माझे शेल्फ
अद्वैत
रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी १९९२ साली लिहिलेली द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी हि पहिलीच कादंबरी इतकी गाजली कि तिच्या लाखो प्रति संपल्या . हि प्रेमकहाणी आहे फोटोग्राफर असलेल्या रॉबर्ट किनसेड व एका खेडेगावातील शेतकऱ्याची बायको असलेल्या फ्रान्सेस्का जॉन्सन यांची . पन्नाशी ओलांडलेला तरीही कणखर शरीरयष्टी असलेला, उंचनिंच, गडद निळ्या डोळ्यांचा, कलंदर, फोटोग्राफीसाठी जगभर फिरलेला असा हा रॉबर्ट किनसेड मॅडिसन काउंटी या गावात असलेल्या ब्रिजेस चे फोटो काढायला म्हणून येतो . पत्ता विचारण्याच्या निमित्ताने त्याची तिथे भेट होते फ्रान्सेस्का जॉन्सन या गृहिणीशी . तिचा नवरा आणि २ मुलं आठवडाभरासाठी परगावी गेलेली असतात आणि हि घरात एकटीच असते. एकमेकांकडे पाहताक्षणीच एक अनामिक हुरहूर लागते आणि दोघेही एकमेकांकडे अक्षरशः ओढले जातात . ती त्याला ब्रिज दाखवायला घेऊन जाते. नंतर चहाला घरी बोलवते . दिव्याच्या मंद प्रकाशात सिगरेट , आईस टी घेत गप्पा गोष्टी होतात . ती त्याच्या समोर आपले मन मोकळे करते . फक्त चार दिवसांचा सहवास पण दोघे तनामनाने एकत्र येतात. इतक्या अद्वितीय प्रेमाचा अनुभव घेतात कि दोघं कायमची एकमेकांची होऊन जातात. त्या चार दिवसानंतर ती दोघेही परत कधीही भेटत नाहीत पण एकमेकांना विसरूही शकत नाहीत . पुढे अनेक वर्षांनी जेव्हा फ्रान्सेस्काच्या मृत्यूनंतर तिची पत्रे आणि डायऱ्या तिच्या मुलांना मिळतात आणि ते वाचून झाल्यानंतर मुलांना जाणवतं कि आपल्या आईच्या आयुष्यात अवचित आलेल्या एका परपुरुषावर तिचं किती जीवापाड प्रेम जडून गेलं पण मुलांच्या व नवर्याच्या प्रेमापोटी तिनं आपल्या सुखाला तिलांजली दिली .तिची हि कहाणी जगासमोर आणण्याचा विचार मुलं करतात आणि त्या डायऱ्या व पत्रे लेखकाकडे आणून देतात . त्यांच्या विनंतीला मान देऊन लेखक हि गोष्ट लिहायला सुरवात करतो . तुमच्या हृदयाचा ठाव घेणारी अत्यंत नाजूक तरल अशी हि प्रेमकहाणी आहे. जी आपल्याला अस्वस्थ करून सोडते इतकी कि वाचताना डोळ्यातून पाणी आणि घशाशी आवंढा येतोच. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्का यांची ताटातूट आपल्या काळजाला चटका लावून जाते . A Thousand Country Roads - द ब्रिजेस ऑफ ...... च्या यशानंतर दहा वर्षांनी रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी हि कादंबरी लिहिली. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्का या दोघांचे पुढे काय झाले ? ते एकमेकांना पुन्हा भेटले का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेखकाने या कादंबरीत देण्याचा प्रयत्न केलाय .रॉबर्ट किनसेड आता वयस्कर झालाय. त्याच्या जवळ आता हायवे नावाचा कुत्रा आहे. अजूनही जमेल तशी फोटोग्राफीची कामे तो करतोय. इथे परत रॉबर्ट च्या मागील आयुष्यात लेखक जातो. वयाच्या तिशी बत्तिशीत रॉबर्ट चा संबंध विन मॅकमिलन या तरुणीशी येतो. त्यातून कार्लिस्ले नावाचा मुलगा जन्माला येतो. पुढे तो आपल्या आईला वडिलांबद्दल विचारतो. तिला जास्त काही सांगता येत नाही पण जी काही माहिती तिच्याकडून मिळते त्या जोरावर तो आपल्या वडिलांचा शोध घायला सुरवात करतो. पुढे रॉबर्ट आणि विनची भेट होते. नंतर रॉबर्ट आणि कार्लिस्ले एकमेकांना भेटतात. दोघे भरपूर गप्पा मारतात. एकमेकांना पत्रं पाठवतात. रॉबर्ट स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेण्याचं ठरवतो. कारण आता आपण एकटे नाही हि भावना त्याच्या मनात जागी होते. पुढे विन, रॉबर्ट, कार्लिस्ले एकत्र येतात का ? इकडे फ्रान्सेस्का चा नवरा रिचर्ड मरण पावतो, मुलं मोठी होऊन स्वतंत्र आयुष्य जगू लागतात. फ्रान्सेस्का मात्र आपल्या घरातून नाही. न जाणो रॉबर्ट परत आला तर या आशेवर ती जगात राहते. रात्रीच्या एकाकी वेळेत ते चार दिवस आणि चार रात्री ती जे वेगळंच जीवन जगते, विलक्षण उत्कटतेने प्रेम करते त्याची आठवण काढत राहते. शेवटी रॉबर्ट कडे जाण्याचा ती निर्णय घेते. रॉबर्टचे फ्रान्सेस्का चे पुढे काय होते हे मी सांगत नाही. वाचकांनीच ते जाणून घ्यावे. लीना सोहोनी यांनी इतका सुंदर अनुवाद केलाय कि आपण मूळ पुस्तकच वाचत आहोत असं वाटतं. द ब्रिजेस ऑफ ... वर चित्रपटही निघालाय. त्याच्या काही clips youtube वर पहिल्या. सिनेमा नक्कीच चांगला असणार असं वाटतंय.