मुखपृष्ठ
आदिपर्व (मालोजीराव भोसले)

माझे शेल्फ

आदिपर्व (मालोजीराव भोसले)

इंग्रजी शीर्षक
Aadiparva (Malojirao Bhosale)
सारांश

आदिपर्व या ऐतिहासिक कादंबरीने धुक्यात लपेटलेल्या मध्ययुगीन कालखंडाला प्रकाशात आणले आहे. छत्रपती शिवाजीराजे यांचे प्रपितामह मालोजीराजे भोसले यांचा कालखंड १५७४ ते सप्टेंबर १६०६. म्हणजे बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतरचा. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशही, इमादशाही,बरीदशाही यांच्यातल्या लढाया व सत्तासंघर्ष यांचा कालखंड. मराठा सरदार व शिलेदार यांच्यात महाराष्ट्रात हिंदुपद बादशाही स्थापन करता येण्याच्या शक्यतेचा विचारही कधी मनात न येण्याचा कालखंड. परकीय सत्तेची इमानाने चाकरी करण्याचा, वतनासाठी एकमेकांशी झुंजण्याचा आणि महाराष्ट्राच्या, भल्याचा विचार मनात नसण्याचा हा कालखंड होता. त्यातील एक मोठे राज्य म्हणजे निजामशाही. अहमदनगर ही त्याची राजधानी वऱ्हाड, बीड, पुणे, नाशिक हे चार प्रांत, कोकणातील चौल व रेवदंडा आणि कल्याण हा भूभाग निजामशाहीत मोडत असे. वेरूळला भोसले घराणे राहायचे. घृष्णेश्वर हे भोसल्यांचे दैवत. मालकर्ण भोसले हे मूळ पुरुष. त्यांना मालोजी व विठोजी असे दोन मुलगे. दोन वर्षांच्या अंतराचे. मालोजी उर्फ बाबाजी तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील मालकर्ण एका जुझात मारले गेले तेव्हा विठोजी जेमतेम एक वर्षांचा होता. मालकर्ण यांच्याकडे वेरूळगाव वावी, मुंगी, बनसेंद्रे, देऊळगाव,जिंती, हिंगणी, बेरडी यांचे निजामशाही वतन होते. मालकर्ण वारल्यावर शहाने हा सरंजाम जप्त केला. पदरात दोन मुले असलेल्या आऊसाहेबांकडे खासगीतला काही भाग, वाड्या, मोकादम्या एवढे उरले. त्यानी त्या आधारावर पतिमागे घर सांभाळले. मुलांना मोठे केले. बाबाजींच्या पत्नीचे नाव रेखाऊ. मालोजी वसुलीचे काम बघत. तर धाकटा भाऊ विठोजी फडाचे जमाखर्चाचे काम करायचा. मालोजी सोळा वर्षांचे असताना आजीकडे हट्ट धरून त्यांनी शिलेदार बनण्याचा विचार स्पष्ट केला. त्यावेळी निजामशाहीत सिंदखेडचे जाधवराव, मुधोळचे घोरपडे, म्हसवडचे माने, मलवडीचे घाटगे, फलटणचे वणगोजी राजे नाईक निंबाळकर असे नामवंत सरदार होते. फलटणचे वणगोजीराव, (मूळ नाव अनंगपाळ) यांचा दरारा मोठा होता. राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ, असा त्यांचा लौकिक होता. निजामशाहीत त्यांचा दरारा होता. बाबाजींनी त्यांच्या कानांवर मुलाचा हट्ट घातला. मालोजी व विठोजी लवकरच वणगोजीराजांकडे शिलेदारीत दाखल झाले. कोल्हापूर मुक्कामी मालोजींनी अचानक घाला घालू पाहाणा-या आदिलशाही तुकडीला पेचात पकडून प्रसंग निभावून नेला. निजामशहीवरचे संकट समूळ नष्ट वेâले. वणगोजी राजेंनी निजामशाहीकडे मालोजी, विठोजींची शिफारस केली. त्यांच्या आजोबांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना पुन्हा देण्यात यावा, असा तोंडी अर्ज केला. शहाने भोसलेबंधूंना, प्रत्येकी १५०० शिलेदारांची सरदारी, राजे ही किताबत शिवनेरी किल्ला व पुण्याचे वतन तर दिलेच आणि आजोबांच्या जप्त केलेला सरंजामही दिला. इथून भोसलेबंधुंच्या कर्तबगारीला वाव मिळत गेला. योजकता, झुंजाची आखणी, सैन्याची व्यूहरचना, शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेणे, नजरबाजांची योजना करणे, रयतेवर प्रेम करणे, परोपकारी वृत्ती, देव धर्म, संतमहंत यांच्यापुढे लीन होणे यामुळे मालोजी सर्वांना प्रिय होत गेले. बघता बघता त्यांचे नाव मोेठे झाले. त्यातच त्यांचे लग्न वणगोजी राजेंची कन्या दीपा हिच्याशी झाले. हा संबंध उभयपक्षी हिताचा झाला. निजामशाही नेकजात मराठा सरदारांवर अवलंबून होती. त्यात आता मालोजी राजे भोसले यांची गणना होऊ लागली. मालोजीराजे यांनी नगरचे सावकार शेषाप्पा यांचा विश्वास संपादन केला तर निजामशाहीतील महत्त्वाची व्यक्ती व दफ्तरातील जबाबदार व एकूणच माहीतगार अशी महत्त्वाची व्यक्ती निळोपंत यांच्याशीही संबंध वाढवले. त्यामुळे निजामशाहीत कोठे काय चालले आहे. याची त्यांना खबर मिळायची. हा काळ अंदाधुंदीचा होता. मनगटशाहीचा होता. दगाबाजी, फंदाफितुरीचा होता. निजामशाहीत खुद्द शहाला आणि त्याच्या सरदारांनी सदैव जागृत राहावे लागे. त्यात निजामशाहीत खुद्द वजिराने बगावतीचे वर्तन केले. पंधराव्या शतकात भारतात पोर्तुगीजांचे पाऊल पडले. दीवदमण ते गोवा हा सागरी भाग निजामशाहीचा. चौल, रेवदंडा, कल्याण (खाडीमार्गे) इथे पोर्तुगीजांचा सतत त्रास असे. (त्याबरोबर जंजि-याच्या शिद्दीचा त्रास तर कानीकपाळी ठेवलेलाच. त्यावेळी स्त्रियांच्या तोंडी नेहमी म्हटले जायचे, ‘आजबाई सारवा । उद्या बाई तारवा’ म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरी सुखरुप आहात. हौस म्हणून घर, अंगण सारवा. त्यावर रांगोळी रेखा. पण शिद्दीचे सैनिक कधी छापा टाकतील आणि पुरुषांची कत्तल करून, लुटालूट करून, घरांना आगी लावून बायकांना फरपटत आपल्या गलबतांकडे नेतील याचा काही नेम नाही. आदिलशहाचा एक सरदार फितूर होऊन निजामशहाला ३०० हत्तींची भेट आणि शेकडो होन घेऊन शहाकडे त्याने आसरा मागितला. शहाने त्याचा मोठा गौरव केला. मनसब दिली. शाही किताब दिला.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद