परीक्षण

रसाळ साहित्याचा सुरस आणि सरस इतिहास : महाराष्ट्र सारस्वत

परीक्षण मजकूर

खरे तर साहित्य हे सामान्यपणे कोण्या एकाच्या कह्यात येईल असा विषय नाही. मिपासारखया संकेतस्थळावर तेव्हा माझा नुकताच जन्म झालेला. थोडीफार वाचनाची जिज्ञासा जागृत झालेली. अशातच अक्षरधाराच्या प्रदर्शनात जाण्याचा योग आला. अपघातानंच महाराष्ट्र सारस्वत हाती लागलं. अर्थातच संशोधकी पुस्तक म्हणून दुर्लक्षयुक्त चाळणं सुरु केलं. आणि जे मधलं पान हाती आलं त्यात एकदम अद्भुत गोष्ट हाती लागली. ती म्हणजे शाक्तांच्या असलेल्या विचित्र मंत्रांच जर सकळी किंवा सुंदरी मधून बालबोध (देवनागरीत) लिप्यंतर केले तर त्या मंत्रांचा सरळ अर्थ "हे देवी अमुक गोष्ट मला दे." प्रकरण एकदम सुरस वाटू लागले. म्हटलं घ्यावं. केवळ १५० रु २ खंड तेही सवलतीत १२० रु. म्हटलं हे तर सोन्याहूनही पिवळं झालं.
जसं घरी येऊन हे पुस्तक वाचू लागलो तसं तसं पुस्तक अधिक चित्तवेधक वाटू लागलं. शं गो तुळपुळे यांनी वि ल भाव्यांच्या परिचयात लिहीलेलं सदर एकदम भारावलं करुन गेलं. भावे हे मूळातच शाळेची आवड नसली तरी वाचनाची प्रचंड आवड असलेलें व्यक्तिमत्व. लहानपणातच औत्सुक्यापोटी अनेक ग्रंथ पोथ्या वाचून काढल्या. पुढे जाऊन मिठाचा यशस्वी धंदा करणारे वि ल भावे हे साहित्यप्रेमाची आवड जोपासता यावी या साठी धंदा बंद करणारे एक मनस्वी व्यक्ती होते हे कळाले.

यांनी (वि ल भाव्यांनी) १८९८-९९ मधे गोविंदराव विजापूरकरांच्या 'ग्रंथमाला' या मासिकातील लेखापासून 'महाराष्ट्र सारस्वत' या ग्रंथाची प्रेरणा अथवा सुरुवात झाली. आणि कालांतराने महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाची निर्मिती झाली. पुढे शं गो तुळपुळे यांनी याच ग्रंथाची पुरवणी म्हणून जोड ग्रंथ अथवा खंड २ प्रकाशित केला. यात विलंचे अप्रकाशीत संशोधन + शंगोंचे संशोधन अशा २न्ही गोष्टी समाविष्ट आहेत.
विल सुरुवात करतात ते महाराष्ट्र या नावाने ओळखल्या जाणार्‍या देशापासून. त्यात अनेकविध कविंनी दिलेल्या व्याख्यांपासून सध्याची चांद्यापासून बांद्यापर्यंत. त्यानुसार महाराष्ट्रात याचे वानगीदाखल कुठे कुठे शिलालेख मिळत गेले याचे विवेचन मिळते. अनेकविध प्रागैतिहासिक, ऐतिहासिक संकल्पनांचा विचार केलेला दिसतो. व त्यातून त्यांनी प्रतिपादिलेली मतेही वाचनीय आहेत.
मग एकूण महाराष्ट्राचा वांशिक इतिहास. महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती, महाराष्ट्री या नावाने संस्कॄतापासून जन्मलेली प्राकृत भाषा. नंतर तिचे झालेले मराठी असे रुपांतरण याबद्द्ल माहीती मिळते. महाराष्ट्री या संस्कॄत जवळ्च्या प्राकृतातले ग्रंथ आज उपलब्ध नाहीत अन्यथा अभ्यासास अजून एक नवीन एक पैलू मिळाला असता असे विल नमूद करतात. मग येणारे चातुर्वण्य यासंबंधाने येणारे चिंतनही वाचनीय आहे.
यानंतर ओघानेच येतो तो म्हणजे "श्रीचावुण्डराये करवियले" वाला श्रवणबेळगोळचा शिलालेख. साष्टीजवळचा शक ११०९ मधील "तेहाची माय गाढवे झ*जे" वाला शिलालेख. एक येवढे जुने क्रियापद अजून वापरात आहे हे वाचून गंमत वाटते. असो. तर अशा अनेक शिलालेखांचा मागोवा घेतला आहे. तेव्हाची लेखन कष्ट वाचवण्यासाठीची पृष्ठमात्रेची पद्धत इ. बारकावे समजतात. लेखकाच्या मते ही मराठी साहित्यनिर्मीतीची सुरुवात. मग ज्ञानेश्वर अथवा मुकुंदराज यांच्या आधी कोणी उत्तम ग्रंथकार आधी निर्माण झाला नाही याचा समाचार विल पुरव्यानिशि घेतात. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट एकदम उच्चपदाला पोचत नसते. त्याची सुरुवात अतिसामान्य, सामान्य, असामान्य अशीच होत असते म्हणूनच जेव्हा ज्ञानेश्वर आणि मुकुंदराजांचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याच क्षमतेचे आणि लायकीचे ग्रंथकार त्याआधी मराठीत होऊन गेले हे मान्य केले पाहीजे असे विल म्हणतात आणि वानगीदाखल २-३ पुरावेही सादर करतात. हळूहळू विल महानुभाव या एका समृद्ध पंथाकडे वळतात. या पंथाच्या उगमापासून ते त्याच्या लौकिकार्थाने लुप्त आणि सुप्त मार्गाने होणार्‍या प्रसाराबद्दल माहीती आणि कारणमिमांसा येते. यातच महानुभावांच्या अलौकिक ग्रंथकर्तृत्वावर विल प्रकाश टाकतात. नंतरच्या काळात सुप्तमार्गानं पंथाचा प्रसार करण्यासठी महानुभावांनी केलेला वेगवेगळ्या सांकेतिक लिपींचा प्रयोग. व त्यासंदर्भातच पहिल्या परिच्छेदातील वाक्यं येते. विलंनी सांकेतिक लिपी आणि बालबोध लिपी यांचा पूर्ण तक्ताच तिथे दिला आहे. मग महानुभाव पंथाच्या अनेक ग्रंथकारांचा मागोवा घेऊन विल समकालीन अमहानुभवीय लेखकांकडे वळतात.
त्यातच हेमाडपंतानं प्रचलित केलेल्या 'मोडी लिपी'चा उल्लेख येतो. व त्यामुळे झालेले फायदे वाचलेले लेखनकष्ट याचा उल्लेख येतो. त्याच काळात लिहील्यागेलेल्या व्यावहारीक लेखन नियमांचा उल्लेख येतो.
मग विल ज्ञानेश्वर आणि भावंडाच्या रचनांचा मागोवा घेतात. त्यात ज्ञानेश्वरांनी अनेक तत्वज्ञान प्रणालींचा उहापोह करुन मग स्वीकारलेली नाथपंथाची वाट यावर चिंतन येते. त्यानंतर समकालीन संत नामदेव, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखोबा, सेना न्हावी इ. च्या रचनांचा सविस्तर परामर्ष विल घेतात. नामदेवांची वाल्या कोळ्याशी साधर्म्य असणारी कथा आणि त्याला त्यांची पत्नी आणि उत्तम ओवी, अभंगरचनाकार राजाई यांच्या ओव्यां आणि अभंगांमधून मिळणारा दुजोरा विल नजरेस आणून देतात. संपूर्ण कुलच कवि असणार्‍या या नामदेवांच्या कुळातील इतर कविंचाही परामर्ष विल घेतात.
मग याच मार्गाने गाडी एकनाथ १४, १५, १६ या शतकातील अन्य परिचीट आणि असंख्य अपरीचीत कविंची आणि त्यांच्या रचनेची माहीती विल देतात. सरतेशेवटी पेशवाईत बहरास आलेल्या लावण्याकार शाहीर, छंदकवि इ मागोवा घेऊन मग विल तेवढ्याच ताकदीने पुस्तकाचा उपसंहार लिहीतात. त्यातुन विलंची स्वत:ची लेखन प्रतिभाही प्रकट होते.
विविध ग्रंथकारांनी केलेले विपुल रसाळ लेखन वाचून हरपून जायला होते. तसेच या ग्रंथांच्या पोथ्या करून, त्यांच्या नकला करून त्या जपणारे तेव्हाचे लोक आणि त्या सर्वांचा आताच्या काळात संग्रह आणि अभ्यास करणारे विलंसारखे लोक पाहीले की अक्षरशः भारावून जायला होते. अशा बुद्धी-शास्त्र संपन्न महाराष्ट्रात आपला जन्म झाला याबद्द्ल अभिमानानं आणि कृतज्ञतेनं कंठ दाटून येतो.
प्रत्येके मराठी ग्रंथप्रेमीने आणि काव्यप्रेमीनं आवर्जून वाचावं असं हे पुस्तक.

अभिप्राय

यशोधरा

यशोधरा · Sun, 2 May 2010 - 18:11

सुरेख परिचय. प्रकाशन कोणाचे? अजून मिळते का हे पुस्तक?

पुण्याचे पेशवे

पुण्याचे पेशवे · Sun, 2 May 2010 - 18:23 · उत्तर

प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनचे आहे. सध्या मिळते का नाही हे माहीत नाही. :(

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Mon, 3 May 2010 - 06:14

छान रे. हे पुस्तक तू माझ्यासमोर बिकाला वाचण्यासाठी दिलं होतंस (खातोय आता शिव्या, ठळक ठशाबद्दल). मला कधी देणार आहेस?

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 3 May 2010 - 06:27

प्रत्येक मराठी ग्रंथप्रेमीने आणि काव्यप्रेमीनं आवर्जून वाचावं असं हे पुस्तक.

नव्या पुस्तकाच्या ओळखीबद्द्ल आभार.. नक्की वाचून बघु

-ऋ

नंदन

नंदन · Mon, 3 May 2010 - 10:10

पुस्तकपरिचय

विविध ग्रंथकारांनी केलेले विपुल रसाळ लेखन वाचून हरपून जायला होते. तसेच या ग्रंथांच्या पोथ्या करून, त्यांच्या नकला करून त्या जपणारे तेव्हाचे लोक आणि त्या सर्वांचा आताच्या काळात संग्रह आणि अभ्यास करणारे विलंसारखे लोक पाहीले की अक्षरशः भारावून जायला होते. अशा बुद्धी-शास्त्र संपन्न महाराष्ट्रात आपला जन्म झाला याबद्द्ल अभिमानानं आणि कृतज्ञतेनं कंठ दाटून येतो.

--- क्या बात है! पूर्ण सहमत आहे. ह्या जुन्या साहित्यसंपदेचं म्हणावं तसं दस्तऐवजीकरण अजूनही झालेलं नाही असं एक मत ऐकून आहे. ह्या समजाला छेद देणारा हा इतिहास दिसतो आहे. मिळवून (किंवा उसने घेऊन :)) वाचायला पाहिजे, ह्या यादीत भर घातली आहे :)

आनंदयात्री

आनंदयात्री · Mon, 3 May 2010 - 20:47

धन्यवाद पेशव्या. असे पुस्तक असेल असे वाटले नव्हते .. अक्षरशः खजिना गवसल्याचा आनंद झालाय.

@नंदनः

>>वाचायला पाहिजे, ह्या यादीत भर घातली आहे

अशी यादी पुस्तकविश्ववर जपता आली तर बहार होईल ना ? यादी संपवणे टारगेट ठेवायचे .. वाचुन झाले की पुस्तक आपोआप वाचलेल्या पुस्तकाच्या यादीत ढकलता येईल !

नंदन

नंदन · Tue, 4 May 2010 - 02:39 · उत्तर

>>> अशी यादी पुस्तकविश्ववर जपता आली तर बहार होईल ना ? यादी संपवणे टारगेट ठेवायचे .. वाचुन झाले की पुस्तक आपोआप वाचलेल्या पुस्तकाच्या यादीत ढकलता येईल !

--- सहमत आहे!

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · Tue, 4 May 2010 - 10:07

शी यादी पुस्तकविश्ववर जपता आली तर बहार होईल ना ? यादी संपवणे टारगेट ठेवायचे .. वाचुन झाले की पुस्तक आपोआप वाचलेल्या पुस्तकाच्या यादीत ढकलता येईल !

गेले वाचायचे राहून...
नावाची नवीन यादी बनविण्यात आलेली आहे. जिथे सदस्य त्यांना वाचावयाची असलेली पुस्तके जोडु शकतात. पुस्तक वाचल्या नंतर सध्या मॅन्युअली वाचलेले म्हणुन नोंदवावे लागेल

टग्या

टग्या · Wed, 7 Jul 2010 - 00:41

साष्टीजवळचा शक ११०९ मधील "तेहाची माय गाढवे झ*जे" वाला शिलालेख.

याबद्दल अधिक (सखोल, तपशीलवार) माहिती मिळू शकेल काय?

याबद्दल उडतउडत तोंडी ऐकलेले आहे पण खात्रीलायक तपशील माहीत नाहीत. जालावरही फारशी किंवा सविस्तर माहिती मिळू शकली नाही. बहुधा शिलालेखात अगोदर जे काही लिहिलेले आहे 'त्याचे उल्लंघन करणार्‍यास हे होवो' अशा प्रकारचा मजकूर आहे असे काहीसे ऐकलेले आहे. (तपशिलांबाबत प्रचंड कुतूहल आहे.)

धन्यवाद.