अलिप्त असतो. जणू
काही आपली माया तिने आधीच्या मुलांवर उधळून टाकलेली असते. तिच्या मते दुःखामुळे कडवं-कठोर होणं हाच
दुःख सहन करायचा योग्य मार्ग असतो. तिच्या दृष्टीने घरचा गाडा हाकणं आणि त्यासाठी जी लागेल ती
मदत ज्योडीने करणं हे महत्वाचं असतं . ज्योडीचं पोरवय आणि जंगलाच्या सुरेख साथीमुळे लहानपणाचा आनंद
उपभोगण्याची त्याला मिळणारी संधी ही तिच्या मते वेळ वाया घालवण्याचे उद्योग असतात. ज्योडीचं आता
संपायला आलेलं पण अजूनही तितकंच मधुर असणारं बाल्य, त्याची निरागसता, साहसाची त्याची जात्याच
असणारी आवड, आणि अतिशय समृद्ध अशा वेड लावणाऱ्या जंगलाची त्याला सतत वाटणारी ओढ ही तिला
समजतच नाही किंवा ती समजूनही आतपर्यंतच्या अपत्यवियोगाच्या दुःखाने जिची संवेदनशीलता साशंक झाली आहे
अशा स्त्रीप्रमाणे ती वागते.
छोट्या ज्योडीचा खरा आसरा,मित्र,मार्गदर्शक,आदर्श,गुरू आणि त्याच्या बालमनाच्या सर्वात जवळ घर करणारी
व्यक्ती आहे ज्योडीचा वडील इझ्रा उर्फ पेनी बॅक्स्टर. अतिशय मानी, सदाचारी आणि अतिशय कोमल
सृजनशील मनाचा पेनी आपल्याला पानापानांतून भेटतो आणि आपल्याही जवळचा होतो. पेनीचं वर्णन लेखिकेने
केलं आहे 'माणूस तांब्याच्या धातूसारखा नितळ आणि अभंग आणि तितकाच सच्च्या मनाचा' . पेनीला स्वतःला
निसर्गातल्या विविध चमत्कारांबद्दल एक जिवंत कुतूहल वाटतं आणि तेच कुतूहल त्याला ज्योडीच्या डोळ्यांमधे
प्रतिबिंबित झालेलं दिसतं तेव्हा तो मुलाशी मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारतो. त्याला अनेक गोष्टी शिकवतो
पण उपदेश करत नाही. मुलाला खऱ्या अर्थाने तो समजून घेतो. आपल्या बालपणाच्या खुणा तो मुलामधे पाहतो
आणि आपल्याला न मिळालेल्या संधी प्रसंगी पदरमोड करूनही मुलाला मिळवून देण्यासाठी धडपडतो. अनेकदा
आईच्या ओरडण्यापासून तो ज्योडीची सुटका करतो. वडील आणि मुलामधलं हे मित्रत्वाचं,जरासं दुर्मिळ असं
जवळचं नातं आपल्या मनाला स्पर्श करून जातं. पेनीला खुळखुळ्या साप चावतो आणि जीवनमरणाच्या सीमेवर
उभा असतानाही तो ज्योडीला सर्दी होण्यापूर्वीच चिंब ओले कपडे बदलून ठेवायला सांगतो तेव्हा ज्योडीच्या
मनाला स्पर्श करणारी मायेची ऊब आपल्यालाही जाणवते.
पुस्तकातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या कथेचा नायक ज्योडी. बारा वर्षांचा पण अजून पोरपण
पुरते न सरलेला हा मुलगा. सांगितलेल्या कामात चुकारपणाही करेल पण निसर्गाची , वांडपणाची , अवखळ
रानवाऱ्याची हाक ऐकून लगेच धावेल असा हा मुलगा. एकुलता एक असल्यामुळे एकटा पडणारा, सतत त्याच्या
अशा एखाद्या मित्राची वाट पाहाणारा, ते मैत्र प्राणी-पक्ष्यांमधे शोधणारा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवू
पाहाणारा, त्याशिवाय जीवाला चैन न पडणारा, पौर्णिमा आमावास्येपासून पाऊस वादळ वाऱ्यापर्यंत निसर्गाच्या
साऱ्या चमत्कारांची, साऱ्या गूढ गुपितांची कोडी आपल्यापरीने उलगडू पाहाणारा ज्योडी म्हणजे बाळपणाचं
मूर्तीमंत गोजिरं असं रूपच जणू. त्याच्या लाडक्या घळीपाशी उभा राहून तो म्हणतो ," इथून जो ओढा निघतो
तो नदीला मिळतो. नदी सेंट जॉर्ज सरोवराला मिळते आणि सरोवर समुद्रात जाऊन मिळतं... म्हणजे ही घळ
हा समुद्राचा उगमच म्हणायचा." त्याच्या बालसुलभ निष्कर्षांची आपल्याला गंमत वाटते. ज्योडी धांदरटपणा
करतो. त्याच्या 'पा' शी बरोबरी करताच येणार नाही हे कळूनसुद्धा ती करू पहातो. आपण इतर
विचारांच्या नादात अर्धवट सोडलेलं काम 'पा' ने पूर्ण करून टाकलेलं पाहून ओशाळतो पण खूशही होतो.
'पा' शिकारीला गेलेला असताना आईच्या सोबतीला एखाद्या शूराप्रमाणे घरी थांबतो , पण तरीही आपल्याला
खरंच वाटणारी भीती तिला दिसू न देण्यासाठी गणिताचं पुस्तक वाचायचं नाटक करतो. अस्वलाने कालवड
मारली हे ऐकल्यावर चिडून पेटून उठतो. पोट भरण्यासाठी इतर प्राण्यांना मारावं लगतं यासाठी दुःखी होतो
आणि त्यांना न मारताही आपल्याला त्यांचं रुचकर मांस मिळालं तर किती छान होईल असा भाबडा प्रश्नदेखिल
विचारतो.
या तिघा मुख्य पात्रांखेरीज पुस्तकात इतर पात्रं सुद्धा मधून मधून येतात आणि आपल्याला सरळसाध्या निर्व्याज
अशा ग्रामजीवनाची गोडी चाखवून जातात. नैसर्गिक अशा शाहाणपणाबरोबरच येणारं असं एक नागरी
शाहाणपण इथे दिसतं जे देशकालाचे बंधनं सोडून आपल्या स्वतःच्या सामाजाशी आपलं नातं सांगतं आणि वाचक
थक्क होऊन जातो.
याशिवाय कलाकृतीचं मुख्य आकर्षण म्हणजे पानोपानी येणारी अतिशय चित्रमय अशी निसर्गवर्णनं. त्या त्या
ऋतूतल्या या सहजसाध्या आणि अनुवादात तरी जऱ्याशा जुन्या बोलीभाषेतल्या शब्दांमधून आपल्या नजरेसमोर
साकार होणारं निसर्गचित्र इतकं निर्मळ, नितळ आणि शब्दांनीच ओलंचिंब करून टाकणारं असतं की आपण
मुग्ध होऊन तिकडे पाहातच राहतो. अतिशय नेमक्या अशा या वर्णनांमधून फ्लोरिडामधला तो सगळाच परिसर
नजरेसमोर अगदी चट्कन उभा राहतो.
कथेच्या ओघात जंगलातल्या ऋतुचक्राचं एक आवर्तन पूर्ण होतं. परिस्थितीचं आकलन अतिशय दुःखमय मार्गाने
झालेला अतिशय पीडित पण क्षणात मोठा झालेला ज्योडी नव्याच सुजाण मोठेपणानं आपली जबाबदारी मान्य
करतो. स्वतःच्या हाताने आपल्याला प्राणाहूनही प्रिय असलेलं सगळंच तो संपवतो. भुकेची राक्षसीण सगळ्याच
चराचराच्या मागे कशी सतत हात धुवून लागली आहे हे त्याला कळतं आणि त्याचं सारं पोरवय अदृश्य होतं .
त्याच्या घळईतली जादू आता त्याच्या मनाला गुंगवत नाही. सगळ्या जगाकडून फसवला गेलेला तो मुलगा एका
क्षणात माणूस बनतो. आपल्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी स्वीकारतो. या शेवटच्या भागात वडील-मुलाचा जो
संवाद आहे त्याने आपलं काळीज पिळवटून जातं. पण अटळ अशा वास्तवाचा सामना करणाऱ्या त्या मुलाबद्दल
मनाला खरंच कौतुक वाटत राहतं. कसलाहीच्मुलामा न चढवता जीवनाचं खरं रूप जेव्हा पेनी मुलाला सांगतो
तेव्हा त्यातल्या अमोघ अशा सत्याचा आघात आपल्याही मनावर झाल्यावचून राहात नाही.
हातातलं पुस्तक संपतं पण मनात झिरपलेल्या आणि अनंत परींनी अचानकपणे समोर उभ्या राहणाऱ्या त्यातल्या
व्यक्तिरेखा मनात कायमचं घर करून राहतात.
--अदिती
(काही वर्षांपूर्वी मनोगतावर लिहिलेला लेख इथे पुनर्प्रकाशित केला आहे)
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 23 Jun 2010 - 11:38
वा! वाचलं पाहिजे हे पुस्तक!
अश्याच अनवट परंतु छान पुस्तकांची ओळख करून द्यावी.. आम्ही वाचतो आहोतच :)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 23 Jun 2010 - 19:18 · उत्तर
आवडले..
नक्की वाचणार..
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 23 Jun 2010 - 12:52
नेमकं. हा परिचय मी आधी वाचला नव्हता. माझ्या सुहृद या मालिकेतील हे एक पुस्तक होतं. रारंगढांग लिहून झालंय. ही बाकीची कधी होतात पहायचं. त्यात असा एखादा परिचय आला की माझ्यातला आळशी सुखावतो मस्त.
पाडस हा अनुवादाचा एक मापदंड आहे असं मी नेहमी सांगतो. अर्थात हा अनुवाद पटवर्धनांचाच. मला वाटतं, या पुस्तकाचा आणखी एक अनुवाद आहे. त्याविषयी नंदन (इथे फिरकला तर) अधिक सांगू शकेल. ऋही सांगू शकेल.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 24 Jun 2010 - 13:26 · उत्तर
दुसरा अनुवाद 'फास्टर फेणे'फेम भा. रा. भागवतांनी केला आहे. 'हरीण शावक' नाव आहे त्याचं. ठीकठाक आहे. मला 'पाडस' आधी वाचल्यामुळेही असेल, पण फार्र नाही आवडला.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Sat, 26 Jun 2010 - 07:53 · उत्तर
अरे वा. तुम्ही आहात का जाग्या? मध्ये गायब होता त्यामुळं या संदर्भात तुमचं नाव घेतलं नाही. तुम्ही बरोबर सांगितलंत. भा.रा.च. मला ते नाव अंधुकसं आठवत होतं.
तुमचं नाव लिहिलं असतं तरी, नंदनसारखा कंस टाकलाच असता म्हणा :)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Mon, 28 Jun 2010 - 10:26 · उत्तर
अवांतरः यवढं काई नक्वाय हो खवचटासारखं बोलाला! बेंगळुरू-ठाणे प्रवासात होते मी. :)
अदिती
अदिती · Fri, 25 Jun 2010 - 11:20 · उत्तर
तुमच्यातला आळशी सुखावला हे ऐकून आनंद झाला.
भा. रा. भागवत हे माझे आवडते अनुवादक आहेत कारण त्यांची स्वतःची अशी एक लेखनशैली आहे आणि ती मला फार आवडते. विशेषतः शेरलॉक होम्स, रॉबिनहूड अशा गोष्टी तर मी त्यांच्या हातच्याच वाचल्या आहेत आणि त्या मला विलक्षण आवडतात. मी हरीणशावक हे पुस्तक वाचलं नाही ते 'हे पुस्तक आपल्याला आवडलं नाही तर दु:ख होईल आणि ते पाडसापेक्षा क्कमी आवडलेलं भाषांतर वाचण्याचं असेल. पण त्याहूनही जास्त ते भागवत आजोबांचं पुस्तक न आवडल्याचं असेल' हे होतं. :)
रामदास
रामदास · Wed, 23 Jun 2010 - 16:46
मी माझ्या योग्य त्या वयात म्हणजे आठवीत किंवा साडेआठवीत असताना हे पुस्तक वाचले होते.ज्याला "दिल के पास "म्हणता येईल अशा काही पुस्तकांपैकी हे एक.वाचायला दिलेलं हे पुस्तक गहाळ झालं आणि फार चुटपुट लागली होती. नुकतेच ओरीजनल पुस्तक पण हाती आले आहे. त्यामुळे थोडी भरपाई झाली खरी .या पुस्तकात ज्योडी आणि पा चा शेवटच्या एखाद दुसर्या पानावर असलेला संवाद मनात घर करून जातो.गेल्या आठवड्यात अनील पटवर्धन सोबत माझी बोलणे झाले. आप्पांची तब्येत(राम पटवर्धनांची)ठिक असली तर कदाचीत या आठवड्यात पाडस या विषयावर त्यांच्या कडून आणखी काही कळेल.(आता तू म्हणशील की हा प्रतिसाद आहे की लेख.पण म्हातारे वाटच बघत असतात बोलायच्या संधीची.)असो.
त्याच काळात ग.रा. कामतांनी रात्र थोडी सोंगे फार हे पुस्तक (भाषांतर)केले होते .ते मिळाल्यास पण जरूर वाचण्यासारखे आहे.
३_१४ अदिती
३_१४ अदिती · गुरुवार, 24 Jun 2010 - 19:00 · उत्तर
राम पटवर्धनांकडून 'पाडस'बद्दल ऐकायला फार आवडेल.
एका भल्या मित्राने अनेक पुस्तकांच्या जोडीला 'पाडस'ही दिलं. एकदा वाचलं, दोनदा वाचलं आणि मग व्यसनच लागलं. पुस्तक उघडायचं, कुठलंही पान उघडायचं असं सुरू झालं. आता पुन्हा कपाट उघडून 'पाडस' हातात घेतलं आहेच.
अदिती, यथार्थ परिचय.
अदिती
अदिती · Fri, 25 Jun 2010 - 10:57 · उत्तर
स्वत: राम पटवर्धनांशी पाडसाबद्दल बोलायचं ही गोष्ट स्वप्नवतच आहे. खरं तर अनेक पाडसभक्तांना यासाठी तुमचा अतिशय हेवा वाटेल. मला तर निश्चितच वाटतो आहे. या गप्पांबद्दल सविस्तर वाचायला / ऐकायला खूपच आवडेल.
रात्र थोडी सोंगे फार (मूळ पुस्तक ब्रोकन यस्टरदेज) या पुस्तकाबद्दल खूप ऐकलंय. वाचलेच पाहिजे अशा पुस्तकांचा यादीत हे पुस्तक निश्चितच आहे. पण सध्या हे पुस्तक मिळत नाहीये असे कळले. नवी आवृत्ती निघण्याची किंवा जुन्या बाजारात हे हाती लागण्याची वाट पाहते अहे.
बाकी तुमच्यासारखंच पाडस मी सातवीतून आठवीत जाताना सुट्टीत वाचलं होतं आणि त्याची मोहिनी तेंव्हापासून आत्तापर्यंत तशीच आहे. खरंतर वाढतेच आहे.इतकी, की यर्लिंगपेक्षा पाडस हे भाषांतर जास्त सरस आहे असं कुठेतरी वाचल्यानंतर मूळ पुस्तकाची ई-प्रत हाती लागूनही मी ती अजूनही वाचलेली नाही!
मस्त कलंदर
मस्त कलंदर · गुरुवार, 24 Jun 2010 - 13:39
गेले वाचायचे राहून मध्ये अॅडवलंय. नक्कीच वाचेन.. अशा सुंदर पुस्तकाच्या ओळखीबद्दल धन्यवाद...
आता अधिक प्रतिसाद पुस्तक वाचल्यानंतरच!!!! :)
भावश्या
भावश्या · Mon, 28 Jun 2010 - 11:53 · उत्तर
गेले वाचायचे राहून मध्ये अॅडवलंय. नक्कीच वाचेन.. अशा सुंदर पुस्तकाच्या ओळखीबद्दल धन्यवाद...
असेच म्हणतो.
भावश्या.
आनंदयात्री
आनंदयात्री · Tue, 29 Jun 2010 - 20:42 · उत्तर
हेच म्हणतो.
रामदास येउ द्या भेटीचा वृत्तांत !!
स्वाती दिनेश
स्वाती दिनेश · Mon, 28 Jun 2010 - 08:30
'पाडस'चे अनेकदा पारायण करुन झाले तरी अजून वाचावेसे वाटते. द येरलिंग पेक्षाही मला हे अनुवादितच जास्त आवडले.
स्वाती
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Mon, 28 Jun 2010 - 21:25
खरोखर अवीट पुस्तक आहे हे..
प्रत्येकवेळी तेवढच ताजं ! व्यक्तिरेखा,निसर्ग्,घटनाक्रम..सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं आहे..
या ज्योडीचे ऐकून लेकीने आम्हाला 'मा' अन् 'पा' म्हणायचं म्हणे ! म्हणतेय ती.. :)
सागर
सागर · Tue, 30 Nov 2010 - 10:01
'पाडस' वाचून गदगदून येते हे नक्की.
काळाच्या ओघात विसरलेले एक अत्भुत पुस्तक. पण खूप सुंदर पुस्तक आहे.
हे पुस्तक सध्या विकत मिळते का? कोणाला माहिती असेल तर कृपया सांगावे.
धन्यवाद.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 10:45 · उत्तर
मिळते की! वरिजनलपण आणि भाषांतरितपण. एक नाही, दोन दोन भाषांतरे मिळतात 'दी इयरलिंग'ची. एक पटवर्धनांचं आणि एक भा. रा. भागवतांचं. मला (अर्थातच!) पटवर्धनांचं आवडतं!
सागर
सागर · Tue, 30 Nov 2010 - 12:39 · उत्तर
ठीक आहे पुण्याच्या भेटीत यावेळी पाडस माझ्या संग्रहात येणार :)
धन्यवाद मेघना
नंदन
नंदन · Tue, 30 Nov 2010 - 11:14
पाडस आणि द इयरलिंग दोन्ही वाचता आली. मूळ पुस्तक प्रथम वाचल्यामुळे ते आधी आवडलं होतंच, पण राम पटवर्धनांचा अनुवाद वाचताना कुठेही उणेपणा जाणवला नाही.
पुढे कधीतरी एका लेखात या पुस्तकाबद्दल अजून थोडी पार्श्वभूमीपर माहिती वाचली, ती आठवेल तशी इथे देतो. ज्या काळात ही कहाणी घडते, त्या काळात म्हणजे सरत्या एकोणिसाव्या शतकात अमेरिकेच्या त्या भागातलं (मध्य फ्लोरिडाचा अविकसित भाग) आयुर्मान जेमतेम ४५-५० वर्षं होतं. त्यामुळे एक अपरिहार्य बाब म्हणून मुलांना फार लवकर जगरहाटी शिकावी लागत असे. ह्या संदर्भात पेनी बॅक्स्टरची ज्योडीचं बालपण जमेल तितका वेळ टिकून रहावं ही धडपड अधिकच हृद्य वाटते.
'टू किल अ मॉकिंगबर्ड'चा मुख्य विषय जरी कृष्णवर्णीय व्यक्तीवर चालवलेला अन्याय्य खटला असा वाटत असला तरी कादंबरीच्या पहिल्या भागात अॅटिकस फिन्चचे आपल्या मुलांना निष्ठुर वास्तवाची झळ लागू नये म्हणून चालणारे प्रयत्न आणि त्याचवेळी ह्या लढाईत पत्कराव्या लागणार्या अटळ पराभवाची असलेली जाणीव याचं सुरेख चित्रण आढळतं, तेव्हाही 'पाडस'ची आठवण येतेच.
थोड्याफार फरकाने द. भि. धामणस्करांची 'केळीचे पान' ही कविताही हीच भावना नेमक्या शब्दांत व्यक्त करणारी -
रोचीन
रोचीन · Tue, 30 Nov 2010 - 11:24 · उत्तर
कविता!!!
सागर
सागर · Tue, 30 Nov 2010 - 12:43 · उत्तर
पण राम पटवर्धनांचा अनुवाद वाचताना कुठेही उणेपणा जाणवला नाही
अगदी सहमत नंदन. पण माझ्यामते पाडस हे मूळ पुस्तकापेक्षा काकणभर सरसच आहे.
कधी कधी अनुवाद देखील मूळ कलाकृतीपेक्षा श्रेष्ठ होतात. त्यातलेच हे एक उदाहरण :)
खाली लतिका म्हणतात त्याप्रमाणेच माझेही मत आहे
अप्रतिम आणि संग्रहात हवेच असे हे पुस्तक आहे
लतिका विवेक
लतिका विवेक · Tue, 30 Nov 2010 - 11:46
पाडस फारच छान पुस्तक. मुळ पुस्तकापेक्षा मला पाडस जास्त आवडले. मुव्ही पण पाहिला पण पुस्तका इतका छान नाही. मी स्वत: पारायणे तर केलीच पण माझ्या मुलाननी माझ्या कडून खूप वेळा वचवून घेतले. आता नातवाला वाचून दाखवायचे आहे.
लतिका विवेक
आरागॉर्न
आरागॉर्न · Tue, 30 Nov 2010 - 12:38
पाडस माझ्या पहिल्या दहांमध्ये नेहेमीच असेल. उत्कृष्ट अनुवाद कसा असावा याचे उत्तम उदाहरण.
पाडसबद्दल एका परिचितांकडून ऐकलेली आख्यायिका अशी : राम पटवर्धन यांच्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे हवे होते. त्या उद्देशाने त्यांनी हा अनुवाद केला. यावर परिचितांचे म्हणणे, "त्यांना आणखी बहिणी असायला हव्या होत्या म्हणजे आपल्याला आणखी सुंदर अनुवाद वाचायला मिळाले असते." ही ऐकीव कथा आहे मात्र परिचित साहित्य वर्तुळातील व्यक्ती असल्याने तथ्य असावे. मात्र चायनिज व्हिस्परप्रमाणे बदल झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आणखी खुलासा झाल्यास चांगलेच.
या निमित्ताने पडलेला दुसरा प्रश्न म्हणजे पाडसनंतर राम पटवर्धन यांनी आणखी अनुवाद केले का?
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 12:20
कथा / दंतकथा ख-त-र-ना-क आहे!
पण माझ्या माहितीप्रमाणे राम पटवर्धनांनी केलेला हा एकमात्र अनुवाद.
('माझं लंडन'चं संपादन त्यांनी केलं आहे आणि त्यातून पुष्कळ शिकायला मिळालं, अशी नोंद मीना प्रभूंनी कुठेशी केली आहे. कुठे ते मात्र आठवत नाही. बहुधा कुठल्याशा दिवाळी अंकात. तोही बर्यापैकी जुना. मीना प्रभू इतक्या फेमस व्हायच्या आधी कधीतरी.)
रोचीन
रोचीन · Tue, 30 Nov 2010 - 12:34 · उत्तर
>> 'माझं लंडन'चं संपादन त्यांनी केलं आहे
मी हेच लिहायला आले होते!! आणि म्हणूनच ते पुस्तक इतकं अप्रतिम झालं आहे!!
(जाणकारांना कळाला असेलच माझा रोख :D)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 30 Nov 2010 - 12:41 · उत्तर
हाहाहाहा... कळला, कळला... :) पण मला जाणकार म्हणू नका. ही आपली आपल्याकडं सहजच असलेली माहिती होती, त्यावरून ते कळलं. जाणकार वेगळे. ;)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 12:42 · उत्तर
:) नव्या वादाला सुरुवात नको, म्हणून जपून लिहिलं, तर तुझा हा प्रतिसाद. झालं का!
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 30 Nov 2010 - 13:01
पाडस आताशाच वाचलं, आता मुळ पुस्तक वाचायला घेतले आहे संथ गतीने वाचत आहे.
मला पाडस हे मुळ पुस्तकापेक्षा थोडेसे सरस झाले आहे असेच वाटते.
पुस्तकातले निसर्गाचे वर्णन असो का ज्योडी, पेनी, ओरी यांचे कॅरेक्टर्स असो एकदम अप्रतिम वाटतात.
माझ्या टॉप २० च्या यादीत तर हे पुस्तक नक्कीच नेहमी असणार.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 1 Dec 2010 - 04:22
मुळ पुस्तक वाचलेले नाहि. अदितीच्या ह्या ओळखीनंतर पटवर्धनांचे पुस्तक वाचले व ते प्रचंड आवडले होते आणि लगेच यंदा हे भेट म्हणून मिळाले आहे :)
हे पुस्तक भरभर न वाचता संथपणे -घोट घोट प्यायलासारखे- संपवायचे पुस्तक आहे. काहि ओळींवर तर तिथेच थांबुन ओळ मनात घोळवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून एक मस्त चहा होऊन जाऊदे असं म्हणावंस वाटायचं :) आरती होऊन गेल्यावरही कापराचा वास जसा हवेत रेंगाळतो तसे हे पुस्तक वाचून झाल्यावरही वातावरणात रेंगाळत असते असे वाटते.
हे पुस्तक वाचल्यावर मला फार 'स्वस्थ' वाटले आहे. सगळ्यांनाच असे वाटते का मलाच?
अदिती
अदिती · Wed, 1 Dec 2010 - 06:26 · उत्तर
ऋ, हे पुस्तक वाचताना आणि वाचल्यावर खूप 'स्वस्थ' वाटते हे अगदी खरे आहे. मला तर हे पुस्तक आठवले तरी बरे वाटायला लागते :)
हे पुस्तक आवडणारी इतकी बहुसंख्येने मंडळी इथे जमलेली पाहून माझा आनंद शतगुणित झाला
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Wed, 1 Dec 2010 - 08:35 · उत्तर
अगदी! मला हेच म्हणायचं होतं, ॠला बरोबर शब्द सापडले आहेत.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 1 Dec 2010 - 05:46
आणखीन १०-१५ वर्षानंतर मूळ इंग्लिश कादंबरीला १०० वर्षे पूर्ण होतील तर पटवर्धनांच्या मराठीतील तितक्याच उत्कट, भावूक अनुवादालाही ५० वर्षे.....इतक्या मोठ्या कालखंडादरम्यान हजारो प्रकारची पुस्तके आली अन् गेली तरीही या इंग्लिश तसेच मराठी कादंबरीवर इतक्या समरसतेने आपण चर्चा करीत आहोत यातच खर्या कलाकृतीची बीजे आढळतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या निमित्ताने 'ठणठणपाळ' यानीही आपल्या अशा खास शैलीत एकदा ललितमधून 'पाडस' चा उल्लेख केला होता [ललितचा अंक माहित नाही, पण 'निवडक ठणठणपाळ' मध्ये समाविष्ठ आहे.]....ते म्हणतात, "आजकाल पहावे तिकडे राम पटवर्धनांच्या 'पाडस' चे समीक्षक तसेच सर्वसामान्य वाचक यांच्याकडून कौतुक चाललेले आम्ही पाहात आहोत. मग असे असेल तर खटाववाडीतून 'पुस्तक खपत नाही' अशी का बरे ओरड होत असते?" ~ अर्थात 'मौज' परंपरा पाहिली तर पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाल्याचे भाग्य दुर्मिळच गोष्ट म्हणावी लागेल. असो.
@ मेघना ~~ भा.रा.भागवत यानी केलेल्या अनुवादीत पुस्तकावे नाव आहे "हरिणबालक"...."हरिणशावक" नव्हे [अर्थात अर्थ तोच आहे म्हणा !!]
इन्द्रा
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Wed, 1 Dec 2010 - 09:30 · उत्तर
बरोबर, हरिणबालक आहे ते. (इथे जीभ चावणारी स्मायली द्या हो, प्लीज!)
आरागॉर्न
आरागॉर्न · Wed, 1 Dec 2010 - 11:31
या पुस्तकावरील ग्रेगरी पेकचा अप्रतिम सिनेमा आहे. संधी मिळाल्यास जरूर पहावा.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 1 Dec 2010 - 12:16
".....ग्रेगरी पेकचा अप्रतिम सिनेमा आहे..."
~ इनडीड...अप्रतिम. माझ्याकडे आहे....हा आणखी त्याच काळातील The Snows of Kilimanjaro, Spellbound व त्याना ऑस्कर देऊन गेलेला To Kill a Mockingbird. त्याना पुढे अकारण Charming Hero (त्यांच्या देखणेपणामुळे) हे लेबल चिकटले (विशेषतः रोमन हॉलिडेच्या यशामुळे...) पण प्रत्यक्षात ते खरेच फार भावनाशील अभिनेते होते ही बाब हे तीन चित्रपट दर्शवितात. ~~ अर्थात रोमन हॉलिडे ही देखील एक कविताच होती....विशेषतः ग्रेगरी पेक जेव्हा शेवटी त्या राजवाड्यातून प्रिन्सेसचा निरोप घेऊन बाहेर पडतात त्यावेळी....! खर्या अर्थाने डोळ्यातून पाणी आणणारे ते दृष्य आहे.
इन्द्रा