माझे शेल्फ
आभाळझुंज
ग्रामीण भागाचा स्वातंत्र्यानंतर शिक्षणामुळे, साखर कारखान्यांमुळे व अन्य उद्योगांमुळे कायापालट झाला; पण त्यात वरच्या थरावरचे नेते, गुंड वगैरेंनीच हात धुऊन घेतले. भोयर यांनी ग्रामीण भागातील धरणामुळे काही लोक कसे गब्बर झाले आणि त्यांनी इतरांना फसवून आपल तुंबडी कशी भरली याचे दाहक चित्रण ‘आभाळझुंज’मध्ये वामन न्हाव्याच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेतून केले आहे.धरणच मरणाच्या दारात कोंडते तेव्हा... ‘आभाळझुंज’च्या निर्मितिप्रक्रियेबाबतचा अनंत भोयरांचा अनुभव जिवंत आहे. ज्या गावात लहानाचे मोठे झालेले भोयर त्याच गावाचे पुनर्वसन शासन करते, परंतु ते पुनर्वसन अर्ध्याच गावाचे झाल्याने पुनर्वसितांचे निर्माण झालेले प्रश्न आणि उरलेल्या जुन्या गावातील बलुतेदारापासून तर अलुतेदारापर्यंतचे पोटासाठी जगण्याचा जीवघेणा संघर्ष अशा दुहेरी टप्प्यावर ही कादंबरी झुंजताना विचारते, माणसाचा कोणता विकास ‘जगण्याचा’ की ‘मरणाचा’, हा संदिग्ध सवाल जिवंत मनाच्या माणसाला कादंबरी वाचताना वेळोवेळी छळतो आणि अजब शासनाचा गजब कारभार ही न्यायपूर्ण शासनाची विसंगत विकासाची प्रगती जगणाऱ्या माणसाच्या मनोधैर्याला धरणात कोंडते. सावेगावातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पडझड हा या कादंबरीचा मुख्य विषय असून मानवाला नैसर्गिक जगण्याचा अधिकारच शासन कसा हिसकावून घेतो, याचा सर्वसाक्षेपी विचार लेखकांनी बेंबीच्या देठापासून मांडलेला आहे. मेलेल्या जनावरांचे सांगाडे जसे शिंदबनात आढळावे तसे घरांचे सांगाडे प्रकल्पबाधित आणि पुनर्वसित अशा जुन्या-नव्या गावामध्ये आपल्या जगण्याची आणि मरणाची हकीकत बयाण करतात. जुन्या गावातील ही खंडारे मरणपंथी माणसासारखी शेवटची घटका मोजत आहे, तर नव्या गावातील विटामाती-सिमेंटच्या नव्या कोऱ्या घरांवर अद्यापि स्लॅब किंवा कवेलू न पडल्याने आपल्या मालकाच्या आटल्या गेलेल्या पैशाची कारुणिकता विशद करते. कादंबरीतील दाहकता रसिक मायबापाला क्षणोक्षणी आपली झुरलेली केविलवाणी काया आपल्या आस्वादक सौंदर्याच्या नजरेने टिपण्यास ही कादंबरी आकृष्ट करते, हेच तिच्या यशाचे सर्वांत मोठे गमक ठरते. या कादंबरीतील नायक वामन न्हाव्याचा एकाकी संघर्ष आणि मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा बाणा मुर्दाड शासनाच्या छाताडावर बसून त्याला लोकशाही मूल्याचा डोस पाजते. वामनचे घडविलेले व्यक्तिदर्शन कणखर, स्वाभिमानी, कष्टाळू आदी व्यूहातून मांडल्याने त्याचा परिस्थितीजन्य जगण्याचा संघर्ष आपणास ऊर्जस्वलता देऊन जगण्याचा नवा मंत्र देते म्हणून ही कादंबरी दुर्मुखलेल्या, भरकटलेल्या, झुरलेल्या माणसाला जगण्याची नवी उभारी देऊन जाते. ‘आभाळझुंज’मधील सर्वच पात्रे आपली सिद्धता स्वत:हून सिद्ध करीत असल्याने त्या पात्रांची निकड आपणास खिळवून ठेवते. वामनची बायको नर्मदा, मुलगी शकून, मुलगा सागर, सून प्रगती या सर्वांची स्थाननिश्चिती कादंबरीत स्वयंभू असल्याने ‘आभाळझुंज’चा ते एक अविभाज्य भाग बनते.’ सावेगावची करुण कहाणी हेरून अनंत भोयरांनी बाधित, वंचित प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न ‘आभाळझुंज’मध्ये केला आहे. धरणापूर्वी गावाची एकता, गुण्यागोविंदाने नांदणारे गाव, गावगाड्यात खूश असणारी जनसंपदा, गावचा रचलारमला डाव, गावाचे वैभव या संपूर्ण गोष्टींवर धरणाने पाणी सोडल्याने आणि शासकीय विकासाच्या नावाने माणसाला माणसापासून तोडल्याने गावात आता एकीनेकीच्या ऐवजी ताटातुटी आली आहे. कादंबरीच्या संदर्भात लेखकांचे मनोगत आपणास अंतर्मुख करून जातं.‘आभाळझुंज’ ही अनंत भोयर यांची किमान गरजांसाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची केविलवाणी कहाणी आहे. विदर्भातील वऱ्हाडी मातीचा जिवंत बाज आणि साज गुंफताना लेखकांनी स्वाभाविकत:च तेथील प्रादेशिक जीवनशैली, लोकसंस्कृती, त्यांची विचारसरणी, राहणीमान, वैशिष्ट्यपूर्ण बोली कादंबरीत एकजीव केलेली आहे.