परीक्षण
तुकयाची आवली - एक अनोखा जीवन प्रवास
'' तुकयाची आवली'' ही सौ. मंजुश्री गोखले यांची कांदबरी. तुकारामांची दुसरी पत्नी आवली हीच भावविश्व सांगणारी...एका वाक्यात सांगायचे तर ''कल्पनेतला चंद्र हातात घरण्याची मनिषा बाळगून तो चंद्र प्रत्यक्षात प्राप्त करणं'' असंच या कादंबरी बाबतीत म्हणावं लागेल. एका स्त्रीनं दुसर्या स्त्रीची उलघडलेली जीवनगाथा अशा स्वरूपाची ही कादंबरी लेखिकेचा यशस्वी प्रयत्न आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही.
माझ्यामते एखाद्या कांदबरीबाबत विचार करताना, तिच्या यशापयशाचा लेखाजोखा मांडताना एक महत्वाचा निकष म्हणजे ती वाचकाच्या मनाला भावते का ,कारण लेखकाने आपली प्रतिभा, आपले विचार लेखणीत उतरवलेले असतात, ते वाचकांच्या मनात पेरण्यासाठी ...आणि जेव्हा लेखिकेच्या ह्दयातील स्पंदने वाचकाच्या ह्दयापर्यत पोहोचतात तेव्हा ती कांदबरी वाचकाच्या, वाचनाच्या अंगाने सर्वोत्कृष्ट असते.,आणि ही आवली वाचकाला भिडते. संवेदनांची तार छेडते आणि, म्हणूनच तो एक यशस्वी लेखनप्रयास ठरतो.
खरंतर ''आवली'' सारखा किचकट आणि अप्रचलित विषय निवडल्याबद्दल प्रथम लेखिकेचे अभिनंदन कारावयास हवे. कारण, या कांदबरीची इमारत बांधणे फार अवघड होते.ना याचा पाया माहित होता, ना त्यांची उंची... हातात होते ते मधले दोन-चार दगड मात्र या दगडांना सामावून घेऊन इमारत बांधण्याचे शिवधनुष्य त्यांनी उत्तमपणे पेलले आहे.
'' तुक्याची आवली'' ही वास्तव कादंबरी नाही, पुर्ण काल्पनिक कांदबरीदेखील नाही येथे वास्तव, आणि कल्पना यांचा सुरेख समन्वय साधला गेला आहे. इतिहासात फक्त मुंगीएवढया उल्लेख असलेल्या तुकारामाच्या दुसर्या पत्नीच्या, जी तुकारांमाबरोबर सावली प्रमाणे होती त्या सावलीरूप आवलीचा हा जीवन प्रवास आहे. जगावेगळा नवरा ,जगावेगळया परिस्थितीत या महिलेने स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे जीवन कसे चालवले याचा हा लेखाजोखा आहे. त्याला, स्त्रीसुलभतेची जोड आपसुकच मिळाली आहे.
या कांदबरीत अनेक पात्रे आहेत. त्या प्रत्येकाच्या अस्तित्वामुळे ही कांदबरीत पुढे जात राहते. या कादंबरीत लेखिकेने सर्व पात्रांना योग्य जागा व योग्य माप दिले आहे. त्यामुळे, कुठेही पात्रे कादंबरीशी अलिप्त न वाटता त्याला पुरकच राहतात.येथे लेखिकेने इतिहास व कल्पना यामध्ये सरमिसळ होणार नाही यांची काळजी घेतलेली दिसते. कथानकात प्रसंगानुरूप अनेक पात्रे आलेली आहेत. त्या प्रत्येकाची स्वभाववैशिष्टये, वय, जाणीवेची पातळी वेगळी आहे मात्र, त्या सर्व पातळयात दिसणारा फरक लेखिकेने आपल्या ओघवत्या शैलीत योग्यपणाने मांडलेला आहे. यामुळे, कथा कोठेही भरकटत जात नाही वा तो एकजिनसीपणा कुठे तुटत नाही....स्त्रीसुलभतेमुळे असेल कदाचित, पण स्त्रीपात्रे अधिकच खुलली आहेत .त्याच्यातील भावनिक आंदोलने अधिक स्पष्ट, भावस्पर्शी आहेत... आवलीच्या पर्यायाने तुकारामांच्या जीवनप्रवासात सामजिक परिस्थीतीने मोठी भूमिका बजावली.आहे . तो काळ रंगवण्यात लेखिकेला बरेच यश आले आहे.हे सारे लेखन परिस्थिती डोळयासमोर उभी राहण्यास मदत करते ज्यायोगी तो जीवनपट सहजतेने उलघडत जातो.
आवलीबाबत म्हणाल तर उत्तम या एकच शब्दाने आवलीसंबधीत लेखनावर प्रतिक्रिया देता येईल. ''आवली'' हे आपल्या कथानकाचे मुख्यपात्र आहे. याची जाणीव ठेवून लेखिकेने ते मस्त खुलवले आहेत. इतिहासाचे जास्त ओझे नसल्याने तीला या पात्रात विविध रंग भरण्यास पुर्ण वाव होता. ज्याचा पुरेपुर वापर लेखिकेने केलेला आहे. आपल्याला काय सांगायचे आहे ते लेखिकेला पुर्ण ज्ञात आहे. हे प्रत्येक वाक्यातून जाणवते.. तीचे बालपण, सासर, माहेर, आंनदी वातावरण असे काही रंगविले आहे की ते एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचते आणि अचानक युटर्न घेते .त्यामुळे तीची मानसिक स्थिती, तिच्या मनातील कल्लोळ, हळूहळू तिचे विचार पटूदेखील लागतात. सपुर्ण कादंबरीत लेखिकेने तिचे व तुकारामांचे तिचे व पांडूरगाचे आणि तिचे तिच्या मुलांशी असणारे नाते संवादातून सुयोग्यरित्या मांडलेले आहे. त्यामुळे तेथे कोठेही अवास्तवता जाणवत नाही. याशिवाय लेखिकेने एक महत्वाची गोष्ट केली आहे. तीने इतिहास कोठेही टाळलेला नाही. आवलीची एक अष्टपैलू स्त्री म्हणून ओळख निर्माण करताना तीने भांडणे केली हे कोठेही टाळले नाही पण, त्या भांडणाचे लिखाण अशाप्रकारे झाले आहे की ती भांडणे होण्यास आवली नाहीतर परिस्थिती कारणीभूत होती हे दाखवून देण्यास लेखिका तसुभरही कमी पडलेली नाही म्हणूनच शेवटी एक नवी आवली उभी करण्यास लेखिका यशस्वी होते आणि इथेच तिचा खरा विजय आहे.
तुकारामांबाबत बोलायचे, तर त्यांचे चरित्र सर्वज्ञात आहे. त्यास धक्का लावण्याचे कोणतेही धाडस लेखिकेने केलेले नाही हे आवलीचे जीवनवर्णन असल्याने साहजिकच तुकारामांना दुय्यम स्थान आहे पण दुसर्या अंगाने त्यांचेही चरित्र फुलत जाते. येथे लेखिकेने तुकारामांचा दुष्टीकोन, आवलीचा दुष्टीकोन, त्यातील बदल, समाजावर व समाजाचा होणार परिणाम यातील द्वंद्व योग्य तीव्रतेने प्रगट होते. मात्र लेखिकेचा एक विचार वाखणण्याजोगा आहे .गेल्या 3-400 वर्षात तुकारामांबद्दल अनेक अंधश्रध्दा निर्माण झाल्या पण त्याचा वापर कादंबरीत कोठेच नाही. उलट त्याला व्यवहारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आहे सदेह वैकुंठगमन स्वप्नात दाखवणे हे तर फारच छान म्हणावे लागेल. महत्वाचे म्हणजे आवलील मोठे करताना तुकारामांच्या प्रतिमेला त्यांच्या जेष्ठत्वाला कणभरही धक्का लावलेला नाही. त्यामुळे कोणताही विद्रोह न होता आवली आपल्या मनात घर करते हे महत्वाचे.....
लेखिकेने आपल्या कादंबरीत एक वेगळा प्रयोग केला आहे. तुकाराम- आवली या दोन पात्रासोबतच तीने विठ्ठल रखुमाईला देखील सजीव केले आहे व प्रत्येक भागानंतर एक प्रेक्षक म्हणून विठ्ठल- रखुमाईची त्या प्रसंगावरील प्रतिक्रिया घेतली आहे. यामुळे साक्षात देव-भक्त, त्यांची पत्नी यांच्यातील नाते सबंध छानपणे मांडता आलेले आहेतच पण त्यामुळे कादंबरीला एक विशिष्ट वजन प्राप्त झालेले आहे.तुकारामाच्या वैवाहिक जीवनात संकटे देवाने म्हणजे पांडूरंगानेच आणली मग त्यामागच्या त्यांच्या भावना काय होत्या हे जाणून होण्यास ते पॅराग्राफ फार महत्वाचे ठरतात आवलीचे मोठेपण दाखवण्यासाठी लेखिकेने याचा वापर खुबीने करून घेतला आहे म्हणूच कादंबरीचा तो उच्चांक ठरतो.
अशी ही ''तुकयाची आवली'' ......मात्र या आवलीची गाथा सांगताना कळत - नकळत काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत का कोणास ठाऊक पण आवली पहिल्या पानापासून पकड घेत नाही आपणाला तिच्याशी समरास व्हायला थोडवेळ जावा लागतो याशिवाय आवलीच्या पुर्वर्धात काही प्रंसग उदाः मुलगीचा हात मागणे इतक्या सहजतेने घेतले गेले आहेत की ते खरेच इतक्या सहजतेने आयुष्यात घडतात का असा प्रश्न पडतो एक दोन ठिकाणी लेखणी थोडी वाहावत गेली आहे पण तेवढया पुरतीच! याऊलट शिवाजी महाराजांच्या भेटीच्या प्रसंगाला अतिशय कमी महत्व दिलेले आहे जे सारखे मनाला खटकते याशिवाय, आवली उलघडताना त्यांनी काही नात्यांची वीण उलघडलेलीच नाही...तुकारामांची पहिली पत्नी जीवंत होती. कल्पनाविश्व वापरायचे होते तर यांच्यातील संवाद खुलवून आवलीला अधिक योग्य घडवता आले असते याशिवाय तुकाराम आवली यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख जवळजवळ नाहीच जे असणे अत्यंत गरजेचे होते काही दगड सोडल्यास हा संपूर्ण कल्पनाविष्कार आहे या अविष्काराचे ध्येय साहजिक आवलीला एक चांगली निदान कजाग नसणारी स्त्री म्हणून उभी करणे हाच आहे ,पण काही ठिकाणी लेखिका तटस्थता व आपलेपणा या गोधळात पडलेली दिसते. त्यामुळे आवलीची भांडणे तुकारामांवर काय परिणाम करीत यांच्या उल्लेख जास्त नाही. त्यामूळे तीची दुसरी बाजू जवळजवळ झाकोकली जाते जे व्यक्तिवित्रणाचा मरक आहे ..स्त्रीचा विचार केला असल्याने सहानभूतीची भावना ठिकठिकाणी उमटते.ज्याची आवश्यकता नाही..
या सर्व त्रुटींसह आवली चांगली आहे. उपमांचा योग्य वापर ओघवती भाषा योग्य भावना दर्शन यामुळे साहित्यिकदृष्टया आवली उत्कृष्टच आहे. मेहता पब्लिशिंगचे पुस्तक असल्याने मुखपृष्ट व मांडणी अत्युत्तम ! या सर्वामुळे पुस्तक हातात घेतल्यावर खरचं झपाटायला होते. ते सोडवत नाही पण या सर्वाहून महत्वाचे की लेखिकेने इतिहास व कल्पनेच्या मेळातून समजाला एका समजुतीतुन बाहेर काढायचा प्रयत्न केलाय.ज्याप्रमाणे तीने पुस्तक नवर्यासाठी मरणार्या हिरकणींना अर्पण केले आहे.त्याचप्रमाणे एका हिरकणीला जनाच्या वनवासातून दूर करायचा प्रयत्न केला आहे. शेवटी असं म्हटलय की ''शेवटी का होईना त्या विठूरायानं मान्य केलं होत की तुकाराम फक्त आवलीचे होते आणि आवली तुकारामांची. ती होती फक्त तुक्याची आवली'' पण या आवलीला 400 वर्षानं वा होईना समाजाचं बनवलयं या कादंबरीनं आता ती झाली आहे. ''समाजाची आवली'' कायमची ....
अभिप्राय
वेदश्री
वेदश्री · Fri, 9 Jul 2010 - 06:27
सुंदर झाला आहे पुस्तकपरीचय. पुपमध्ये तू मांडलेली पुस्तकाची तितकीशी न भावलेली/खटकलेली बाजू वाचूनदेखील पुस्तक आवर्जून वाचावेसे वाटतेय.. हा बहुतेक तुझ्या पुपचाच प्रताप! १५० रुपयाला महाग नाही वाटतेय पुस्तक... नक्की वाचणार आवली!
पुप पकाशित करायच्या आधी एकदा प्रूफ रीडींग करत जा.. शेवटच्या २-४ परिच्छेदात अगदी घाईगडबडीत टाईप केल्याने काही चुका झाल्यासारख्या वाटत आहे. संदर्भाने वाचता येते आहेच पण परिपूर्णतेच्या दृष्टीने सांगितले.
विनायक पाचलग
विनायक पाचलग · Fri, 9 Jul 2010 - 09:10
नक्कीच
वेदष्री ताई ,
खरे सांगायचे तर हा लेख जवळ जवळ १.५ वर्षापुर्वी मिपावर लिहिला आहे ...
निदे च्या सांगण्यावरुन तो इथे प्रकशित केला ,पण तेव्हा गडबडीत चेक करायला विसरलो
असो
आता करतो
आपला प्रतिसाद आवडला
मनापासुन धन्यवाद
विनायक
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 9 Jul 2010 - 09:14
तरीच म्ह्टलं या पुस्तकावर मागेही कोणीतरी लिहिले होते.. ते शोधले तर तुझेच नाव निघाले :)
शिवाय प्राजुताईने याचे रेडियोवर वाचनही केले होते बहुतेक (आता नक्की आठवत नाहि)
तु आधी लिहिलेला पुप वाचला होता.. तेव्हापासून पुस्तक वाचायचं म्हणतोय.. अजून योग नाहि.. बघु कधी जमतंय.
पुस्तक परिचय छानच हेवेसांन
विनायक पाचलग
विनायक पाचलग · Fri, 9 Jul 2010 - 10:19 · उत्तर
जाता जाता ..
प्राजु तै ने लिहिलेले अजुन अवेलेबल असेल का ई प्रसारण वर
सध्या नेट अनलिमिटेड आहे ,
त्याचा फायद घेऊन ऐकवे म्हणतोय...
विनायक