माझे शेल्फ
अॅट एनी कॉस्ट
‘बालगंधर्व’ ही कादंबरी लिहून वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिराम भडकमकर या विख्यात रंगकर्मीने आपल्या अनुभूतीला न्याय देणारी ‘अॅट एनी कॉस्ट’ ही कादंबरी लिहिल्याने एक अस्सल अनुभव देणारी कादंबरी वाचल्याचे समाधान मिळण्यासारखे आहे. या वाचनीय तरीही चिंतनप्रधान कादंबरीने एका रंगकर्मीची व्यथा आणि चिंतन नेमकेपणाने पोचवल्याचे समाधान दिले आहे.या कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेले अरविंद आणि आभास हे दोघे उच्च जाणिवा आणि समज असणारे श्रेष्ठ रंगकर्मी आपापल्या पद्धतीने या नव्या माध्यमाला कसे भिडतात, हे अभिरामने स्वानुभवाचा भक्काम पाया असल्याने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. अरविंद हा दिग्दर्शक योगायोगानेच एका चॅनलच्या मालिकेत ओढला जातो आणि दूरदर्शन मालिकांचे उबगवाण्या सवंगतेने बरबटलेले जग त्याच्याच नजरेतून ‘क्रिटिकली’ तपासले जाते. चॅनेलची प्रमुख संयुक्ता, निर्माता विकास आणि दुसरीकडे अरविंद आणि आभास या वेगवेगळ्या पातळीवरच्या प्रोटॅगोनिस्टकडून मुख्य पेच चांगला चर्चिला जातो. यात कोणाच्याच भूमिकेचे एकाच रंगातले चित्रण नाही, तर सर्व बाजूंनी येणारे सहिष्णू चित्रण आहे, हे या कादंबरीचे मोठेच यश आहे
.या साऱ्या तात्त्विक चिंतनासाठी अभिरामने तृतीय पुरुषी निवेदन, दारू पिऊन मारलेल्या गप्पा, इंटरनेटवरचे चॅटिंग, मीटिंग्जमधले वाद अशा विविध माध्यमांचा वापर केल्याने, हे तत्त्वचिंतन पुस्तकी न होता जिवंतपणे समोर येते.सीरियलमधली बिनडोक कामे करून भरपूर पैसा मिळवू आणि एक दिवस या सवंग माध्यमाकडे पाठ फिरवून त्या पैशाच्या बळावर आपल्याला हवे तसे उत्तम नाटक करू, असे स्वप्न बघत या चक्रव्यूहात शिरलेला अरविंद नकळत त्यात कसा अडकत जातो, याचे हे चित्रण उत्तम आहे. या प्रवासात अभिरामने टीव्ही-मालिका आणि त्यांचा समाजावरचा परिणाम, त्या बनवण्यामागची मानसिकता, त्यातले देखील जीवघेणे ताण हे सारे अतिशय अस्सलपणे रंगवले आहे. एखाद्या मालिकेसारखी कादंबरी उत्कंठा वाढवत पुढे पुढे सरकत राहते. यामुळे कादंबरी वाचनीय आणि उत्कंठावर्धक होते.