मुखपृष्ठ

माझे शेल्फ

२६/११ मुंबईवरील हल्ला

इंग्रजी शीर्षक
26-11 Mumbaivaril Halla
सारांश

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (बोरीबंदर स्टेशन), कामा हॉस्पिटल, द न्यू ताजमहाल हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, ट्रायडंट हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊस वगैरे स्थळांवर दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला, हाताँब फेकले. बऱ्याच निरपराध नागरिकांचा त्यात नाहक बळी गेला. लाल किल्ला आणि संसदभवन यावर पूर्वी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यापेक्षा व्याप्ती आणि तीव्रता या बाबतीत मुंबईतील हा हल्ला अधिक मुंबईतील हा हल्ला अधिक प्राणघातक आणि भयावह होता. या हल्ल्याचे नियोजन अधिक काटेकोर होते. या हल्ल्यासाठी बत्तीस अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते आण त्यापैकी दहा जणांना कराचीहून समुद्र मार्गे पाठवण्यात आले. गुजरातमधील पोरबंदर येथे या अतिरेक्यांनी एमव्ही कुबेर ही मासेमारी बोट हस्तगत करून मुंबई गाठली. एका डिंगीतून मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर उतरून आपल्या ५ टीम केल्या आणि वेगवेगळ्या पूर्व नियोजित ठिकाणी जाऊन बाँबस्फोट आणि गोळीबार करून साठ तास मुंबईला वेठीला धरले. प्रारंभी पोलिसांनी या अतिरेक्यांना तोंड दिले. कामा हॉस्पिटलजवळ हेमंत करकरे (एटीएस प्रमुख), अशोक कामठे, विजय साळस्कर वगैरे पोलीस अधिकारी जबरदस्त जखमी झाले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी पुढे आले. तीन दिवसात या दलाचे १८ जवान बळी पडले. दहा पैकी नऊ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. दहावा अतिरेकी कसाब याला जिवंत पकडण्यात आले. या हल्ल्याविषयी वेगवेगळ्या पत्रकारांना लिहायला सांगून, त्याचे संकलन करण्याचे महिला पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ठरवले. ‘तहेलका’ या वृत्त–नियतकालिकाच्या न्यूज अँड इन्व्हेस्टिगेशन्स विभागाच्या त्या संपादिका आहेत. ‘कारगिल–एक अकथित कथा’ या त्यांच्या पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला आहे. २६/११ मुंबईवरील हल्ला या पुस्तकात या हल्ल्यातील प्रमुख स्थळी घडलेल्या घटनांचे नाट्य शब्दांच्या माध्यमातून उभे करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. त्या त्या स्थळी प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी हजर असणारे आणि वृत्तांकन करणारे हे पत्रकार लेखक असल्याने, संबंधितांच्या मुलाखती घेऊन आपल्या समोर घडलेल्या घटनांच्या चित्रणात तपशीलवार भर घातलेली असल्याने हे पुस्तक विश्वासार्ह दस्ताऐवजाच्या दर्जाला पात्र झाले आहे. वृत्तवाहिन्यांना शोधक कंटेन्ट पुरवणाऱ्या ‘तहेलका’ या संस्थेद्वारे अनेक सनसनाटी प्रकरणांना वाचा फोडणारे आणि सध्या आजतक या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे पत्रकार आशिष खेतान यांचे या पुस्तकात हॉटेल ताजमधील अंधारयात्रा (४० पृष्ठे) हॉटेल ओबेरायमधील धुमश्चक्री (२० पृष्ठे), कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास (५० पृष्ठे) असे तीन लेख आहेत. दृश्य एक, दृश्य दोन अशा नाट्यपूर्ण शैलीत त्यांनी विविध घटना शब्दबद्ध केल्या आहेत. दहशतवादी आणि सूत्रधार यांच्यातील महत्त्वाची संभाषणेही त्यात समाविष्ट केली आहेत. ताजमधील कर्मचाऱ्यांना शौर्याचीही साक्षेपाने नोंद केली आहे. ‘मार्कोसनी चेंबर्समधील सुमारे दोनशे जणांचे प्राण वाचवले’ (७१), ‘हॉटेलमध्ये खासदार असल्याचे कळल्यानंतर त्या खासदाराला ओलीस धरा किंवा ठार मारा असा आदेश या घटना टीव्हीवरून पाहणाऱ्या या हल्ल्याच्या पाकिस्तानमधील सूत्रधारांनी दिला.’ (६८) या सारखे तपशील या हल्ल्याचे गांभीर्य आणि संबंधित व्यक्तींचे मनोधैर्य प्रकट करतात. आशिष खेतान यांच्या या तीन लेखांनी पुस्तकाची निम्मी पृष्ठे व्यापलेली आहेत. कराची ते मुंबई प्रवासाचे तारीख - वेळेनुसार पुनर्रचित केलेले नाट्य अतिरेक्यांच्या चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखतीतून एटीएसच्या कार्यालयातील नोंदीवरून, आंतरराष्ट्रीय फोनवरील संभाषणातून, कसाबच्या कबुलीजबाबातून आपल्यापुढे उभे राहते. अतिरेक्यांनी वापरलेल्या बोटीचे तपशीलही त्यांनी एखाद्या बेस्टसेलर पाश्चात्य थ्रिलरच्या शैलीत दिले आहेत. सीएनएन-आयबीएनचे प्रमुख वार्ताहार जॉर्ज कोशी यांच्या लेखात बोरीबंदर स्थानकावरील हल्ल्याची हकीकत आली आहे. कसाब आणि इस्माईल हे अतिरेकी गोळ्यांचा वर्षाव करून प्रवाशांना मारत होते. तेथून ते चालत आझाद मैदानापर्यंत गेले. आलब्लेस हॉस्पिटलच्या मागाच्या दाराशी पोचले. दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडत पुढे जात राहिले. मेट्रोजवळ त्यांनी पोलीस निरीक्षक साळसकर यांच्यावर गोळी झाडली. त्यांचे प्रेत गाडीतून बाहेर फेकून अतिरेकी पोलीस जीपमधून पळाले. इस्माइल ड्रायव्हिंग करीत होता. विधानभवनाकडे त्याने पोलीस जीप नेली. पोलिसांनी तिचा मागचा टायर गोळीने टिपला. गाडी वळवताना कलंडली इस्माईलने धाक दाखवून तेथे असणाऱ्या शरण यांच्या स्कोडा गाडीची किल्ली मिळवली. इस्माईलने ती चौपाटीकडे नेली. पोलिसांनी उभ्या असलेल्या अडथळ्याशी गाडी न थांबल्याने गोळ्या झाडल्या. ईस्माइल मेला एके-४७ घेतलेला कसाब मेल्याचे सोंग करून रस्त्यावर पडला.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
295.00
ISBN
9788184982046
समुदायाने जोडले
बंद