परीक्षण
पुस्तक परिचय - दुनियादारी
“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !”
हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा ‘घेता’ (recipient साठी दुसरा चांगला शब्द माहिती आहे?) आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!!
एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो. रात्रीचा दिवस करून वाचलं आणि एका रात्रीत खूप काही बदललं. मागे एकदा किमी काटकरची मुलाखत वाचली होती. (बरोबर आहे, तीच किमी ! हिंदी “टारझन” सिनेमात जिच्यापेक्षा टारझनच्या अंगावर जास्त कपडे होते ना ती !) ती म्हणाली होती की ‘हम’ सिनेमात अमिताभची हिरॉइन झाल्यावर लोक तिला ‘किमी’ ऐवजी ‘किमीजी’ म्हणू लागले. तसं, ‘दुनियादारी’ वाचल्यावर, “गपे xxxच्या ! अजून दुनियादारी…..” हा डायलॉग म्हणायचा अधिकार मिळाला. आता ‘दुनियादारी’ची स्टोरी वगैरे सांगत नाही कारण तो ह्या लेखाचा उद्देशच नाही. ‘चिकन सूप’ चाखून ताटातल्या झणझणीत रश्याची नक्की चव नाही कळत !
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!
कॉलेजच्या भाषेचा एक छान लहेजा कादंबरीला आहे, योग्य तिथे आणि योग्य त्या शब्दांसकट !! दुर्दैवानं आता सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत पण त्यांचा वाचक-चाहता म्हणून मी अकरावीत असताना त्यांना पाठवलेल्या पहिल्याच पत्राच्या उत्तरात त्यांचं वाक्य होतं ,”दुनियादारी मात्र जरूर वाच.” त्यानंतर वयाचं अंतर पार करून, त्यांच्याशी छान स्नेह जुळला होता. मला आठवतंय एकदा त्यांच्या घरीच त्यांना विचारलं होतं की ‘दुनियादारी’त इतक्या सहजपणे शिव्या वगैरे का? ते म्हणाले होते, “एक तर कॉलेजमधली तुझ्याच आसपासची भाषा बघ, तुला वाक्यांगणिक सहज शिव्या सापडतील. दुसरं म्हणजे मारामारीचा वगैरे प्रसंग वाचताना,” अरे नालायका, मूर्खा ! थांब जरा तुझ्याकडे बघून घेईन” कसं वाटेल? तिथे शिव्यांशिवाय intensity येणारच नाही !! तसंच कॉलेजची पोरं, “काय वेडा किंवा काय बावळट आहेस का तू?” वगैरे म्हणतात का? नाही! सरळ “काय xx झाला काय?”, असंच म्हणतात ना?” येस बॉस, मानलं !
‘दुनियादारी’मधे श्रेयस तळवळकर मुख्य पात्र आहे पण ‘धासू रोल’ म्हणजे, एस.पी. कॉलेजमधला टेरर, ‘डीएसपी.’ ! दिग्या एस. पाटील !! जसं, रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ मध्ये ‘सत्या’भोवती कथा फिरते पण ‘धासू रोल’ आहे ‘भिखू म्हात्रे’! सुशिंनी कादंबरीतलं ‘डीएसपी’ हे character ज्या कुणावरून तरी साधारणपणे घेतलं होतं ते शांत आणि मवाळ दिसणारे-बोलणारे गृहस्थ एकेकाळी ‘टेरर’ होते?
अर्थात दुनियादारीत शिव्या, रोमान्स, मारामारी, एस.पी. कॉलेजचा कट्टा, दारू, इतकंच काय श्रेयस, दिग्या, मिनू, रेखा, शिरीन, साई, अश्क्या, एम.के.श्रोत्री वगैरे सगळी फक्त ‘साधनं’ आहेत...कादंबरीचं ’साध्य’ नाही !! आपल्याला मारझोड करणाऱ्याची ओळख सांगताना नित्या म्हणतो “दिग्या त्याला काही करू शकणार नाही. ‘नितीन सदाशिव घोडके’ मधला तो माणूस ‘सदाशिव’ आहे रे !” असं अंगावर येणारं वाक्यं दुनियादारीतच आहे !
ऑर्कुटवर ‘Suhas Shirvakar’ नावाची कम्युनिटी आहेच पण नुकतीच ‘duniyadari’ ही community सापडली! Yes, आपल्या आवडत्या पुस्तकाची दुनियादारी !! मी तर त्या कम्युनिटीतल्या बऱ्याच मेंबर्सना (अजून तरी) ओळखतही नाही. कोण कुठले हे लोक? वेगवेगळ्या वयांचे, ठिकाणांचे, मतांचे आणि विचारांचेही !! पण सगळ्यांच्या मनाच्या एका सुगंधी कोपऱ्यात कुठेतरी ‘दुनियादारी’ कायम आहे.
‘दुनियादारी’नं तुम्हाला ‘बि’घडवलं असेल तर नक्की सांगा कारण आपण-तुपण गाववाले !!!
----------------------------------
अभिप्राय
सागर
सागर · Fri, 17 Sep 2010 - 09:17
पुन्हा एकदा दुनियादारीच्या निमित्ताने काय बोलणार संदीप?
दुनियादारी हा अनुभव आहे. दुनियादारीचं प्रत्येक पारायण हे जगणं आहे.
हॅट्स ऑफ टू "दुनियादारी"
दुनियादारीएवढा काळजाला हात कोणत्याच पुस्तकाने नाय घातला
साईनाथ तो भुजंग...
अश्क्याची गद्दारी
एमकेश्रोत्रीने दिलेला तीव्र निराशेचा फील
श्रेयसच्या मनाची घालमेल - शिरिन आणि मिनू दोघांच्या तुलना
मनाची आंदोलने
एका मुलाचे आई - पपा हवे म्हणून तुटलेले मन.
दिग्याचा प्रचंड धाडसीपणा
श्रेयसचे पोलिसस्टेशनमधले इन्स्पेक्टरला समजावणे
कॉलेजचा पहिला दिवस
काय काय म्हणून सांगू?
आणि किती किती सांगू? :)
दुनियादारीने जगायला शिकवले... दु:ख पचवायला शिकवले
आनंदाने जगायला शिकवले....
आणि खूप काही शिकवले... सुशिंनी दुनियादारी वाचकांना देऊन एक प्रकारे हजारो-लाखो लोकांना 'दुनियादारी' म्हणजे काय हेच शिकवले आहे....
अशा गुणी लेखकाला प्रणाम
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 17 Sep 2010 - 11:30
दुनियादारी अशातच पहिल्यांदा वाचली
कदाचीत कॉलेजलाईफ मधे ज्या प्रकारचे अपिल झाले असते तसे काहीसे झाले नाही.
कादंबरी अर्थातच सुशि स्टाईल म्हणजेच एकदम ग्रिपिंग.
सगळे पात्रे छान रंगवलेले आहेत.
वेदश्री
वेदश्री · Fri, 17 Sep 2010 - 12:18
परीचय छानच करून दिलायस, संदीप. लिहित रहा.
दुनियादारी आजच वाचून संपवले मी. प्रांजळपणे सांगायचे तर मला हे पुस्तक त्यातले ओघवते लेखन, व्यक्तीरेखांना न्याय देण्याचा बर्यापैकी प्रयत्न आणि विशिष्ट वर्गाचे मनोरंजन या गोष्टींमुळे एकदा वाचण्यापुरते ठीक वाटले, पारायणे करण्यासाठी या पुस्तकाची निवड किमान मी तरी करणार नाही. आज हे पुस्तक वाचले म्हणून नव्हे तर अगदी ऐन कॉलेजच्या दिवसांत वाचले असते तरी तूफ्फान आवडले असते असे अजिबात वाटत नाही कारण कॉलेजमध्ये असताना मी अर्न-अॅंड-लर्न प्रकारची विद्यार्थिनी असूनदेखील 'दंगा' केला नाही असे अजिबात नसले तरी मुख्यत्वे माझा स्वभाव अभ्यासू असल्याने अगदीच अंगावर येत नाहीतो मी काही करायचे नाही.. शिवाय केले तरी स्वतः पिक्चरमध्ये न येता परस्पर काम उरकवून घेण्याकडे माझा कल जास्त असायचा. ;-) या पुस्तकात गुंतवणूक करून बसल्याबद्दल खूपच हळहळतोय माझा जीव. :(
सागर
सागर · Fri, 17 Sep 2010 - 12:26 · उत्तर
दुनियादारीची माझी नवीन प्रत हरवली आहे (कोणीतरी पुन्हा ढापली आहे). त्यामुळे मला घ्यायचीच आहे.
तुझी गुंतवणूक वायापण जाणार नाही... तू हळहळू मात्र नकोस आता :P
स्वाती
स्वाती · गुरुवार, 23 Sep 2010 - 08:44
छान वर्णन केले आहेत. तुमची वर्णन करण्याची शैली छान वाटते.
दुनीयादारी मी अजुन नाही वाचली.
लायब्ररीत नाही मिळत :-( तुम्ही लिहीलेल वाचुन आणि बर्याच ठिकाणी ऐकुन वाटतय आता विकतच घ्यावी काय?
सागर
सागर · गुरुवार, 23 Sep 2010 - 09:17 · उत्तर
>>> लायब्ररीत नाही मिळत?
स्वाती, याचे मला खूप आश्चर्य वाटले. बहुतेक सर्व लायब्ररींतून सुहास शिरवळकरांच्या दुनियादारी च्या २-३ कॉपीज असतात. तुमच्या लायब्ररीचे नाव सांगा ना.
विकत घेणार असाल तर कुठेही मिळेल, पण पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्यमधून घेतलीत तर चांगला डिस्काऊंट पण मिळेल ... :)
स्वाती
स्वाती · Fri, 24 Sep 2010 - 06:05
आमच्या इथे एक फार छोटी लायब्ररी आहे. त्यांच्या कडे एक दोन कॉपीज होत्या पण लोक परत आणुन देत नाहीत म्हणुन ते अशी पुस्तक ठेवतच नाही म्हणे.
मी पुण्यामध्ये चांगल्या लायब्ररीच्या शोधात आहे. आपण त्यांची माहिती गोळा करण्यासाठी धागा काढुयात का? मी काल प्रयत्न केला पण धागा कोणत्या कॅटॅगरीत काढायचा हे समजले नाही. कोणी मदत करेल का?
सागर
सागर · Fri, 24 Sep 2010 - 08:43 · उत्तर
स्वाती,
तुम्ही कुठे राहता ते कळाले तर येथील अनेक सदस्य तुम्हाला चांगली लायब्ररी शोधून देऊ शकतील.
अप्पा बळवंत चौकाच्या आसपास असाल तर २ चांगल्या ग्रंथालयांची नावे सुचवेन मी.
१. पुणे नगर वाचन मंदीर
२. पुणे मराठी ग्रंथालय
या दोन ग्रंथालयांमध्ये असलेल्या ग्रंथांचा साठा प्रचंड आहे.
बाकी पुण्यात कोथरुडलाही एक मोठे ग्रंथालय आहे नाव आठवत नाही आता.
बाकी तशी चांगली ग्रंथालये औंध, कर्वेनगर, धनकवडी, हडपसर, येरवडा या ठिकाणीही आहेत.
विभाग कळाला की ग्रंथालय सुचवणे सोपे पडेल. :)
पुण्यातील भरपूर वाचनालयप्रिय वाचक पुस्तकविश्व वर आहे. तेव्हा तुम्हाला नक्की मदत होईल.
करा नवीन धागा सुरु :)
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 24 Sep 2010 - 07:37
पुस्तक मी वाचलेय. त्यामुळे परिचय आणि सागरचा प्रतिसाद अगदी सार्थ आहे असे म्हणू शकते. पात्रांची निवड, संवाद, प्रसंग.. सगळे अगदी वेगळं आणि परफेक्ट!!!! मी सुशिंची आठ-दहा पुस्तके वाचली असतील, अर्थात त्याला आता किमान दहाहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. दुनियादारी अगदी अलिकडे दोन चार महिन्यांपूर्वीच वाचली. तरी बहुतेक त्यात आधीच्या तरूणाईच्या कादंबर्यांची छाप आहे असे वाटत नाही.(चू भू दे घे) त्यामुळेच कधी त्यांच्या कादंबर्यांत तोच तोचपणा जाणवत नाही.
तरीही अगदी प्रेमात पडण्यासारखे अथवा पारायण करण्यासारखे पुस्तक नाही वाटले. पण अगदीच वेळ आणि पैसा वाया गेला असेही वाटत नाही.
@ स्वाती, जर चौकशी करणारा धागा काढायचा असेल, तर तो चर्चा या सदरात काढावा.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 24 Sep 2010 - 07:44
मी सुशिंचे पहिले पुस्तक वाचले ते "सनसनाटी" आणि तेही साधारण आठवीत असताना. तोवर मला त्यांचे नावही माहित नव्हते. वाचनालयात त्यांची बरीचशी पुस्तके पाहून हा लेखक आहे तरी कोण म्हणून मी आणि बहिणीने ते पुस्तक आणले होते. वाचून जाम तंतरली होती माझी. त्यानंतरच्या कित्येक रात्री तो मुखपृष्ठावरचा खंजीर मला डोळ्यासमोर दिसत होता. आता त्याचे कथानक तितकेसे आठवत नाही, कदाचित आज पुन्हा ते पुस्तक वाचले तर मी तितकीशी घाबरणारही नाही. आता ते काहीतरी उत्खननाशी संबंधित होते हे सोडून बाकीचे काहीच आठवत नाही. या पुस्तकाचा परिचय कुणी लिहील का??? सुशिपंख्यांना खास विनंती आहे माझी!!!!
सागर
सागर · Fri, 24 Sep 2010 - 08:56 · उत्तर
मस्त कलंदर
तुम्ही म्हणता ते खरे आहे. सनसनाटी हे अंगावर काटा आणणारे पुस्तक आहे.
उत्खननात एका प्राचीन संस्कृती ने कोरलेला एक लेख बहुतेक मिळतो त्याच्या खाली अजून काहीतरी मिळते. ते अत्भुत असते पण अमानवी आणि भयंकर असते. त्यातून जे घडते ते सनसनाटी. मी पण खूप वर्षांपूर्वी वाचले होते.
पण सुशिंच्या भयकथा वाचायच्या असतील तर 'समथिंग' ही सुशिंची सर्वोत्तम भयकादंबरी असावी असे मला वाटते. बाकीच्या भयकथांमधे तुम्हाला हिरवे डोळे, रक्ताची तहान असे टिपिकल वातावरण दिसेल. पण समथिंग मधे अशा प्रकारचे कोणतेही उल्लेख नसूनही ती वाचकाच्या मनात भय निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे, यातच सुशिंच्या भयकथांची ताकद दिसून येते.
भयकथांमध्ये सनसनाटी, समथिंग बरोबर प्राक्तन, जाणीव, माध्यम या भयकादंबर्याही उल्लेखनीय आहेतच. :)
सनसनाटी माझ्या संग्रहात बहुतेक नाहिये. पण पुन्हा एकदा तपासून पाहीन. संग्रहात असेन तर नक्की लिहिन.
समथिंग , जाणीव आणि माध्यम ही पुस्तके आहेत माझ्या संग्रहात.