परीक्षण
तंबी दुराईचा 'दोन फुल एक हाफ' चा विनोदी प्याला ...
शेकडो वर्तमानपत्रे आणि त्यातले हजारो स्तंभ.
हजारो मासिके, साप्ताहिके आणि त्यातले तितकेच स्तंभ.
पण ह्यातले काही आपल्या ओळखीचे, काहींची ओळ्ख इतकी जवळची की त्याचे 'व्यसन' लागलेले.
तंबी दुराईचे 'दोन फुल एक हाफ' हा अशाच एका व्यसनामधला एक.
रविवारी सकाळी पेपर वाचायचा म्हणजे की पहिल्यांदा लोकसत्ताचे 'लोकरंग' उघडुन त्यातले 'दोन फुल एक हाफ' वाचण्याचे व्यसन, चहाबरोबर हा अडीच प्याला चांगलाच रुचकर लागतो. हे केवळ माझे नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक मराठी माणसांचे व्यसन.
व्यसन त्या 'दोन फुल एक हाफ'चे ....
तंबी दुराईंच्या ह्या स्तंभातल्या अशाच काही निवडक लेखांचा हा संग्रह, कुठली पान उघडा आणि वाचुन पोटभर हसा खात्री...
तंबी दुराईने विनोदासाठी एकच शैली कधी वापरली नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी गण-गौळण, कविता, चारोळ्या, मुक्तक, समिक्षा, निवेदन, दुसर्याच्या सदर्यात शिरुन केलेले अनुभवकथन तर कधी कपाटावर बसुन पाहिलेल्या मिटिंगा आणि खलबते ह्यांचा अहवाल असा वेगवेगळा लेखनप्रकार तंबीने समर्थपणे हाताळला आहे.
तंबीच्या स्तंभातली पात्रे काल्पनिक नाहीत. त्यांची सर्व पात्रे रोजच्या रोज टीव्हीवर, पेपरांमध्ये सतत आपल्याला दिसतात. कधी ती वाद घालत असतात तर कधी गळ्यात गळे घालुन 'ऐक्याची' घोषणा करत असतात, कधी भाषणे देत असतात तर कधी शिवीगाळ करत असतात, कधी निरर्थक बोलुन वादंग माजवत असतात तर कधी एखादा महत्वाचा मुद्दा काढुन विरोधकांची बोलती बंद करत असतात.
राजकारणी, पुढारी-नेते, साहित्यिक आणि प्रकाशक, खेळाडु व त्यांचे प्रशिक्षक, पत्रकार बंधु संपादक तसेच टीव्हीवरचे वॄत्तनिवेदक, अभिनेते दिग्दर्शक गायक वादक, भांडवलदार-उद्योगपती अशी खुप मोठ्ठी रेंज असलेली ही आपल्या सर्वांच्या परिचयाची पात्रे तंबीच्या मुखातुन आपल्याशी 'दोन फुल एक हाफ'मधुन बोलत असतात.
एवढे सगळे प्रकार हाताळणे आनि प्रत्येक व्यक्तिरेखचे बाज संभाळणे हे केवळ लेखनकसब असुन जमत नाही, तर त्यासाठी व्यासंग आणि भरपुर वाचनही हवे असते, नजरही किंचित 'तिरकी' असावी लागते. ज्या व्यक्तीवर लिहायचे आहे त्यंचे फक्त विचार आणि तत्वज्ञान माहित असुन भागत नाही तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक सवयी, लबकी शारिरीक ठेवण आदींचे नेमके आणि अचुक भान असावे लागते. तंबी दुराईंना मात्र हे अचुक जमते, त्यांच्या लेखनातुन जणु ही पात्रे स्वतःच बोलतात.
तंबीचा विनोद हिंस्त्र नाही किंवा तो समोरच्याची पार चिरफाडही करत नाही, तो एक हलकीच टप्पल मारतो व किंचित वस्त्रहरण करतो, मात्र हे करताना तंबी कधीच कमरेखाली वार करत नाही, त्याची त्याला गरजही नसावी. तंबीचा विनोद माणसाला आनंद देतादेता आत्मपरिक्षण करायला लावतो आणि किंचित गुदगुल्याही करतो तंबी व्यक्तीवर नव्हे तर त्या प्रवॄत्तीवर आघात करतात म्हणुन तंबी ज्या माण्साची खेचतात तो माणुसही तंबीला दिलखुलस दाद देतो, हेच तंबीच्या लेखनाचे यश ...
४ घटका हसवता हसवता पटकन एखाद्यावेळी एखाद्या विषयाचे गांभिर्य पटवुन देणारे हे लेखन.
हा तंबीचा 'दोन फुल एक हाफ'चा प्याला जरुर प्यावाच असा आहे ...
अभिप्राय
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 12 May 2010 - 11:48
डॉनराव चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन दिलात..
रवीवारची सकाळ खरोखर दोन फुल एक हाफ च्या वाचनानेच होते..
आता त्याची सवयच झाली आहे. अगदी तंबी मधला परवाचा महाराष्ट्र सुवर्ण मोहत्सवाचा वग पण अजुन डोक्यात ताजाच आहे. अर्थात पुस्तक म्हणुन वाचण्यात वेगळी मजा येणार ह्यात वादच नाही.
बेस्ट ऑफ तंबी दुराई नक्की वाचणार..
अगदी सहमत आहे ह्या वाक्याशी
अवांतरः- वृत्तपत्रातल्या कॉलमचे जेव्हा पुस्तक होते.. त्यात बरेच वेळा त्या कॉलमला तत्कालीन संबध असतो.. असे लेख पुढे वाचताना आउट्डेटेड वाटतात का????
छोटा डॉन
छोटा डॉन · Wed, 12 May 2010 - 12:21 · उत्तर
>>अवांतरः- वृत्तपत्रातल्या कॉलमचे जेव्हा पुस्तक होते.. त्यात बरेच वेळा त्या कॉलमला तत्कालीन संबध असतो.. असे लेख पुढे वाचताना आउट्डेटेड वाटतात का????
:)
अत्यंत रास्त मुद्दा आहे.
ह्याचे उत्तर 'होय आणि नाही' असे दोन्हीही प्रकारे देता येऊ शकते.
कारण ह्या स्तंभातले काही लेख तात्कालिक परिस्थितीवर भाष्य करणारे असतात की ज्यांचा संदर्भ काही दिवसांना ऑट ऑफ कन्टेक्स्ट होतो.
मात्र काही लेख जे व्यक्ती, संस्था, एखादी नेहमी लक्षात राहणारी घटना ह्यावर लिहले असतात ते आउटडेटेड वाटत नसावे.
तंबीच्याबाबत बरेच लेख अजुन सुद्ध बरेच हसवुन जातात ...
अवांतर : शिरिष कणेकरांचे ह्या प्रकारचे लेखन बहुदा 'आउटडेटेड' वाटत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Wed, 12 May 2010 - 12:35 · उत्तर
:-)
अर्थात जे अश्या प्रकारच्या घटनेवर लिहिलेले असतात ते कायम हसवणारच....
पहील्या प्रतिसादात मी माझे मत लिहिलेच नव्हते त्या अनुषंगाने बोलायचे झाले तर कधी हो आणि कधी नाही असेच असणार... एक उदाहरण द्यायचे झाले तर नवी गुगली हे दिलीप प्रभावळकर ने षटकार मधे लिहिलेल्या लेखांचे पुस्तक मला कुठे कुठे आउटडेटेड वाटले होते.
बाकी ह्या अवांतर चर्चे बद्दल सगळ्यांची माफी मागतो.
आनंदयात्री
आनंदयात्री · गुरुवार, 13 May 2010 - 20:57
मस्तच डॉनराव. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचता .. आम्हाला अंमळ कौतुक वाटते :)
परिचय छान आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 14 May 2010 - 11:04
तंबी दुराईचे हे पुस्तक वाचले आहे. मात्र पेपरात ताजी टिप्पणी वाचताना जी मजा येते ती पुस्तकात आली नाहि. वर निदे म्हणतात त्याप्रमाणे मला व्यक्तीशः काहि प्रसंग आउटडेटेड वाटाल्याने पहिल्यांदा वाचल्यावर / प्रसंग ताजा असताना आलेली मजा आली नाहि.