परीक्षण

पुस्तक परिचय : नाझी भस्मासुराचा उदयास्त

परीक्षण मजकूर

(हा पुस्तकपरिचय मी माझ्या ब्लॉगवर आणि अन्य संकेतस्थळावर लिहिला होता.)

मित्रांनो,

मी बरीच पुस्तके वाचली आहेत. "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.
मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे.मी काही हिटलरची भलावण नाही करत. पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुसर्‍या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते.

दुसर्‍या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पराभव न पत्करता जर्मनी पहिले महायुद्ध हरले होते.हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर थोडेसेच लढले गेले होते.कैसर राजाच्या पलायनाने जर्मनीला पराभव पत्करावा लागला.जर्मन जनतेच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण युद्ध जिंकत असताना कसे हारलो.

जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले.जर्मनीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली.
हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा त्याच्यापुढे किती प्रश्न होते ते पहा
- ६० लाख लोकांची बेकारी
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत अगदी हास्यास्पद झाली होती(जर्मनीचे चलन एवढे पडले होते की एक भाजीची जुडी घेण्यासाठी पोतेभर पैसे घेउन जावे)१ डॉलर= ७,००,००० जर्मन मार्क्स
अवघ्या तीन वर्षात त्याने या प्रश्नांचा निकालदेखील लावला आणि जर्मनीला स्वयंपूर्ण देखील केले
- पहिल्या महायुद्धाची भरपाई म्हणून दोस्त राष्ट्रांना अब्जावधी रुपयांची खंडणी द्यायची होती
- जर्मनीला एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य उभारायची परवानगी नव्हती
असे शेकडो प्रश्न त्याच्यापुढे उभे होते
हे सर्व प्रश्न त्याने ज्या पद्धतीने सोडवले, ते पाहता माणूस आश्चर्यचकीतच होतो कधी नमते, तर कधी धमकी तर कधी शांततेची तान.या सर्वांच्या जोरावर हिटलरने जगातील महाशक्ती समजल्या जाणा-या बड्या नेत्यांना असे झुलवले की त्याच्या मुत्सद्देगिरीची दाद त्याचे शत्रूदेखील देतात. जगाच्या रंगमंचावरचा हा अक्षरश: एकपात्री प्रयोग होता.

हिटलर १९३३ साली सत्तेवर आला तेव्हा त्याला बहुमत नव्हतेच। तरी तो सत्तेवर आला.सत्तेवर येताच त्याने तीन वर्षात जर्मनीला एवढे बलशाली केले की जर्मनीत त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती.फक्त ३८% मते असताना तीन वर्षानंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते, यावरुन हे लक्षात यावे
- बेरोजगारी नावालाही शिल्लक उरली नाही
- जर्मनीचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावले
- व्हर्सायच्या तहाच्या चिंध्या केल्या व जाहीरपणे सांगितले की जर्मनी ही नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही
- जर्मनीच्या सैन्याची आरमार विभागासकट पुनर्रचना केली
- युवकांना बलशाली करण्यावर कठोर मेहनत घेतली
(जेव्हा १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा शत्रूसैन्यापुढे जर्मन सैनिक एवढे बलशाली आणि ताकदवान दिसायचे की दोस्त राष्ट्राचे सैन्य जर्मनीला प्रतिकार करण्याच्या योग्यतेचे नव्हते आणि हिटलरला सहज चिरडू या भ्रमात राहण्यापेक्षा दोस्त राष्ट्रांनी सैन्य बांधणीस प्राधान्य द्यावयास होते असे हे बरेच इतिहासकार मान्य करतात)

हिटलरने रक्ताचा एक थेंबही न सांडता ३ भूभाग जर्मनीला जोडले.हे त्याच्या राजकीय ज्ञानाचे आणि आपल्या शत्रूंचे पाणी जोखण्याचे उत्तम उदाहरण आहे.दुसरे म्हणजे हिटलरची विलक्षण मानसिक शक्ती.त्याचे आडाखे इतके अचूक असत की त्याच्या पुढे त्याच्या सेनानींचा विरोध पूर्णपणे थंडावला.युरोपात जबरदस्त चढाई करुन १०-१५ दिवसांत एकेक देश जिंकून हिटलरने आपल्या शत्रूला जबरदस्त धडकी भरवली होती.हिटलरने रशियावर केलेली हिवाळ्यातील स्वारी त्याला खूप घातक ठरली.इतिहासकार हे खुल्या दिलाने मान्य करतात की हिटलरने रशियावर स्वारी केली नसती तर आज आपल्याला दुस-या महायुद्धाचा इतिहास वेगळाच दिसला असता.

अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. कदाचित दुसरे महायुद्ध जर्मनीने जिंकले असते तर भारत जर्मनीच्या गुलामगिरीत आला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. विल्यम शिरर याने स्वतःच्या डोळ्यांनी हिटलरचा उदय आणि अस्त पाहिला त्यावर त्याने "राईज अ‍ॅन्ड फॉल ऑफ द थर्ड राईश" हे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात येथून उतरवून घेता येईल.

तर मित्रांनो, दुसर्‍या महायुद्धाचा हा अत्भुत इतिहास तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा
तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. :)

अभिप्राय

टण्या

टण्या · Sat, 18 Sep 2010 - 00:36

सागर,
एका अतिशय उत्तम पुस्तकाचा परिचय करुन दिला आहेस. गेल्या शतकातली सर्वात महत्वाची, अनेक गोष्टींवर अति-दीर्घकालीन प्रभाव टाकणारी व कित्येक नवीन गोष्टींना जन्म देणारी (ह्यात वैद्यकीय क्षेत्रापासून आण्विक शास्त्रापर्यंत आणि राजकीय पद्धतींपासून अंतर्गत यादवीच्या नवनवीन पद्धतींपर्यंत सर्व गोष्टी येतील, आणि अ‍ॅसिटीलीनच्या औद्योगिक उत्पादनापासून इस्रायेल/मध्यपूर्व आशिया/आफ्रिका इथले अनेक देश निर्माण करण्यापर्यंत नवीन शोध येतील) घटना म्हणजे 'दुसरे महायुद्ध'.
Rise and fall of Third Reich हे विल्यम शिरर ह्या युद्धपत्रकाराने लिहिलेले एक अवाढव्य पुस्तक. अर्थात इंग्रजीत असल्याने अनेक मराठी वाचकांपासून दूर.

वि.ग.कानिटकरांनी 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही लेखमालिका (बहुतेक माणुस मध्ये ही प्रकाशित झाली होती) आणि पुढे त्यावर आधारीत हे पुस्तक लिहून मराठीत ह्या अत्यंत महत्वाच्या अध्यायावर माहितीग्रंथ लिहिला. दहावीत असताना मी हे पुस्तक वाचले. त्यानंतर वाचलेले नाही. पण ह्या पुस्तकामुळे इतिहासाच्या पुस्तकातून न मिळणारी कितीतरी माहिती हाती लागली आणि अनेक नवीन संदर्भग्रंथ/पुस्तके/anthologies on WWII वाचण्याची प्रेरणा मिळाली.

वर सागरने अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलेलाच आहे. दुसर्‍या महायुद्धास कारणीभूत ठरलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह ह्या पुस्तकात चांगल्यापैकी आलेला आहे ज्यामुळे ह्या नरसंहाराचा उगम दिसून येतो. खुद्द युद्धाची वर्णने, डावपेच, व्युह (जर्मनी व जपान ह्या दोन्ही महत्वाच्या अक्षराष्ट्रांबद्दल विस्ताराने आहे), सहसा वाचनात न येणार्‍या उत्तर आफ्रिकेतील महत्वाच्या लढाया इत्यादी अनेक गोष्टी विस्ताराने येतात.

पुढे कधीतरी शिररचे पुस्तकदेखील वाचाच. शिररचे पुस्तक अधिक उत्कंठावर्धक होते कारण शिरर बर्‍याचदा युद्धभुमीवर/युद्धभुमीपासून खूप जवळ व खुद्द जर्मनीत नाझी उदय बघण्यास हजर होता.

सागर

सागर · Sat, 18 Sep 2010 - 13:25 · उत्तर

>>> शिररचे पुस्तक अधिक उत्कंठावर्धक होते कारण शिरर बर्‍याचदा युद्धभुमीवर/युद्धभुमीपासून खूप जवळ व खुद्द जर्मनीत नाझी उदय बघण्यास हजर होता

नेमके हेच कारण आहे मी शिररच्या पुस्तकाचा पीडीएफ दुवा देण्यामागे. :)
म्हणूनच शिरर चे पुस्तक इतर कोणत्याही लेखकापेक्षा जास्त महत्त्वाचे आणि विश्वासार्ह मानले गेले आहे.

शिररचीच
(बिस्मार्कची शिकार) The Sinking Of The Bismarck: The Deadly Hunt
(बर्लिन डायरी) Berlin Diary: The Journal Of A Foreign Correspondent, 1934-1941
(धीस इज बर्लिन रिपोर्टींग)This Is Berlin: Reporting From Nazi Germany, 1938-40

ही तीन पुस्तके देखील हिटलरच्या अंतिम युद्धावर मोठा प्रकाश टाकतात. शिरर बर्लिनमध्येच असल्यामुळे त्याला दुसर्‍या महायुद्धाचा हा थरार नेमका टिपता आला.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sat, 18 Sep 2010 - 10:55

अतिशय वाट पाहिली या परिक्षणाची. धन्यवाद.
वाचण्याची निरातिशय इच्छा आहे.
लवकरच वाचेन.

सागर

सागर · Sat, 18 Sep 2010 - 13:29 · उत्तर

नक्की वाच मित्रा.
इतिहास असला तरी पानोपानी थरार आहे या पुस्तकामध्ये.
कानिटकरांच्या या पुस्तकामुळे दुसर्‍या महायुद्धाला हिटलरने कसे नेले आणि सुरुवातीपासूनच सगळी सूत्रे आपल्या हाती कशी ठेवली याचा थरारक इतिहास आहे हा.
रशियावर स्वारी महागात पडली हिटलरला. नाहीतर सगळे युद्ध त्याने केलेल्या योजनेनुसारच चालत होते

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Sat, 18 Sep 2010 - 18:46

खूप दिवसांपासून गेले वाचायचे राहून मध्ये टाकून ठेवलेय हे पुस्तक. माझ्या घराच्या आसपास लायब्ररी नसल्याने विकत घेतलेली आणि चुकून मिळालीच तर उसनी मिळालेली पुस्तके वाचली जातात. पुढच्या वेळेस हे पुस्तक घेणार नक्की!!!

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 20 Sep 2010 - 08:53

खुप आधी वाचले होते पुस्तक
आता परत वाचावे लागेलच :-)

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 21 Sep 2010 - 15:19

एक परिचय म्हणून चांगले.

मी काही हिटलरची भलावण नाही करत. पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.

हिटलरचे दुर्गुण इतके भयानक होते की त्याचे गुण त्यापुढे फिके पडावेत. हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले होते तेव्हा मीही असाच भारावलो होतो. मात्र तेव्हाचे वयच असे प्रत्येक गोष्टीने भारावण्याचे होते :) पुढे जसजशी जाण वाढत गेली, हिटलर व त्याच्या नाझी सेनेच्या चहुअंगाने गोष्टी वाचल्यावर पुन्हा हे पुस्तक वाचतानाही/वाचूनही हिटलर हा मनात "नकोसा इतिहास" म्हणून कायम राहिला आहे. भारतात काही उजव्या व सगळ्याच अतिउजव्या लोकांना हिटलरची भलामण करण्याची मागे फ्याशन आली होती (अजुनही ती आहे) व त्याला पुरावा म्हणून दुर्दैवाने ह्या पुस्तकाचा संदर्भ दिला जात असे याची आठवण झाली

अर्थात हे पुस्तक मात्र कमी वाचनीय होत नाही. फक्त वाचताना हिटलरला दुसरी काळीठिक्कर बाजु आहे हे लक्षात ठेवावे इतकेच सांगणे.

सागर

सागर · Tue, 21 Sep 2010 - 15:58 · उत्तर

>>> अर्थात हे पुस्तक मात्र कमी वाचनीय होत नाही. फक्त वाचताना हिटलरला दुसरी काळीठिक्कर बाजु आहे हे लक्षात ठेवावे इतकेच सांगणे

हे मात्र अगदी खरे

टण्या

टण्या · Wed, 22 Sep 2010 - 00:30

ऋषिकेशने अचूक शब्दात मांडले आहे की 'हिटलरची कृष्णकृत्ये इतकी भयाण होती की त्यापुढे सर्वच फिके पडावे'. कुठल्याही बाजूने ह्या माणसाची भलावण करता येत नाही. हिमलर/गोअरींग आदी मंडळी देखील तितकेच भयानक गुन्हेगार.

रंगासेठ

रंगासेठ · Tue, 22 Feb 2011 - 07:02

मी दहावीत असताना हे पुस्तक वाचले होते, आणि तेव्हापासून आज पर्यंत असंख्य पारायणे केलीत, पण प्रत्येकवेळी नवीनच वाटते हे पुस्तक. यात हिटलरचे समर्थनाथवा उदात्तीकरण नाहीये, पण कानिटकरांनी लिहिलय तसं, हिटलरच्या ५५-५६ वर्षांच्या आयुष्यातील ६-७ वर्षे युद्धाची वगळली तर एक प्रशासक म्हणून त्याचे कार्य तपासलेच पाहिजे व त्याने घडवलेली जर्मनीची प्रगतीही उल्लेखनीय होती हेही मान्य करायला हवे.

>>'हिटलरची कृष्णकृत्ये इतकी भयाण होती की त्यापुढे सर्वच फिके पडावे'. कुठल्याही बाजूने ह्या माणसाची भलावण करता येत नाही. हिमलर/गोअरींग आदी मंडळी देखील तितकेच भयानक गुन्हेगार.<< अगदी सहमत.

सागर

सागर · Tue, 22 Feb 2011 - 09:00 · उत्तर

मी देखील या पुस्तकाचे पहिले वाचन माझ्या शालेय जीवनातच केले होते आणि त्यावेळेस प्रचंड भारावून गेलो होतो. कानिटकर म्हणतात तसे, इतिहास हा नेहमी जेत्यांचा लिहिला जातो तद्वतच शालेय पाठ्यक्रमात हिटलरला क्रूरकर्मा रंगवले गेले होते आणि दोस्त राष्ट्रांना विजेते व जगाचे तारणहार. कानिटकरांच्या याच पुस्तकामुळे मला दुसर्‍या महायुद्धाची एक वेगळी दिशा कळाली व हिटलरवर वाचन सुरु झाले.

रक्ताचा थेंबही न सांडता भूभाग घशात घालणे यातच हिटलरचा मुत्सद्दीपणा दिसून येतो... सुडेटन लँड्वरुन ठिणगी उडाली. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावरही हिटलरने अशी भरारी मारली की सर्व युरोप हादरुन गेला होता.
- ज्यूंची कत्तल
- रशियावर हिवाळ्यात केलेले आक्रमण
- मुसोलिनीची दोस्ती
- नॉर्मंडीवरुन दोस्तांचे कोंडित पकडलेले सैन्य समुद्रमार्गाने जाऊने दिले

या हिटलरला महागात पडलेल्या प्रमुख बाबी आहेत.

मणिकर्णिका

मणिकर्णिका · Wed, 23 Feb 2011 - 04:06 · उत्तर

इयत्ता आठवीत असताना वाचलेलं पुस्तक. तेव्हाही इतकं काही भारी नव्हतं वाटलं. पण एक गोष्ट मात्र नक्की की MEIN KAMPH वाचताना हे पुस्तक वाचल्याचा खूप फायदा झाला होता.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Wed, 23 Feb 2011 - 06:56 · उत्तर

"...नॉर्मंडीवरुन दोस्तांचे कोंडित पकडलेले सैन्य समुद्रमार्गाने जाऊने दिले...."

~ इथे काहीतरी चुकते आहे, सागर. माझ्या माहितीप्रमाणे "डंकर्क" वरून दोस्तांचे कोंडीत पकडलेले सैन्य हिटलरने जाऊ दिले होते. 'नॉर्मंडी' मार्गे अखेरच्या हल्ला दोस्तांनी केला, जो अंतिम विजयाचा मार्ग झाला.

इन्द्रा

सागर

सागर · Wed, 23 Feb 2011 - 10:27 · उत्तर

बरोबर आहे इंद्रराज तुमचे...
डंकर्कचे यशस्वी पलायन हेच मला अभिप्रेत होते.
चुकीबद्दल क्षमस्व.
टंकताना डंकर्क ऐवजी नॉर्मंडी आठवले.
डंकर्क बरोबर स्थान आहे. नॉर्मंडीचे युद्धाला निर्णायक दिशा देणारे ठरले.

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Sat, 26 Feb 2011 - 16:18

सागर,
ह्या पुस्तकाची तुम्ही करून दिलेली माहितीपूर्ण ओळख आणि त्यावरील सर्व `पुवि'कारांच्या तशाच सुयोग्य प्रतिक्रिया ह्यामुळे हे पुस्तक वाचावेसे वाटते आहे.
आतापर्यंत काही अपवाद वगळता इतिहास-युध्द अशा विषयांच्या वाटेला मी फारशी गेलेली नाही. आता मात्र नि:शंक मनाने असे विषय वाचायला हरकत नाही.
वरील सर्व `पुवि'कारांचे मनःपूर्वक आभार!!

"राईज अ‍ॅन्ड फॉल ऑफ द थर्ड राईश" हे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात येथून उतरवून घेता येईल.
खूप प्रयत्न करूनसुध्दा ही लिंक ओपन होत नाहीए.
काय करावे?

सागर

सागर · गुरुवार, 10 Mar 2011 - 19:04 · उत्तर

चित्रा,

पीडीएफ स्वरुपातले हे पुस्तक डाऊनलोड होते आहे. तुम्ही ऑफिसातून बघत असाल तर कदाचित ब्लॉक केलेले असू शकते. तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता विरोपवा. मी तुम्हाला पाठवतो
४ एमबी आकाराची आहे फाईल

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Fri, 11 Mar 2011 - 04:48

सागर,
ह्या विषयाशी संबंधित खालील पुस्तक (द रीडर - अनु. अंबिका सरकार) मी वाचले आहे. अर्थात मराठी....
http://www.flipkart.com/reader-bernhard-schlink-movie-tie-book-0753823292?ref=ff5652b6-ca1b-4c7d-8f09-6c8ce5bee5a8
मला ते खूप आवडले, म्हणून त्या लेखकाविषयी महिती घेत असता दुसरे पुस्तक सापडले.
http://www.flipkart.com/guilt-past-bernhard-schlink-book-0887849598
हे तुम्ही वाचले आहे का?

सागर

सागर · Fri, 11 Mar 2011 - 04:56 · उत्तर

चित्राजी,

फ्लिपकार्टचा मी देखील नियमित ग्राहक आहे.

२ छान पुस्तके माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
ही दोन्ही पुस्तके माझ्या फेसबुकाच्या विशलिस्ट मधे अ‍ॅडवली आहेत. सवडीने नक्की घेईन.

यातील द रीडर माहिती आहे पण दुसरे पुस्तक माहिती नव्हते.
दोन्ही पुस्तके नाही वाचली अजून पण नक्की वाचेन आता :)