परीक्षण
पुस्तक परिचय : "पार्टनर" व.पु. काळे
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले.
भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही.
पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो.
कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले. वैयक्तीक आयुष्यावर कदाचित अगणित कादंबर्या लिहिल्या गेल्या असतील.... वाचल्या गेल्या असतील... पण स्त्री-पुरुष , नवरा-बायको , आई - मुलगा, सासू - सून , भाऊ भाऊ, जिवाभावाचा मित्र, मालक-नोकर, विक्रेता-ग्राहक, दीर वहीनी या सर्व नात्यांवर कमी शब्दांत पण परिणामकारकपणे आणि विलक्षण प्रभावीपणाने क्वचितच कोणी लिहिले असावे.
पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्य दिसणार्या तरुणाचे चित्त हरवते. तिला आपल्या खर्या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाचे भान आहे हे देखील तिलाच स्पष्टपणे सांगणे. तिच्याशी संसार फुलवताना प्रचंड समाधानाची भावना फक्त त्यालाच नव्हे तर तिलाही तितक्याच समर्पणाने जाणवते. तिला प्राप्त करताना त्याला मिळालेले समाधान, आणि त्याचबरोबर वाट्याला आलेला सख्ख्या आईसकट भाऊ व वहिनीचा तिरस्कार. असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धूमकेतू सारखा अवतीर्ण होणारा 'पार्टनर'च त्याला प्रत्येक प्रसंगात जवळ कसा वाटतो. प्रेयसीचे रुपांतर आधी अर्धांगिनीत त्यानंतर मग आईत झाल्यावर तिच्या स्वभावातील बदल किती छोट्याशाच पण काळजाला चटका लावणार्या प्रसंगांतून वपुंनी दाखवून दिले आहे.
अर्थात कथानक हे 'पार्टनर' चे बलस्थान आहे की नाही माहिती नाही. किमान माझ्यामते तरी नाही. पण त्याहीपेक्षा अद्वितिय आणि मनात घर करुन बसणारी वपुंची योग्य वेळी केलेली योग्य वाक्यांची पेरणी आहे.
जसे
"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."
"आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक."
यातही 'नरक' या व्याख्येवर वपुंनी कोटी केली आहे. हाच नरक 'पार्टनर' मध्ये तीन वेगळ्या व्याख्यांनी दाखवलेला आहे. ते इथे सांगून या सुंदर पुस्तकाचा रसभंग नाही करत :)
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं."
"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."
ही असली सुंदर सुंदर वाक्ये पुस्तक हातातून खाली ठेवलं तरी मनात हिंदोळत असतात.
आणि त्याही पेक्षा मति गुंग करणारे म्हणजे क्वचित समोर येणार्या 'पार्टनर' चे विचार आणि त्याचे जीवन
"पार्टनर" केवळ एक कादंबरी नाहिये.... केवळ एक घटनाक्रम नाहिये.... तर एक सखोल चिंतन आहे.
मला वाटते यातच व.पुं.च्या 'पार्टनर' चे यश दडलेले आहे.
ज्याचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे त्याला पार्टनर कळला असे मी म्हणणार नाही तर त्याने 'पार्टनर' जगण्याचा अनुभव घेतला असेच म्हणेन. आणि म्हणूनच 'पार्टनर' हे लग्नानंतर काही वर्षांनंतर वाचायचे पुस्तक असे मी आवर्जून म्हणेन. :)
अभिप्राय
वल्ली
वल्ली · Mon, 11 Oct 2010 - 06:02
सागर, फारच छान परिचय करून दिलात तुम्ही 'पार्टनर'चा. मी ही हे पुस्तक कॉलेजमध्ये असताना वाचले होते. पण नंतर का कोण जाणे पण वपुंची पुस्तके आवडेनाशी झाली कदाचित माझ्या रहस्यकथांकडे, ऐतिहासिक कादंबर्यांकडे तसेच खास करून श्री. ना., गोनिदां कडे झालेल्या ओढीचाही हा परिणाम असेल. पण आता मात्र नक्की 'पार्टनर' मिळवून वाचेनच.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 11 Oct 2010 - 06:36
परत एकदा पार्टनर वाचेल रे...
परिचय छान झाला आहे.
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 11 Oct 2010 - 07:06
वपुंच्या दोनच पुस्तकांशी माझे एनकाउंटर झाले होते. वपुर्झा आणि पार्टनर .. दोन्हीही पुर्ण करु शकलो नाही. दर वाक्यागणिक आयुष्याचा अर्थ उलगडुन सांगणार्या तत्वज्ञानाचे अजीर्ण झाले होते. हे झाले माझे त्यावेळचे मत. पण तु हा परिचय इतका छान आणि उत्स्फुर्त लिहला आहेस की बायेसेस सोडुन पुन्हा एकदा वाचावेसे वाटत्तेय. माझी कॉपी आहे कपाटात, धुळ झटकली पाहिजे.
धन्यवाद सागर, परिचय आवडला.
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Mon, 11 Oct 2010 - 07:53
मलाही पार्टनर वाचून पुष्कळ वर्षे झाली. कुणीतरी घरी आलं होतं. त्यांच्याकडून सहज "चाळायला" म्हणून घेतली आणि त्या व्यक्तीने परत जाईपर्यंत अर्धीअधिक संपलीही होती. :) पण नंतरही कधी ती पूर्ण झालीच नाही. कथानक चांगलं आहे यात वाद नाही, आणि त्यातली वाक्यांची पेरणीही मस्तच आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 11 Oct 2010 - 08:47
परिचय छानच झाला आहे. वपुंची धुंदी उतरलेली दिसत नाही.. तुझ्याही काहि वाक्यात डोकावतेय ;)
ओक्के. आता यादीत अॅडवून ठेवतो.. मग काहि वर्षांनी वाचेन! :)
सागर
सागर · Mon, 11 Oct 2010 - 10:28
वल्ली, निखिल, आनंदयात्री, मस्त कलंदर व ऋ सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
'पार्टनर' वाचताना त्यात समरस होऊन वाचता येईल अशा वातावरणात वाचा ही माझी तुम्हा सर्वांना विनंती. कारण वाचनाबरोबर थोडेसे चिंतनही 'पार्टनर' वाचताना होते. त्यातून एखादा अनुभव जवळचा वाटला / असला तर नको त्या ठिकाणी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी गत होईल. तेव्हा एकांतात शक्यतो वाचली तर 'पार्टनर' ची गोडी देखील कळेल आणि त्यातील दाहकता पण जाणवेल. दिलखुलास हसताही येईल आणि मनसोक्त रडताही येईल :)
ऋ, तुझ्यात तेवढी मॅच्युरिटी आहे रे त्यामुळे आत्ता वाचलीस तरी चालेल. काही वर्षांनी तर तुला पार्टनर पटेलच ;)