परीक्षण

सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

परीक्षण मजकूर

आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला,
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.

अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं. ज्यानं बाप हे नातं कधी पाहिलच नाही आणी ज्या घर नावाच्या जागेत तो लहानपणी राहिला तिथे पदोपदी (हो अक्षरशः पदोपदी ) त्याच्या वाटेला उपेक्षाच आली. ६-८ वर्षाच्या वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत, तमाश्यात नाचणार्‍या मावशीबरोबर फडावर राहुन पडेल ते काम करुन कमावलेल्या पैश्यात, पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागणार्‍या पुस्तकांची खरेदी करण्याची स्वप्नं जेव्हा त्याचा सख्खा आजा एका रात्रीच्या दारुसाठी उधळुन लावतो तेव्हा त्या लहानग्या जिवाला त्याच्या वयाला न शोभणारे प्रश्न पडतात, त्याच्याकडे आपली आई आपल्याबरोबर रहात नाही हे एकच उत्तर असते. हे कोल्ह्याट्याचं पोर नंतर पुस्तकात जागोजागी आई भेटावी म्हणुन नवस करत रहातं. त्याचा देव त्याच्या आज्यासारखाच मुर्दाड होता जणु, कधी पावलाच नाही त्याला. त्याचं बालपण सगळं आईची वाट पहाण्यात अन घरातल्या एतखाउ पुरुषांचा मार खाण्यात गेलेलं. घरातली सगळी बायकांनी करण्याची कामं त्याच्या वाट्याला आलेली असायची. अगदी पाहुण्यांना जेवायला वाढण्यापासुन ते त्यांचे उष्टे खरकटे काढण्यापर्यंत.

त्याच्या आजुबाजुला सगळी आपापल्या वासनांना इच्छांना चटावलेली अन त्यांनाच अग्रक्रम देणारी अन आयुष्यात भावभावनांना फारसे स्थान नसणारी, आपल्या गरजा सोप्यात सोप्या मार्गाने पुर्ण करु इच्छिणारी माणसं होती. घरातले सगळे पुरुष म्हणजे लेकिंना अन बहिणींना नाचायला लावणारे, त्यांच्या पैश्यावर मालकी दाखवुन माज करणारे. त्यांना उत्पन्नाचे साधन मानणारे. एखादा माणुस त्यांच्या घरातल्या मुलीशी-बहिणीशी लग्नाला तयार जरी झाला तरी आधी त्याच्याकडनं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करवुन घेणारे अन मगच पुढे जाउ देणारे दगड. त्यांना कुठेही किशोरच्या मेहनतीचे, अभ्यासातल्या यशाचे कौतुक वाटत नाही, अभिमान वाटत नाही. अन वाटेलही कसा अभिमान ? पैश्याच्या लालचीनं अन आयतं खाण्याच्या सवयीनं त्यांच्या अभिमानाचा जनु खुनच केलेला असतो.

अशा या सगळ्या वातावरणात वाढणारा, आईपासुन दुरावलेला एक उपरा पोर, नशिबाची सगळी दानं उरफाटी पडत असतांना जिद्दीने शिकतो, डॉक्टर होउन त्याच्या आयुष्याची लढाई लढतो अन जिंकतो पण !
गोड गोजिरी, पैश्याच्या राशीत लोळणारी, तुपात भिजवलेली डिझाइनर दु:ख पाहुन डोळे ओले करण्याची सवय लागलेल्या शहरी माणसाला हे कोल्ह्याट्याचं पोराचं अंगावर येणारं, सुन्न करणारं दु:ख सोसवत नाही, पेलवत नाही.
विजिगिषा हा शब्द तोकडा पडावा इतकी ... अक्षरश: इतकी ... चांगले जगण्याची, शिकण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती कोल्ह्याट्याचं पोर दाखवुन जातं!
आयुष्याला लढाईची उपमा द्यायला याहुन योग्य माणुस नसावा कदाचित !

किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!

अभिप्राय

बटुकेश्वर

बटुकेश्वर · Sat, 1 May 2010 - 13:21

वर लिहिल्याप्रमाणे अंगावर येते, हे खरेच. हे पुस्तक माझ्या संग्रही आहे; आणि दोन-तीनदा वाचले आहे. ग्रंथाली प्रकाशन नव्यानेच चालू झाले होते तेव्हा त्यांनी आजीव सदस्यत्त्वाची योजन राबवली होती. रु. २०००/- या तत्कालीन (माफक?) शुल्कात माझी आई ग्रंथालीची आजीव सदस्य झाली. ग्रंथालीतर्फे प्रकाशित होणार्‍या पुस्तकांच्या प्रती आईला मोफत येत असत. हे पुस्तक तसेच आले होते. पहिल्यांदा काहीशा अडनिड्या वयात वाचले. त्यावेळी गोष्ट कळली, कोणावर काहीतरी मोठा अन्याय झाला, हे कळले. पण त्याचे नक्की स्वरूप, अर्थ आणि खोली व भयानकता तितकीशी कळली नाही. कॉलेजात असतना पुन्हा वाचले गेले तेव्हा जास्त भयावह वाटले, टोचले.

याच कथेवर/पुस्तकावर आधारीत पुस्तकाच्याच नावाचा चित्रपट मध्यंतरी आला होता. त्यात किशोर चे काम समीर धर्माधिकारी यांनी तर शांताबाईंचे (किशोरच्या आई) काम सुरेखा कुडची यांनी केले होते, असे आठवते. माध्यमिक शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल परळच्या परिवर्तन या संस्थेने केलेल्या सत्कारात खुद्द किशोर काळेंच्या हस्ते पारितोषिक स्वीकारले होते, याचीही हृद्य आठवण पुन्हा ताजी झाली. डॉ. किशोर यांच्या अल्पवयातच अकाली झालेला अपघाती मृत्यू आजही फार हेलावून जातो.

कालांतराने ग्रंथालीची आजीव सभासद योजनाही बंद पडली. आई सदस्य असेपर्यंत पुस्तकांचा खजिनाच घरी जमला. वेळ मिळेल तसे त्या खजिन्यातील मी पारखलेल्या एकेक दागिन्याबद्दल काहीतरी लिहीन म्हणतो. तूर्तास इतकेच!

विनायक

विनायक · Sat, 1 May 2010 - 15:42 · उत्तर

परिचय एवढा अंगावर येतो तर पुस्तक वाचल्यावर काय होत असेल?

यशोधरा

यशोधरा · Sat, 1 May 2010 - 13:30

हे पुस्तक वाचायचे राहिलेच आहे अजून. धन्यवाद प्रसाद!
बटुकेश्वर, तुमच्या आईने किती उत्तम निर्णय घेतला! :)किती पुस्तकं जमलीयेत संग्रहात?

बटुकेश्वर

बटुकेश्वर · Sat, 1 May 2010 - 19:34 · उत्तर

एक मोठा खण नुसता पुस्तकांनीच भरला आहे. मी हिंदू झालो (डॉ. रविन थत्ते), अंताजीची बखर, फुले वेचिता (लता मंगेशकरांचे आत्मचरित्र) इ. जमेल तसे काही निवडक पुस्तकांबद्दल येथे नक्की लिहीन.

पुणेरी

पुणेरी · Sun, 2 May 2010 - 10:32

अत्यंत सुंदर पुस्तक आहे. खडतर जीवन सोसलेल्या माणसांमधे बहुतेकदा अभिनिवेश येतो. पण काळे यांच्या या लिखाणात अभिनिवेश टाळलेला आहे. त्यामुळे ती कैफियत ठरत तर नाहीच पण ते जिणे अंगावर येते. असेच दुसरे मला आवडलेले पुस्तक म्हणजे 'तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा'.

नंदन

नंदन · Mon, 3 May 2010 - 10:15 · उत्तर

सहमत आहे. 'आहे हे असं आहे' या शैलीमुळे हे लेखन अधिक भिडतं.

>>> असेच दुसरे मला आवडलेले पुस्तक म्हणजे 'तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा'
--- ह्या पुस्तकाबद्दल अधिक वाचायला आवडेल, प्रसन्नदा. योगीराज बागुलांचं आहे ना? त्यांचं अलीकडे आलेलं 'पाचट' हे आत्मचरित्रही वाचण्यासारखं आहे असं ऐकून आहे.

पुणेरी

पुणेरी · Mon, 3 May 2010 - 11:40 · उत्तर

बागुलांचच आहे. विठाबाई भाऊ नारायणगांवकर यांच्यावर चरित्रात्मक पुस्तक आहे ते. पाणी येते डोळ्यातुन विठाबाईंची जीवनकथा वाचताना.

नुकतेच या विषयाशी संबंधित अजुन एक पुस्तक मिळालेय - म वा धोंडांचे मराठी लावणी. अजुन वाचायचेय ते.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Sun, 2 May 2010 - 13:18

पुस्तक छानच आहे. मला आवडलेले आहे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 3 May 2010 - 06:22

अप्रतिम पुस्तकाची तितकीच छान ओळख...

-ऋ

दिपक

दिपक · Sat, 5 Jun 2010 - 07:52

जबरदस्त ओळख आनंदयात्री.. वाचायचे आहे ह्या यादीत टाकले आहे.