परीक्षण

सोनिया गांधी: एक चरित्र

परीक्षण मजकूर

भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल.

अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि. 'रशिद किडवई" हे सोनियांच्या घरापर्यंत बर्‍याचदा जाऊ शकणार्‍या व्यक्तींपैकी एक. अश्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिले आहे हे बघुन त्यातील माहिती केवळ "सोनियास्तुती" नसेल अशी अपेक्षा होती आणि ती काहि अंशी पूर्ण झाली.
सोनिया गांधींचे बालपण, कॉलेज, राजीव गांधीचा जीवनात प्रवेश, इंदीरा गांधींबरोबरचे संबंध, संजय गांधींबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध, मनेका गांधींचा प्रवेश, राजीव गांधींबरोबरच्या त्यांच्या गप्पा , राहूल गांधी - प्रियांकाचा प्रवेश, राजकीय घडामोडी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एका सामान्य परदेशी स्त्रीचा एका खंडप्रा:य देशाची नेत्री म्हणून केलेला प्रवास ह्या पुस्तकात खूप सुंदर मांडला आहे.

पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोनियांच्या चरित्राबरोबरच पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळातील कॉंग्रेसचा प्रवासही नीट समोर येतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास बर्‍याचदा वाचला जातो. त्याच बरोबर हा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासही तितकाच रोचक व नाट्यापूर्ण घटनांनी भरलेला व भारलेला आहे. आणिबाणी असो वा मंडल आयोग, संजय गांधींची "मारूती" असो वा नसबंदी, बाबरी मशीद असो वा भारताने लढलेली युद्धे किंवा त्यांनी केलेला पंतप्रधानपदाचा (तथाकथित) त्याग ह्या व अश्या अनेक प्रसंगांतून बदलता देश, बदलती काँग्रेस, बदलते राजकारण व त्यातून राजकारणापासून जाणिवपूर्वक दूर असणार्‍या व पतीनिधनानंतर तर राजकारणापासून पूर्ण संबंध तोडणार्‍या एका स्त्रीचा प्रवास अतिशय रोचक आहे. हा नुसता सोनिया गांधींचा प्रवास नसून त्यांच्या परदेशी संस्कारांना देशी संस्कारात ढाळण्याचा देखील प्रवास आहे, तो "गोरी बहु" ते "देसी बिटीया" ते "मॅडम" असा प्रवास आहे, तो अवखळ मुलगी, ते मनस्वी प्रेयसी, ते एकनिष्ठ पत्नी, लाडकी सून व खेळकर वहीनी, ते आई, ते विधवा, ते काँग्रेस अध्यक्षा असा विस्मयकारक प्रवास आहे.

गांधी घराण्याबद्दल, किंवा सोनिया गांधींबद्दल तुम्हाला आदर असो किंवा राग असो, त्यांच्याबद्दल उत्सुकता नाहि असा भारतीय मिळणे कठिण आहे असे वाटते. आणि हे पुस्तक त्या उत्सुकतेला बराच न्याय देते. त्यामुळे एका निराळ्या स्त्रीचे निराळे व अतिशय रोचक चरीत्र वाचण्यासाठी हे पुस्तक सुचवतो.

अभिप्राय

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Sat, 22 May 2010 - 15:26

हात सोडा की थोडा मोकळा. हे काय टिपण लिहिल्यासारखं? काढा वेळ आणि होऊ द्या एक बडा ख्याल या पुस्तकाविषयी.

ऋषिकेश

ऋषिकेश · Sat, 22 May 2010 - 19:37 · उत्तर

:).. सध्याचा मिळणारा वेळ बघता हाच ख्याल बडा समजून घ्यावा. (त्रोटक ओळखीबद्दल क्षमस्व). वेळ मिळताच इतर एखाद्या पुस्तकावर विस्ताराने लिहिने

नीलकांत

नीलकांत · Sun, 23 May 2010 - 08:04

या आधी इंदिरा गांधींविषयी वाचलेले आहेच मात्र अद्याप सोनीया गांधींबद्दल काहीच वाचलेले नाही.

- नीलकांत