परीक्षण

पुस्तक परिचय - निशाणी डावा अंगठा

परीक्षण मजकूर

nishaNee Daavaa anghaTha 1 nishaaNee Daavaa angaThaa 2
कधी कधी बोलता बोलता सहज एखाद्या पुस्तकाविषयी समजतं. आपल्याला कुणीतरी सांगतं की ते पुस्तक नक्की वाच. आपण हरप्रयत्नाने पुस्तक मिळवतो आणि पुस्तक भन्नाट म्हणजे भन्नाटच निघतं. अशा वेळी पुस्तक नक्की वाचायला सांगणाऱ्याचे आभार कसे मानायचे तेही कळत नाही !
‘निशाणी डावा अंगठा’ या पुस्तकाबद्दल असं म्हणजे सेम असंच झालं !

आधी तर चक्क आप्पा बळवंत चौकात चार-पाच दुकानं फिरूनही ते पुस्तक मिळत नव्हतं. बरं, हातात फार वेळही नव्हता, त्यामुळे आता पुढच्या सुट्टीतच पुण्याला आल्यावर ‘निशाणी..’ वाचायला मिळणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. घरी येताना शेवटचा प्रयत्न म्हणून अत्रे सभागृहातल्या पुस्तक प्रदर्शनाबाहेर रिक्षा थांबवली. रिक्षावाल्यांना म्हटलं, “दोन मिनटांत अलोच”. नुसतं आत जाऊन पुस्तक आहे का विचारायचं आणि नकार घेऊन परतायचं. दोन मिनटं खूप झाली की त्यासाठी ! आत गेल्यावर आश्च्यर्याचा धक्काच ना एकदम… चक्क पुस्तक मिळालं तिथे !

या कादंबरीच्या सुरूवातीला ओळी आहेत – “घटना व प्रसंग काल्पनिक वाटू नयेत इतक्या हुबेहूब गोष्टी आपल्या भोवताली घडत असतात, पात्रे काल्पनिक वाटू नयेत इतकी हुबेहूब माणसे भोवताली वावरत असतात.” एरवी आपल्याला वापरून गुळमुळीत झालेली वाक्यं वाचायची / पहायची सवय असते – “या कादंबरीतील पात्रे….योगायोग समजावा !” ‘निशाणी…’च्या वेगळेपणाची ही पहिली खूण !!

गावांमधले ‘प्रौढ साक्षरता अभियान’ हा या कादंबरीचा विषय. ‘निशाणी डावा अंगठा’ .. काय पर्फेक्ट नाव आहे ना कादंबरीचं? ‘रंगनाथ भास्कर डुकरे’ हा गावाकडचा एक तरूण शिक्षक स्वेच्छेने (आणि स्वार्थासाठी !) अभियानात पूवेका (पूर्ण वेळ कार्यकर्ता) म्हणून नाव नोंदवतो. डुकरेच्या प्रवेशापासून आणि ’पूवेका’ म्हणून बदललेल्या कामाच्या स्वरूपातून उलगडत जातो ‘निशाणी डावा अंगठा’ नावाचा भन्नाट प्रकार. कादंबरीतला खूपसा भाग बोलीभाषेतला असल्याने, वाचताना जरी तो लहेजा पकडायला थोडा वेळ लागला तरी, कादंबरी जास्तच खुमासदार होते.

साक्षरता प्रसार अभियानातले घोळ हा विषय घेऊन एकूणच सरकारी व्यवस्थेचा भोंगळ कारभार, नोकरशाहीच्या अजब तऱ्हा, कागदी घोड्यांचे महत्व (आणि त्यांचे पराक्रम !), आकडेवारीचा बडेजाव, माणसांचे ‘कातडी बचाओ’ स्वभाव असे एक ना अनेक प्रकार गमतीजमतीतून दाखवले आहेत. ‘निशाणी…’मधले साक्षरता अभियान म्हणजे एक प्रकारचा फार्सच म्हणाना.

शाब्दिक, प्रासंगिक, उपरोधिक, उपहासात्मक अशी विनोदाची वेगवेगळी रूपं आपल्याला ‘निशाणी…’मधून भेटायला येतात. रोजच्या जीवनात काही ठराविक घटना घडत असतात, आपण गृहित धरलेली काही ठराविक वाक्यं / शब्द असतात. रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं. नमुन्यादाखल बघा ….

>>>> गटशिक्षणाधिकारी खासबागेसाहेब ऑफिसात आले तेव्हा नेमके सहा वाजले होते. सूर्य आपला नेहमीसारखा चित्रातल्या दोन डोंगरांच्या मधात गडप झाला होता. पाखरंही नेहमीसारखी चारचे आकडे घेऊन घरट्याकडे परतत होती.
>>>> गध्याच्या मागून आणि साहेबाच्या पुढून कधी जाऊ नये. गधं लाथ मारतं आणि साहेब तोंड मारतं. दोन्ही गोष्टी लागल्या की माणसाले काही सुचत नाही.
>>>> आपल्याकडं कसं, आपण कम्प्युटरचा क्लास टाकला तरी सत्यनारायणाची पूजा करणार. घरी टीव्ही, फ्रिझ किंवा फोन घेतल्यावर त्याला हळद-कुंकू लावून, वाहून, नारळ फोडून शेरणी वाटणारे किंवा मोबाईल घेतल्यावर पहिला एस.एम.एस. देवाला करणारे लोक आपण.

काही ठिकाणी तर हसून हसून डोळ्यांत पाणी आलं तरी मूळ विषयाचं गांभीर्य सतत जाणवत राहतं…. चार्ली चॅप्लिनच्या विनोदासारखं ! बरं, मराठी भाषाही इतकी वळणदार आहे की शब्दाशब्दांतच विनोद दडलेला असतो. आता कुणी म्हणेल की हो, पण ‘निशाणी…’त काही ठिकाणी अश्लील शब्द आणि अश्लील विनोद सहज वापरले आहेत. पण बोलीभाषेची तीच तर मजा असते. त्यात श्लील / अश्लील असं काही नसतंच.. असतं ते फक्त मनातले विचार सरळसोट पोचवणं. ’निशाणी डावा अंगठा’मधली अस्सल नमुनेदार पात्रं तेच तर करतात.

२००५ साली ‘निशाणी डावा अंगठा’ प्रकाशित झाली.
गेल्या चार वर्षांत कादंबरीच्या एकूण पाच आवृत्त्या निघाल्या आहेत ! ’निशाणी…’ हा इतका अस्सल प्रकार आहे की माझी खात्री आहे आज कै. पु.लं. असते तर त्यांनी या कादंबरीचं आणि लेखकाचं भरपूर कौतुक केलं असतं.

या कादंबरीवर आधारित मराठी सिनेमा झळकलाय -- ‘निशाणी डावा अंगठा’ याच नावाने. पुरूषोत्तम बेर्डे दिग्दर्शक आहेत. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांना, अनुक्रमे त्या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार म्हणून, झी गौरव पुरस्कारही मिळालाय. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, संजय नार्वेकर असे एक से एक कलाकार या सिनेमात आहेत. मी कादंबरी तर तीन वेळा वाचलीय, आणि सिनेमाही पाहिला -- ‘निशाणी डावा अंगठा !’

अभिप्राय

टण्या

टण्या · Mon, 20 Sep 2010 - 02:08

वा संदीप. एका सुरेख पुस्तकाची ओळख करुन दिलीस आणि तीसुद्धा फार सुंदरपणे. मराठीतले हे सटायरच्या जवळ जाणारे फार समर्थ पुस्तक. तू वर लिहिल्याप्रमाणे ह्यातल्या भाषेचा लहेजा फारच सुंदर. 'चारचा आकडे काढल्याप्रमाणे आकाशात उडणारे पक्षी' वगैरे वाक्ये तर भन्नाटच आहेत. भाउंचा काझीवरचा संताप तर ज्या उस्फुर्तपणे उतरलाय की ज्याचे नाव ते. अतिशय सकस लिखाण आहे हे.

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Mon, 20 Sep 2010 - 08:55

पुस्तक वाचायचे राहुन गेले आहे,
यावर आलेला चित्रपट मात्र फारसा आवडला नाहीए.

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Fri, 24 Sep 2010 - 07:26

चित्रपट मात्र असाच कधीतरी टीव्हीवर लागला होता तेव्हा पाहिला होता. आपल्याकडे चांगल्या कथानकांची वाट लावण्याची उज्ज्वल परंपरा दुनियादारी मालिकेने आणि या चित्रपटाने चांगलीच पुढे चालवली आहे.
थोडंसं साक्षरता अभियानाविषयी:
मला स्वतःला मी नववीत असताना माझ्या शाळेतून एका मुलाला शिकवण्याची जबाबदारी दिली होती. तो माझ्याहून एक वर्ष मोठा आणि मुलखाचा घुमा होता. त्यात भर म्हणून निरक्षरांच्या घरी जाऊन आम्हांला शिकवायचे होते. पहिल्याच दिवशी तो मुलगा माझ्या बडबडीला घाबरला, दुसर्‍या दिवशी भेटला नाही आणि मी त्याच्या आईच्या हातचा मस्त फराळ करून आले. नंतर मात्र त्याने त्याच्या आईबाबांना तो आता शिकू इच्छित नाही हे सांगितले. माझ्या शिक्षकांनी काहीही कर पण ती साक्षरता वर्गाची वही भरून आण म्हणून सांगितले. शेवटी माझी आत्या मदतीला धावून आली आणि वेड्यावाकड्या अक्षरात ती वही लिहून दिली. अशा प्रकारे माझ्या शाळेने त्या वर्षी ४०० लोकांना साक्षर केले.

माझी आई शिक्षिका आहे. त्यांनाही असेच फार्स करावे लागतात. दोन शिक्षक घरांतून लोकांना शाळेत आणण्यासाठीच खास असतात, आणि दोन शिक्षक लोकांच्या , "उद्या पेरणी करायला जायचेय, लवकर झोपायला हवे, आज खूप काम होतं-तेव्हा दमलोय" अशा छापाच्या तक्रारींमधून शिकवायचा प्रयत्न करतात. त्यात वर्गात गळतीचे प्रमाण पुष्कळ आणि कधी कधी विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या जास्त असते. मग तेही अशाच साक्षरता स्वाध्याय वह्या भरायची कामे करतात. :)

रंगासेठ

रंगासेठ · Fri, 4 Feb 2011 - 13:04

पुस्तक मस्त आहे, अतिशय आवडले. चित्रपट पण आवडला.

यशोधरा

यशोधरा · Fri, 4 Feb 2011 - 14:54

संदीप, खूप छान लिहिलेस रे.

वल्ली

वल्ली · Mon, 7 Feb 2011 - 02:33

पुस्तक घेतलेच पाहीजे आता.